Neelima Deshpande

Romance Inspirational


3  

Neelima Deshpande

Romance Inspirational


जीवनातील छटा : ये कौनसा मोड हैं उम्र का!

जीवनातील छटा : ये कौनसा मोड हैं उम्र का!

3 mins 424 3 mins 424

लग्नानंतर पहिल्या वर्षभरात एकमेकांच्या आवडी-निवडी समजू लागल्यानंतर अनेकदा हे वाटून गेले होते की, विवाह मंडळात लग्न जुळणाऱ्या प्रश्नमालिकेत नव्या अनेक प्रश्नांची भर टाकण्याची गरज आहे.


आमच्या दोघांच्याही आवडीनिवडी काही बाबतीत अगदीच भिन्न म्हणजे अगदी दुसरे टोक गाठणाऱ्या वाटत असताना, इतकी वर्षे एकमेकांसोबत सुखाचा संसार झाला याचे कधी कधी आश्चर्यही वाटते आणि समाधानही!


मला तिखट आणि खमंग खायला आवडतं तर सचिन गोडाचा भक्त! माझा प्रिय ऋतु हिवाळा तर सचिनचा आवडता ऋतू उन्हाळा!! त्याला पावसात भिजायला खूप आवडतं आणि मला पावसात भिजायचं म्हणजे आधी सतराशे साठ अटी पूर्ण करा.... म्हणजे साध्या कपड्यात असूत तर ठीक, पण सणासुदीचे कपडे असतील तर ते खराब नको व्हायला हा विचार. बाहेरुन घरी जाणार असूत आणि सोबत भिजून खराब होईल असं काहीही सामान नसेल किंवा नाईलाजाने कुठेतरी वेळेवर पोहोचायचे आहे म्हणून पावसातून जावे लागणार असेल... अशा सगळ्या वेळी भिजायला माझी हरकत नाही. पण जर ऑफिसमध्ये जात असताना किंवा कुठे कामासाठी छान तयार होऊन जात असताना, सोबत सामान असेल किंवा लेकरू असेल तर मग या सगळ्यांच्या चिंतेपोटी ते भिजणे नको आणि तो पाऊस तर नकोच नको असे होते. सगळ्यात मोठी अडचण रस्त्यात सगळीकडे पावसामुळे झालेल्या चिखलातून जीव वाचवत एकीकडे गाडी चालवायची आणि दुसरीकडे अंगावर उडणाऱ्या पाण्यापासून बचाव करायचा अशी कसरत करत जेव्हा ऑफीसला किंवा घरी पोहोचायचे असते त्यावेळी अनेक ठिकाणी पाणी भरल्याने रस्ते बदलून घरी पोहोचण्याची धडपड अधिक होते, जेव्हा वाट पाहणारे लेकरू डोळ्यांसमोर दिसते. असे अनेक प्रश्न मला भेडसावत असताना त्याला मात्र जिथे आहोत जसे आहोत तो क्षण साजरा करायला आणि पावसात भिजायला नेहमीच आवडतं. 


इंजिनिअर असल्याने त्याला सगळ्या टेक्निकल गोष्टींमध्ये रस आणि त्यावरची चर्चा त्याची आवडती तर मी चंद्र, सूर्य, तारे आणि पाना-फुलात राहणारी! माझं विश्व कथा, कादंबऱ्या अन् कवितांमध्ये आणि त्याचे स्वप्न नवनव्या टेक्नॉलॉजीत लागणाऱ्या शोधामध्ये रमणारे. योगायोगाने आमच्या नावांची इनिशियल (आद्याक्षरे) एस आणि एन! आमच्या स्वभावाला अगदी साजेशी... एक नॉर्थ पोल (N) तर दुसरा साउथ पोल (S)!


पण म्हणतात ना, लग्नानंतर एकमेकांच्या सवयी समजण्याच्या किंवा बदलण्याचा नादात, सोबत राहून एकमेकांना जसे आहोत तसे आनंदाने स्वीकारण्याचा मनापासून प्रयत्न केला तर काही वर्षात आपल्यामध्ये जो बदल होतो त्यावर आपलाही मग विश्वास बसत नाही. एकमेकांसोबत वीस वर्ष आयुष्य घालवल्यानंतर आता नेमके आम्ही दोघे एकमेकांसारखे झालो आहोत. माझ्या सगळ्या सवयी त्याच्या कधी झाल्या आणि त्याला स्वीकारताना त्याच्या सगळ्या आवडीनिवडी मी कधी अंगिकारल्या हे मलाही कळले नाही.


आता सिंथेटिक कपडे असले तरी त्याला फारशी अडचण नसते पण मला मात्र त्याची कॉटन कपड्यांची आवड आणि सवय इतकी लागली कॉटनशिवाय काही असेल, अगदी रेशमी वस्त्र जरी, तरी... थोड्या वेळात ते नकोसे वाटायला लागते. पाणी पुरी आणि भेळ तो आता मनापासून खातो तर अधून मधून मलाच त्याच्यासारखी गोड खाण्याची लहर येते. नोकरीच्या निमित्ताने किंवा बदलत्या जगाशी जुळवून घेताना मी कधी टेक्निकल गोष्टी समजून घ्यायला लागले आणि स्वतःहून त्या शिकले हे आठवायचं झालं तर उत्तर सापडत नाही आणि मी लिहिलेली प्रत्येक ओळ, कथा किंवा कविता सर्वात आधी आवडीने वाचून त्यावर दाद देणारा आणि काही कमी वाटल्यास अगदी समीक्षणसुद्धा करणारा हा तोच पूर्वीचा सचिन आहे यावर त्याचाही विश्वास बसत नाही.


स्वतः सारखंच आपल्या जोडीदाराला बनवण्याच्या अट्टाहासात पहिल्या वर्षभरातच आम्ही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि प्रेमात पडल्यानंतर अगदी मनापासून एकमेकांच्या सवयींपासून ते आवडीनिवडीपर्यंत आणि स्वभावातल्या गुण-दोषांसकट एकमेकांना सावरत आणि साथ देत इथवर आलो आहोत. वयाच्या या टप्प्यावर आपल्या आधीच्या पिढीला समजून घेत आणि त्यांना साथ देत त्यांचे राहिलेले दिवस अधिक आनंदाचे आणि समाधानाचे कसे करता येतील हा विचार मनात ठेवत, त्याचवेळी पुढच्या पिढीलादेखील जमेल तसा मार्ग दाखवत आणि त्यांच्या प्रवासात कुठे गरज लागली तर आम्ही पाठीशी आहोत हे सांगत आम्ही एकमेकांचा हात हातात धरुन खंबीर उभे आहोत याचा आनंद आहे.


आजवर केलेल्या अनेक तडजोडी हसण्यावारी विसरत आणि नजर क्षितिजावर रेंगाळत ठेवत, आपल्यामध्ये एवढे शहाणपण कधी आले हे समजण्याच्या पलीकडे कुठेतरी अर्धवट वयामध्ये आम्ही आलो आहोत, जे ना तर धड ऐन तारुण्यात आहेत ना म्हातारपणात! एकमेकांना समजण्याचा आजही अगदी मनापासून प्रयत्न करत आहोत आणि म्हणूनच सगळे हट्ट समंजसपणात उतरले असले तरीही, मनात अजूनही एक पालवी काहीतरी नवीन करून दाखवण्याचा हट्ट धरून, नव्या अंकुरासह खुणावते आहे. वयाच्या या टप्प्याला हसत सामोरे जाण्यासाठी सचिन सोबत नीलिमा आजही उभी आहे जशी लग्नाच्या दिवशी सगळ्यांचे आशीर्वाद घेत रिसेप्शनमध्ये मिरवत उभी होती!!


Rate this content
Log in

More marathi story from Neelima Deshpande

Similar marathi story from Romance