कन्यादान
कन्यादान
आज खूप दिवसांनी श्वास घेतोय म्हणजेच कथा लिहतोय.
कन्न्यादान
आज आई बाबांना तीन वर्षानंतर पत्र लिहायचं ठरवलं. कारण हे एकटेपण मला पटत नाही. सगळी दुनिया मला वाईट बोलली तरी मला चालेल पण माझेच आई बाबा मला चुकीचं समजले तर आत्मा मेल्यानंतर पण तडपडत राहील. खूप विचार केला आणि आई बाबांना पत्र लिहलं
प्रिय आई बाबा,
स.न. वि. वि. पत्र लिहण्यास कारण कि, आज मरता मरता वाचलो. मला आता माझा भरवसा नाही. मी सध्या नक्षलवादी प्रदेशात महाराष्ट्र राज्य राखीव दलात काम करतोय. छत्तीसगडला आहे. इथे पोलीस म्हणजे शत्रू आहेत. कुणाला कळलं कि हा पोलीस आहे तर सरळ त्याची हत्त्या केली जाते. पोलिसाच्या गाड्या बॉम्बने उडवल्या जातात. आता छत्तीसगडच्या दवाखान्यात आहे. गेल्या आठवड्यात आमच्या पोलीस जीपवर हल्ला झाला आमचे दोन साथीदार शहीद झाले. मी आणि अजून तिघे जखमी झालो आहोत. माझं पण असच काही होऊ शकत पण मला त्याच बिलकुल दुःख नाही. कारण तिरंग्यात लपेटून मरण नशिबवानालाच भेटत. खंत याच गोष्टीची असेल कि माझ्या शवाला अग्नी द्याला नातेवाईक किंवा तुम्ही नसाल. पण ती खंत खूप मोठी शिक्षा आहे ती मला मेल्यानंतर पण मरु देणार नाही. मी माधुरीला घटस्फोट दिल्यापासून तुम्ही आणि सर्व नातेवाईकांनी मला वाळीत टाकलं. माझाशी माझे काही जवळचे मित्र पण नाराज आहेत. मी तुमचा सर्वांचा दोषी आहे मला फाशीची शिक्षा दिली तरी मला मान्य असेल पण प्रत्येक आरोपीला आपली बाजू मांडण्याचा अधिकार असतोच म्हणून हे पत्र लिहतोय. माझं माधुरीशी तुम्ही सर्वानी लग्न करून दिल आणि मी कुणाचंही न ऐकता तिला ८ महिन्यातच घटस्फोट दिला यावरुन तुम्ही सर्व नाराज आहे. पण प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. तुम्ही माझं चांगलं व्हावं म्हणून माझं माधुरीशी लग्न लावून दिल. तुमचं म्हणणं होत कि ३१ गुण जुळत आहेत लग्न करुन टाक. मी तुमच्या इच्छेने लग्न केलं. माधुरी खूप चांगली मुलगी आहे. त्याबद्दल मी काही बोलणार नाही. माधुरी एम बी ए झाली होती. आणि मी फक्त बारावी. पण मला सरकारी नोकरी होती आणि तुमचा चांगुलपणा म्हणून तिच्या आई बाबांनी माधुरीच माझाशी लग्न करुन दिल. यात चुकी कुणाची नव्हती. इथं पर्यंत सगळं मस्त होत. माधुरी पण माझ्यासोबत खुश होती. पण नंतर एक अशी गोष्ट झाली कि मला घटस्फोटाचा अवघड निर्णय घ्यावा लागला.
त्या दिवशी माझ्या मोबाईलचा चार्जर मिळत नव्हता मग मी माधुरीच्या पर्स मध्ये तिचा चार्जर शोधत होतो त्यामध्ये मला एक पत्र मिळालं माधुरीला अमेरिकेत नोकरीची संधी मिळाली होती. तिकडे तिला १२ लाख पगार एक घर एक गाडी मिळणार होत. आणि ही गोष्ट त्या मूर्ख मुलीने माझ्यापासून पण लपवली होती. मी तिला विचारलं
मी: हे पत्र कसलं
माधुरी: काय नाही हो. त्यात खास काही नाही.
मी: पागल आहेस तू ? जा ही संधी परत कधी मिळणार नाही.
माधुरी: नाही. आता वेळ गेली. आता आपली स्वप्न सजवायची आहेत.
नंतर मी सरळ निघून गेलो. थोडा नाराज होतोच. मी नाराज झालो कि समुद्र किनारपट्टी शोधतो. आणि त्यादिवशी मी गिरगावला चौपाटीला जाऊन बसलो. माधुरीला भेटलेले पत्र माझ्याकडेच होत. ती संधी कुणाला भेटत नाही ती तिला भेटली होती. पण आता लग्न झालं म्हणून तिने ती संधी एका बाजूला ठेवून दिली. एका सरकारी कर्मचारी आज एका मुलीवर किती मोठ ओझं झाला होता. ती गप्प बसली कारण तिला माहिती होत कि कोणी तिला अमेरिकेला जाऊन देणार नाही. मी पण नाही. कारण एका मुलीचं जग लग्न झाल्यावर कसं बदलत याची जाणीव मला आता झाली होती. पण मला ते पटत नव्हतं. हे पण खरं होत कि मी माझी पोलिसाची प्रिय नोकरी सोडून अमेरिकेला तिच्यासोबत जाऊ शकणार नव्हतो. पोलिसात कमी पगार मिळो, काही सुविधा नसली तरी पोलीस नोकरी मला प्राणापेक्षा जास्त प्रिय आहे. कदाचित हे माधुरीला कळलं असेल म्हणून ती मला काय बोलली नव्हती. मनात विचारांचं वादळ निर्माण झाला होत. एका बाजूला एका बापाने मला कन्न्यादान करुन एका मुलीची जवाबदारी दिली होती. आणि एका बाजूला एका मुलीला पूर्ण एका कुटुंब सांभाळायची जवाबदारी मिळाली होती. आणि ती जवाबदारी सांभाळायची तिने ठरवलं होत. पण का असं. हे चुकीचं आहे यार. मी खूप विचार केला आणि निर्णय घेतला माझ्या नात्यातून तिला मुक्त करून त्या पक्षाला आपल्या मनासारखं उडून द्याच. पण हे खूप कठीण काम आहे.
त्यानंतर मी त्याच गोष्टीचा विचार करत होतो. माणसाचं डोकं वाईट काम करण्यासाठी चांगलं चालत म्हणून मी एका कॉल गर्ल ला पैसे दिले आणि तिला माझी खोटी गर्लफ्रेंड बनवलं आणि माधुरीच्या नजरेत पडलो. माधुरीला हिणवलं, तिच्याशी खूप भांडण केली. आणि नंतर माझं चरित्र कसं घाण आहे हे सर्वाना पटवून दिल. कायद्याने मला घटस्फोट मिळवून दिला. त्या दुःखात माधुरीने अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला. माझ्या मनात नसताना हे मोठं कारस्थान मी केलं. पण याशिवाय मला काहीच पर्याय सुचत नव्हता. एका वर्षाने पण माझं पूर्ण लक्ष माधुरीवर होत. सुयोग हा रमा मावशीचा अमेरिकेत राहणारा मुलगा होता. तिच्या आईबाबांना मी माधुरीचा फोटो एका भटजी कडून पाठवला. त्यांनी तिला पसंद केलं. सुयोग आणि माधुरीच लग्न झाल. तुम्ही पण हसत हसत तिकडे गेला होता. पण ते मीच जुळवलं होत. कारण सुयोग तिच्या योग्य मुलगा होता. माझं अजून पण तिच्याकडे लक्ष आहे. आता ते दोघे खूप खुश आहेत त्यांना आता एक जय नावाचा गोड मुलगा पण आहे. माझ्या एका बलिदानानंतर एका मुलीला एका योग्य जोडीदार आणि एका मुलीला तिच्या स्वप्नांचं सुख मिळालं होत जे तिला मिळायला हवं होत. माधुरीच लग्नाआधीच स्वप्न होत कि अमेरिकेत जाऊन नोकरी करायची. पण ते स्वप्न आमच्या नात्यामुळे तुटलं होत. मी फक्त ते जोडायचा प्रयत्न केला. मी यशस्वी पण झालो. मी वाईट नाही आई बाबा. तुमचे संस्कार वाया गेले नाहीत. तुमच्या कडूनच एक गोष्ट शिकलो होतो कधीही स्वतःआधी दुसऱ्याचा विचार करायचा. प्रत्येक मुलीला पहिल्या सामन्यात तिचे वडील सांभाळतात. आणि दुसऱ्या सामन्यात तीच जवाबदारी एका नवऱ्यावर येते. माधुरी माझ्या बायकोसोबत माझी मुलगी पण होती. आणि मला मुलीच्या सुखासाठी बायकोला सोडावं लागलं. मी माधुरीला कारण सांगून घटस्फोट दिला असता तर तिने दिला नसता आणि कदाचित देऊन ती मला विसरू शकली नसती. म्हणून मी वाईट बनून तिच्याकडून घटस्फोट घेतला. कृपया ही गोष्ट कुणाला सांगू नका. फक्त मनाला वाईट वाटून घेऊन नका. मी माझ्या वर्दी सोबत खूप खूप खुश आहे. माझ्या वर्दीशी प्रामाणिक आहे. आता आपली भेट कधी होईल माहित नाही. पण हे पत्र भेटलं तर मला फोन करा. मला तुमची खूप खूप आठवण येते. बाबा तुमच्या गोळ्या वेळेवर घरी याव्यात याच मी नियोजन केलं आहे. आई जास्त चीड चीड करू नको. माझं लग्न करून सुख तुम्ही लिहलं होत पण एका मुलीच्या सुखासाठी तुम्ही लिहलेलं सुख मला खोडाव लागलं. आई मी जमलं तर यावर्षी दिवाळीत सुट्टी काढून तुम्हाला भेटायला येणंच फराळ भरपूर बनवून ठेवणे. आणि मला जमलं तर माफ करावं. माझी हळवी आई पत्र वाचून बिलकुल रडू नकोस ग. मुलांची स्वप्न पूर्ण करायला तुम्ही स्वतःच मन मारलं होत ना मी पण तेच एका चांगल्या मुलींसाठी केलं. बाबा लहानपणी तुम्ही बरोबर बोलत होता मी खरच बिनडोक आहे. हा हा हा हा. दोघांनी स्वतःची काळजी घ्या. आईसोबत विनाकारण वाद घालू नका.
तुमचा प्रामाणिक मुलगा
विजय
पत्र आई बाबांना मिळाल्यानंतर पुढच्या आठवड्यात ते मला दवाखान्यात भेटायला आले. दोघे खूप खूप रडले. माधुरीचे आई बाबा पण आले होते. माझ्या आईच्या तोंडात काही राहत नाही. सर्वानी माझी माफी मागितली. मी एकच विनंती केली कि कुणी माधुरीला काही सांगू नये.
कथा आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया लाईक करून, कमेंट करून, शेअर करून कळवाव्यात.
वाचकांच्या हृदयाचा मोफत भाडेकरू
मन एक लेखक