आठवणीतले क्षण ते तीन दिवस .........
आठवणीतले क्षण ते तीन दिवस .........
ही गोष्ट एकूणवीसशे ब्याणऊ साला मधील आहे. त्यावेळी मी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पळसोबढे जिल्हा अकोला येथे शाखा प्रमुख कार्यरत होतो. बँकेच्या आंतरिक पदोन्नतीच्या स्पर्धा परीक्षेमध्ये माझी अधिकारी वर्ग 2 मध्ये पदोन्नती झाली. मनोमन अतिशय आनंद झाला त्यासोबत चिंतेची पण एक झालर होती. कारण पदोन्नती नंतर लगेचच माझी बदली परभणी शाखेमध्ये झाली. माझी सौभाग्यवती स्टेट बँक ऑफ इंडिया अकोला येथे कार्यरत होती. तसेच मुले पण अकोल्याच्या चांगल्या शाळेमधे शिकत होते. त्यामुळे सगळ्यांना घेऊन परभणी ला जाणे शक्य नव्हते. त्यामुळे ऑक्टोबर/नोव्हेंबर महिन्यामध्ये मी एकटाच परभणी शाखेत रुजू झालो व
अकोला परभणी अशी साप्ताहिक वारी सुरू झाली. शनिवार दिनांक 5 डिसेंबर रोजी परभणी वरून रात्री अकोल्याला आलो. नेहमीच्या सवई प्रमाणे सोमवार दिनांक 7 डिसेंबरला अकोल्यावरून सकाळी सहा वाजता निघालो. अकोला ते परभणी अशी थेट बस नसल्यामुळे सकाळच्या नांदेड बसने हिंगोली पर्यंत जायचे व हिंगोली वरून दुसरी बस पकडून परभणीला जायचे हे एव्हाना अंगवळणी पडले होते. त्या दिवशी नेहमीप्रमाणे नांदेड बसने सकाळी नऊ वाजता हिंगोली येथे उतरलो आणि परभणी ची बस लागली आहे का ते शोधू लागलो. त्यावेळी कळलं की काल 6 डिसेंबर रोजी अयोध्येतील बाबरी मज्जीत पाडल्याचे पडसाद संपूर्ण देशात उमटू लागले आहेत. कायदा व सुव्यवस्था ची परिस्थीती अतिशय गंभीर झाल्यामुळे परभणी येथे संचारबंदी लागली आहे त्यामुळे कोणतेही वाहन तिकडे जाणार नाही. आता काय करायचे असा विचार मनात सुरू होता. तितक्यात नांदेडहून अकोल्या कडे जाणारी एक बस आली , मी अकोल्याला परत जायचे ठरवले व बसमध्ये बसलो. ही बस वाशिम पर्यंत आली असता सगळीकडे नुसता गदारोळ सुरू होता. वाशीम स्थानकात बस आल्यानंतर वाहकाने सांगितले अकोला सह सर्व ठिकाणी संचारबंदी लागू झाली आहे. त्यामुळे बस इथून पुढे जाऊ शकणार नाही. मी मधल्यामध्ये पुरता अडकून गेलो होतो. अकोल्यावरून तर निघालो पण परभणीला पोहोचू शकत नाही आणि परत अकोल्याला हि घरी येऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. थोड्या वेळात वाशीम स्थानकावर सुद्धा भयाण शांतता पसरली मला काहीच सुचेना . बस स्थानकाजवळ आमच्या बँकेची शाखा आहे नकळत तिकडे पावले वळली पण बघतो तर शाखेला पण भलेमोठे कुलूप दिसले. रस्त्यावर सुद्धा कुठेही चिटपाखरू दिसत नव्हते मधूनच पोलीस ची गाडी सायरन वाजवत फिरत होती व कोणीही बाहेर पडू नये असे बजावत होती. आता मी भयंकर घाबरलो जवळच असलेल्या लाॅज वर जाऊन बघितले तर तिथेही सगळे बंद दिसले. आता काय करावे कोठे जावे हा यक्ष प्रश्न माझ्यासमोर उभा ठाकला. पोलीस च्या गाड्या तर सतत फिरत होत्या असेच थांबलो तर केव्हा पोलिसांचा प्रसाद मिळेल सांगता येत नव्हते. अचानक आठवले वाशीमला आमचे दूरचे नातेवाईक राहतात. यापूर्वी त्यांच्याकडे कधीच गेलेलो नव्हतो घरही बघितले नव्हते पण पत्ता थोडा आठवत होता. मी वाशिमच्या गल्ली बोळातून शोधत शोधत त्यांच्या घरी पोहोचलो. त्यांना सर्व हकीकत सांगितली. त्यांनी पण मनापासून स्वागत केले व काही काळजी करू नका असे सांगितले.
माझी स्वतःची सुरक्षितता सुनिश्चित झाली पण घरच्यांची काय अवस्था झग असेल किती काळजी वाटत असेल असे एक ना अनेक प्रश्न मनात घर करू लागले. त्याकाळी मोबाईल तर नव्हतेच पण लँड लाईन फोन सुद्धा फारसे कोणाकडे नव्हते त्यामुळे घरी खुशाली कळविण्यात करता काहीच मार्ग नव्हता. एखाद दोन दिवसांमध्ये परिस्थिती सुरळीत होईल व आपण परभणीला जाऊ कामावर जाऊ शकू असा सकारात्मक विचार करून झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी टेलिव्हिजनवर बातम्या बघून काळजी आणखीन वाढली कारण संपूर्ण देशामध्ये हिंसाचाराचा आगडोंब उठल्याचे व संचारबंदी सात दिवस वाढविल्याचे सांगत होते. मी जरी सुरक्षित ठिकाणी असलो तरी घरी निरोप कसा द्यायचा आणि घरच्यांची काय अवस्था झाली असेल या विचाराने जीव कासावीस होऊ लागला. मी ज्यांचे घरी थांबलो होतो त्यांचा मुलगा जीवन प्राधिकरण मध्ये कामाला असल्यामुळे त्याला संचार बंदी मध्ये फिरण्याची पास मिळाली होती. नंतर चे दिवशी रात्री त्याने अकोला येथे फोन करून निरोप पाठविण्याची व्यवस्था केली की मी त्यांचे घरी सुरक्षित आहे. आता मन थोडे शांत झाले . तसेच घरी अकोल्याला सौभाग्यवतीची पण काळजी थोडी कमी झाली. संचारबंदी कधी उठेल ते सांगता येत नव्हते मी ऑफिसला पण जावू शकत नाही व अकोल्याला घरी पण येऊ शकत नाही अशी परिस्थिती होती.
तिसऱ्या दिवशी माझा भाचा कार्यालयातून घरी आल्यानंतर आणि एक ट्रेन रात्री अकोल्याकडे जाणार असल्याचे सांगितले. परंतु परिस्थिती खूपच स्फोटक असल्यामुळे मी काही दिवस त्यांच्या घरीच राहण्याचा आग्रह सगळ्यांनी केला.पण मला घरी पोहोचण्याची खूपच ओढ लागली होती. भाच्या कडे संचार बंदीची पास असल्यामुळे कसेही करून मला रेल्वे स्टेशन पर्यंत सोडण्याची विनंती केली . आणि रात्री 8 च्या सुमारास वाशिम वरून अकोला कडे जाणाऱ्या रेल्वे मध्ये बसलो. परंतु रेल्वे अकोल्याला पोहोचेल की नाही याची शाश्वती नव्हती . एक एक स्टेशन मागे पडत गेले तशी माझी धुकधूक वाढत गेली. एकदाचे अकोला जवळ आले पण रेल्वे स्टेशन वर भयंकर गोंधळ सुरू असल्यामुळे आमची रेल्वे आउटर चे सिग्नल ला थांबवून ठेवण्यात आली. स्टेशन वर पोहोचल्यानंतर गोंधळ आणखी वाढला तर घरी कसे पोहोचू याची भीती वाटू लागली. मनात देवाचे स्मरण करून मी आउटर सिग्नललाच उतरलो व स्टेशनच्या मागच्या बाजूने घराकडे धावतच सुटलो. वाटेमध्ये किर्र अंधार होता. स्टेशनच्या मागच्या बाजूने दीड किलोमीटर पर्यंत कसलीही वस्ती नव्हती अशातच मागून कोणी येईल का तसेच अंधारामध्ये विंचू काटे व साप याची पण भीती होतीच. देवाचा धावा करत मी धावत राहिलो आणि एकदाचे घर गाठले त्यावेळी सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.सौभाग्यवतीच्या व मुलांच्या चेहर्यावरील आनंद बघून मीही तीन दिवसांत झालेले दुःख कष्ट क्षणात विसरून गेलो. सुरक्षित सुटका झाल्याबद्दल सगळ्यांनी परमेश्वराचे खूप खूप आभार मानले. आजही त्या तीन दिवसांच्या आठवणी मनामध्ये ताज्या आहेत.
