Seema Kulkarni

Inspirational

3  

Seema Kulkarni

Inspirational

जेव्हा आपण अडचणीत असतो तेव्हा

जेव्हा आपण अडचणीत असतो तेव्हा

2 mins
226


बुडत्याला काडीचा जसा आधार असतो, म्हणजेच जसे काडीचा जरी आधार मिळाला तरी बुडणारा वाचू शकतो. तसेच संकटांच्या किंवा गरजेच्या वेळी हेच आधाराचे शब्दच किती बळ देऊन जातात. माणूस नव्या धैर्याने समोरील प्रसंगाला सामोरा जातो. आधार अर्थातच मदतीचा हात. आपला एक आधाराचा हात किंवा आपल्याला मिळालेला आधाराचा हात यामध्ये कितीतरी समस्या सोडवण्याची ताकद असते. आधार हा जसा आर्थिक असतो तसाच शारीरिक आणि मानसिकही असतो. प्रसंगा नुसार याची व्याख्या बदलत राहते.


आज मी माझ्या बाबांबद्दल बोलणार आहे. जे माझ्या जीवनाचा आधार होते, त्यांचा आधारस्तंभ होण्याची माझी पातळी नाही. हा एवढे निश्चित सांगू शकते की माझ्याकडून त्यांना कायमच या आजारपणात मानसिक आधार मिळायचा. माझ्या सहवासात ते खूष असायचे. पण कधीकधी असेही आयुष्यात प्रसंग येतात की, आपण त्यांच्यापेक्षा मोठे होऊन जातो.


ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा मी जॉब करत होते. बाबा प्यारालीसीस ने आजारी होते. त्यांची ही उजवी बाजू पूर्णपणे गेली होती. त्यामुळे ते झोपूनच होते. सर्वकाही जागेवरच. पुण्याला भावा कडेच असायचे ते. अशातच एक दिवस त्यांनी भावाकडे हट्ट केला की "मला उल्काकडे नेऊन सोड"

आणि त्यांना माझ्याकडे नाशिक ला यायला खूप आवडायचे. आले की समाधानाने , आनंदाने राहायचे. मी पण तेवढेच जिव्हाळ्याने ,मायेने त्यांचे सर्व करत होते. भावाचा फोन आल्यावर मी विचारात पडले. कारण एक तर माझा जॉब सुरू होता, मी कितपत त्यांना वेळ देऊ शकणार होते? ऑफिसच्या वेळेपर्यंत मला त्यांचे सर्व करणे होईल का? असे अनेक प्रश्न मनात येऊन गेले. दुसरे म्हणजे जागेची अडचण. फ्लॅट छोटा होता. वन बीएचके. त्यात सासूबाई होत्या घरी. आणि बेड रिडन पेशंट म्हटल्यावर सेपरेट जागा हवीच. मी नाही म्हणणे शक्यच नव्हते. भाऊ बाबांना सोडून निघून गेला.


बाबांना बाहेर हॉल मध्येच दिवानवर जागा केली. ते आल्यावर माझे रूटीनच बदलून जायचे. लवकर उठून सकाळचा स्वयंपाक, नंतर त्यांना उठवून ब्रशपासून ते स्पंजिंग पर्यंत सर्व करावे लागत होते. जाताना टेबल वर त्यांचे खायचे ,त्यांच्या गोळ्या, पाणी सर्व ठेवून बरोबर साडेदहाला मी ऑफिसला जायला निघायचे. सासूबाईंनी त्यांना आणण्याची परवानगी दिली हेच खूप होते माझ्यासाठी. बाहेर पडल्यावर एका दिव्यातून बाहेर पडल्यासारखेच वाटायचे मला.


संध्याकाळी पावणेसात वाजायचे घरी यायला. आल्यावर परत त्यांना हवं नको ते पहायचे, त्यांच्याशी गप्पा मारायच्या, त्यांचं आणि माझं नातं फार मोकळेपणाचे असायचे.आमच्या घराच्या समोरच कॉमन टेरेस होता. संध्याकाळी खुर्ची वगैरे टाकून त्यांना तिथे बसवायचे. मोकळ्या हवेत त्यांना ही बरे वाटायचे. रात्री ही कामे आवरेपर्यंत उशीरच व्हायचा.


या दरम्यानची एक गोष्ट चांगली आठवते. नेमके त्याच वेळेस माझे दुसऱ्या गावाला ट्रेनिंग आले. मला धक्काच बसला. त्यांना कोणाच्या जीवावर सोडून जाणार होते. खाण्यापिण्याचे कसेही झाले असते पण बाकीचे कोण करणार? भीत भीतच यांनाही सांगितले आणि बाबांनाही. बाबांचा चेहराच उतरला. दोन दिवसांचे ट्रेनिंग होते तिसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत मी परत येणार होते. मला जावेच लागले ट्रेनिंगला. परत आले तेव्हा खूप रडले. अक्षरश: त्यांनी दोन दिवस काहीच खाल्ले नव्हते. कसलाच त्रास नको म्हणून.


जमेल तेवढा, जमेल तसा त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांना मानसिक बळ देण्याचा प्रयत्न केला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational