काळुची इमानदारी
काळुची इमानदारी


काळू हे नाव आपण शक्यतो माणसाचे ठेवतो; पण हे नाव आहे एका माणसाळलेल्या इमानदार कुत्र्याचे.
नावाप्रमाणेच तो काळ्या रंगाचा आहे;पण त्याचे जगणे स्वाभिमानाने जगण्याचे, इमानदारीने वागण्याचे.काळू हा एक छोटेसे पिल्लू होते. एका व्यक्तीने त्याला लहानपणात शाळेच्या हॉटेल कामगाराच्या ताब्यात दिले.आई विना काळू पोरका झाला होता.लहान वयात त्याची आई अपघातात ठार झाली होती. लहान वयात त्याला आईचे दूध मिळाले नाही. प्रेमाची माया मिळाली नाही.
तो आईच्या प्रेमासाठी आसुसलेला होता. पण ते त्याच्या नशिबात नव्हते. कामगाराने त्या पिलाला आपल्याजवळ ठेवून घेतले. त्याला दररोज वीस रूपयाचे दूध विकत आणून बाटलीतून पाजत होता. काळू जसजसा मोठा होत होता तस तसा कामगाराशिवाय कुणाकडेही जात नसे.
कुणाकडेही राहत नसे. कामगाराचे नाव जितू होते. अगदी तो जितू जवळ रात्रीच्या वेळी झोपायचा. त्यामुळे दोघे ही जीवलग भावासारखे राहू लागले होते. सकाळी उठल्यावर जितू सोबत काळूचाही नाश्ता व्हायचा. दुपारी दूध, चपाती मिळत असे. संध्याकाळी चपाती, डाळ, भात मिळत असे. आठवडयातून दोन तीन दिवस मटन, मासे, अंडी खायला मिळत असे. बराचसा पगार काळूच्या देखभालीसाठी जात असे.
आता काळू मोठा झाला होता. जीतूला घरातील एक जिव्हाळा असणारा काळू वाटू लागला. त्याच्या शिवाय जगणे त्याला अधूरे वाटू लागले. मोठा झाल्यावर काळू जितू बरोबर फिरू लागला. रात्री मात्र तो जीतूच्या पायरी वर झोपत असत. त्याच्या भरवशावर अख्खं कुटुंब बिनधास्त झोपत असे. गल्लीत अनोळखी व्यक्तीला प्रवेश नसायचा. चुकून कोणी आल्यास त्याला तो जख्मी करायचा. त्यामुळे सराईत चोराना त्याची दहशत होती.
जीतूच्या घरी कधीच चोरी झाली नाही. गल्लीत सगळे ओळखीचे झाले होते. त्यांच्यावर तो भुंकायचा. पण काळू म्हणून ओळखीच्या माणसाने ओरडल्यावर त्याला वाईट
वाटायचे. तो लगेच आपली शेपटी हलवून माफी मागायचा. गल्लीतील सर्वांचा तो लाडका झाला होता.
त्यामुळे गल्लीतही कधी चोरी झाली नाही. मालकाच्या घराजवळ कडक बंदोबस्त करण्याचे काम काळू करायचा. कोणताही फेरीवाला दिवसा गल्लीत येत नसे.
अचानक एक दिवस काळू दिसेनासा झाला.सर्व गल्लीतील लोक शोकाकूल झाले होते. दुःखाश्रू वाहत होते. जितू आजारी पडला होता. शोध घेऊनही काळू दिसत नव्हता. दोन दिवस गेले, तीन दिवस गेले तरी काळू घरी परत आला नाही. जितू वेड्यागत प्रत्येकाला विचारत होता. पण शेवटी अपयश वाट्याला आले. काळूचा चोरानी काटा काढला होता. त्याला दूर नेऊन ठार मारले होते. काळू डोळ्यासमोर दिसल्याचा भास जीतूला होऊ लागला. जितू सतत रडत होता. पण काय उपयोग? काळूचे आयुष्यच तेवढं म्हणायचे! परत काळू कधी दिसलाच नाही. मात्र त्याच्या आठवणी जिवंत होत्या.