Jyotsna Patwardhan

Abstract Thriller Others

4.2  

Jyotsna Patwardhan

Abstract Thriller Others

जीवनदान

जीवनदान

13 mins
581


सकाळी ५.३० चा अलार्म झाला तशी सुचेता अंथरूणातून बाहेर आली. खर तर ती अलार्म होण्याचीच वाट बघत होती. रात्रभर तसाही डोळ्याला डोळा लागला नव्हता. घरात अजून कोणीच उठलेले नव्हते. अर्थात रोजही तीच सर्वाआधी उठत असे. मस्तपैकी आल्याचा चहा करून घ्यावा म्हणजे बरे वाटेल म्हणून चहा ठेवला आणि नेहमीप्रमाणे एकीकडे पोळ्यांची कणिक भिजवून घेतली. चहा कपात ओतून टेबलावर येऊन बसली. चहा घेत होती पण......... आज जरी मन थोडे शांत झाले असले तरी ते अस्वथ होते. निर्णयाची संपूर्ण जबाबदारी तिने श्रीरंगवर टाकली असल्याने ! पण तो काय निर्णय घेईल? आपले पुढे काय ? हे प्रश्न मनात येतच होते.

या प्रश्नाबरोबर मन एकदम २५ वर्षे मागे गेले.

आज नोकरीचा पहिला दिवस, सुचेता व्यवस्थित तयार होऊन १० मिनिटे आधीच बँकेत पोहोचली. बघितले तर अजून कोणीच आलेले नव्हते. कुठे जावे, काय करावे वगैरे विचार करीत असतानाच तिचे लक्ष केबिनकडे गेले तर तेथील अधिकारी कामालाहि लागलेले. तेवढ्यात एका शिपायाने येऊन विचारले “कोण पाहिजे?”

“मी आजपासून या बँकेत जॉईन होण्यासाठी आलेय.” सुचेता

“हो का बर बसा अजून लोक यायचीत”. ते गेले त्यांच्या कामाला.

तिच्यासारखे आणखी ३-४ जण आज जॉईन होणार होते. एक एक करत सर्व आले. नवीन जॉईन होणाऱ्यात एक मुलगी आहे हे बघून सुचेताला जरा बरे वाटले. चला कोणीतरी आहे बरोबर! सर्वांच्या जॉईनीग फॉरम्यालीटीज पूर्ण झाल्यावर शाखा प्रमुखांचे सर्वांसाठी वेलकम लेक्चर होते. लेक्चर चालू असताना सुचेताच्या मनात आले ‘ अरे हे एवढे मोठे अधिकारी असून सुद्धा एवढे यंग कसे? नेहमी बँकेचे प्रमुख अधिकारी म्हणजे एजेड गृहस्थ असतात ना! जाऊ दे आपल्याला काय करायचे आहे? आपण बरे आणि आपले काम !’

तिला प्रथम लोन डिपार्टमेंट देण्यात आले. तिची कामाची तत्परता, सिन्सियारीटी, नवीन शिकण्याची आवड म्हणून तिथल्या सेक्शन हेडची ती लाडकी झाली. आपले काम संपवून परत सगळ्यांच्या मदतीला नेहमी तयार! ३-४ महिन्यात ती तिथे चांगली रुळली. तेवढ्यात फॉरीन एक्सचेंज डिपार्टमेंटमधील बोकीलमादामना डिलिव्हरीसाठी रजेवर जायचे होते म्हणून मग तिची त्या डिपार्टमेंटला ट्रान्स्फर झाली. त्या रजेवर जाण्याआधी त्यांच्याकडून थोडेफार शिकून घेतले. काम नवीन व जोखमीचे होते. ती पण मन लावून शिकत होती. कामाच्या निमित्ताने तिला वारंवार शाखाप्रमुखांच्या केबिनमध्ये जावे लागे. प्रत्येक वावचर, डिक्लरेशन, क्लेम वगैरेवर त्यांची सही असणे बंधनकारक होते. त्यामुळे श्रीरंग गोडबोले व तिची भेट होऊ लागली. सुरुवातीला त्यांच्यात फक्त कामाचेच बोलणे होई, मग हळू हळू ती केबिनमध्ये आल्यावर दोघे मिळून चहा घेऊ लागले. कामाव्यतिरिक्त घराच्याविषयी आवडी निवडी वगैरे बोलणे होऊ लागले. कधी बँकेत उशीर झाला तर ते तिला सोडायला तिच्या घरी जाऊ लागले. बोकीलमादाम रजेवरून परत आल्या पण घरी लहान बाळ म्हणून त्यांना लोन डिपार्टमेंटला पाठविण्यात आले. हळू हळू दोघांमध्ये मैत्री वाढू लागली. सुचेताच्या घरी आता लग्नासाठी स्थळ बघुयात, वधूवर सूचक मंडळात नाव नोंदणीसाठी आई पाठी लागली होती. तिला एकीकडे कळत होते कि ती आणि श्रीरंग एकमेकात गुंतत चाललेत पण बोलायचे कसे? तो तर काहीच बोलत नाही! शेवटी एकदा धीर करून त्याला सांगितले “ अरे माझ्या घरी आता लग्नाचे वारे वाहायला लागलेत!’ तर म्हणाला माझी आई पण तेच म्हणत होती !

“ मग पुढे काय? “ सुचेता

“म्हणजे? “ श्रीरंग

त्याने असे म्हटल्यावर ती गप्प! वाटले त्याला आपल्याशी लग्न करण्यात इंटरेस्ट दिसत नाही. मनात मात्र खट्टू झाली. दुसऱ्या दिवशी कोणत्याच कारणाने श्रीरंगच्या केबिनमध्ये गेली नाही साह्यासाठी कागद नाईक काका करवी पाठविले त्यानेही फोन केला नाही! विचार केला जाऊ दे नसेल त्याच्या मनात.

दोन दिवसांनी रविवार होता अंजलीकडे जायचे म्हणून आवारत होते तेव्हड्यात बाबाची हाक आली बाहेर येऊन बघते तर श्रीरंग आपल्या आई वडिलासहित आलेला ! त्याने त्याच्या आई बाबाशी ओळख करून दिली अन न सांगता आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. आत्ता हा कशाला आलाय तेही आई बाबा सहित? पण मनातून आनंदहि झाला होता. मग त्याचे बाबा म्हणाले “मी लगेच मुद्यावर येतो. आज आम्ही मुद्दाम आलो. हा आमचा मुलगा तुम्हाला माहित आहेच. श्रीरंग इजिनिअर असून एम बी ए आहे तुमच्या मुलीच्या बँकेत ऑफिसर आहे. तुमची मुलगी आम्हाला सून म्हणून पसंत आहे. तुमचा काय विचार आहे ते सांगा”.

आई बाबांना हा सुखद धक्काच होता. तरीही ते म्हणाले आम्ही सुचेताला विचारून कळवतो! मी मात्र उडालेच! थोडा रागही आला, काहीच कसे सांगितले नाही आधी? पण मनातून सुखावले होते. खाणे पिणे झाल्यावर मंडळी मार्गस्थ झाली अन बाबांनी मोर्चा माझ्याकडे वळविला “काय ग काय म्हणणे आहे तुझे ?”

“मी काय तुम्ही ठरवाल ते!” हे मी म्हणत असले तरी माझे डोळे आणि गाल वेगळेच बोलत होते. अर्थात हे आई बाबाच्या नजरेतून सुटले नाही. नीता मात्र खुश होती. “ चांगला शिकलेला, स्मार्ट, तशी जबाबदारीही नाही, त्यात त्याला माझी लेक आवडली म्हणजे मला तर काही प्रॉब्लेम वाटत नाही” बाबा.

“अहो मस्तच अगदी पाहिजे तसे स्थळ घरी चालत आल्यावर कशाला नाकारायचे ? पूर्व पुण्याई म्हणून दुसरीकडे जोडे झीझवावे लागले नाहीत!” आई खुश होत म्हणाली

“मग आहेतच माझ्या मुली अगदी बंदा रुपया!” बाबा

मी हवेतच तरंगत होते! समोर आल्यावर काय बोलायचे हा प्रश्नच होता. विचार केला आपणहून जायचेच नाही म्हणून परत फाइल्स नाईक काका जवळ दिल्या तर निरोप आला,” तुम्हाला सर बोलवीत आहेत थोडे चिडलेले वाटतात, लवकर जाऊन बघा काय ते”.

केबिन मध्ये गेले तर म्हणाले “ पडलीस का काय, पायाला लागलाय का?”

मला काही अर्थ बोध होईना!

“फाईल्स नाईक काका करवी का पाठविल्या? बसा जरा बोलायचय”

सर्व सह्या झाल्यावर वर बघितले “ काय बाईसाहेब कसे वाटले सरप्राईज ? झाले का तुझ्या मनासारखे ?

मी थोडे फुरंगटून म्हणाले “ काय रे आधी काही का नाही सांगितलेस?”

“अग जरा मजा! आणि हे बघ आपण दोघांनी जरी ठरविले तरी घरच्याची परवानगी लागणारच ना! मग म्हटले त्यांनाच ठरवू दे! हो पण तुमचा विचार अजून कळला नाही! “

“ बाबा कळवतील “ म्हणून सटकले.

बाबांनी इतरांकडून बाकीची माहिती काढून दोन दिवसांनी होकार कळविला.

पुढचे दिवस कसे भराभर गेले. खरेदी, केळवण, बोलावणी, आमच फिरण यात ! विधिवत लग्न होऊन सुचेता देशपांड्यांची सौ सुचेता श्रीरंग गोडबोले झाले. दोन्ही घरी सर्व आनंदात होते लग्नाला बँकेतील तमाम मंडळी हजर होती. हनिमूनला मनालीला गेलो असताना मी सहज म्हणाले “ अरे तू एवढा इंजिनिअर आणि एम बी ए केलेस आणि बँकेत कसा काय नोकरी करतोस? “

“अग तुला भेटायचे होते ना आता बघ मी काय करतो ते!”

अगदी मनावरच घेतले आणि वर्षातच नोकरी सोडून मित्रांच्या मदतीने या बिझनेसला सुरवात केली. लवकरच तो हि सेट झाला. रिटायर्ड झाल्यावर बाबा सुद्धा मदतीला जाऊ लागले. घरचा माणूस म्हणून त्याचा थोडा भार कमी झाला.

एवढ्यात बाळाची चाहूल लागली. मग काय नुसते कोड कौतुक! सर्व प्रकारची डोहाळे जेवणे! कित्येक वर्षांनी दोन्ही घरात बाळ येणार म्हणून दोन्ही आज्ज्या बाळाच्या आगमनाची जय्यत तयारी करीत होत्या! अन यशचा जन्म झाला! श्री च्या यशाची कमान पण वर वर चढत होती. नोकरी आणि यश यात वेळ पुरत नव्हता. तीन वर्षांनी मग स्वराचा जन्म! श्री ला मुलांचा फारच लळा! कामावरून कितीही दमून आला तरी दोघांना घेऊन त्यांच्याशी खेळायचा. मुल मोठी होत होती निरनिराळ्या स्पर्धा परीक्षामध्ये भाग घेत बक्षिसे हि मिळवत! श्रीरंगला दोघांचा भरपूर अभिमान! माझीही घर मुले नोकरी दोन्ही आई बाबा हि सर्कस चालू होती. आई बाबा आता थकलेत. त्यातच बँकेच्या परीक्षा देऊन मी ब्रांच मनेजर झाले. श्रीरंगला तेव्हा केवढा आनंद झाला! मला थंड हवेच्या ठिकाणी जायला आवडते म्हणून पुण्याजवळ पाचगणीला त्याने सुंदर बंगला घेतला. मी अगदी सुखाच्या हिंदोळ्यावर झुलत होते. माझ्या या संसाराला माझीच दृष्ट नको लागायला! मन चिंती ते वैरी न चिंती म्हणून तो विचार झटकला. आणि ती काळरात्र उगवली.....

आमच्या बंगल्यावर श्रीने मित्रांची पार्टी ठरवली होती. बाकी सर्व जण दुपारीच निघाले, श्री ला काही काम होते म्हणून तो एकटाच संध्याकाळी निघाला. मला मात्र खूप अस्वथता जाणवत होती त्याला म्हणाले सुद्धा एकटा जाऊ नकोस. पण म्हणाला अग कितीसा वेळ लागणार पायाखालचा तर रस्ता! शेवटी गप्पं बसले. रात्री आठ वाजता श्रीच्या मित्राचा फोन “ वहिनी श्री कधी निघाला? पोचला का नाही अजून?”

“अहो केव्हाच गेलेत एव्हाना पोचायला हवे होते”

“ठीक आहे पोचल्यावर फोन करतो”

मुलांना हाक मारली आणि जेवायच्या तयारीला लागले. तर परत फोन वाजला वाटले पोचला वाटते म्हणत फोन उचलला तर अनोळखी आवाज!

“हल्लो मी सुचेता बोलतेय आपण”

“हल्लो मी इन्स्पेक्टर देशमुख”

ऐकले आणि हातापायातले त्राणच गेल्यासारखे झाले

“हेल्लो इथे अपघात झालाय! त्यांच्या मोबाईल मधील घरचा नंबर बघून फोन केला. पंचनामा झालाय आम्ही त्यांना पुण्याला दिनानाथ हॉस्पीटला घेऊन येतोय तुम्ही तिकडेच या.”

“आई काय झालय? “ यश

“अरे यश बाबांचा अपघात झालाय त्यांना आत्ता दिनानाथ हॉस्पीटला आणतायेत चल आपण जाऊयात”

“अग कसा झाला अपघात? किती लागलाय? बाबा का नाही बोलले?” यश

“अरे मला हे विचारायचे सुचलेच नाही”

“बर बर आपण लगेच निघुयात” यशने श्रीच्या मित्रांना कळविले ते हि लगेच निघाले.

आम्ही हॉस्पिटलला पोचलो पण अजून कोणी आले नव्हते, एक एक मिनिट युगासारखा वाटत होता. कधी एकदा श्री ला बघते असे होऊन गेले होते. यश सुद्धा सारखे फोनवर माहिती काढत होता.

तेवढ्यात दोन अमब्यूलन्स आल्या त्यातून दोघांना आणले गेले. दोघेही बेशुद्ध चेहरे संपूर्ण रक्ताने माखलेले! दोघांना डायरेक्ट ऑपरेशन थेटरमद्धे नेले. प्रख्यात न्युरो सर्जन डॉ. दलाल त्यांना तपासत होते. तेव्हढ्यात कोणी तरी एक फॉर्म पुढे केला. मला काहीच कळत नव्हते सर्व संवेदना जणू गोठून गेल्या होत्या. यश मात्र खंबीरपणे सर्व परिस्थिती हाताळत होता. एव्हाना बाकीचे मित्र पण आले होते. डोक्याला जबर मार लागलाय ऑपरेशन करावे लागेल. मी ऑपरेशन फॉर्म वर सही केली म्हटले, ”काही करा पण माझ्या श्रीला वाचवा!” घरी आई देव पाण्यात ठेऊन बसल्या होत्या.

जवळ जवळ चार पाच तासांनी डॉ. बाहेर आले म्हणाले “ ऑपरेशन सक्सेसफुल झाले, थोड्याच वेळात त्यांना ICU मध्ये हलवतील, पुढील ४८ तास त्यांना अंडर ऑबझरवेशन ठेवावे लागेल नंतर काय ते सांगू. मी आत्ता अमेरिकेला जायला निघतोय डॉ. पाठकांच्या संपर्कात मी राहीन. तुम्ही काळजी करू नका.”

श्रीला ICU मध्ये हलवल्यावर बाहेरून बघितले चेहरा ब्यान्डेजने झाकला होता फक्त डोळे आणि ओठ सोडून. बाकी कुठे लागले असे वाटत नव्हते. यश व श्रीच्या मित्रांनी त्या दुसऱ्या व्यक्ती विषयी विचारले पण डॉ पाठक म्हणाले आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. फार वाईट वाटले.

सकाळी इन्स्पेक्टर देशमुखांनी पंचनाम्याची प्रत दिली ती वाचल्यावर कळले कि एस टी च्या बसने त्या व्यक्तीला उडविले आणि तो श्री च्या गाडी समोर येऊन पडला त्याला वाचविण्यासाठी श्री ने गाडी वळविली ती थेट डीवायडरवर आदळली आणि अपघात झाला. हे सर्व रस्त्यावरील लोकांनी प्रत्यक्ष बघितले होते.

४६ तासांनी त्याने फक्त डोळे उघडले बाकी काही नाही. ४८ तासांनी त्याला रूम मध्ये शिफ्ट केले. तो जागा झाला पण नजर अनोळखी! मी, मुले, आई बाबा कोणालाही ओळखेना! डॉ म्हणाले वेळ लागेल. अर्थात वाट बघण्याशिवाय आम्ही काहीही करू शकत नव्हतो. त्याची बाकी प्रगती चांगली होती औषधाना तो रिस्पॉन्स देत होता पण आम्हाला ओळखत नव्हता.

दोन महिन्यांनी डॉ म्हणाले आता बाकी काही औषधे नाहीत तुम्ही घरी घेऊन जा कदाचित घरच्या वातावरणामुळे त्यांना ओळख पटेल.

त्याला आमच्या लग्नातील फोटो, मुलांचे बारशाचे, वाढदिवसाचे, ट्रीपचे फोटो असे अनेक फोटो दाखविले तरी तो ओळखेना. मी जवळ गेले तर तो एकदम दूर जायचा. सुरवातीला तर तो आमच्या बेडरूममध्ये झोपायलाही तयार नसायचा असे गेले ४- ४.५ वर्षे चाललय. आता कुठे सर्वांनी सांगून सांगून त्याचा जरा विश्वास बसायला लागलाय. कारखान्यात जाऊन काम व्यवस्थीत करु लागला. तरी तो म्हणत होता, “अग सुचेता खर सांगू माझ्या बुद्धीला पटतय कि हे सर्व आपले आहे, तू, मुले, आई बाबा पण मन मानायला तयारच होत नाही. मी कोणावर तरी अन्याय करतोय असे वाटत राहते. विचार करून करून डोक फुटायची वेळ येते. तुझी ओढाताण तुझा त्रास मला सहन होत नाही. काय करू? मला कळतंय पण वळत नाही.”

“हे बघ तू नको जास्त विचार करू आणि जास्त त्रासही करून घेऊ नकोस होईल सगळे नीट”.

त्याची ती ओढाताण, अस्वस्थता मला जाणवत होती, त्यासाठी माझे काळीज तुटत होते पण डॉ. पाठकांच्या म्हणण्यानुसार काळ हेच औषध!. अधून मधून तो स्वराला गौरी म्हणून हाक मारत असे मग ती म्हणे “ अरे बाबा गौरी काय माझे नाव स्वरा !” मग तो हि गप्प व्हायचा. या सर्वामुळे यश एकदम मोठा होऊन गेला. इंजिनिअर होऊन बाबाच्या बिझनेसमध्ये लक्ष घालतोय.

अन परवाचा तो प्रसंग.....

“आई आपण सर्व आपल्या पाचगणीच्या बंगल्यावर जाऊ यात का बाबांना पण चांगला चेंज मिळेल”

“यश अरे अपघाता नंतर तेथे कोणी गेलेले नाही आणि खर सांगू आता परत तिकडे जावेसेच वाटत नाही”

“कम ऑन आई, अग बाबांना किती आवडायचा तो बंगला, त्याचा परिसर, कदाचित त्यांच्या आठवणी परत येतील”

“ठीक आहे जाऊयात पण स्वच्छ करायला सांग”

“हो सांगितला आहे”

शेवटी एकदाचे निघालो वाईपर्यंत यश ड्राईव्ह करत होता अचानक श्री यशला म्हणाला मी करू का ड्राईव्ह. मी आणि यशने एकमेकाकडे बघितले, आम्हाला खूप बरे वाटले. किती दिवसांनी म्हणाला खर तर त्याला ड्राईव्हीगची खूप आवड, आम्ही कित्तेकदा लॉंग ड्राईव्हला जायचो. यशने श्रीच्या हातात स्टेंरिंग दिले आणि तो बाजूला बसला. थोडे पुढे गेल्यावर त्याने उजवीकडे वळवली. आम्हाला वाटले ड्राईव्हिगची हौस भागवतोय! पण तसे नव्हते. डावी उजवी करत छोट्या गल्ली बोळातून गाडी चालवत होता. यश अन मी दोघे त्याच्याकडे बघत होतो यशने विचारले सुद्धा “ अरे बाबा कुठे चालला आहेस?” काहीही न बोलता त्याने गाडी एका छोट्या घरासमोर थांबवली. एक छोटेसेच पण टुमदार घर, बाजूला शेत विहीर! आम्ही प्रश्नार्थक नजरेने एकमेकाकडे बघत होतो. तर हा गाडीतून उतरून घराच्या दिशेने चालायला लागला तेही जोर जोरात हाका मारत “ ए गौरी, ज्योती अग आई कुठे आहात तुम्ही मी आलोय ना!”

आम्ही त्याच्या मागे गेलो. घरातून एक मुलगी, तिची आई अन आजी बाहेर आल्या आणि त्या श्रीकडे बघतच राहिल्या.

“अरे बघताय काय अशा माझ्या बरोबर पाहुणे आलेत त्यांचे चहा पाणी करा”

“कोण तुम्ही? कोण पाहिजे तुम्हाला? आणि आमची नावे कशी माहित तुम्हाला?” बाई

हे ऐकता क्षणी श्री गप्प झाला मग मीच पुढे होऊन त्यांचाशी बोलले त्यांची चौकशी केली तेव्हा कळले कि त्यांचे पती ४ – ४.५ वर्षा पूर्वी अपघातात गेले. श्री चा अपघात तोच असावा का? काय गौडबंगाल आहे कळेचना! इथे कुठे घेऊन आला या लोकांची नावे कशी माहित? मी पण त्यांना श्रीच्या अपघाताची कहाणी सांगितली आणि तेव्हापासून जरा विचित्र वागतोय आम्हाला माफ करा. ती मोठ्या मनाची होती आम्हाला आग्रहाने घरात घेऊन गेली चहा केला.

पुढे बंगल्यावर गेलो पण एका दिवसात परत आलो. श्री अस्वस्थ होता. काहीच कळत नव्हते. आम्ही मग डॉ पाठकाना फोन केला. सर्व वृतांत ऐकून त्यानाही जरा विचित्रच वाटले. म्हणाले डॉ दलालाशी चर्चा करून सांगतो.

दोन दिवसांनी डॉ पाठकांचा फोन, “गुड न्यूज आहे, डॉ दलाल इंडियात आलेले आहेत आणि त्यांना तुम्हा सर्वाना पेशंट सहित भेटायचे आहे”.

दिलेल्या वेळेनुसार आम्ही सर्व डॉ पाठकांच्या क्लिनिकमध्ये पोहोचलो. डॉ दलाल आलेलेच होते. सार्वजण कॉन्फरन्स हॉल मध्ये बसलो डॉ दलाल बोलू लागले.....

“नमस्कार! मी ऑपरेशन करून लगेच अमेरिकेला गेलो तरी डॉ पाठक यांच्या टचमध्ये होतो वेळोवेळी माझ्या पेशंटची खबर घेत होतो. त्यांना औषधे, उपाययोजनाहि सांगत होतो. पोस्ट ऑपरेशन औषधोपचाराना पेशंट उत्तम प्रतिसाद देतोय ऐकून बरेच वाटत होते. आता मी तुम्हाला मानवी मेंदूची थोडी माहिती सांगतो त्यामुळे कदाचित तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील”.

त्यांनी स्लाईड दाखविण्यास सुरवात केली, “ आपल्या मेंदूचे एकूण चार भाग असतात. प्रथम उजवी आणि डावी बाजू हे दोन आणि या दोन भागांचे आणखी दोन एक वर एक खाली. ज्याला बोली भाषेत आपण मोठा मेंदू आणि लहान मेंदू असे म्हणतो. प्रत्येकाचे कार्य कसे चालते हे थोडक्यात समजाऊन सांगितले. आपल्या लहान मेंदूचा जो डावा भाग आहे तिथे त्यात आपली माहिती, आठवणी साठविल्या जातात. म्हणजेच आपली स्मरणशक्ती! ज्यामुळे माणसाला आठवणी येतात, गोष्टी आठवतात!” हे सर्व आम्हाला डायग्राम नुसार सांगत होते आता त्यांचा आवाज अजून गंभीर झाला. पुढे म्हणाले “या अपघातात श्रीच्या याच भागाला धक्का लागून तो ड्यामेज झाला बर तो काढून टाकणेही शक्य नाही कारण माणसाला संपूर्ण ब्रेन असणे आवश्यक आहे. त्याचवेळी दुसऱ्या टेबलावर अपघातातील ती दुसरी व्यक्ती होती. दुसरे डॉ त्यांच्यावर उपचार करीत होते. त्याचेही ऑपरेशन करावे लागणार होते कारण त्याची तर कवटीच फुटली होती, पण तेवढ्यात त्याचे हार्ट बंद पडले. बरेच प्रयत्न करूनही ते सुरु होईना! म्हणजे आता त्याच्या ऑपरेशनचा मार्ग बंद.” आम्ही सर्व श्वास रोखून हे ऐकत होतो.

मिनिटभर ते थांबले पाण्याचा एक घोट घेतला आणि पुढे म्हणाले, “सर्व प्रथम मी त्या इसमाच्या धीरोदत्त पत्नीचे आभार मानतो तिला धन्यवाद देतो, कारण त्याचे हार्ट बंद पडले आता काहीही करू शकत नाही पण तुम्ही आणखी कोणाचे प्राण वाचवू शकाल! आम्ही तिला अवयव दानाची कल्पना सांगितली. अशा कठीण मानसिक अवस्थेमध्ये सुद्धा तिने अवयव दानाच्या फॉर्मवर सही करून परवानगी दिली. म्हणूनच आम्ही त्या व्यक्तीच्या मेंदूतून तो भाग काढून यांच्या खराब झालेल्या भागात त्याचे प्रत्यारोपण केले. हा प्रयोग आमच्यासाठी सुद्धा नवीनच होता, ऑपरेशन सक्सेसफुल झाले पण पोस्ट ऑपरेशन याचे काय परिणाम होतील या बद्दल आम्ही सुद्धा अनभिज्ञ होतो. याचे परिणाम तुम्ही भोगताय याची मला कल्पना आहे. जी व्यक्ती मृत आहे तिच्या आठवणी घेऊन हा जगतोय. म्हणूनच तुम्हाला विचित्र वाटेल असे काहीसे घडतंय! पण घाबरू नका काही दिवसांनी तो हे विसरेल व नॉर्मल आयुष्य पुन्हा जगू शकेल.”

आम्ही सर्व सुन्न झालो होतो. यंत्रवत क्लिनिकवरून निघालो घरी आलो, सुचत काहीच नव्हते. पण एक गोष्ट झाली श्रीच्या विचित्र वागण्यातील सुसंगती लक्षात आली.

रात्री जेवणाचा मूड नव्हता कसेबसे ४ घास पोटात ढकलले! झोपताना मी श्रीला सांगितले “श्री तुला जो निर्णय घ्यायचा तो घे मी कुठेही आडकाठी करणार नाही फक्त पूर्ण विचार करून घे.”

“अग आई किती वेळ फोन वाजतोय लक्ष कुठे तुझ” यश, “मावशी मी तुला नंतर फोन करतो”

माझ्या खांद्यावर हात ठेऊन म्हणाला, “ आई नको इतकी काळजी करूस सर्व काही ठीक होईल”.

तेवढ्यात श्री पण उठून आला आता त्याचा चेहरा शांत वाटत होता.

सार्वजण आवरून ब्रेकफस्ट करिता टेबलावर जमले. श्रीने बोलायला सुरवात केली..

“माझ्यामुळे तुम्हा सर्वाना खूप त्रास सहन करावा लागला पण या पुढे असे होणार नाही. माझ्या मनात नेहमी द्वद्व चालेले असे, बुद्धीला जे पटत होते ते मन मानायला तयार नव्हते, त्यात आठवणीची साथ सांगत पण सुटून गेली होती पण आता याचे कोडे काल आपल्या सर्वांनाच उलगडले. त्यामुळे मी आता जुन्या आठवणी एका कप्प्यात बंद करून ठेवणार आहे आणि परत पूर्वीचे आयुष्य जगणार तसे वागणार”

आम्ही सर्व नुसते पाहत होतो आमच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.

“ह आणखी एक, मी ज्याचा जीव वाचवायचा प्रयत्न केला पण त्यानेच मला जीवनदान दिले आहे! त्याचे हे ऋण मी कधीहि फेडू शकणार नाही, मी मुक्त होऊ शकणार नाही! पण त्याची मुलगी गौरी हिच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा मी पूर्ण भार उचलणार आहे. या सर्वासाठी मला तुमची मदत लागेल. आणि यश स्वरा तुम्ही तिला आपली लहान बहिण माना!”

मुलांनी टाळ्या वाजवून त्याला प्रतिसाद दिला.

“अरे श्री आपण आजच त्यांच्याकडे जाऊन ज्योतीताईना सर्व काही सांगूयात. कोण कोणाच्या कधी कसे उपयोगी पडेल सांगता येत नाही! कुठला हा ऋणानुबंध!”

नियतीच्या या अजब न्यायावर एका डोळ्यात आसू तर दुसऱ्यात हासू जमा झाले!.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract