Jyoti gosavi

Fantasy

2.6  

Jyoti gosavi

Fantasy

कहाणी नव्या सिंड्रेलाची

कहाणी नव्या सिंड्रेलाची

5 mins
538


फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका नगरीमध्ये एला नावाची एक मुलगी तिच्या आई-वडिलांच्या सोबत राहत असे. तिचे वडील खूप श्रीमंत होते. 

परंतु दुर्दैवाने ती लहान असताना तिची आई वारली . बिचारी "एला" एकटी पडली. वडील कामानिमित्त बाहेर जात असत त्यामुळे "एला" स्वतःशीच एकटी खेळत असे.  त्यामुळे वडिलांनी असा विचार केला की "एला" एकदम एकटी पडली आहे तिला कोणीतरी सोबत आणावे. त्यासाठी त्यांनी पुन्हा विवाह करण्याचा विचार केला. आणि एका मार्था नावाच्या स्त्रीशी विवाह केला .तिला दोन मुली देखील होत्या तिच्या वडिलांना वाटले आपल्या मुलीला सोबत होईल, पण झाले उलटेच मार्था आणि तिच्या दोन्ही मुली एलाला जाच करू लागल्या. तिच्या आईने आल्याबरोबर घरातील सर्व नोकर चाकर काढून टाकले आणि सर्व कामे बिचाऱ्या लहानशा एलाला करावी लागत असत. 


तिच्या दोन्ही मोठ्या सावत्र बहिणी आणि आई सतत छान- छान कपडे घालून नटून -थटून बाहेर फिरायला जात, पार्टीजना जात. त्या एलाला मात्र घरातील सर्व कामे करायला लावत. तिला नेहमी घरातील उरलेले शिळेपाके अन्न तिला देत असत .तसेच बहिणीचे जुने कपडे तिला वापरायला लागत. तिला झोपायला घराच्या पाठीमागे एक लहानशी अंधारी खोली दिलेली होती. तेथे एक जुनीपुराणी शेगडी असे, थंडीसाठी ती शेगडी पेटवली तिला झोपायला जागा पण राहत नसे. शेगडी थंड झाल्यावर ती खाली उडालेल्या राखेत झोपत असे त्यामुळे तिचे कपडे अजून मलिन होत. तिच्या सावत्र बहिणी कारण नसताना देखील रोज ती शेगडी पेटवायला लावत. बिचारी "एला "मनात दुखी असे. ती रोज त्या शेगडीशी गप्पा मारत असे. शेगडीताई शेगडीताई बघतेस ना? माझे दुःख! माझ्या बहिणी आणि आई मला किती त्रास देतात. बाबांना तर काही माहीतच नाही. कामधंद्यासाठी बाबा घराच्या बाहेर असतात. बाबा आले की या सगळ्या जणी माझ्याशी खूप चांगल्या वागतात,मला चांगले कपडे देतात, कोणतेही काम करून देत नाहीत, त्यामुळे बाबांना वाटते आई आणि माझ्या बहिणी माझी किती काळजी घेतात. मी पण बाबांना काही सांगत नाही बिचार्‍यांना दुःख नको. त्या शेगडीची राख तिच्या अंगावर पडत असे.


सिंडर म्हणजे राख आणि या मुलीचे नाव एला. राखेत भरलेली मुलगी. त्या तिला मुद्दाम सिंडर- एला सिंडर- एला या नावाने चिडवत असत. त्यातून तिचे नाव सिंड्रेला पडले. एकदा त्या नगरी मधील राजाने सर्व नगरात अशी दवंडी पिटवली की, या नगरातील सर्व तरुण, सुंदर मुलींनी आज संध्याकाळी राजमहाला मध्ये समारंभासाठी उपस्थित रहावे. त्यातील राजकुमाराला जी मुलगी आवडेल तिच्याबरोबर तो नृत्य करेल आणि जर त्याला ती मुलगी आवडली तर तो तिच्याशी लग्न करेल. 


नगरीतील सर्वच मुली त्या राज्याची राणी आणि राजकुमार ची बायको बनण्याचे स्वप्न बघू लागल्या. त्यानुसार त्या ठरलेल्या रम्य संध्याकाळी त्या स्वतःचे सर्वोत्तम कपडे आणि दागिने घालून नटून-थटून तयार झाल्या. सिंड्रेलाच्या दोन्ही बहिणी देखील आपले सर्वोत्तम कपडे घालून नटून-थटून तयार झाल्या. सिंड्रेला ची आई आणि दोन्ही बहिणी निघाल्या. त्यांना तयार होण्यासाठी सिंड्रेला ने मदत केली आणि जेव्हा ती आई मी पण येऊ का? असे विचारू लागली तेव्हा काही नको! तू घरातच बैस. असे म्हणून तिला अंधाऱ्या खोलीमध्ये बंद करून गेल्या. सिंड्रेला रडत राहिली आणि त्या जुन्या पुराण्या शेगडीला आपले दुःख सांगत राहिली. शेगडी ताई! शेगडी ताई! बघितलंस ना? मला तर फक्त समारंभ बघायचा होता. राजकुमार कसा दिसतो ते बघायचं होतं. राजवाडा कसा असतो ते बघायचं होतं. पण त्यांनी मला तेवढं पण करू दिलं नाही. बाहेर थंड हवा पडली होती. तिने स्वतःशी मुसमुसत शेगडी पेटवली, आणि काय आश्चर्य त्या पेटवलेल्या शेगडीतून अग्निपंख असलेली एक परी बाहेर आली. 

बाळा सिंड्रेला! मी रोज तुझे दुःख ऐकत होते, मला या शेगडी मध्ये एका दुष्ट बाईने जादूगाराच्या मदतीने बंदिस्त करुन ठेवले होते. मी एक परी आहे ज्या दिवशी मी एखाद्या निष्पाप दुःखी जीवाची मदत करेन त्या दिवशी मला या शेगडी तून मुक्त होता येणार आहे. फक्त माझी ही जादू रात्री बारा पर्यंतच राहील. राजकुमाराच्या पार्टीला तू नक्की जाऊ शकशील, असे म्हणून आपल्या जादूने परीने बागेतून एक मोठा भोपळा आणला.  त्याची बग्गी तयार केली. बागेतील चार उंदीर पकडून यांना घोडे बनवले आणि एक ससा पकडून आणला त्याला गाडीवान बनवले. आपल्या जादूच्या छोडीने तिला सुंदर सोनेरी -चंदेरी पोशाखाने सजवले.


डोक्यावर चमचमता खड्यांचा मुगुट आणि पायामध्ये सुंदर सोन्याचे बूट अशा रीतीने सिंड्रेला एकदम राजकुमारी दिसू लागली आणि ती समारंभात पोहोचली तेव्हा तेथे नगरीतील सुंदर -सुंदर तरुणी छान -छान पोशाखात नटून थटून आल्या होत्या. अगदी खचाखच भरलेल्या होत्या. परंतु त्यातील एक देखील राजकुमाराच्या मनात भरली नव्हती आणि त्यातच सिंड्रेला ने पार्टी मध्ये प्रवेश केला आणि सगळेजण विस्फारित नजरेने तिच्याकडे पाहू लागले. तिच्यासारखे अप्रतिम सौंदर्य तिच्या सारखा सुंदर पोशाख कोणाकडेही नव्हता. राजकुमाराला एकदम ती आवडून गेली. त्याने तिला नृत्यासाठी विचारले आणि संपूर्ण पार्टीमध्ये फक्त दोघेच नृत्य करू लागले. तिला तिच्या बहिणीने आणि आईने देखील ओळखले नाही. परंतु सगळ्याजणी मनातून तिचा द्वेष करु लागल्या. तिच्यावर जळू लागल्या. सिंड्रेलादेखील राजकुमाराच्या प्रेमात पडली. दोघे एकमेकांच्या नजरेत नजर घालून नृत्य करू लागले .त्यात सिंड्रेलाला वेळेचे भान राहिले नाही, बघता बघता घड्याळांमध्ये बाराचे ठोके पडले आणि सिंड्रेला वरती परी ने केलेले सर्व जादू नष्ट झाली. आणि सिंड्रेला आपल्या जुन्या पुराण्या कपड्यात राजकुमारासमोर उभी राहिली. पार्टीमध्ये उभे राहिलेले सगळेजण तिच्यावरती फिदीफिदी हसू लागले. तिच्या बहिणींना तर फारच आनंद झाला. 


आली मोठे भिकारडी! राजकुमारी बनायला, अरे! पण ही त्या अंधार्‍या खोलीतून कशी काय निसटली? आई तू नीट कुलूप लावलं नाही का? आणि हे काय? एवढे छान छान कपडे कोणी दिले? ही काय चेटकीण आहे का? अस रुप घेऊनी कशी काय आली? अशा गोष्टींची तेथे चर्चा सुरू झाली. त्यातच तिच्या आईने आणि बहिणीने तिच्याबद्दल विष ओकून लोकांमध्ये गैरसमज पसरवायला सुरुवात केली. राजकुमाराने एका बाजूला तिला घेतले आणि खरं खरं काय सांग? तू कोण आहे ते सांग? असे विचारले त्याबरोबर सिंड्रेलाने रडत रडत आपली सर्व हकीगत राजकुमाराला सांगितली. राजकुमार म्हणाला फाटके कपडे असले, जुने कपडे असले, तरी तू यात देखील खूप सुंदर दिसतेस !मी तुझ्याशी लग्न करणार! आणि राजकुमाराने समारंभात येऊन सर्वांना सिंड्रेला ची खरी हकीकत सांगितली आणि तिच्या आई आणि बहिणी तिच्याशी कशा वागतात हे देखील सांगितले .त्याबरोबर राजाला खूप राग आला एवढ्या सुंदर लहानशा मुलीला इतक्या वाईट रीतीने दुष्टपणाने या कशा काय वागू शकतात? असे म्हणून त्यांना अटक करून जेलमध्ये टाकले.


आता राजाचाच राजवाडा तो! त्याला काय कमी असणार? ताबडतोब तिथल्यातिथे सिंड्रेलाला सुंदर पोशाख आणि दागदागिने मिळाले आणि राजाने ताबडतोब दोघांचा विवाह घोषित केला. त्याच वेळी अग्निपंख लावून परी तेथे प्रगट झाली. सर्वांना सिंड्रेला ची खरी हकीकत सांगितली. त्यावर सगळ्यांचा विश्वास बसला आणि या दोघांना आशीर्वाद देऊन परी अदृश्य झाली आणि काही दिवसातच सिंड्रेला राजाची सून झाली. राजकुमाराची लाडकी राणी झाली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy