Pandit Warade

Tragedy Thriller

3  

Pandit Warade

Tragedy Thriller

झपाटलेले घर (भाग-२२)

झपाटलेले घर (भाग-२२)

5 mins
343


  *(भाग-२२)*


   इन्स्पेक्टर सावंत नेहमी प्रमाणे आपल्या ऑफिसमध्ये चहाच्या घोटासोबत पेपरमधील बातम्या चाळत बसलेले होते. तेवढ्यात हवालदार एक रिपोर्ट घेऊन तिथे आला. सावंतांना सॅल्युट ठोकून त्याने तो रिपोर्ट त्यांच्या समोर ठेवला. 


  "सर, अपघातग्रस्त सुजीतच्या पोस्ट मार्टमचा रिपोर्ट आलाय आत्ताच." 


   "हं! बघू काय म्हणतात डॉक्टर?" असं म्हणत त्यांनी ते पाकीट फोडले अन् त्यातला रिपोर्ट पाहू लागले. जस जसे रिपोर्ट पाहत गेले तसे त्यांच्या चेहऱ्या वरचे भाव बदलत गेले. 


   "अरे! सुजीतचा मृत्यू अपघाताने नाही तर घातपाताने, गळा दाबून झालेला आहे तर? हा मृत्यू अपघाती नसून हत्या आहे तर? अरे बापरे! त्याच्या सोबतच्या तरुणीचा अजून तपास लागला नाही. आता आपल्याला आणखी चांगल्या प्रकारे तपास करावा लागेल. हवालदार, गाडी काढायला सांगा आपल्याला आत्ताच्या आत्ता लामणगावला जावे लागेल." असं म्हणत समोरच्या महत्वाच्या पेपर्सवर सह्या करून सावंत बाहेर निघाले सुद्धा. ड्राइवर गाडी घेऊन आला तसे सावंत हवालदार लांडगेंसह गाडीत बसले, गाडी लामणगावच्या दिशेने धुरळा उडवत निघाली. जसजसा धुरळा उडत होता, सावंतांच्या डोक्यात विचारांचा धुरळा उडत होता. 


  "लांडगे, आपण जी केस अपघाताची समजत होतो, ती तर घातपाताची केस निघाली. तुम्हाला काय वाटते? काय कारण असावे सुजीतच्या हत्ये मागे?" सावंतांनी हवालदार लांडगेला विचारले. 


   "सर, हे नेहमी प्रमाणेच प्रेमाच्या त्रिकोणातील प्रकरण असावे, सुजीत सोबत जी तरुणी होती तिचे रहस्यमयरित्या गायब होणे अनाकलनीय वाटते. तिचा तर हात नसावा ना?" हवालदार लांडगेचा तर्क.


  "आजकालच्या मुली काय करतील याचा काही नेम नाही . किंवा असंही असू शकतं, की तिसऱ्या कुणाच्या डोळ्यांत या जोडीचे प्रेम खुपत असेल आणि त्याने आपला विकृत आनंद प्राप्त करण्यासाठी हे कृत्य केले असेल. काही माणसांना दुसऱ्याला दुःख देण्यात आनंद मिळत असतो. कॉलेज मधीलही काही प्रकरण असू शकते. सर्व शक्यतांचा विचार करावा लागेल आपल्याला. त्यांचा कॉलेजचं मित्र रमेशच यावर प्रकाश टाकू शकेल. त्याला गाठायला पाहिजे आधी." सावंतांनी खुलासा केला. 


   "सर, आपण आधी कॉलेजमध्ये जायला पाहिजे होते, असं नाही वाटत तुम्हाला? अशी प्रकरणं तिथेच चवीनं चघळली जातात. तिथेच त्याची खरी माहिती मिळू शकते. असे मला तरी वाटते." लांडगेने आपल्या मनातील शंका बोलून दाखवली.

  

  "बरोबर आहे लांडगे तुमचं म्हणणं. पण आपला प्रमुख साक्षीदार आहे रमेश. तो गावातला असल्यामुळे त्याला जास्त माहिती असू शकते." सावंतांनी लामणगावला जाण्याचे कारण स्पष्ट केले. 


   "प्रमुख साक्षीदारच प्रमुख आरोपी प्रमुख आरोपी निघणार नाही कशावरून? माझा आपला एक संशय. असं म्हणत त्याने आपली जीभ दाबली. 


  त्यांच्या या चर्चेतच गाडी लामणगावच्या वेशीत येऊन पोहोचली. सावंतांनी बघितले, वेशीच्या बाजूलाच असलेल्या स्मशान भूमीत एक प्रेत जळत होते. मोठमोठ्याने आक्रोश सुरू होता. सुजीतच्या मामांच्या खांद्यावर डोके ठेवून रामराव पाटील (रमेशचे वडिल) हमसून रडत होते. बायकांच्या घोळक्यात रमेशची आई रखमाबाई मोठ्याने आक्रोश करत होती. सावंत गाडीतून खाली उतरले. आपली कॅप हातात घेऊन त्यांनी जळणाऱ्या प्रेताला सन्मानपूर्वक नमस्कार केला. त्यांना तिथे बघून आबा लगबगीने त्यांच्याकडे आले. 


  "साहेब, आपण यावेळी इथे?" आबांनी विचारले.


   "सुजीतच्याच मृत्यूची चौकशी करायला आलो होतो. हे कुणाचे प्रेत जळते आहे?" सावंतांनी विचारले. 


   "साहेब, सुजीत तर गेलाच. माझी मुलगीही बेपत्ता आहे. तिचाच शोध घेता घेता रमेशचाही आज बळी गेला. काल पाण्यात बुडून त्याचाही मृत्यू झाला. माझ्या नावावर अजून एक पातक चढले. माझ्या मुलीसाठी बापूंचा एकुलता एक, हाताशी आलेला मुलगा गेला." असं म्हणत महिनाभर राधिकेला शोधण्यात रमेशने कशी मेहनत घेतली ते सविस्तर कथन केले.


  "पाटील, सुजीतचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला आहे. सुजीतचा अपघात झाला नसून घडवण्यात आला आहे, आणि त्याची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. असं डॉक्टर म्हणताहेत. म्हणून जरा रमेशकडे काही माहिती मिळेल या हेतूने आलो होतो. पण त्याचाच मृत्यू बघायची वेळ आली. असो. बघतो कॉलेजला जाऊन काही क्ल्यू मिळतो का? जरा काळजी घ्या तब्येतीची. काही गरज पडली तर संपर्क करीन. बाय." असं म्हणत इन्स्पेक्टर सावंत तिथून निरोप घेऊन कॉलेजच्या दिशेने निघाले. 


  कॉलेजमध्ये नेहमीप्रमाणे वर्ग सुरू होते. काही मुले लायब्ररी मध्ये बसून अभ्यास करत होते. तर काही कॅन्टीनमध्ये चहा बरोबर शिळोप्याच्या गप्पा मारत बसले होते. स्टाफ रूम मध्ये क्लास नसलेले प्राध्यापक गप्पा करत , कुणी पुढील तासाचे टिपण काढत बसलेले होते. तेवढ्यात इन्स्पेक्टर सावंत एक हवालदारासह आत आले. प्रा. लुकतुकेही स्टाफ रूम मध्ये काही टिपण काढत बसलेले होते, सावंतांना बघताच, ...


  "या! मिस्टर सावंत. आता आणखी काय काम काढलंत?" असं म्हणत त्यांच्यासाठी एक खुर्ची समोर ओढली. 


  "थॅंक्यू!" म्हणत सावंतांनी खुर्चीत बस्तान ठोकलं.


   "सर, सुजीतच्या प्रकरण बद्दल थोडे बोलायचे होते. त्यासाठी आपल्या केबिनमध्ये बसलो तर ठीक राहील. असे मला वाटते." सावंतांनी येण्याचे कारण स्पष्ट केले. 


   गांभीर्य ओळखत प्रा. लुकतुके ताबडतोब स्टाफ रूम मधून उठून आपल्या कॅबिन कडे सावंतांना घेऊन गेले. चपरशाला पाणी आणि चहा आणण्याची ऑर्डर केली. चपराशी चहा, पाणी ठेऊन जायला निघाला तेव्हा त्याला, आपण सांगे पर्यंत कुणालाही मध्ये न सोडण्याची ताकीद दिली.


  "बोला इन्स्पेक्टर आता आणखी काय नवीन माहिती हवी आहे तुम्हाला?" त्यांनी सरळ सरळ मुद्यालाच हात घातला. 


   "सर, दुर्दैवानं सुजीतचा मृत्यू हा अपघात नसून त्याची हत्या झाली असल्याचा पोस्टमार्टेम रिपोर्ट सांगतोय. त्याचा गळा दाबून मृत्यू झालेला आहे." सावंतांनी स्पष्टीकरण दिले.


  "अरे बाप रे! मग पुढं तुमचा तर्क काय म्हणतो इन्स्पेक्टर? काय कारण असू शकतं त्याच्या हत्येमागे?" लुकतुकेंचा अधिरतेचा प्रश्न. 


   "त्यासाठीच तर आलोय इथे तपास करायला. रमेश शिवाय आणखी कोण कोण होते सुजीत किंवा राधिकेच्या संपर्कात? जे या प्रकरणात तपासात मदत करू शकतील असे काही मित्र, मैत्रिणी असतीलच नक्की." इन्स्पेक्टर सावंत म्हणाले.


   "हां! नाटकात भाग घेतांना गीता नावाच्या विद्यार्थिनीने सुजीत बरोबरच भूमिका करण्याचा आग्रह धरला होता. ती रमेश, राधिका आणि सुजीत यांना चांगलीच परिचित होती. कदाचित ती या प्रकरणावर थोडा फार प्रकाश टाकू शकेल असं मला वाटतं." लुकतुकेंनी सहकार्याच्या भावनेने आपला कयास मांडला.


   "ठीक आहे. गीताला इथे बोलवा. तिचाच जबाब घेऊ, काही तरी क्ल्यू नक्कीच मिळेल. असं माझं अंतर्मन मला सांगत आहे." सावंतांनी असं म्हणताच लुकतुकेंनी चपराशा मार्फत गीताला बोलावून घेतले. गीता, प्रा. लुकतुके, इंस्पे. सावंत आणि हवालदार लांडगे एवढेच लोक केबिनमध्ये होते. इन्स्पेक्टर प्रश्न विचारत होते, गीता उत्तरं देत होती. कुठलाही आडपडदा न ठेवता तिने सारे काही सविस्तर सांगितले. राधिकेच्या अतृप्त आत्म्याशी भेट झालेली मात्र तिने कुणालाच सांगितली नाही. सांगितली असती तरी सर्वांनी तिला वेड्यातच काढले असते.  रमेशची मैत्रीण म्हणून सुजीतला राधिके पासून दूर करण्याच्या प्लॅन मध्ये तीच सुजीत मध्ये कशी गुंतत गेली?, रमेशने तीन मित्रांच्या मदतीने कसा सुजीतचा आणि राधिकेचा काटा काढला? हे सविस्तर सांगितले. राधिका बेपत्ता झालेली नसून तिचीही रमेशने हत्याच केलेली आहे आणि मृतदेह पुलाखाली फेकला आहे. हे तिने अगदी स्पष्ट केले. गीता सांगत होती. हवालदार लिहून घेत होता. सर्व जबाब लिहून झाल्यावर गीताची स्वाक्षरी घेतली गेली. साक्षीदार म्हणून प्रा. लुकतुकेनीही सही केली. त्यांनतर सावंतांनी गीताला रमेशच्या मृत्यूची बातमी सांगितली. क्षणभरच गीता थबकली अन् लगेच म्हणाली, 

    

   "केलेल्या कर्माचं फळ मिळालं म्हणायचं लगेच. जसे कर्म केले तसे फळ भोगावेच लागते. नाही का?" लुकतुकें कडे पहात गीता म्हणाली. प्राध्यापक लुकतुके आश्चर्य चकित होऊन नुसते बघत राहिले. असंही होऊ शकेल, एवढ्या स्तरा पर्यंत विद्यार्थी जातील, याची कल्पना सरळ मनाच्या लुकतुकेंना कोठून येणार?


   "ठीक आहे गीता. धन्यवाद सविस्तर माहिती दिल्या बद्दल. अजून काही आवश्यकता वाटल्यास पुन्हा येईन" असं म्हणत इन्स्पेक्टर सावंत तिथून ठाण्यात जाण्यासाठी गाडीत बसले. मनातील खदखद बोलून टाकली म्हणून गीता मोकळी झाली होती. गीताच्या मनावरील ताण हलका झाला होता. एक स्त्री हृदय एवढं काही आत दडवून रहात होती. काय अवस्था होत असेल हे तिच्या शिवाय कोण जाणू शकत होते?......


*क्रमशः*


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy