काश्यादाचं मीठपुराण
काश्यादाचं मीठपुराण


पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर काश्यादाची काळी कुळकुळीत आकृती चमकत होती. मीठ गोळा करण्यासाठी वापरला जाणारा लाकडी निवळा त्याने हातातून खाली ठेवला. मिठागराच्या आयताकृती कोंड्यांमध्ये आता शुभ्र मीठाचे थर जमा होऊ लागले होते. कोंड्यांच्या लहान बांधावरून चालत तो पेंढ्यानी बांधलेल्या झोपडीसारख्या पापटामध्ये आला. तिथल्या थंडगार सावलीत विसावत त्याने मडक्यातल्या थंडगार पाण्याचा घोट घेतला. त्याची नजर एकदा रत्नांसारख्या चमचमणाऱ्या मीठाच्या राशींकडे गेली. मीठ तयार होऊन आठवडा उलटला होता, पण ते घेण्यासाठी नेहमीचे व्यापारी अजूनही आले नव्हते. येत्या दहा-बारा दिवसांत जर मीठ उचलले गेले नाही तर त्या राशींना जपणे आणखीनच अवघड होणार होते. मे महिना निम्मा उलटून गेलेला. पाऊसही माणसाप्रमाणेच बेरभरवशाचा, कधीही येऊ शकेल. तयार मीठ विकले गेले नाही, तर ते झाकण्याची व्यवस्था करावी लागणार. काश्यादाने मनातल्या मनात 'टाळेबंदी' करणाऱ्यांना चार दोन शिव्या हासडल्या.
काश्यादाचे मूळ नाव काशिनाथ. तो या मीठागराचा खातेदार, एकप्रकारचा मुकादमच. त्याच्या हाताशी पाच-सहा खारवे म्हणजेच मीठ कामगार होते. हे खारवे पावसाळ्यांत दुसरी कामे करण्यासाठी निघून जात असत. त्यामुळे जाण्यापूर्वी त्यांचा पगार खातेदाराने चुकता करायला हवा होता. काश्यादाच्या सपाट माथ्यावर चिंतेच्या रेषा झळकू लागल्या. मीठकामगार म्हणून सुरूवात केलेला काश्यादा गेली पंचविस वर्षे स्वतंत्रपणे मीठागराची जबाबदारी सांभाळत होता. जाहीरातींनी आयोडीनयुक्त, शुद्ध वगैरे शब्द लोकांच्या डोक्यात भरण्यापूर्वीच्या काळात घरोघरी पांढरे शुभ्र खड्याचे मीठ वापरले जात होते. त्यातच एका सरकारी फतव्याने खुल्या बाजारात मीठ विक्रीला बंदी केल्यानंतर एक मोठा ग्राहकवर्ग या व्यवसायापासून दुरावला होता. आता काश्यादाकडे येणाऱ्या ग्राहकांमध्ये व्यापारी, वीटभट्टीवाले, गाई-म्हैशींचे मालक अशांचा भरणा होता. त्यातच या व्यवसायातही दलालांनी शिरकाव केल्याने मेहनतीच्या पीकाची कवडीमोलाने विक्री करावी लागत होती. काश्यादाचे वय पासष्ट वर्षे. या वयात दुसरे काही काम करणे शक्य नव्हते आणि वर्षानुवर्षे मीठ कसत असलेली खारजमिन ओसाड ठेवणे परवडणारे नव्हते. नाही म्हणायला काश्यादाचा एकुलता एक मुलगा एका ट्रान्सपोर्ट कंपनीत खाजगी लेबर म्हणून जात होता. पण कामगार, कंत्राटदार आणि कंपनी यांच्या वादात त्या कंपनीलाही वर्षभरापासून टाळे लागलेले. खाजगी लेबर असल्याने त्यालाही सरळ घरी बसावं लागलं होतं. आधीच आर्थिक अडचणीतून जात असलेल्या काश्यादाची अवस्था अधिकच बिकट होत चालली होती.
करोनाने शिरकाव केल्यानंतर जाहीर झालेल्या टाळेबंदीत बरेचसे परप्रांतीय मजुर त्यांच्या राज्यात परतू लागले होते. परिणामी बांधकाम व्यवसायही ठप्प झालेला. अशा परिस्थितीत वीटभट्टयांचा अग्नीही मंदावला होता. संचारबंदीमुळे मीठ विकले जाण्याच्या इतर शक्यताही मावळलेल्या. काश्यादाने खारव्यांना बोलावले. मीठाच्या राशींना पावसापासून वाचवण्यासाठी पेंढ्याने झाकण्याची तयारी करण्यास सांगीतले. त्यांना योग्य त्या सूचना देऊन काश्यादा घरी परतला. जेवण उरकून अंगणात टाकलेल्या खाटेवर अंग टेकले. थकलेला असूनही झोप लागण्याची चिन्हे नव्हती. गावात फेरफटका मारायला जायचीही सोय नव्हती. अजूनही गावात पूर्णत: संचारबंदी नव्हती. पण धास्तावलेले लोक एकमेकांना टाळत होते. कोणाच्या घरचे पाणीही पित नव्हते. काश्यादाने कापडी पिशवीत ठेवलेली आपली हिशोबाची वही उघडली. त्यातच एक पिवळे पडलेले बँकचे खातेपुस्तकही होते. बऱ्याच दिवसांत बँकेकडे फेरी झाली नव्हती. मीठाचा व्यवहारच झाला नसल्याने बँकेत पैसे जमा करण्याची शक्यता नव्हतीच. न जुळणाऱ्या हिशोबाकडे पाहत काश्यादा खाटेवर बसून राहीला. रात्री उशीरा केव्हातरी त्याचा डोळा लागला. सकाळी पुन्हा सवयीने तो मीठागरात जाण्याची तयारी करू लागला. त्याच्या हालचालींमध्ये नियमितता होती पण नेहमीसारखा उत्साह नव्हता.
घरात लोळत पडलेल्या मुलाच्या नावाने बडबड करत तो दरवाजाच्या बाहेर आला. दरवाजाबाहेर एक व्यक्ती हातात वही आणि पेन घेऊन उभी होती. संपूर्ण तोंड बांधल्याने ओळखणे कठीण होते. काश्यादाची विचारपूस करताना आवाजावरून आणि खिशाला असलेल्या लाल पेनावरून काश्यादाने ते पाटील गुरूजी असल्याचे ओळखले. घरात कोणाला सर्दी, खोकला, ताप असल्याच्या नोंदी सर्वेक्षणासाठी आलेले पाटील गुरूजी करत होते. काश्यादाचे स्क्रिनिंग करताना चेहऱ्यावरील भावही गुरूजींनी तपासले. सर्वेक्षणाची माहिती शोधताना गुरूजींना काश्यादाच्या व्यवसायाची समस्याही कळली. पाटील गुरूजींनी उरलेले सर्वेक्षण संपल्यानंतर थेट मीठागराची वाट धरली. काश्यादाला भेटून यातून काही ना काही मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. मदत होईल न होईल, पण गुरूजींनी आपले दु:ख समजून घेतल्याचा आनंद काश्यादाच्या चेहऱ्यावर झळकू लागला. आज आणखी दोन कोंड्यांमधून मीठ काढायचे होते. डोक्यातले प्रश्न विसरून काश्यादा पुन्हा कामाला जुंपला. दोन दिवसांत मीठाची आणखी एक रास तयार झाली. मीठ झाकण्यासाठी मातीचे लिंपण तयार करायला घेतले होते. पेंढ्याच्या लहान गुंड्याही बांधल्या होत्या. गाडीचा हॉर्न वाजला म्हणून काश्यादाने चमकून वर पाहीले. चौधरी शेठ 'छोटा हत्ती' म्हणून प्रसिद्ध असलेले वाहन घेऊन आले होते. धंदा बंद आहे म्हणून नकार दिलेला शेठ हातात चेकऐवजी रोकड घेऊन मीठाच्या खरेदीला आलेला. सगळा माल उचलतो, म्हणून आश्वासित करत होता. काश्यादाने पुढचा मागचा विचार न करता मापावरच्या खारव्यांना पोत्यांमध्ये मीठ भरण्यास सांगितले. मोठे वाहन न मिळाल्याने चौधरी शेठला लहान टेंपोसोबत चार पाच चकरा माराव्या लागणार होत्या. काश्यादाने पैसे काळजीपूर्वक मोजून खिशात ठेवले. बऱ्याच दिवसांतून त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.
तासा दीड तासाने पुन्हा छोटा हत्ती आला. त्याच्या सोबत स्कूटीवर गावातले आणखी दोघेजण आलेले. हातात रिकामं पोती घेऊन त्या दोघांनी सरळ मीठ भरायला सुरूवात केली. दोन पोती भरून त्यांनी काश्यादाच्या हातात शंभरची नोट देऊन निघून गेले. चौधरी शेठ जाता जाता, शेजारच्या गावातील मन्या येताना दिसला. मन्या म्हणजे गावातल्या बऱ्याचशा व्यवहारांचा एजंट. त्याने चौधरी शेठने मीठाला दिलेल्या भावाबद्दल प्रश्न विचारले. मन्या शेठच्या दुप्पट भाव द्यायला तयार होता. चौधरी शेठसोबत सौदा ठरला असल्याने काश्यादाने त्याला नकार दिला. पण येत्या दोन दिवसांत आणखी मीठ तयार होईल, ते मन्याला द्यायचे कबूल केले. दिवस मावळला. खारव्यांच्या पगाराचा प्रश्न मिटला होता. हिशोबाची वही आता जुळत होती. बँकेकडून नवे खातेपुस्तक घ्यायला हवे, काश्यादाने विचार केला.पण उठाव नसलेला माल दोन दिवसांत कसा विकला गेला याचे गूढ त्याला कळले नाही. फारसा विचार न करता आकाशाकडे समाधानाने पहात काश्यादा शांतपणाने झोपी गेला.
दोन दिवसांपूर्वीची गोष्ट... काश्यादाची भेट घेऊन पाटील गुरूजी घरी परतले. त्यांच्या डोक्यात विचारचक्र चालू होते. स्वच्छ आंघोळ झाल्यानंतर त्यांनी चार्जिंगला लावलेला मोबाईल हाती घेतला. सगळे व्हॉटस्अॅप समूह कोविड-१९ च्या संदेशांनी भरलेले. कुठे गीत, कुठे व्हिडीओ असे बरेच काही आदळत होते. गावातल्या एका समूहावर कोणीतरी मीठाने भाज्या धुणे, मीठाच्या पाण्याने गुळण्या करणे, ताप आल्यास मीठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवणे असे विविध उपाय सुचवले होते. गुरूजींच्या डोक्यात मीठासारखाच शुभ्र प्रकाश पडला. त्यांनी मीठाच्या संदेशाखाली लिहिलं 'नैसर्गिक मीठामध्ये कसलेही केमिकल मिसळलेले नसते, त्यामुळे कंंपनीतल्या मीठाऐवजी नैसर्गिक मीठ वापरायला हवे. नॅचरल गोष्टींना साईड इफेक्टही नसतात.' त्याखाली नैसर्गिक मीठासाठी आपल्याला लांब जायची गरज नाही, काश्यादाकडेही हे असे मीठ मिळू शकेल अशी कल्पना दिली. गुरूजींच्या या संदेशाला चार जणांनी अंगठा दाखवला, तिघांनी व्वा म्हटले तर उरलेल्या पन्नास-साठ जणांनी वरवर वाचून दहा बारा समूहांवर हा संदेश पाठवूनही दिला. काही जणांनी या दोन स्वतंत्र पोस्ट एकत्र करून 'Natural Salt' अशा मथळ्याखाली या मीठाची भलामण करणारी पोस्ट लिहिली. काही हुशार आणि अभ्यासू व्यक्तींनी ही पोस्ट कॉपी करून फेसबुकवर आपल्या स्वत:च्या नावाने पोस्टदेखील केली. हे सर्व संदेश वाचून किराणा मालाच्या व्यापाऱ्यांकडे नैसर्गिक मीठाची विचारणा होऊ लागली. अखेर या मीठासाठी व्यापाऱ्यांनी काश्यादाची वाट धरली. गुरूजींना चौधरी शेठची, मन्याची बातमी कळली. काश्यादाचा प्रश्न मार्गी लागल्याबद्दल त्यांनी आकाशाकडे समाधानाने पाहिले. उद्या काहीही करून आपल्याला 'नैसर्गिक मीठ' आणायला हवी याची खूणगाठ मनाशी बांधून ते शांतपणे झोपी गेले.