Shreyas Gawde

Comedy Others

4.6  

Shreyas Gawde

Comedy Others

"आईचे धपाटे. . ."

"आईचे धपाटे. . ."

6 mins
267


सुखी आयुष्य म्हणजे लहानपणी आणि आतासुद्धा आईचे दिलेले प्रेमळ धपाटे ! दिवाळीत किंवा एखाद्या कार्यक्रमाला जसे फटाके फुटतात ना; अगदी तसेच असतात आपल्या आईचे धपाटे. . .

'तुम्ही कधी आईचा धपाटा खाल्लाय का ?'

अर्थात कमी अधिक प्रमाणात बरेच जण तो 'धपाटा' म्हणा किंवा 'फटका' म्हणा पक्का खातात. हे मात्र खरं ! आपण असे कुरापती,विद्रोह, कांड इत्यादी केल्यावर 'तुझं घर उन्हात बांधते पासून,' ' मर मेल्या' ते ' हा मेला आमच्याच घरात कुठून जन्माला आला.' इथवर मजल पोहचते. या सगळ्या वरून तुमच्यातील गुणांची आणि अवगुणाची माहिती वा परीक्षणचं म्हणा ना, तुमच्या घरतल्याना त्याचे दर्शन होते. हो, जरी ते आपल्यातील गुण असले तरी आई आणि घरच्यांसाठी ते कर्मकांडच असतात... यावर मी ठाम आहे. असाच काहीसा थोड्याफार प्रमाणात मी लहानपणी खट्याळ, अतरंगी होतो. हे सगळं सांगण्याचे खरे कारण म्हणजे आज मोठे होऊन सुद्धा आईचे धपाटे कधी कधी पडतातच... आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या आईसाठी लहानच लेकरू ना...


आज हे सगळं सांगायचं कारण असं आहे की आईने मला या लॉकडाऊन काळामध्ये तिने दळायला दिलेलं दळण घरापासून जवळ असणाऱ्या चक्की वरून आणायला सांगितलं... आणि मी चक्, चक असा चक्क दोनदा नकार दिला. खरंच ! कारण, मी माझ्या सो कॉल्ड मोबाईल मध्ये बिझी होतो. आईच्या हे कदाचित तिथूनच ध्यानात आलं असावं म्हणून तिने स्वयंपाक घरातूनच जोरात तांडव करत ती मला म्हणाली,

" आधी त्या तुझ्या मोबाईलला आग लाव आणि जातो की नाही आता ? का थोबाड रंगवू तुझं ? "

या जगातल्या सगळया आईंना सगळं न बघता कसं काय कळतं देवचं जाणे ! मी उठून स्टाईल मध्ये आत गेलो आणि आईला बोललो ,

" मला माहितेय तू काही मला मारणार नाही. कारण, आता मी मोठा झालोय आई ! लव्ह यु मेरी माँ... "

असं बोलून वळलो तोच एक पाठीत आईच्या पिठाच्या हातचा हळुवार अगदी हळुवार फटका पडला... ते पीठ झाडतच तोच त्यात माझ्यातला फिल्मी कीडा सुद्धा जागा झाला आणि म्हणाला,

" थप्पड से डर नई लगता माँ.. तुम्हारे प्यार से लगता है।"

या डायलॉग वर माझ्या आईने जे डोळे वटारून रौद्र रूप धारण केलें ते पाहून मी म्हणालो,

" हे बघ, आता लगेच गेलो आणि लगेच आलो."

अस बोलून तिथून पळ काढला...

दुकानात जाता जाता लहानपणीचे काही क्षण आठवले... आणि ओठावर स्मित हास्य फुललं... त्यात जाताना कोणी ओळखीचा मित्र बोलला,

" काय भाई मुलीच्या प्रेमात पडलात का ? गालातल्या गालात हसत चाललाय ते..."

मी ही तसा हजर जबाबी तिथेच उत्तरलो,

" मुलीच्या नाही रे लहानपणाच्या प्रेमात ! " दोघेही हसलो... तडक चक्कीवर पोहचलो दळण घेऊन घरी यायला निघालो. येताना सुद्धा मला मी लहानपणीचे दिवस आठवत होते. मला क्रिकेटचं भयंकर वेड तर मी घरातच भिंतीवर बॉल टाकून मग बॅट नी टोलवायचो.. तसंच एकदा मी क्रिकेट खेळताना घरातली ट्यूब लाईट फोडली होती... तर कधीकाळी मित्रांना घरी बोलवून नूडल्स करण्याचा फसलेला आमचा प्रयत्न, आणि हो हे सगळं नेहमीप्रमाणे आई घरात नसताना म्हणजे आई कामावर गेल्यावर करायचो. त्याचप्रमाणे घरात मित्र बोलवून खेळलेली तेव्हाची WWF... आत्ताची WWE सगळं अगदी स्पष्ट आठवतं होतं... अच्छा या सगळ्या कांड मध्ये मी आणि माझ्या मित्रांनी कित्येक वेळा ओरडा, मार खाल्ला याचा काही नेमच नाही... म्हणजे आमच्यावर साम, दाम आणि दंड असं सगळे उपाय घरच्यांकडून होतं असतं. त्याच धुंदीत दळण घेऊन घरी पोहचलो.. आईला आवाज देऊन सांगितलं दळण आणलंय ते आणि सोफ्यावर बसून परत भूतकाळात जाऊन रमलो.


मला वाटतं कधी कधी अधून मधून आपल्यातील खट्याळ लहान मूल वर डोकं काढून डोकावत असतं.. आणि त्यातच खरी मज्जा असते. यातलाचं एक लहानपणीचा माझासोबत घडलेला किस्सा मजेशीर आहे... माझी आई कामाला गेलेली तो दिवाळी नंतर चा काळ होता. मी माझ्या मित्रांना घरी बोलावलं आणि हर्ष उल्हासने सांगितलं की माझ्याकडे दिवाळीचे जपून ठेवलेले २ चक्र आणि १ पाऊस आणि एक फुलबाजा पॅकेट सुद्धा उरलंय... मग, आमचे प्लॅन सुरू झाले कुठे लावायचं. कसं करायचं. बाहेर तर नको. कारण, चाळीत लगेच बोंबाबोंब होईल. तर आमच्यातल्या एका सूड बुद्धीने सांगितलं की बाहेर नको आपण हे घरातच वाजवू म्हणजे कोणी ओरडणार नाही... मग, घराचा मालक मी असं ठरवलं की हॉल मध्ये नको आपण किचन मध्ये करूयात... बाकीच्यांना तर फक्त मज्जा करायची होती. म्हणून बाकीच्यांनी 'हो' मध्ये 'हो' मिळवले. त्या छोट्याश्या १२ × २५ मधल्या चाळीच्या घरात आम्ही करामतची पहिली पायरी फुलबाजी पेटवायला सुरुवात केली... मग पाहिलं चक्र पेटवले आणि त्या येणाऱ्या चिंगाऱ्यामध्ये मनसोक्त नाचलो... जसे सगळे दिवाळीमध्ये नाचतात अगदी तसे.. मग, दुसरं चक्र पेटवले... आनंद शिगेला पोहोचला. त्यानंतर पाऊस लावायची वेळ आली... माझ्या तीक्ष्ण नजरेने पाऊस पेटवायच्या आधी दोरी वरचे कपडे बाजूला केले, जे पाऊसमधील मोठा अडथळा होता. भावना एवढीच होती की काही जाळायला नको. मग आम्ही पाऊस पण पेटवला. आमचा उत्साह द्विगुणित झाला. या सगळ्या प्रकारानंतर खाली असलेली घाण आम्ही चौघांनी मिळून कचऱ्यात मागच्या दरवाजाने फेकली... लादी फुसणार तेवढ्यात दरवाजावरची कडी वाजली. आणि सगळ्याचें धाबे दणाणले... सगळी पोरं मागच्या दराने फरार ! आता मी एकटाच. मी जरी घाबरलो होतो. तरी मी हसत-हसत दरवाजा उघडला... त्यावर बायकांच्या प्रश्न स्वभावाने माझ्यावर माझ्या आईने केलेल्या पहिल्या प्रश्नाचा भडिमार झाला.

" एवढा उशीर का झाला रे दरवाजा उघडायला...? "

" काही नाही. पाणी पीत होतो... तू बस तुला पाणी पाहिजे ? नाही आणतोच ... " कधीही सांगितल्याशिवाय समोरून पाणी न देणारा मी. आत आईसाठी पहिल्यांदा पाणी आणायला गेलो... मला वाटतं होतं वादळ येण्यापूर्वी पाणी देऊन शांत करावं म्हणजे आई तिथेच बसेल आणि थोडी विश्रांती घेईल... म्हणजे मी लादी पुसायला मोकळा.. मी पाणी घेऊन आलो. आई पाणी प्यायली... आणि ग्लास ठेवायला उठली. . मी लगेच ग्लास तिच्या हातून हिसकावला आणि म्हणालो,

"दे, मी ठेवतो ... "

तेव्हाच आईला संशय आला असावा. याने काहीतरी कांड केला असावा. तशी आई माझ्या मागे कधी उठली हे मला कळलंच नाही... आणि किचन मध्ये येऊन मला विचारलं,

"हे काय ? काळं कसं काय झालं ?"

मी आव आणत म्हणालो,

" अग, ते काय झालं.. ते मी .. माझं चक्र होतं ना ते बाहेर मेणबत्ती घेऊन पेटवायला जात होतो. पण चुकून इथेच पेटलं..."

आई काहीच बोलली नाही. भयाण शांतता... मला वाटलं वाचलो... पण, वाचेल असे आपलं नशीब कुठे... आई ने मॅक्सी साठी वर दोरी कडे पाहिलं.. तिथले मी जाणूनबुजून सर्कवलेले सगळे कपडे पाहिले...आणि तिच्या लक्षात आलं असावं. परत प्रश्न केला,

"आणि मग चक्र वर इथे कसं पोचलं."

मी हळूच उत्तरलो. चक्र नाही.. पाऊस...

त्यावर आईने ज्या रागाने पाहिलं त्याने माझी पुरती फाटली होती. आणि आई सुरू झाली.

"नालायका, पुरे झाली तुझी हौस !"

आणि मग जी शिव्यांची आणि माझ्या फटाक्यांची माळ एकसाथ फुटली... अशी जोरात फुटली की काही विचारू नका... मला नुसता हातांनीच नाही तर पायांनीही तुडवला... दिवाळी नंतर माझी चांगलीच दिवाळी झाली होती... आता त्या किस्या वरून खूप हसायला येतं..


जाता जाता अजून एक छोटासा किस्सा सांगतो. आई जेव्हा जेव्हा मला तिचे पाय चेपायला सांगते तेव्हा तेव्हा तिला मजेत मी नेहमी म्हणतो की, माझ्या पायात जादू आहे. कारण, मी पायाळू आहे 'आई'... हे असं कितीही वेळा बोललो तरी 'आई' मस्करीत बोलतेचं,

"हट, मेल्या ! जन्म मी दिला आणि तू सांग मला तू पायाळू आहे ते... "

तेव्हा एकंच हसू फुटतं आता आईला हे कोण सांगणार असं सांगून मी कित्ती जणांची जबरदस्ती मालिश केलीय ते...


रोज आठवणीने आपण भविष्यकाळ थोडा का होईना जगतो. मग, तो पूर्ण होवो अथवा न होवो. 'स्वप्ने' तर पाहतोच ना ? अगदी, तसाच आपण वर्तमानकाळही जगतो. मग, मला असं वाटतं आपण चांगल्या घडलेल्या क्षणांचा भूतकाळ ही असाच जगायला हवा.. कारण, त्यात कधी काळी होऊन गेलेले आपले असतात. जर आपल्याला काही कमी पडत असेल तर आपल्यापेक्षा कमी मिळालेल्या व्यक्ती कडे पाहावे असं माझी 'आई' मला नेहमी सांगते. म्हणजे आपलं 'घर' ही 'महाल' वाटतं. बाकी सर्व देवाने आणि आपल्या कर्तृत्वाने आपल्याला दिलंच आहे..

' जसे माझ्या आईचे धपाटे. . .'

आणि तुमच्या ?


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy