Shreyas Gawde

Classics Inspirational Others

4.7  

Shreyas Gawde

Classics Inspirational Others

कित्ती आनंदी आनंद...

कित्ती आनंदी आनंद...

13 mins
1.5K


राम-राम मंडळी, माझं जग हे पूर्वी फक्त भजनाच्या अवतीभोवती फिरायचं. ते जग आम्ही भजनाला घेऊन जात असलेल्या ढोलकीच्या आणि टाळाच्या आवाक्याएवढं छोटंसं होतं. पण, स्वच्छंदी आणि उन्मुक्त होतं. आज मी सुरुवातच अशाच एका गोड भजनाने करत आहे... तेव्हा जे जे लोकं याचा भाग होणार आहेत; त्यांनी मनातल्या मनात एक गाठ बांधा ती म्हणजे माऊलीच्या जयघोषाची, माऊलीचा पताका हवेत झेपवायची, तसेच सोबत टाळ-मृदुंगाची... आणि ढोलकीच्या तालावरची. हा तर आमचं पाहिलं वहिलं भजन ज्याने या सगळ्या प्रवासाची सुरुवात आणि अनुभूती खऱ्या अर्थाने झाली... ती या माझ्या मनी बसलेल्या माझ्या लाडक्या भजनाने,


कित्ती आनंदी आनंद, कित्ती आंनदी आनंद।

या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या।।धृ।।


"वा बुवा!" ही दाद तर भजन चालू असताना आलीच पाहिजे. जेव्हा जेव्हा आनंदाविषयी माझ्या मनात विचार येतात. तेव्हा तेव्हा मला तरी माझा पहिला आनंद आम्ही सुरुवात केलेल्या प्रत्येक भजनात आठवतो. त्यात प्रामुख्याने येते ते हे वर लिहिलेले भजन. हे भजन मला आणि बऱ्यापैकी लोकांना, तसेच शाळकरी मुलांना माहीत असेल. यात काहीच वाद नाही. माझ्या शाळेत परिपाठचा एक वेगळा तास होता याचा मला सार्थ अभिमान आहे. तिथे मी बरीच भजने, समूह गीते, श्लोक, गजर, पसायदान शिकलो. त्यातले काही निवडक भजन जे मला आवडतात खास तुमच्यासाठी,


जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले...

तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा।।


तसेच


काट्याच्या अरणीवर वसली तीन गावे

दोन ओसाड एक वसेचीना


हा, तर वर्ष पहिले या सगळ्याची सुरुवात मला चांगलीच आठवतेय त्या नुसार गणेश उत्सवात झाली. आम्ही सगळे मित्र एका चाळीत राहायचो. माझ्या समोरच्या घरात अमोलदादा राहायचा. तो नुकताच नवीन राहायला आलेला होता. थोड्याशा ओळखीतून जसे सगळे चाळीतले शेजारी विचारपूस करायला जातात अगदी तसे आम्ही शेजारी नवीन आलेल्या दादाच्या घरात घुसलो, ओळख वाढवली, तसं आमचं नातं बहरत गेलं... त्याचं आमच्या वाढलेल्या बोलण्यातून कळलं की, त्याच्याकडे घरी गणपती येतात. मग तर काय आनंद हा गगनात मावेनासा झाला. कारण, आमच्या चाळीत आधी दोघांकडे बाप्पा यायचे. पण, त्यांच्याकडे गणपतीत उत्साहाने भाग घेण्याचा इतका योग आला नव्हता. तो आता नेमका हाती आलेला जो मला सोडायचा नव्हता. शेवटी तो दिवस उजाडला ज्याची मी आतुरतेने वाट पाहात होतो. आणि गणपती बाप्पा आमच्या घरी आले. बरं का.. चाळीत दुसऱ्याशी चांगलं सख्य असलेलं घर हे आपलंच घर असतं... आणि भांडण असलेल्या घराबाबत आता वेगळं सांगायला नको.. बाप्पा हा माझा पहिला आनंद! आणि दुसरं बाप्पाच्या आरत्या आणि भजने. मुळात माझं गाव कोकणामध्ये असल्याने भजनावरचं प्रेम याबद्दल वेगळं असं काही सांगायला नको. बाप्पा येण्याच्या आधीपासूनच तयारीला सुरुवात केली... अमोलदादाच्या घरचा मखर बनवला. भिंतीला स्टिकर लावले. उत्साहच उत्साह अंगी संचारला होता. एक पॉझिटिव्हिटी!

तो सण आम्ही अगदी जोशात गाजवला! त्याच सुवर्णमय योगातून आणि बाप्पाच्या आशीर्वादाने त्या वर्षी आमचा एक 'नवज्योत मित्र भजन मंडळ' नामक गृप स्थापन झाला. मी आणि माझे चाळीतले मित्र आम्ही जवळ-जवळ एकाच वयाचे होतो. म्हणजे आमच्यात वयाचा फरक असलाच तर अगदी १ ते २ वर्षांचा... तर आम्ही या सगळ्या भजन मंडळाचा कायमचा एक जिवंत भाग कधी झालो; हे आम्हालासुद्धा कळलं नाही. यावर्षी आम्ही अगदीच माहीत असलेली जुनी भजने गायलो. रात्रीची आरती झाली की मग जवळ-जवळ दोन, अडीज तास आम्ही डेरा टाकून टाळ, ढोलकी, डफ घेऊन कुटत बसायचो... ते दिवस कधी संपले हे ही कळलंच नाही... बाप्पा जसे आपल्या कायमस्वरूपी मनात घर करून आहेत; अगदी तसं भजनसुद्धा कायम मनात घर करून गेले.. मग हा भजनाचा सिलसिला प्रत्येक सणात आणि काही खास क्षणांना परत परत होऊ घातला. आता खऱ्या अर्थाने वेध लागले ते पुढच्या वर्षीच्या बाप्पाचे.


वर्ष दुसरे, बाप्पाचे आगमन झाले. आणि आम्ही भजनात एक वर्ष एक्सपिरॅअन्ससुद्धा.


रूप पाहता लोचनी

सुख झाले हो साजणी।।१।।

तो हा विठ्ठल बरवा

तो हा विठ्ठल बरवा।।२।।


यावेळी फुल प्लॅनिंग आणि भरीसभर म्हणजे दोन मित्रांनी त्यांच्या घरी गणपती बाप्पा बसवायचे ठरवले. त्यानुसार आमच्या ऑर्डर पण ठरल्या होत्या. मित्रांच्या घरी गणपती असल्यामुळे बाहेर दुसऱ्यांकडे भजन करण्याची गरज नव्हती... मुळात आम्ही सगळे कॉलेज विद्यार्थी असल्याने आम्ही उडती भजनं गायचो... आणि ते बऱ्याच लोकांना आपलंसं वाटायचं, आकर्षित करायचं आणि त्यातून बरीच लोक आम्हाला तत्क्षणी नवीन ऑर्डर देत असत... सुरुवातीला आमच्या भजनाची सुरुवात बाप्पाच्याच ठरलेल्या,


नमो नमो तुज श्री गणराया बुद्धी द्यावी तुझे गुण गाया।।


या भजनाने होत असे. मग हळूहळू भजन रंगात येई... माझा एक मित्र 'प्रशांत' आणि त्याची ७३ वर्षाची आज्जीसुद्धा भजनात त्याच जोशाने, उत्साहाने भाग घेई. तिने आम्हाला विठ्ठलाची काही नवीन भजने दिली.


जशी की,


विठ्ठला विठ्ठला नाम तुझे चांगले, ऐकता मन माझे रमले।।


आणि


ये गं, अगं ये गं, ये गं विठाबाई माझे पंढरीचे आई।।


तसेच,


पांडुरंगा आ आ आ, पांडुरंगा आ आ आ

मी पतंग तुझ्या हाती धागा, मी पतंग तुझ्या हाती धागा।।


असे आणि यासारखी अनेक भजने आज्जीने आमच्या नवीन पिढीला ताला-सुरासकट देणं म्हणून दिली. याबाबतीत आम्ही खूप नशीबवान आहोत असं आम्हाला नेहमी वाटतं. तिचा आम्हाला शिकवण्याचा उत्साह तर लाजवाब होता. तिने आम्हाला भजनातले खूप बारकावे सांगितले. जसं कुठलं भजन केव्हा आणि कुठे म्हणावं.

जसे आधी;


१.नमन,

२.भजन,

३. भैरवी,

४. गौळण

५. आणि गजर


त्याआधी आम्ही जे येतंय आणि ऐकलीय अशीच भजने कुठल्याही क्रमात कशीही म्हणत असायचो. बऱ्याच मोठ्या मार्गदर्शक व्यक्तींच्या सहवासातून आम्हाला त्यातलं ज्ञान वाढत गेले. जे अजूनही इतकं परिपूर्ण नसावं तरी शिकण्याची जिद्द मात्र नेहमीसारखीच होती. त्यात प्रशांतसुद्धा आजीच्या पावलावर पाऊल ठेऊन छान भजने गायचा... प्रत्येकाची अशी ठरलेली भजने असायची. तशी त्याचीही होती. जसे की,


चांदणं चांदणं झाली रात

साई पालखीची पाहत होतो वाट


यात जे देवीचं भजन आहे तेही आम्ही कधी कधी एकत्र करून गायचो...


चांदणं चांदणं झाली रात

एकवीरेची पाहत होतो वाट


आणि


सोन्याचं, चांदीचं, हिऱ्याचं, मोत्याचं मुकुट घडवलं

मुकुट घडवलं, माझ्या साईला चढवलं


आमच्यात अजून एक 'सचिन' नावाचा मित्र हा वारकरी संप्रदायातला आहे. तो ही आम्हाला नवनवीन त्याने ऐकलेली भजने नव्याने देत. त्यामुळे दिवसागणिक आमचा उत्साह आणि भजनाची ओढ शिगेला पोहोचत गेली... यात काही वादच नाही.

सचिनने आम्हाला दिलेली काही भजने अशी होती;


तुमच्या नादानं मी, तुमच्या प्रेमानं मी मंदिर गाठलं

तुझ्या भजनाला यावंसं वाटलं।।


तसेच त्याचं आणि बराचशा लोकांचे आवडते भजन,


या पंढरपुरात काय वाजत गाजत

सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागतं।।धृ।।


या सगळ्यात सचिनची आईही आवडीने सहभाग घायची. त्यांचं एक हिंदी भाषिक भजन मित्र मंडळ होतं... ते भजन आम्ही जेव्हा जेव्हा सचिनकडे जायचो तेव्हा ती आवर्जून हातात 'डफ' घेऊन एका विशिष्ट चालीत गायची. ते भजन असं होतं,


तारा हे सारा जमाना

प्रभू हमको भी तारो

हमने सुना है तुमने शबरी को तारा

शबरी को तारा प्रभू शबरी को तारा

पेरो का करके बहाणा

प्रभू हमको भी तारो


खूप मज्जा यायची.. एकच दंगल करत गायचो. या सगळ्यात आमचा जुना अजुन एक कॉलेज मित्र सुधीर आमच्या भजनात नव्याने दाखल झाला होता. तेव्हा त्याच्या गोड सुरेल गळ्यानी आमच्या भजनाला नवीन भजने तर दिलीच सोबत भजनात चार चांददेखील लावले… सुधीरनी गायलेले प्रत्येक अभंग, बाबांची भजने, गौळणी, गजर अगदी मंत्रमुग्ध करून टाकत.

त्याची काही खास भजने होती त्याची सुरुवात तो,


सकळ मंगळ निधी, श्री विठ्ठलाचे नाम आधी।।


नंतर


ओ साई रेssss लागला तव मज छंद

नाम तुझे घेताना रूप तुझे पाहताना

होई मनाला आनंद...

लागला तव मज छंद...


या सगळ्यात साथ द्यायला अजूनही बरीच मित्र मंडळी होती. यातलाच प्रशांतचा सख्खा चुलत भाऊ 'दीपक' गौळणी गाण्यात एक्सपर्ट होता.. जसे की,


उधव उधव उधव उधव आई तू गोंधळा ये

आई मी सोनार होईन गं आई मी सोनार होईन,

सोनार होऊन मी आई मी तुला बांगड्या भरविन...

पापाची वासना नको ग आई माझा इडा पीडा टळू दे ए ए ए...


तसेच सगळ्यांची आवडती गौळण,


यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी हो हो हो... कान्हा वाजवितो बासरी...


खरं तर अजूनही बरीच मंडळी आहेत ज्यांच्या नावाशिवाय हे मंडळ अपूर्णच आहे. कारण, आत्तापर्यंत मी जे गायक होते त्यांच्याबद्दल सांगितलं. पण, जे आमच्यात सामील होऊन आमच्या मागे आम्हाला खरी साथ द्यायचे असेही बरेच होते. त्यात 'अशोक दादा' , 'देवेंद्र' , 'दिनेश' , 'प्रमोद' , 'निलेश' , 'विनोद' , 'सारंग ', ' सुमित' , 'सौरभ' आणि येऊन जाऊन असणारे बरेच जण असायचेत. आणि सगळ्यात महत्त्वाचे गडी आमचे खरे शिलेदार, मानकरी म्हणजे आमचे लाडके ढोलकीपट्टू 'अमोल ' आणि 'विशाल ' हेही तितकेच महत्त्वाचे 'अमोल' आणि 'विशाल'ची जुगलबंदी ऐकायला एक खास मज्जा यायची. दोघेही खूप दंगा करायचे आणि करायला लावायचे. अर्थात त्यांच्याशिवाय आम्ही अपूर्ण!


वर्ष तिसरे, या सगळ्यात आमच्या भजनातला सर्वोच्च क्षण म्हणा, नाहीतर आठवण म्हणा, जी आमच्या हृदयात कायमस्वरूपी लक्षात राहिली... ज्याची सुरुवात हे तिसरं वर्ष होतं. पण शेवट हे चौथं वर्ष. त्याआधी मी तिसऱ्या वर्षी शोधून आणलेलं माझं आणखी एक आवडत भजन,


घेऊनि आलो नैवेद्याला, घेऊनि आलो नैवेद्याला...

तरी मजवरी का रुसला आ आ आ आ

एक तरी घास घे रे विठ्ठला...

एक तरी घास घे रे विठ्ठला...।।धृ।।


तर आम्हाला दर गणपतीत आमच्या ओळखीच्याकडून आमच्याकडेसुद्धा भजन करा, अशी नेहमी विनवणी व्हायची... खरं सांगू तर त्यावेळी प्रत्येकाकडे २ ते ३ तास भजन करणे शक्य नव्हते. अशा विनवणीचा ओघ वाढू लागला होता. म्हणून आम्ही असा निंर्णय घेतला की आपली ठरलेली घरं सोडून बाकीच्याकडे त्यांच्या आग्रहामुळे ३० ते ४५ मिनिटे भजन करायचे. आमच्या गृप मधला 'अशोक दादा' मुलुंडला राहायचा जो आधी 'प्रशांत'च्या बाजूला राहायचा... त्याचा उत्साहपण भारी असायचा.. तो नेहमी रात्री शेवटचं भजन त्याच्याकडे ठेवायचा आणि आम्ही मग रात्रभर गप्पा मारत बसायचो... 'अशोक दादा'चे 'बाबा'ही एक गजर आवडीने न चुकता आम्हाला त्यांच्यामागून म्हणायला लावायचे.


गोविंदाचे गुण गायिले, पांडुरंगी मन रमले।।


हे आम्ही खूप वेळ खेचायचो. सुरुवात नेहमीप्रमाणे नॉर्मल, पण नंतर वरच्या पट्टीत, मग खालच्या पट्टीत, मध्येच हळू, मध्येच जोरात, त्यामुळे हा गजर बोलायला वेगळीच मज्जा यायची.


अशोक दादाचा सख्खा चुलत भाऊ प्रमोदही आम्ही खूप फोर्स केल्यावर लाजून शरमेने गायचाच... म्हणजे तो नेहमी या भजनाचा अविभाज्य घटक होताच. जो नारळ फोडण्यात नेहमी पुढे आणि तरबेज होता... पण त्याचा आवाज विशिष्ट शैलीचा होता. जो मला खूप भावायचा... तो नेहमी एकच भजन गायचा खरंतर फक्त सुरुवात करायचा. मग मी ते नेहमीप्रमाणे पुढे घेऊन जायचो... त्याची ही पुढीलप्रमाणे ठरलेली आवडती दोन भजने आहेत,


ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर

सखा माझा ज्ञानेश्वर

सखा माझा ज्ञानेश्वर

ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर



ज्या सुखा कारणे देव वेडावला

वैकुंठ सोडुनी संत सदनी राहिला।। धृ ।।

धन्य धन्य संतांचे सदन

तेथे लक्ष्मीसहित शोभे नारायण।।१।।


आणि तसेच एकेदिवशी आम्ही अशाच आमच्या ओळखीतले 'अशोक' आणि 'प्रमोद'चे गावातले आमच्या ओळखीचेसुद्धा जवळ राहणारे 'मामा' यांच्याकडे भजन करत होतो. तिथे त्यांच्या घरी अगदी वारकरी संप्रदायातले एक वृद्ध आजोबा आमच्या भजनात 'भजन' चालू झाल्यानंतर आवडीने लगेच येऊन तन्मयतेने लिन होऊन बसले होते... शक्यतो जे नवीन यायचे ते एखादं भजन गायचेच. हे सांगायचं कारण म्हणजे काही जण अति करायचे. जे आम्हाला कधी-कधी आवडायचं नाही. पण त्या आजोबांनी असं काही केलं नाही. ते भजन झाल्यावर मामांना फक्त म्हणाले जर यांना आमच्या घरी पण भजन करता आलं तर विचारून बघा.. तसेच आमच्या गृपमधला 'सुमित' त्यांच्या शेजारी एक दोन घर सोडून राहायचा... त्याने आम्हाला खूप फोर्स केला पण आम्ही त्यावर्षी काही तिथे भजन केलं नाही.. यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे आधी बऱ्याच जणांना सांगून ठेवलेलं की तुमच्याकडे भजनाला येतो. आणि दुसरं म्हणजे बऱ्याच जणांच्या घरीसुद्धा बाप्पा यायचे. त्या गडबडीत त्या वर्षी राहून गेलं.. बरं आम्ही भजन हे पैशासाठी कधीच केलं नाही. जे स्वखुशीने लोकं द्यायचे तेच घ्यायचो. आणि त्यातून भजनासाठी खर्च करायचो... अगदी, कोणी फक्त नारळ दिला तरी तो आनंदाने फोडून खायचो...


चौथ्या वर्षी 'सुमित' आम्हाला भेटायला अचानक आला. त्या वर्षी त्याने जास्त भजनात सहभाग घेतला नव्हता... पण, तो खास विनंती करायला आला की माझ्या घरी या वर्षी गणपती आहेत तर भजनाला या... ज्याचा त्याने गणपती बाप्पा येण्याआधीपासूनच तगादा लावला होता. त्याआधी त्यावर्षी आमच्यातल्या 'निलेश' नावाच्या कारट्याने आम्हाला तीन पत्तीचं वेड लावलं... आम्ही ज्या 'अमोलदादा'कडे पहिल्या दिवशी भजनाला जायचो त्याने त्या तीन पत्तीत अजून एक ट्विस्ट ऍड केला. त्याने सांगितलं, "अरे नुसते असेच काय खेळत आहात... १-१ रुपयांनी खेळा... खेळण्याआधी डावाचा १ रुपया आणि मग हवं तर ब्लाइंड खेळा १ रुपयाने किंवा पत्ते पाहिल्यावर २ रुपयाने खेळायचं..."


या पैशामुळे आम्हाला त्याचं भयंकर वेड लागलं.. याचं अजून एक कारण म्हणजे त्या दिवशी रंगलेला एक डाव. म्हणजे बरेच जण काही लागत नाही किंवा मला उद्या ऑफिस आहे असं म्हणून बाजूला झाले आणि झोपले... आम्ही थोडे गृप मेंबर खेळत बसलो होतो... त्या डावात बऱ्याच जणांना चांगले पत्ते आलेले म्हणून तो डाव रंगत गेला... मग जे जोडी, आणि नुसते कलरवाले होते ते पॅक झाले.. शेवटी मी, 'दिनेश', 'विनोद', 'प्रमोद' आणि प्रमोदचा विरार वरून आलेला नातेवाईक 'मयूर भणगे' असे पाच जण राहिलेलो होतो.. त्यातही मी आणि प्रमोद चांगले पत्ते असून काँप्रो करून पॅक (बाजूला) झालो... तो पर्यंत १-१ रुपयांचा डाव पाच रुपयांवर येऊन पोहोचला होता... त्या बोंबाबोंबीच्या माहोलमध्ये झोपलेलेसुद्धा चक्क जागे झाले... तर मयूरचे पैसे संपले होते आणि तो प्रमोदकडे पैसे मागत होता.. प्रमोदने पत्ते बघून त्याला पैसे देऊ केले...पण प्रॉब्लेम हा होता की तिघेही काँप्रोला तयार नव्हते आणि तो डाव आता १० रुपयांपर्यंत येऊन पोहोचला... पैशाचा (चिल्लर) ढीग बरोबर मधोमध जमा झालेला होता.. लागेल त्याची चांदी हे आमच्या बाजूला असलेल्या प्रत्येकाच्या मनात होतं... आता प्रमोदचेही पैसे संपले मग त्याला अशोकदादाने पैसे देऊ केले... मला तर टेन्शन आलेलं आता हा आपल्या गळ्यात असलेली चैन वगैरे तर लावणार नाही ना? कारण त्याचा उत्साह अमाप होता... तो प्रत्येक राऊंडला जोशात, उत्साहात म्हणायचा...


"दादा तू पैसे टाक आपणच जिंकणार..."


त्याच्या या एका वाक्यावर आम्ही खूप पोट धरून हसत होतो.. पण मग माझ्या मनात विचार आला... नेमके 'विनोद'कडे पत्ते काय आहेत. त्याने मला मुश्किलीने पत्ते दाखवले... आणि तोपर्यंत 'विनोद'ने 'विनोद' केला होता... तो नुसत्या कलर पत्यावर पैसे लावत होता. तेही काँप्रो न करता.. हे पाहून आम्ही दोघा-तिघांनी 'विनोद'चे पत्ते पाहून त्याला मारलं.. हा आपला उगाच बोली लावत होता... मग विनोद बाजूला झाला. शेवटी मयूरने शो केला... 'मयूर'चे पत्ते होते बदाम कलर १, २, ३ आणि 'दिनेश'चे ५, ५, ५ ट्रायो, दिनेश तो मोठा डाव जिंकला. तेव्हा 'दोन दादांची' आणि 'मयूर'चं तोंड पाहण्यासारखं होतं... नंतर पण आम्ही चिडवून चिडवून खूप हसलो...


"दादा तू पैसे टाक..."


बापरे ! भयानक !


आमचा आधी आरती, मग भजन, त्यानंतर पत्ते (फक्त गणपतीत) असा अजून एक फक्कड विस्तार वाढला. आता अजून एक गंमत म्हणून सांगतो. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली की आम्ही पत्ते खेळतो... जेवढं आम्ही भजन करून फेमस झालेलो नव्हतो; तेवढे त्या "तीन-पत्तीने" झालो.. अर्थात सगळी चांगली मुले असल्याने कोणी वाईट बोललं नाही... पण, त्यामुळे आमच्या भजन मंडळात काही नवे चेहरे दाखल झाले. जे या आधी फक्त आम्हाला आमच्या विभागातले लहानपणापासून राहणारे तोंड ओळखीचे होते. ते अचानक भजनात सामील झाले... आधी दोन दिवस दोघे होते. मग चार, पाच जण वाढले. आम्ही खुश झालो की आपले भजन बिघडलेल्या मुलांनासुद्धा सुधारत आहे. पण, ही मुले भजनात तर इतके इंटरेस्ट नि नाही बसायचे. पण नेमकं जेव्हा शेवटचा गजर चालू व्हायचा तेव्हा यांच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा असायची.. आणि ती ऊर्जा "तीन-पत्तीच्या" वेडाची होती. हे आम्हाला नंतर कळलं... मग, आम्ही मुद्दाम पत्त्याचा प्लॅन कॅन्सल झाला सांगायचो. तेही पूर्ण भजन संपल्यावर, तेव्हा यांचे चेहरे बघण्यासारखे असायचे. मग, आम्ही नेहमीचे मित्र यांना पळवून पुन्हा खेळायला बसायचो. खूप मज्जा यायची.


असंच चालू असताना बाप्पा जायचा शेवटचा दिवस उजाडला. त्या दिवशी दोन भजने बाकी होती. (त्या वर्षी गौरी-गणपती सात दिवसाचे होते.) आम्ही शेवटचा दिवस म्हणून 'मामा' आणि 'सुमित' अशी दोनच घरे भजनासाठी ठेवलेली होती.. आधी मामाकडे सकाळी भजन केलं. मग सुमितच्या घरी सकाळी लवकर भजनाला सुरुवात केली. जसं सुमितकडचे भजन संपले तसा तो त्या आजोबांकडे भजन करण्याचा आग्रह करू लागला... हे तेच आजोबा जे तिसऱ्या वर्षी मामांच्या घरी भजनाबद्दल विनंती करून गेले होते. आम्ही सगळ्यांनी आधी नाहीच म्हटलं. कारण , एकतर शेवटचा दिवस होता. सो, आम्हाला विसर्जनाची तयारी करायची होती.. आणि त्या दिवशी बरेच जण नव्हते आले. ते डायरेक्ट विसर्जन मिरवणुकीला येणार होते... म्हणून आम्ही नायरीचं लावली... पण तो म्हणाला फक्त दोन भजने अगदी पंधरा मिनिटांसाठी करा... आणि त्याचं घर एकाच चाळीत असल्यामुळे नाही तरी कसं म्हणायचं म्हणून आम्ही ठरवलं की १५ मिनिटे भजन करू... म्हणजे तेही नाराज नाही होणार.. हे ठरल्यावर खुश होऊन तसाच सुमित त्यांच्या घरी सांगायला धावत गेला की पोरं तुमच्याकडे भजनाला येत आहेत. तोपर्यंत आम्ही सुमितकडे वेफर्स, लाडू, कचोरी याचा आस्वाद घेत बसलो होतो... आणि खाऊन झाल्यावर तिथे भजन करायला गेलो. जसे आम्ही घरी आत शिरलो तसं पाहिलं तर ते आजोबा अंथरुणाला खिळले होते... आम्ही सगळे हसत आत घुसलेलो एकदम शांत झालो... तेव्हा कळलं त्यांची शेवटची इच्छा आम्ही त्यांच्याकडे भजन करायची आहे... आम्ही ते भजन दणक्यात सुरू केलं... शेवटच्या दिवशी खरंतर सतत चालू असलेल्या आरत्या आणि भजनामुळे प्रत्येकाच्या घशांची वाट लागलेली असते.. पण, तिथे तसं काहीच नाही झालं. तिथे आम्हाला एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती... हा... आम्ही तिथे जास्त वेळ भजन नाही केलं... हे खरं... पण, या सगळ्यात ऊर्जेची बाब म्हणजे आजोबांनी झोपलेल्या अवस्थेतसुद्धा त्यांचा खडा आवाज लावला... तो थेट आमच्या हृदयात घुसला.. त्यांनी भजन गायलं,


जाता पंढरीशी सुख वाटे जिवा जाता पंढरीशी... आनंदे स्मरावा पांडुरंग।।


आम्ही तर एकमेकांकडे पाहातच बसलो... आम्ही तिथे जे भजन केलं ते आमच्या सगळ्यांच्या आयुष्यभर लक्षात राहील. जर चुकून तिथे गेलो नसतो तर कदाचित आयुष्यभर स्वतःला कोसत बसलो असतो. पण तिथून बाहेर निघताना एक आत्मिक समाधान होतं... चेहऱ्यावर हसू, मनात रडू आणि हृदयाच्या एका कोपऱ्यात त्यांचा आवाज कायमचा दडून स्मरणात राहिला... ते नंतर अनंतात विलीन झाले...


जाता जाता आमच्या भजनाचा शेवट आम्ही भजनी मंडळी सुधीरच्या,


वैकुंठीचा विठ्ठल भूवरी आला हो जय जय रखुमाई विठ्ठल गजर झाला हो...


या गजराने सुरू व्हायचा. गजर प्रांतात माझा बऱ्यापैकी हातखंडा होता.. जो मी नंतर गजर पुढे पुढे न्यायचो. याची सुरुवात मी,


हातामध्ये टाळ घ्या खांद्यावरी वीणा घ्या

नाचत पंढरी जाऊ चला...


जरा अलीकडे या मला पलीकडे न्या साईनाथा नदी भरली गोदामाता...


गोपाळा गोपाळा रे प्यारे नंदलाला

प्यारे नंदलाला मोहन मुरलीवाला...


गोविंद बोलो हरी गोपाळ बोलो...


यासारखे बरेच गजर आम्ही जवळ जवळ अर्धा ते पाऊण तास हो अर्धा ते पाऊण तास न थांबता सलग गायचो...

त्या गजरामध्ये आमचा सचिन जी नॉनस्टॉप तोंडपाठ हनुमान चालिसा बोलायचा तो क्षण तर बऱ्याच नव्याने ऐकणाऱ्याला भारावून टाकायचा... विलक्षण! माहोल व्हायचा...


नंतर आम्ही '१०८' वेळा 'राम नामा'चा जप 'राम राम १', 'राम राम २', ....... 'राम राम १०८', असा करायचो.. तेही अगदी पूर्ण तालात आणि सुरात ३३ कोटी देवांच्या भक्तीत विलीन होऊन...


शेवटच्या भागात काही गजर बोलायचे; तर अर्धे खाली दिल्याप्रमाणे माझ्या मागे नाव घ्यायचे...


पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री नामदेव तुकाराम...


पंढरीनाथ महाराज की जय!


माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय!


जगतगुरु तुकाराम महाराज की जय!


श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त!


आणि मग आम्ही,


ज्ञानदेव तुकाराम... ज्ञानदेव तुकाराम...


आणि तुझी परत आठवण काढत राहू यासाठीही विनवणी करायचो...


हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा

गुण गाईन आवडी हेचि माझी सर्व गोडी माझी सर्व गोडी माझी सर्व गोडी...'


अशी जवळ जवळ सगळ्या देवांची नावे, देवाचे विसरू नये म्हणून 'स्मरण' करून आम्ही मंडळी 'भजन' समाप्ती करायचो.


आपल्या 'माऊली संत तुकाराम महाराजांनी' वैकुंठाला जाताना,


भजन करा सावकाश...


असा संदेश आपल्या अनुयायांना दिला होता. तो आज आमच्या पिढीकडून थोड्या प्रमाणात का होईना चालू आहे... भले तो थोडासा धांगडधिंगा गटातील असावा. पण भजनावरचे प्रेम, आपुलकी, भक्ती निस्सीम होती, आहे आणि सदैव राहील. आता आमचं भजन जरा हरवलंय. पण, सापडायला वेळ लागणार नाही. तेव्हा गणपतीत आमच्या भजनाला नक्की यायचं मंडळी! आणि हा तुमचं आवडतं भजन कुठलं आहे ते ही नक्की सांगा...


रामकृष्ण हरी...!


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics