Anil Ghotkar

Others

4.6  

Anil Ghotkar

Others

सेवाकाळातील आठवणीचे क्षण

सेवाकाळातील आठवणीचे क्षण

2 mins
314


  माझ्या महाबैंकेतील 39 वर्षाहून अधिक सेवा काळातील एक अविस्मरणीय प्रसंग. मी जालना मेन शाखाप्रमुख म्हणून कार्यरत असताना घडलेली घटना आहे. 2005 सालातील सप्टेंबर महिना त्यादिवशी रात्री 8.00 /8.00 ची वेळ असेल. मी एकटाच केबिन मधे काम करत होतो.शाखेच्या ग्रील च्या दाराला कुलूप लावून टेंपररी शिपाई प्रमोद आतल्या खोलीत व्हावरच शिवत होता.अचानक ग्रीलचे दार जोरात खटखटण्याचा आवाज आला. मी प्रमोद ला जाऊन बघायला सांगितले.एक अंदाजे 60/65 वर्षाची वृद्धा दार उघडण्याची विनंती करीत होती.प्रमोदने तिला सांगितले बॅंक बंद झाली आहे आत कोणीच नाही. परंतू ती वृद्धा ऐकेच ना ,सारखी मला मॅनेजरला एकदा भेटू दे म्हणून विनवत होती.मी प्रमोदला दार उघडायला सांगितले. दार उघडताच ती वृद्धा केबिनमधे येउन म्हणाली की मला ताबडतोब दहा हजार रूपयांची खूप गरज आहे.मी तिला सांगितले आजी बॅंक तर केव्हाच बंद झाली आहे. कॅशियर सह सर्वजण घरी निघून गेले आहेत.आता पैसे काढणे शक्य नाही.हे ऐकून तीने एकदम हंबरडा फोडला. मी समजावण्याचा बराच प्रयत्न केला पण तीचे सांत्वन होईना. पैसे कशाला हवे असे विचारले असता ती म्हणाली आज दुपारी शेतात औषध फवारत असतांना तिच्या तरूण मुलाला विषबाधा झाली आहे व जालना मेन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्याला ताबडतोब औरंगाबाद ला न्यायला सांगितले आहे आमचे जालन्यात कोणीच नाही आता तूम्हीच माझ्या मुलाचे प्राण वाचवू शकता असे म्हणत तीने परत जोरात हंबरडा फोडला. तीचे आमच्याच शाखेमधे पेंशनचे खाते होते व त्यामध्ये तेवढी शिल्लक होती. ते पासबुकपण तिने दाखविले. 


अशा कठोर प्रसंगी आपण मदत करायला हवी असे मला वाटले. आमचे अकौंटंट त्यावेळी दुसऱ्या गावाहून जाणे येणे करत होते म्हणून कॅश ची चावी मी सांभाळत असे. मी प्रमोदला माझी स्कूटर घेवून हेडकॅशियरला घरून घेवून यायला सांगितले. आजीला पाणी प्यायला दिले व थोडावेळ शांतपणे बसायला सांगितले. प्रमोद कॅशियरला घेवून येइपावेतो आजी कडून विडरावल फाॅर्म भरून ठेवला. हेडकॅशियर आल्या बरोबर स्ट्रांगरूम मधून दहा हजार रूपये काढून दिले व रात्री 9/9.30 वाजता आजीला रवाना केले. त्यानंतर 3/4 दिवसांनी ती आजी पेढ्याचा डबा घेवून बॅंकेत आली आणि व मूलाची प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले व म्हणाली त्यादिवशी तुमच्या रूपात आम्हाला देवदूतच भेटला. वास्तविक पहाता तिचेच पैसे तिच्या कामी आले होते. परमेश्वराने माझ्या हातून ही सेवा करवून घेतली एवढेच.


त्यानंतर दर महिन्याला ती आजी जेव्हा जेव्हा पेंशनचे पैसे काढायला बॅंकेत यायची तेंव्हा तेव्हा केबिनमध्ये येवून भेटायाची व सोबतच्या स्त्रियांना सांगायची की यांच्यामुळे माझ्या मुलाचे प्राण वाचले. आपल्या कामाचे समाधान याहून मोठे काय असू शकते?


Rate this content
Log in