Pratibha Tarabadkar

Drama

3  

Pratibha Tarabadkar

Drama

जावे त्यांच्या वंशा -सान्वी

जावे त्यांच्या वंशा -सान्वी

3 mins
183


घराची बेल वाजवायच्या आधी सान्वीच्या लक्षात आलं तशी तिने सॅकचे कप्पे चाचपडून इयरफोन कानात अडकवून, मोबाईलला कनेक्ट करून मगच बेल वाजवली.पटकन् दार उघडले.बाबा दारात उभे होते आणि आई रागाने डोळे वटारुन तिच्याकडे पहात होती.नेहमीचंच दृश्य!सान्वी बंद असलेल्या मोबाईल मधून तन्मयतेने गाणं ऐकत आहे असं नाटक करत फ्रेश व्हायला पसार झाली.

  डायनिंग टेबलवर ताटं मांडली होती.बाबांनी जेवायला सुरुवात केली होती.सान्वी येऊन बसली आणि मुकाट्याने जेवू लागली.'घड्याळात पाहिलेस का किती वाजलेत ते?'आईने शांततेचा भंग केला.सान्वीने घड्याळाकडे पाहिले, पावणेदहा वाजले होते.'अगं आई,रोज काय तेच तेच विचारतेस?माझा जॉबच तसा आहे शिवाय ऑफिस इतकं दूर मग उशीर होणारच ना!'सान्वी त्याच त्या प्रश्नोत्तरांना कंटाळली होती.

  'अगं जेवू दे तिला शांतपणे!दमली असेल.'बाबा समजुतीच्या स्वरात म्हणाले.

 'आणि मी नाही दमले काम करुन?रोज उशिरा उठायचं, स्वतःचं आवरायचं, नाश्ता झाला की लंच बॉक्स सॅकमध्ये कोंबून ऑफिसला पळायचं...'आई आज फुल्ल भांडणाच्या मूडमध्ये होती.सान्वी ताटाशेजारी मोबाईल ठेवून मख्खपणे मेसेजेस वाचत होती आणि डाव्या हाताने रिप्लाय देत होती.मधेच विनोद वाचून खुदूखुदू हसतही होती.आपल्या बोलण्याचा सान्वीवर काहीच परिणाम होत नाही असे पाहून आई हताशपणे जेवू लागली.

  आज आईने चंगच बांधला होता,सान्वीला आज सुट्टी आहे तर लॅपटॉप वर वधू वर सूचक मंडळातील मुलं बघायची!तिने भराभर स्वयंपाक उरकला आणि सान्वीला उठवायला गेली.

'उठा महाराणीसाहिबा, सूर्य उगवून तीन तास झालेत.'

 'आई झोपू दे ना गं मला प्लीज.आठवडाभर इतकं काम होतं ना ऑफिसमध्ये!'सान्वी दुसऱ्या कुशीवर वळत म्हणाली.

 'ते काही नाही, आता उठायचं म्हणजे उठायचं! सासरी गेलीस की असं लोळत पडता येईल का? चल तर आपण मुलांची स्थळं बघू .'आईने सान्वीचे पांघरूण खस् कन् ओढून काढले तशी सान्वी ताडकन् उठून बसली.

'काय घाई आहे लग्नाची? तुला बघवत नाही का मी आनंदात आहे ते!'

'अगं सान्वी तुझं वय वाढतंय, पुढच्या महिन्यात तीस पूर्ण होतील तुला! वेळच्यावेळी झालं की बरं असतं गं सगळं!'आई समजुतीच्या स्वरात म्हणाली.'आम्ही किती दिवस पुरणार आहोत तुला?'

 'ए आई, उगाच इमोशनल ब्लॅकमेल करणं बंद कर पाहू आधी! आणि काय गं लग्न झालं की सगळे प्रॉब्लेम्स सुटतात का? आणि ते सुखाने संसार करू लागले....टाईप?'

'अगं तसं नाही गं,पण आयुष्य मार्गी लागतं, मुलंबाळं....!'

  'बापरे आई, किती पुढचा विचार करतेयस तू? मला तर विचारानेच कापरं भरतंय!'

'एव्हढं कापरं भरायला झालंय काय?'

'अगं आई,माझी नोकरी ही अशी! सकाळी नऊला निघून रात्री नऊ, साडेनऊ कितीही वाजतात घरी यायला.'

 'मग नोकरी बदल '.

'इतकं सोपं आहे का नोकरी बदलणं? शिवाय माझं प्रमोशन ड्यू आहे आणि नोकरी बदलू?'

'मग ऑफिस जवळचं स्थळ बघू.म्हणजे येण्याजाण्याचा वेळ सुद्धा वाचेल.'आईकडे सगळ्या गोष्टींवर उपाय होते.

 'हो, मुलं वाटेवर पडली आहेत ना माझ्या ऑफिसच्या! आणि आई मला नाही हं जमणार घरची कामं करुन ऑफिसला जाणं!' 

'अगं पाण्यात पडलं की पोहायला येतं!'

'पोहायला येतं माय फूट! आमच्या ऑफिसमध्ये बघते ना मी लग्नानंतर काय अवस्था झाली आहे एकेकीची! घरकाम, मुलं, सणवार,मुलांची आजारपणं, त्यांच्या परिक्षेचा अभ्यास, आला गेला सगळ्या फ्रंटवर लढायचं आणि वर नोकरी, त्यातील स्ट्रेस,टार्गेटस् यांनाही तोंड द्यायचं, बिचाऱ्या पार पिळवटून गेल्या आहेत.'

'पण बाई म्हटलं की या जबाबदाऱ्या पार पाडाव्याच लागतात!'आई पुटपुटली.

'आई , मला नाही हं जमणार हे मल्टिटास्किंग ',सान्वीने स्पष्ट शब्दात आईला सुनावले.

'मग तुला कसा हवाय बाई नवरा?'आईच्या स्वरात चिंता डोकावत होती.

'मला नं, कामाची विभागणी करून मला मदत करणारा नवरा हवा आहे.'

'म्हणजे मी दूध तापवून चहा केला तर त्याने भाजी चिरावी.मी पोळ्या केल्या तर त्याने वॉशिंग मशीनला कपडे लावावेत अशी अनेक कामं आहेत जी दोघांच्या सहभागाने हलकी होतील.बाईवरच सगळा भार टाकून स्वतः तंगड्या पसरून आराम करणारा नवरा मला अजिबात नको.'सान्वीने ठामपणे सांगितले.

'पण असं मुलाला कसं विचारणार की बाबा तू अशी कामं करायला तयार आहेस का?'

'का नाही विचारायचं?'मुलींना नाही विचारत, घरातील सणवार पाळावे लागतील, थोडाफार स्वयंपाक येतो ना,तसंच मुलांनाही विचारायचं!'सान्वी सहजपणे म्हणाली.'आई, मुली शिकल्या, मुलांच्या बरोबरीने नोकरी करु लागल्या पण घरच्या जबाबदाऱ्यांतून त्यांची सुटका झाली का?उलट त्यांच्यावर टीका करुन सतत दडपणाखाली ठेवलं जातं.बहुतांश घरात अशीच परिस्थिती आहे.अपवाद निश्चितच असतील.आणि अशा अपवादात्मक घरातच मला लग्न करुन जायचं आहे.'

 आणि सान्वीच्या अपेक्षा वरपक्षाला आवडतील का? पटतील का? या विचारात आई बुडून गेली....


(समाप्त)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama