क्लबहाऊस
क्लबहाऊस
"तु सांगशिल का मला इथे का बंद केलयं? तु आधी हा दरवाजा उघड. . . " राणी खिडकीतुन ओरडत होती. बंद दरवाज्यावर वारंवार हात मारत होती.
"तु आता आतच रहा. सांगितलं होतं तुला कि बाहेर जाऊ नकोस, तरिही तु गेलीस. राणी तुला का मान्य नाही कि तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय ते." आदित्य चिडुन बोलत होता.
"अरे मी खरं बोलतेय, मला काही झालेल नाही. मला त्या जोशी काकु काल भेटल्या होत्या यात काही खोटं नाहिये अन् यावरुन माझ्या डोक्यांवर परिणाम झालाय हे हि सिद्ध होत नाही. तु आधी मला बाहेर काढ." राणी बोलत होती.
"अगं तुला कळत कसं नाही त्या जोशी काकुंना जाऊन महिना झालाय. मग काय त्यांची आत्मा भेटली का तुला." आदित्य
"त्यांची इच्छा अपुर्ण राहीली म्हणून. . . . ." राणी
"म्हणून तु त्या छोट्या चिऊला त्याच्या नातीला टेरेस वर घेऊन गेली. चिऊ वाचली आज नाहीतर. . ." आदित्य रागात बोलत होता. राणी ऐकत होती.
"आपल्याला हा फ्लॅटही लवकरच सोडावा लागनार अस दिसतयं" आदित्य हताश होत बोलला.
राणी अन् आदित्य एक छान कपल. दोघांच एकमेकांवर जिवापाड प्रेम. आदित्य एक शिक्षक तर राणी गृहिणी. पण गेल्या काही महीन्यापासुन राणी ला काही तरी झाले होते. ती आत्म्यांसोबत बोलती असं काही म्हनायचे तर काही म्हनायचे कि तिच्या डोक्यांवर परिणाम झालाय. आत्मे इच्छा पुर्ण करन्यासाठी आपल्याशी बोलतात असं राणी ला वाटायचं. तर आत्मा, भुत हे सर्व मनाचे खेळ असं आदित्यच ठाम मत होतं. अखेर या सगळ्या नाट्यानंतर ही सोसायटी सोडावी लागनार होती.
थोड्याच दिवसात आदित्यला एक नवीन फ्लॅट मिळाला. ते दोघे वृंदावन सोसायटीत राहायचा आले. घर छान होत. मात्र राणी आता खुपचं शांत झाली होती ती क्वचितच बोलत असे. वृंदावन सोसायटीचे सचिव पवार राणी आदित्य ला भेटायला आले. चहा सोबत छान बोलणं झाल्यावर जाताना त्यांनी वेळीअवेळी बाहेर फिरत जाऊ नका अस आवर्जुन सांगितलं. आदित्य ची सुट्टी संपायला अजुन चार दिवस होते. तो राणी ची पुरेपुर काळजी घेत होता.
अशाच एका संध्याकाळी. राणी औषधामुळे झोपली होती. आदित्य सोसायटीच्या खाली आला. वातावरनात गारवा होता. सोसायटीच्या कंपाउंडच्या जवळच एक क्लबहाऊस होत. तिथुन लोकांच्या हसन्याचा आवाज येत होता. नवीन लोकांची ओळख होयील म्हणून तो आत गेला. आतमध्ये अनेक लोक होते. ५०-६० च्या आतबाहेर वय असनारे. काही जण कॅरम खेळत होते, काही जण चेस तर काही पत्ते. दोन लोक गप्पा मारत होते. तर एक आजोबा खुर्चीवर शांत बसलेले होते.
आदित्य चेस खेळनार्या दोघांजवळ आला. त्या दोघांनी हसुन त्याच स्वागत केलं.
"नमस्कार, मी आदित्य, या सोसायटीच्या ३०२ मध्ये नवीन राहायला आलोय." -आदित्य
"नमस्कार, मी देसाई आणि हे पाठक साहेब. पाटबंधारे विभागात होते आता रिटायर आहेत." त्या चेस खेळनार्या निळ्या शर्ट वाल्या माणसाने ओळख वाढवली.
जुजबी बोलन झाल्यावर तो हि त्या सगळ्यांसोबत खेळु लागला. त्यानंतर त्याची सगळ्यासोबत छान मैत्री जमली. तो रोज क्लब हाऊसला जाऊ लागला. कधी कॅरम कधी चेस तर कधी आनखी काही. देसाई सोबत खेळुन तो चेस मध्ये expert झाला होता.पण तो उदास असायचा. पाठकांनी हे ओळखलं.
"काय रे आदित्य, तु उदास दिसतो अनेकदा, काय झालंय ?"- पाठक
वडिलधारा हात खांद्यावर पडताच आदित्य ला गहिवरुन आलं तो सांगु लागला. राणीला त्याच्या बायकोला आत्मा दिसतात असं तिच मत आहे अन् हेच खरं मानुन ती जगतेय. तिला मानसिक आजार आहे असं डॉक्टरनां वाटतं.
"बाळा आदित्य, आपल्या बायकोच्या डोक्यांवर परिणाम झालायं असं प्रत्येक नवर्याला वाटतं. पण ज्यावेळेस ती आपल्यापासून दुर जाते ना तेव्हा तिची खरी किंमत कळते." कधीच न बोलता शांत खुर्चीवर बसनारे कुलकर्णी आज बोलले. "तुझ्या बायकोला डॉक्टरची नाही तर तुझ्या प्रेमाची गरज आहे. अजुनही वेळ गेलेली नाही. या म्हतार्याच ऐक अन् जा तुझ्या राणीकडे. गोड पोरगी आहे रे ती. माझ्या बहिनीची एक इच्छा पूर्ण करन्यासाठी त्या छोट्या चिऊला नाचायला टेरेसवर घेऊन गेली आणि सगळ्यांचा राग सहन केला. जा तिच्याजवळ. . . जा."- कुलकर्णी
आदित्य घरी आला. त्याला कुलकर्णीच म्हणनं पटलं होत. तेव्हापासून तो राणीची अधिकाधिक काळजी घेऊ लागला. तिच्यावर प्रेम बरसवु लागला. हळुहळु राणी हि बरी होऊ लागली. ती पुर्वीसारखी हसु बोलु लागली. आदित्यच क्लबहाऊस ला जानं कमी होत होतं. पण राणीत होत असनारी सुधारना त्याला सुखावत होती. अशातच एका गोड पाहुन्याची चाहुल लागली. राणी आदित्य खुप आनंदात होते. कधी एकदा ही गोड बातमी क्लबहाऊसच्या मित्रानां जाऊन सांगतो असं आदित्यला झालं होतं.
शाळेतुन येतांनाच त्याने मिठाई, समोसे असं सामान घेतलं होतं, अन् कुलकर्णीसाठी शुगरफ्री मिठाईसुद्धा. हातात पिशव्या घेऊन क्लबहाऊस कडे जाताना रस्त्यात पवार भेटले.
"नमस्कार आदित्य" - पवार
"नमस्कार पवार साहेब, बर झालं इथेच भेटलात. चला क्लबहाऊस कडे आज एक गुडन्यूज द्यायचीये मला." - आदित्य
"क्लबहाऊस कोनतं क्लबहाऊस?" - पवार
"अहो असं काय करतायेत पवार साहेब, ते सोसायटीच्या कंपाउंडच्या जवळच." - आदित्य
"ते क्लबहाऊस, अहो ते जळुन दोन वर्ष झालेत. दोन वर्षापूर्वी त्या क्लबहाऊसला आग लागली. दरवाजा जाम झाल्यामुळे आतमध्ये सगळ्यांचा मृत्यू झाला. ते वरच्या मजल्यावरचे देसाई, तळमजल्यांवरचे कुलकर्णी काका, पलीकडचे पाठक साहेब असे ६-७ जन गेले त्या आगीत. अजूनही तिथून कॅरमचे, हसन्याचे आवाज येतात म्हणून तिकडे कोणी जात नाही. अहो आदित्य ऐकताय ना. . . आदित्य. . ."
आदित्य सुन्न होऊन ऐकत होता. हातातल्या पिशव्या केव्हाच खाली पडल्या होत्या...

