Anil Ghotkar

Thriller

4.5  

Anil Ghotkar

Thriller

काळ आला होता पण...

काळ आला होता पण...

3 mins
342


1998 साला मधील ऑक्‍टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यातील ही घटना कायम स्मरणात राहिली आहे. मी त्यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रच्या अकोला मुख्य शाखेचा शाखाधिकारी म्हणून कार्यरत होतो. चारच्या सुमारास बँकेच्या नागपुर हायकोर्टातील वकील श्री फडके साहेबांचा फोन आला. त्यांनी नागपूर हायकोर्टामध्ये प्रलंबित असलेल्या बँकेच्या एका दाव्यामध्ये काही दस्तऐवज ताबडतोब हवे असल्याचे सांगितले. तसेच जर दुसऱ्या दिवशी हे दस्ताऐवज नागपूर हायकोर्ट मध्ये दाखल करता आले नाही तर दाव्यावर विपरीत परिणाम होऊ शकेल असे बजावले. क्षेत्रीय कार्यालय अकोला शहरात होते मी लगेच क्षेत्रीय प्रबंधक यांना सर्व हकीकत सांगितली. साहेबांनी मला त्वरित सर्व दस्तऐवज घेऊन नागपूरला जाण्याचे फर्मान काढले. दिवाळी दोन दिवसांवर असल्यामुळे सगळ्या बसेस रेल्वे गाड्या मध्ये तोबा गर्दी होती. आरक्षण मिळणे शक्यच नव्हते. मी लगेच सर्व दस्तऐवज एका फाईल मध्ये गोळाकरून सेवाग्राम एक्सप्रेसने नागपूरला रवाना झालो.


सकाळी वकील साहेबांना सर्व दस्तऐवज दाखविले. त्यांनी हायकोर्टामध्ये समक्ष हजर राहण्याचा सल्ला दिला. दुसऱ्या दिवशी दिवाळी असल्यामुळे परत येणे गरजेचे होते. त्याचप्रमाणे कोर्टाचे काम केव्हा संपेल याची खात्री नसल्यामुळे आरक्षण करू शकत नव्हतो. दुपारी चार साडेचार च्या दरम्यान सर्व काम आटोपले. आता जे वाहन मिळेल त्यांनी अकोला जायचे मी ठरवले. नागपूर हुन अकोला कडे जाणाऱ्या सर्व बसेस भरत नगर थांब्यावरून जातात. मी तडक तिथे पोहोचलो आणि अकोला कडे जाणाऱ्या वाहनांना हात दाखवून थांबवण्याची विनंती करू लागलो. प्रचंड गर्दी असल्यामुळे एकही वाहन थांबेना. तशी माझी धुकधूक अधिकच वाढायला लागेली. रात्री नऊ दहाच्या दरम्यान एक खाजगी बस येताना दिसली मी हात दाखविला असता वेग कमी करून हळूहळू पुढे जात होती, मी धावत जाऊन क्लीनर ला एक सीट घेण्याची विनंती केली. तो म्हणाला "जगा नही है इंजिन पे बैठ ना पडेगा", मान्य करण्याशिवाय माझेकडे पर्यायच नव्हता. चढलो एकदाचा गाडीमधे व ड्रायव्हर शेजारी इंजिन वर बसलो. गाडीची स्थिती फारच खराब होती. मी मनातल्या मनात देवाचा जप करीत अक्षरशः जीव मांडीत घेऊन बसलो. जेमतेम चाळीस किलोमीटरचा प्रवास झाल्यावर

 

माझ्या बुडाखाली खडखडाटचा मोठा आवाज झाला आणि बस जागेवरच थांबली. काही केल्या पुन्हा सुरू होईना, चालकाने सर्वांना खाली उतरून धक्का मारायला सांगितले. सर्वांनी मिळून जवळ जवळ एक ते दीड किलोमीटर धक्का मारत एका धाब्याजवळ बसला आणलं. नंतर चालक व क्लिनर मेकॅनिकला शोधायला निघून गेले. डोळ्यामध्ये रात्रीची झोप व दिवसभराची दगदग असल्यामुळे खूपच थकवा जाणवत होता. त्याच बरोबर येणाऱ्या पहाटेच्या पहिल्या अभ्यंगस्नाना पूर्वी घरी पोहोचण्याची ओढ होती. मात्र काहीच मार्ग सापडत नव्हता. धाब्यावर गरम गरम ब्रेड पकोडे काढणे सुरू होते. दोन-तीन ब्रेड पकोड्यावर ताव मारला आणि सर्वप्रथम पोटातल्या कावळ्यांना शांत केले. दोन ते तीन तासांनी बस सुरू झाली आणि परत प्रवास सुरू झाला. झालेला उशीर भरून काढण्यासाठी चालक अधिक सुसाट वेगाने बस हाकलत होता. माझा मनातल्या मनात जप सुरू होता भिती खूपच जास्त वाटत होती.


रात्री तीन ते साडेतीनच्या दरम्यान अमरावती बायपासवर एक प्रवासी उतरला, माझी अवस्था बघून चालक म्हणाला की "पीछे एक जगह हो गई है आप पीछे जाके बैठो." मी लगेच शेवटच्या सीटवर जाऊन बसलो. थोडे पुढे गेल्यानंतर आणखी एक प्रवासी चढला व माझ्या पूर्वीच्या जागी बसला. बस आणखी सुसाट वेगात सुरु झाली. नंतर जेमतेम दहा मिनिटांनी आमच्या चालकाने एका ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला समोरून दुसरे वाहन येताना दिसत होते . त्यामुळे मी भीतीने सीटला घट्ट धरून डोळे मिटून घेतले. तोच प्रचंड मोठा आवाज झाला मी गच्च डोळे मिटून सीटला धरून बसलो होतो. क्षणभर मला काय झाले काहीच कळले नाही. एकदम जल्दी उतरो, जल्दी उतरो असा जोरात आवाज ऐकून मी डोळे उघडले तर सर्वजण खाली उतरण्याची घाई करत होते. माझी सीट सर्वात मागे असल्यामुळे मला थोडा वेळ लागला. उतरताना चालकाच्या केबिनपर्यंत आलो असता ते भयंकर दृश्य बघून मला चक्कर आली. आमचा चालक तर जागेवरच निपचित पडला होता. पाच मिनिटांपूर्वी मी ज्या जागेवर बसलो होतो तिथे रक्ताचा नुसता सडा पडला होता. तिथे माझ्यानंतर बसलेला प्रवासी सुद्धा दिसला नाही. मी स्वतः खाली उतरलो की लोकांनी आणून बसवले कळले नाही. दिवस उजाडेपर्यंत रस्त्यावरच इतर प्रवाशांसोबत बसून होतो. मनात जप सुरू होता. तसेच मनोमन परमेश्वराचे आभार मानणे सुरू होते.

त्यावेळी वाटले नक्कीच काळ आला होता पण...


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller