रौप्यमहोत्सव प्रेमाचा !
रौप्यमहोत्सव प्रेमाचा !
एका छोट्याशा धक्याने सुप्रियाने अर्धवट झोपेत डोळे किलकिले करून बघितले क्षणभर तिला कळेचना आपण कुठे आहोत. ती इकडे तिकडे बघू लागली. " वेलकम टू डाबोलीम एअरपोर्ट, गोवा" हे शब्द तिच्या कानी पडले अरे आपण फ्लाईटमध्ये आहोत अन पोहोचलो सुद्धा !
सुप्रियाला आठवले ऑफिस संपवून धावत पळत जेमतेम १०- १५ मिनिटे राहिली होती काऊटर क्लोज व्हायला मग सर्व सोपस्कार आटपून जवळ जवळ पळतच ती प्लाईटमध्ये येऊन स्थानापन्न झाली अन लगेचच तिचा डोळा लागला ते आत्ता उठतेय. पण तेवढ्याने तिला एकदम फ्रेश वाटायला लागले.
एअरपोर्टच्या बाहेर हॉटेलचा माणूस तिच्या नावाची पाटी घेऊन उभाच होता. ती हॉटेलवर पोहोचली. हॉटेल अजूनही त्याच दिमाखात उभे होते. थोडेफार बदल झाले पण चांगले वाटले. तिचे बुकिंग आधीच झाल्याने तिला रूमही allot झाली होती तरीही तिने परत विचारले " मला ती ५२५ नंबरची रूम मिळू शकेल का." " Sorry मादाम पण ती आधीच बुक झालीय तुम्हाला त्याचा शेजारची ५२७ दिली आहे."
ती रूम मिळाली नाही म्हणून जरा नाराजच होती पण कि घेऊन ती रूमवर आली. तिचे सामान घेऊन आलेल्या मुलाने सांगितलं " मादाम बुफे रेडी आहे तुम्ही फ्रेश होऊन या." तरीही तिने sandwitch कॉफी आणायला सांगितले.
फ्रेश होऊन पुस्तक वाचत पडली तर वाचता वाचता परत तिचा डोळा लागला. जागी होऊन बघते तर पहाटेचे ४ वाजलेले, थोडीशी तशीच लोळत पडली अन मग उठून बाल्कनीत आली. सर्वत्र अंधाराचे साम्राज्य असले तरी आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या त्यांचा साथीदार चंद्र परतीच्या वाटेला लागला होता अन समुद्राची गाज होती साथीला.
आतल्या गार हवेपेक्षा बाहेरील मोकळी हवा सुप्रियाला बरी वाटली. अजूनही भरतीच्या लाटा येताच होत्या. थोड्या वेळाने परत ओहोटी सुरु होईल पण आपल्या मनातील लाटांचे काय ? त्या कधी थांबणार ? खरच आपण येथे येऊन चूक तर केली नाही ना. खरच अजितला आजचा दिवस लक्षात असेल ? तो येईल का ? एक अनामिक हुरहूर लागून राहिली होती.
तेवढ्यात एक कार गेटमधून आत आली कोण आले ते कळले नाही कदाचित अजित तर नसेल ? परत ती तो गार वारा पीत तशीच उभी राहिली. तिच्या मनात आले हा समोर पसरलेला अथांग सागर त्याच्या पोटात कायकाय दडलेलं असेल! त्याने ते अगदी सांभाळून ठेवलय. काही मोती तर काही दगड धोंडे किवा आणखी काही, भारती ओहोटीच्या रोजच्या सत्रात सुद्धा ते वर येत नाही. इतकी वर्षे आपण मनाच्या तळाशी साठविलेले आज सुनामी सारखं उचंबळून येतंय.
आज आपल्या लग्नाचा २५ वा वाढदिवस ! २५ वर्षापूर्वी ती अन अजित दोघे हनिमूनला इथे आले होते. तेव्हाच त्यांनी ठरवले कि आपल्या लग्नाचा रौप्यमहोत्सव आपण इथेच येऊन साजरा करायचा.
पण खरच जीत येईलना ! नाही तो तसा विसरणार नाही नक्की येईल ! पण मनात थोडी धाकधूक होतीच. याला कारण म्हणजे गेल्या १२ वर्षात त्याचा अन आपला काहीही संपर्क नाही कुठे असेल कसा असेल ? नाही तरीही तो नक्की येईल!
सुप्रिया अजितचे लग्न अगदी ठरवून चहा पोह्याचा कार्यक्रम होऊन पार पडले. लग्नाची धामधूम संपली दोघे कुलदैवताच्या पाया पडून आले. अन हनिमूनला गोव्याला आले. काय दिवस होते ते अगदी मंतरलेल म्हणतात तसेच. या हॉटेलमध्ये पाय ठेवताच सुप्रियाला अगदी आवडून गेले होते. " जीत किती सुंदर आहे ना! चहुबाजूला हिरवळ, निरनिराळी रंगीत, तर काही वासाची फुले, समुद्रही अगदी हाकेच्या अंतरावर." सुप्रिया.
"तू काय म्हणालीस जीत! वा मस्त वाटले मी पण तुला आता प्रियु म्हणणार चालेल ना !" जीत. "चालेल काय पळेल!" प्रियु. अशा रीतीने त्यांचा प्रेम संवाद सुरु होता.
रूमवरून व रुमच्या बाल्कनीतून त्याच्या लाटा स्पष्ट दिसत शिवाय साथीला त्याची गाज होतीच! हा हॉटेलचा प्रायव्हेट बीच ! तेव्हाच ठरविले आपल्या लग्नाचा २५ वा वाढदिवस येथेच येऊन अगदी याच ५२५ रुममध्ये साजरा करायचा.
हनिमुनचे मंतरलेले दिवस संपले अन आमचे रुटीन आयुष्य सुरु झाले. दोघेही ऑफिस घर यामध्ये बिझी झालो. ३ वर्षांनी श्रेयाचा जन्म झाला. श्रेयाच्या जन्मानंतर तर दिवस पुरेनासा झाला. श्रेयाला सुद्धा बाबाचा किती लळा. अजित हि एक एक प्रमोशन घेत कंपनीचा जनरल म्यानेजर झाला. आता तो खूपच बिझी झाला होता तरीही लग्नाचा १०वा वाढदिवस इथेच श्रेया सहित येऊन साजरा केला. एक छानसा बंगला सुद्धा विकत घेतला. बाजूला मस्त हिरवीगार हिरवळ. बंगला मला हवा तसा रीनोवेट करून घेतला. सर्वाना एक जंगी पार्टी पण दिली. सर्वांनी किती कौतुक केले आमचे. किती सुखात होते मी ! उगीचच मनात आले कि या माझ्या संसाराला कोणाची दृष्ट नको लागायला.
लहान वयातच जितने त्याच्या हुशारीने अन हार्डवर्क ने लाबचा पल्ला गाठला होता. पण हे सर्वांच्या पचनी पडत नाही ना! जीतच्या ऑफिसमधील राजकारण अगदी टोकाला जाऊ लागले. लोकांना त्याचे कष्ट दिसत नव्हते ! आजकाल जीत टेन्शनमध्ये दिसू लागला. विचारले तर म्हणायचा काही विशेष नाही ऑफिसचेच ! त्याचा मूड ठीक व्हावा म्हणून एक दिवस ऑफिसमधून येताना मी रात्रीच्या शो ची तिकिटे काढून आणली म्हटले चालेल उद्या सुट्टी आहे.
घरी येऊन पटापट सर्व आवारत होते तेवढ्यात जीत आला. बर झाले लवकर आला. पण त्याच्या चेहऱ्याकडे बघूनच छातीत धस्स झाले. तो डायरेक्ट बेडरूम मधेच गेला. मागून जाऊन बघितले तर हा डोके धरून बसलेला. मी चहा केला अन घेऊन गेले. " जीत चहा घे म्हणजे बरे वाटेल " तर हा काहीच बोलेना. मी त्याच्या जवळ जाऊन त्याच्या डोक्यावर हात फिरवीत विचारले " जीत काय झाले बरे वाटत नाही का काय होतय डॉक्टर कडे जायचे का ? "
जितने माझा हात हातात घेतला अन म्हणाला " प्रियु उद्यापासून माझी नोकरी संपली. मला कंपल्सरी VRS घ्यावी लागली. माझी काय चूक होती हे मला कोणीही शेवटपर्यंत सांगू शकले नाही".
खरतर माझ्या पायाखालची जमीन सरकल्या सारखी झाली होती पण क्षणभरातच स्वतःला सावरले त्याच्या हातातून हात काढून त्याच्या डोक्यावरून फिरवीत त्याला म्हणाले " अरे कशाला काळजी करतोस तुला या पेक्षा चांगली नोकरी मिळेल. तू हुशार आहेस तुझी कष्ट करायची तयारी आहे शिवाय माझीही नोकरी चालू आहे त्यामुळे आपल्याला काहीही फरक पडणार नाही. सर्व काही चांगले होईल. " तेवढ्यात श्रेया रुममध्ये आली " आई तुम्ही मुव्हीला जाणार होतात ना मग आवरना लवकर."
"नाही जात बाबांना जरा बरे वाटत नाही म्हणून "
पुढचे २ दिवस रजा घेवून घरीच थांबले वाटले जीतला जरा बरे वाटेल. पण किती दिवस रजा घेणार म्हणून परत ऑफिस जॉईन केले. तो अगदी जेवढ्यास तेव्हडे बोलत असे फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे. तेही बळेबळे. माझ्याशीच काय ते थोडेफार बोले. पुढे पुढे तो अजूनच अबोल झाला अन स्वतःच्या कोषातच गेला. डॉक्टरकडे नेले पण काही उपयोग होत नव्हता. त्याच्या आलेल्या पैशातून घराचे कर्जाचे हप्ते भरत होते. सगळीकडे निराशा भरून राहिली होती.
अन तो काळा दिवस उजाडला, ऑफिसमधून आले त्याचवेळी श्रेया पण नुकतीच आली होती पण जीत घरात नव्हता. आई अप्पाना वाटले गेला असेल जवळ कित्येक दिवसात नव्हे महिन्यात घराबाहेर पडला नव्हता. त्या दृष्टीने जरा बरे वाटले. रात्र झाली तरी जीतचा पत्ता नव्हता मग काळजी वाटायला लागली. मित्रांकडे फोन करून पहिले पण तेथेही कुठे नव्हता. मन चिंती ते वैरी हि न चिंती या उक्ती प्रमाणे नाही नाही ते विचार मनात यायचे. काही सुचत नव्हते कशी बशी रात्र काढली अन सकाळी पोलिस कम्प्लेट केली. पोलीसांनी सर्व हॉस्पिटल पालथी घातली एखादी अपघाताची केस आली का पण नाही. काहीही काळात नव्हते आईनी देव पाण्यात ठेवले होते.
पाचव्या दिवशी एक पत्र आले ! पत्रावर शिक्का मुंबईचा होता. उघडले तर फक्त २ ओळी " मी सुखरूप आहे काळजी नसावी. मी काही तरी बनल्यावर परत येईन स्वतःला सांभाळा" अजित.
कुठेही असला तरी सुखरूप आहे म्हणून जीव भांड्यात पडला. पत्र दाखवून कम्प्लेट मागे घेतली.
या गोष्टीला आता एक तप होऊन गेले पण अगदी आत्ता घडल्या सारखे वाटते. मनात आले VRS च्या राक्षसाने माझ्या संसाराचा असा घेतलेला बळी !
अरे चांगलेच उजाडले कि म्हणत सुप्रियाने आवरले अन समुद्रावर फिरायला गेली. तिथे बरीच मुले होती त्यांच्यात ती रमली. वाळूचा बंगला बांधला खूप खेळली पण नजर मात्र जीतला शोधात होती. परत येऊन ब्रेकफास्ट करूनच रूमवर आली तर श्रेयाचा फोन " आई भेटला का ग बाबा "
" नाही ग नाही अजून " सुप्रिया.
"येईल ग तो नक्की. बघ आज तो तुला भेटतो कि नाही. मला लगेच फोन कर " श्रेया.
मनाशी ठरवले आज संध्याकाळ पर्यंत वाट बघू नाही तर परवाच्या ऐवजी उद्याच परत जाऊ. परत फोन वाजला " आई अग तुझी रूम ज्या अमेरिकन माणसाने घेतली तो कोण ते कळले का" श्रेया.
" नाही ग . काय माहित कोण तो " सुप्रिया
अजितला जग आली तेव्हा बघितले तर दुपारचे १२ वाजलेले. क्षणभर खरेच वाटेना म्हणून परत घड्याळ बघितले अन स्वतःचा त्याला खूप राग आला. किती ठरविले सकाळी ६.३० ला उठून ७ वाजता समुद्रावर जाऊ तेथे प्रिया नक्की भेटेल म्हणून अलार्म लावला तरी झोपेने घात केला. पटापट आवरून लंच ला गेला पण तेथेही त्याला प्रिया दिसली नाही.
संध्याकाळी आवरून जीत समुद्राच्या दिशेने निघाला बीचवर येऊन इकडे तिकडे बघत होता त्याचे डोळे प्रियाला शोधत होते तेवढ्यात त्याचे लक्ष त्या खडकाकडे गेले तिथे कोणीतरी बसलेले होते. तो जवळ जाऊन बघतो तर ती प्रियाच होती. त्याच्या आवडत्या गुलाबी रंगाच्या साडीत. त्याच रंगाचा स्लीवलेस ब्लाउज, म्याचींग कानातले, हातात ब्रेसलेट, मंगळसूत्र, तिचे केस वाऱ्याने उडत चेहऱ्यावर येत होते अन ती मात्र आपल्याच विचारात हरवलेली एक टक मावळतीच्या सूर्याकडे बघत होती. खरच किती सुंदर दिसतीय अजूनही पण चेहऱ्यावरची उदासी काही लपत नाही. त्याचे मन भरून आले याला आपण कारणीभूत आहोत ! तिचे शतशः अपराधी आहोत ! पण आता नाही तिला गमवायचे भरभरून सुख तिच्या पदरात टाकूयात.
अजितने पुढे जाऊन मागून तिच्या खांद्यावर हात ठेवला त्या क्षणी मागे न बघता तिने म्हटले " जीत आलास तू ! मला खात्री होती तू आज नक्की येशील". अजित तिच्या शेजारी बसला अन तिचा हात हातात घेतला. दोघांनी एकमेकाकडे पहिले अन पाहताच राहिले. जणू शब्द मुके होऊनी गेले. प्रियाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. सूर्यास्त होऊन गेला सगळीकडे अंधाराचे साम्राज्य पसरू लागले चांदण्या लुकलुकू लागल्या संगतीला चंद्रही आला. भारती सुरु झाली अन एक मोठी जोरात लाट आली अन दोघांना एकमेकांच्या मिठीत पोहचवून नखशिखांत भिजवून गेली. दोघे एकदम भानावर आले.
"प्रियु मी तुझा शतशः अपराधी आहे प्लीज मला माफ कर " अजित
"शु ss " म्हणत प्रियाने त्याच्या तोंडावर बोट ठेवले," चाल निघूया ".
एकमेकांच्या हातात हात गुंफून दोघे हॉटेलवर आली तेव्हा तिला कळले ५२५ रूम बुक करणारा दुसरा तिसरा कोणी नसून अजितच आहे.
रूमवर आल्यावर तिने श्रेयाला मेसेज केला " बाबा भेटला, बाकी सर्व भेटी अंती " आपापल्या रूम मधून फ्रेश होऊन दोघे डिनर ला एकत्र आली पण कोणीच कोणाशी काही बोलत नव्हते. काय अन कसे बोलावे हा दोघानाही प्रश्न पडला होता दोघे एक तपानंतर भेटत होते. अजितला सर्व सांगायचे होते श्रेया बद्दल आई अप्पा बद्दल विचारायचे होते. प्रीयालाही त्याला विचारायचे होते कुठे होतास, काय झाले कसे झाले काय करतोस इतक्या वर्षात आठवण आली नाही का? मी श्रेया कश्या आहोत याची साधी चौकशी पण करावीशी वाटली नाही का ?
हॉटेल विषयी इकडच्या तिकडच्या गप्पा व बाकी मौन! यात डिनर संपले. तसे दोघे निघाले आपापल्या रूममध्ये. अजितच्या रुमजवळ आल्यावर जीत म्हणाला " प्रियु या आपल्या रुममध्ये येणार ना !"
प्रिया काहीही न बोलता पुढे आपल्या रूमवर गेली कपडे चेंज करून नाईट सुट घातला झोपण्याच्या तयारीने पुस्तक हातात घेतले पण त्यातली अक्षरेच दिसेना तिला कळत नव्हते काय करावे. ते तसेच ठेऊन अगदी भारावल्या सारखी एका अनामिक ओढीने ती निघाली अन ५२५ रूम मध्ये आली अजित रूम उघडी ठेऊन तिची वाटच बघत होता.
आली अन त्याला बिलगली जीतच्या बहुच विळखा तिच्या भोवती पडला तिने त्याच्या छातीवर डोके ठेवले अन तिचा बांध फुटला. तोही तिला थोपटत राहिला तिला पोटभर रडू दिले. रडणे कमी झाल्यावर तिची हनुवटी उचलून वर केली, आपले ओठ तिच्या ओठांवर टेकविले. एकमेकांचे बंध आणखीनच घट्ट होऊ लागले, स्पर्शाने आपले काम चोख बजाविले दोन अतृप्त मने, शरीरे एक झाली अन सगळे बंध मोकळे झाले ! हे मिलन चंद्र खिडकीतून मध्येच झाडा आड लपत बघत होता. प्रियाला जाणवले जीतच्या सहवासात तीच पूर्वीची उत्कटता होती. तिचे हरवलेले प्रेम तिला पुन्हा परत मिळाले होते अन लग्नाचा त्यांच्या प्रेमाचा खरा खुरा रौप्यमहोत्सव साजरा झाला !
जितने बोलायला सुरुवात केली " प्रियु, मी घरून निघालो कुठे कुठे भटकत होतो मन काही थाऱ्यावर नव्हते तशातच मला आमच्या शाळेतील गोडबोले सर भेटले. माझी अवस्था बघून ते मला घरी घेऊन गेले. त्यांनी मला जवळ घेतले अगदी शाळेत गेल्यासारखे वाटले. मी त्यांना काय अन कसे झाले ते सर्व सांगितले. म्हणाले तू आत्ता इथेच राहा घरी कळवू या का तर मीच नाही म्हणून सांगितले. उद्या शिरीष म्हणजे त्यांचा मुलगा येईल तेव्हा बोलू आता शांत झोप.
दुसऱ्या दिवशी शिरीष आल्यावर त्याला सर्व सांगितले. तो म्हणाला तू माझ्याबरोबर सिंगापूरला चल तिथे तुझे नक्की काहीतरी होईल. लगेच आम्ही मुंबईला आलो अन गेलो सिंगापूरला तेथे व्हिसा ऑन अराइवल असल्याने काही प्रोब्लेम आला नाही. त्याच्याकडे काही दिवस राहिलो. त्याच्या ओळखीने नोकरी पण मिळाली. तिथून मग अमेरिका गाठली. जरा स्थिर स्थावर झाल्यावर घरी फोन केला तर कळले कि तुम्ही आता तिथे राहत नाही. कुठे असाल कसे असाल या काळजीत होतो मी. खूप प्रयत्न केला पण तुमचा काही कॉनट्याकच होऊ शकला नाही. शेवटी आज तू नक्की येशील याची खात्री होती म्हणून मी हि रूम १ महिना आधीच बुक केली. तुला तुम्हाला भेटण्याचा का एकमेव शेवटचा मार्ग होता माझ्यापुढे ! आज जर तू आली नसतीस तर....
प्रियाने त्याच्या तोंडावर बोट ठेवले.
" तू एक दोन ओळींचे पत्र पाठवून गेलास. पुढे काय ? माझ्या एकटीच्या पगारात त्या घराचे लोन चे हप्ते भागणे शक्य नव्हते. शिवाय श्रेयाचे शिक्षण आई अप्पा त्यांच्या तब्बेती ! मग तुझ्या मित्रांच्या सहाय्याने तो बंगला विकला अन आम्ही २ बेडरूम च्या छोट्या जागेत राहायला गेलो ! त्यामुळे तिथला फोने नंबर बदलला. त्यामुळे तू जेव्हा फोन केलास तेव्हा तुला कोणी भेटले नाही. श्रेया आता इंजिनीअर झाली ! आता MBA करायचे म्हणून परीक्षा देते. आई अप्पा बरे आहेत तुझी आठवण अधून मधून काढत असतात.
तू आज नक्की येशील याची माझ्या एवढी किंबहुना थोडी जास्तच श्रेयाला खात्री होती. पण म्हणतात ना मन चिंती ते वैरी ना चिंती. " प्रिया
" बर पण या पुढे मी तुला कुठेच जाऊ देणार नाही " प्रिया
" मी आता तुझ्यापासून दूर राहूच शकणार नाही. आपण सर्व अमेरिकेला जाऊयात श्रेयाला म्हणावे तू MBA नको MS कर तिकडे !" जीत.
या बोलण्यात सकाळ कधी झाली ते दोघानाही कळले नाही.
"आपण आज खूप भटकू जुन्या आठवणी पुन्हा जाग्या करूयात अन उद्या पुण्याला घरी जाऊ " जीत
" मला वाटते आपण मिळेल त्या फ्लाईट ने निघू घरी जाऊ श्रेया आई अप्पा सर्वाना तुला बघून खूप आनंद होईल आपण आपला वाढदिवस सर्वांच्या बरोबर साजरा करूयात " प्रिया.
" खरच ! किती माझ्या मनातले ओळखलेस ! माझे मन दोलायमान झाले होते तुझ्या बरोबर जुन्या आठवणीत रमावेसे वाटत होते त्याच वेळी श्रेयाला भेटायची पण ओढ होती. काय करावे सुचत नव्हते. चालेल तू म्हणतेस तसेच करू " जीत
सुप्रियाने लगेच फ्लाईट बुक केली अन श्रेया क्लास मध्ये असेल म्हणून तिला मेसेज केला " आम्ही आजच येत आहोत "