Jyoti gosavi

Fantasy

4.0  

Jyoti gosavi

Fantasy

जादूची टिकली

जादूची टिकली

8 mins
262


ऑफिसची वेळ संपत आली होती, सहाला पंधरा मिनिटं कमी असताना सगळ्या जणांनी टेबल आवरायला घेतलं. महिला मंडळ तर आधीच गायब झालेलं होतं. त्यांच्या मेकअप साठी आणि तयारी साठी गव्हर्मेंट ने त्यांना अर्धा तास दिलेला आहे अशी त्यांची समजूत होती. 

दीप्ती ने साडेपाचलाच नेहमीप्रमाणे आपल टेबल सोडलं, जरा चेहऱ्यावर आणि डोळ्यावर पाणी मारून फ्रेश व्हावे या इराद्याने ती बाथरूममध्ये गेली. 

टाइपरायटर गेले कॉम्प्युटर आले पण डोळ्याचा आणि मानेचा त्रास काही कमी झाला नाही. 

उलट डोळ्यांना तर अजूनच जास्त त्रास होतो, तिने चेहरा वगैरे धुतला आणि तोंड धुताना तिची पहिली टिकली पडली. 

तिने चेहऱ्यावर पावडर वगैरे लावल्यानंतर, टिकली लावायला पर्स उघडली आणि आजच तिने ट्रेनमध्ये टिकल्या पिना विकणाऱ्या बाईकडून टिकल्यांची तीन पाकीट घेतली होती. 


अरेच्चा! हे नवीन पाकीट कुठून आलं? मी तर तीनच पाकिटे घेतली होती. चुकून त्यात चौथ पाकीट आल वाटतं! ती स्वतःशीच म्हणाली, 

पण त्यावर तर एकच टिकली होती ,आणि ती माझ्या आजच्या पंजाबी ड्रेसला मॅचिंग होते आहे. आज तिने निळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता. शनिवार होता म्हणून !

जरी कितीही  मॉडर्न झालं! मॉडर्न पणाचा कितीही आव आणला, नोकरी केली, तरी अनेकजण भविष्यावर विश्वास ठेवतात. किंवा भविष्याचा वेध घेऊ पाहतात. तर काहीजण वारानुसार कपड्यांचा रंग वापरतात. 


उदाहरणार्थ 

सोमवारी पांढरा

 मंगळवारी लाल 🔴

 बुधवारी निळा🔵

 गुरुवारी पिवळा 

शुक्रवारी हिरवा

 शनिवारी ⚫काळा किंवा निळा आणि 

रविवारी नारिंगी🍊


 आज शनिवार असल्याने तिने निळा ड्रेस घातला होता. त्या त्या दिवशी त्या त्या ग्रहांचे रंग वापरले तर तो दिवस सुसह्य होतो, असे म्हणतात किंवा जरी काही संकट येणार असेल तरी त्याचे प्रमाण, त्याची तीव्रता कमी होते. 

तिने मॅचिंग म्हणून ती एकुलती एक टिकली आपल्या कपाळावर लावली. आणि क्षणभर तिला डोकं जड झाल्यासारखं वाटलं, 

 मेंदूला झिण्याझिण्या आल्यासारखं झालं. डोक्याला एक जडपणा आला, तिने आपली नेहमीची ट्रेन पकडली. सुदैवाने आज खिडकीची जागा मिळाली होती. पहाटेपासून कामाच्या धबडग्याखाली सुरू झालेले शरीर नावाचे यंत्र, जरासे सुखावले, विसावले आणि त्यात तिला डुलकी लागली. त्या अर्ध्या तासाच्या डुलकीत तिला चित्र विचित्र दृश्य दिसत होती, निखिल तिचा नवरा आज बॉसशी भांडत होता.  पार अगदी हमरीतुमरीवर आला होता. आणि मग ऑफिस च्या लोकांनी हो -हो करत, मध्यस्थी करत, त्याला केबिनच्या बाहेर काढले. इत्यादी इत्यादी


 त्यानंतर ती घरी आली. रोजचीच आवराआवरी, स्वयंपाक, उद्या रविवार असल्याने उठायची घाई नव्हती. 

नेहमीप्रमाणे झोपताना तिने कपाळावरची टिकली ड्रेसिंग टेबलच्या आरशाला लावली, चेहरा धुतला, क्रिम लावले, पण तिला ती टिकली काढताना थोडीशी विचित्र संवेदना जाणवली. 


सकाळी आरामात उठून नाश्ता वगैरे बनवला, आणि दोघे एकत्र गप्पा मारत बसले तेव्हा, निखिल तिला सांगू लागला .


अगं काल माझं बॉस शी भांडण झालं. लोकांनी आडवलं म्हणून ,नाहीतर चां ssssगला  झोडपून काढल असता! 

 आणि अचानक आपल्याला ट्रेनमध्ये डुलकी लागली असता, ते भांडण दिसलं होतं हे तिला जाणवलं. 


असेल काहीतरी योगायोग! असा विचार करून तिने ती गोष्ट तिथेच सोडून दिली. 

मात्र त्याला ती ओरडली,


 अरे बाबा !काही झालं तरी तो बॉस आहे .त्याच्याशी अशा मारामाऱ्या करून चालेल का? नोकरी टिकवायची आहे ना? मग थोडसं नमतं घ्यायला पण शिकाव! 


अगं लायकी नसणाऱ्या माणसांना झुकतं माप देतो, आणि आम्हाला डावलतो म्हणजे काय? 


अरे जाऊ दे रे बाबा! सोडून दे, तुझा पगार कमी झाला नाही ना?  देऊ दे कोणाला झुकत माप .


त्यानंतर पाच सहा दिवसांनी जीन्स पॅन्ट वरती काळा टॉप घातला असता तिने ती टिकली परत लावली. टिकली पण आता निळ्या रंगाची काळपट दिसू लागली होती, आणि बरोबर तिच्या टॉप ला मॅचींग झाली. 

नेहमीप्रमाणे टिकली लावताना तोच अनुभव. आणि आजही येताना डुलकी काढायला मान टेकली ,आणि डोळ्यापुढे निखिल दिसू लागला. 

गच्च भरलेली लोकल आहे, निखिल ती पकडण्याचा प्रयत्न करतोय, कसा बसा गर्दीतून घुसला आणि ट्रेन पकडता पकडता त्याचा हात सुटला . 



"निखि sssल "करून ती जोरात ओरडली,  


पण सुदैवाने कोणीतरी हात दिला आणि निखिल पडता पडता वाचला. 

ती जागी झाली आपण लोकल मध्ये आहोत हे तिच्या लक्षात आले, आणि आजूबाजूच्या बायका तिच्याकडे विचित्र नजरेने बघत होत्या,असे तिला जाणवले. तिला पण ओशाळल्यासारखे झाले. 


सॉरी !जरा डुलका लागला होता, त्यात स्वप्न पडले तिने खुलासा केला. 


यांना बरी स्वप्न पडेपर्यंत झोप लागते, इथे एवढं गरम होतय श्वास देखील घुसमटतोय. एक जण बोलली


 शिवाय आम्ही इथे एका पायावर उभे राहिलो आहोत आणि यांना डुलकी काढून स्वप्ने पण पडतात!,  दुसरी म्हणाली 


अग ती स्टार्टिंग पॉइंट पासून येते ना! मग तिला मिळतं बसायला, असत एकेकाचं नशीब! तिसरी म्हणाली


 घरी आली रोजच्याप्रमाणे स्वयंपाक करताना डोअरबेल वाजली निखिल घरी आला परंतु त्याचा चेहरा एकदम उतरलेला होता घरात पाऊल टाकल्या टाकल्या त्याने तिला घट्ट मिठी मारली. 


दिप्ती! आज केवळ नशीब बलवत्तर म्हणून मी गाडीतून पडता पडता वाचलो.


 त्यानंतर त्याने घडलेली सर्व हकीगत तिला सांगितली, व तिला दुपारी डोळ्यापुढे दिसलेल्या दृश्याची आठवण झाली. 

आता मात्र हा योगायोग नाही, हे तिच्या लक्षात आले. 

त्यानंतर त्या टिकलीची दोन तीन वेळा तिने ट्रायल घेतली. तिने कोणत्याही रंगाचा ड्रेस किंवा साडी घातली, तर ती टिकली रंग बदलत असे ,आणि ती टिकली लावल्यानंतर निखिल कुठेही असला, तरी तो काय करतोय त्याचे तिला डोळ्यासमोर दृश्य दिसत असे. नंतर तिला मोघम बोलताना, ती गोष्ट खरी असल्याचे जाणवत होते. 

ती बोलता बोलता सदर गोष्ट आपल्या मैत्रिणीला नीताला तिने सांगितली. नीताने पण त्या टिकलीची ट्रायल घेतली, आणि तिला पण तिचा नवरा महेश काय करतोय ते दिसलं. 

तशी ती स्वतःचीच बडबडायला लागली , 

"कुत्र्या मला फसवतोस काय ? तू त्या टवळीबरोबर मजा करतोयस! आणि मी मात्र तुला ऑफिसला गेला म्हणून समजते, 

ये घरी! मग बघतेच तुला! तिने ठणाणा बोंबलायला सुरुवात केली, आणि तिच्या या टिकली ची साऱ्या ऑफिसभर जाहिरात झाली. सगळ्या ऑफिसला बातमी पसरली, मग काय विचारता! सगळा महिलावर्ग तिच्याभोवती जमा झाला, आणि कुतुहलाने तिला टिकली बाबत विचारू लागला. कुठून आली? कशी आली? त्याने काय होते? इत्यादी इत्यादी. 


नीता तिथून जी निघाली ती डायरेक्ट हॉटेल "किनारा" मध्ये पोहोचली, तिथल्या हॉटेल च्या रिसेप्शनला महेश चा फोटो दाखवून, हा माणूस इथे आलाय का? याची विचारणा केली आणि डायरेक्ट महेश ला रूम नंबर 17 मध्ये जाऊन, कॉलरला धरुन ओढतच घरी आणला. धड रिक्षा करू देईना, का बस मध्ये चढू देईना, साऱ्या रस्त्याने बडबडत ,शिव्या देत, ही वरात घरापर्यंत आणली. रस्त्याने लोक मजा घेत होते, कोणी कोणी तर व्हिडीओ पण काढत होते. दहा मिनिटात हा व्हिडीओ सोशल मीडियाला व्हायरल झाला बघा" आजची रणरागिणी आणि एक नेभळट , खोटारडा नवरा " अशा नावाने तो व्हायरल झाला. 

महेश ला एक गोष्ट मात्र शेवटपर्यंत कळली नाही, की आपल्या बायकोला किनारा हॉटेल चा पत्ता नेमका कसा मिळाला. त्याला एक ते कोडेच पडले होते, एक तर नीता पैसे वाल्या बापाची पोरगी होती. वरून त्याच्यापेक्षा चांगल्या पोस्ट वरती कामाला होती, त्याच्यापेक्षा चांगला पगार घेत होती, दोघांचा प्रेमविवाह होता. 

महेश दिसायला एकदम गोरागोमटा ,हिरो टाईप, चिकना, चुपडा, त्याच्यापुढे नीता डावी होती. 

ती त्याच्या सौंदर्यावर भाळली आणि तो तिच्या पैशावर भाळला .अशी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी दुखावून चालणार नव्हते. त्याने हात पाय जोडून, दहा वेळा माफी मागितली. आणि शेवटी नीताला पटवले. परंतु तुला हे सारे कसे कळले? हे तो वारंवार विचारत होता. 

तिने आपल्या मागे एखादा प्रायव्हेट जासूस लावला असावा अशी त्याला शंका येत होती. 

पण ते एक माझे गुपित आहे, मी कोणाला सांगणार नाही. हेच उत्तर ती त्याच्या तोंडावर फेकत होती. त्यातून एक गोष्ट मात्र चांगली झाली, महेश आता जरा घाबरूनच राहू लागला, वेळेमध्ये घरी येऊ लागला. बायकांची लफडी नाईलाजाने सोडावी लागली. 

त्यानंतर एक दिवस निता तिला भेटली, 


दीप्ती तुला एक विचारू? 


बोल ना नीता! 


तुला ही टिकली कोठे मिळाली? 


कोणती टिकली? कसली टिकली? दीप्तीने न कळल्याचा आव आणला. 

पण तिलाही कोणती टिकली ते चांगलेच माहीत होते. 


अगं अशी काय करतेस! त्यादिवशीची टिकली,  बघ मी लावली, आणि मला महेश एका हॉटेलमध्ये दिसला. तिथून मी त्याला शर्टाच्या कॉलरला धरून ओढत घरापर्यंत आणला. त्या दिवशीचा सारा इतिवृत्तांत तिने पुन्हा एकदा ऐकवला,आठवण करून दिली.  तिने दिप्ती ला डायरेक्ट ती टिकली विकतच मागितली. 


 मला तुझी टिकली विकत दे ना! 

मी तुला पाच हजार देते. 


 दीप्ती म्हणाली , अगं वेडी की काय तू नीता ?अशी कोठे टिकली असते का ग? तो एक योगायोग असावा. 


नाही दिप्ती तो योगायोग नव्हता, ती टिकली लावल्यावर मला एक प्रकारच्या झिण्याझिण्या सगळ्या शरीराभर पसरल्या, आणि डोके जड झाले.  हे बघ दीप्ती, तुझा नवरा काही लफडेबाज नाही, तो सज्जन माणूस आहे तेव्हा तुला या टिकलीची गरज नाही. पण मला मात्र गरज आहे. माझा नवरा मोठा लफडेबाज माणूस आहे, तो 10 ठिकाणी तोंड टाकायला जाईल, पण मी त्याला सोडू शकत नाही, मी प्रेम करते ना त्याच्यावर! शेवटी शेवटी ती दहा हजारावर आली, नंतर पन्नास हजारावर आली पण दिप्तिने तिला थांग लागू दिला नाही. शेवटी दीप्तीने तिला अधून मधून ती टिकली वापरायला देण्याचे प्रॉमिस केले. 

या टिकलीचा आपल्याला चांगला बिजनेस करता येईल, असा साक्षात्कार दीप्ती ला झाला आणि अर्ध्या तासासाठी शंभर रुपये अशा भाड्याने ती आपली टिकली देऊ लागली. त्यातून बऱ्याच नवऱ्यांची गुपिते, लफडी, कुलंगडी, उघडकीस येऊ लागली . कोणाची extra-marital अफेअर, कोणी पत्नीपासून लपवलेले पैसे ,प्रॉपर्टी ,दारू न पिण्याची शपथ घेतलेला नवरा, कोणाला बार मध्ये दिसू लागला. तर काही जणींना आपला नवरा आपल्या मागे आपली तारीफ करत असतो, जरी तोंडावरती गोड बोलला नाही तरी आपल्याबद्दल सासरच्या माणसांबरोबर चांगलेच बोलतो. आपल्यासाठी त्यांच्याशी पंगा देखील घेतो ,असे पण निदर्शनास आले. 

म्हणजे टिकली मुळे चांगले घडत होते आणि वादविवाद पण घडत होते. 

एका मैत्रिणीला टिकली दिली तेव्हा, तिचा नवरा तिला बीअर बारमध्ये दारू पिताना दिसला. 

तो बियर बार मध्ये असणे तिला काही नवीन नव्हते, परंतु त्याच्या नशेत असण्याचा गैरफायदा घेऊन, त्याचा एक सहकारी कोणत्यातरी कागदपत्रावर त्याची सही घेत होता. त्यामुळे ती ताबडतोब रिक्षा करून त्या बारमध्ये पोहोचली, आणि वेळेत हस्तक्षेप करुन तिने ते कागदपत्र हिसकावून घेतले आणि फाडून टाकले. आणि नवऱ्याचे देखील त्या मित्राबद्दल डोळे उघडले. त्यानंतर त्याने दारूचे प्रमाण खूप कमी केले ,आणि हळूहळू सोडून दिले. 


 हळूहळू तिच्या टिकली ची चर्चा बॉस पत्नीच्या कानावर गेली म्हणजे त्याचे असे झाले ऑफिस मध्ये महिला दिन साजरा करायचा होता त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून "मिसेस बॉसला" बोलावण्यात आले होते. आणि बोलता बोलता कोणी तरी त्या टिकली ची बातमी तिच्यापर्यंत पोहोचवली. आणि तीच बाई आता तिला टिकली मागू लागली, कसली टिकली? कोणती टिकली? वगैरे वगैरे दिप्ती न करून झालं ,परंतु शेवटी ती बॉस ची बायको, तिला काही नाही म्हणता येईना. खरे तर ती टिकली दिप्ती ला कोणाला विकायची किंवा फुकट द्यायची इच्छा नव्हतीच. 

त्यावर त्या दोघींमध्ये एक करार ठरला, तिने आपल्या नवऱ्याकडे रदबदली करून तिला प्रमोशन आणि पगार वाढ दोन्ही द्यायचं, आणि त्याबदल्यात दीप्तीने तिला टिकली द्यायची. 

मिसेस बॉसने काय कळ फिरवली माहिती नाही, पण दोन एक महिन्यांमध्ये दीप्ती ला प्रमोशन पण आले आणि पगार वाढ पण झाली. पण त्याआधी त्या टिकली ची एक दोन वेळा ट्रायल घ्यायला मी तेच बॉस विसरली नव्हती आणि दोन्ही वेळा जे तिला दिसले डोळ्यापुढे दिसले ते तंतोतंत खरे निघाले त्यावर तिने आपल्या नवऱ्याकडून दीप्ती चे काम करवले आणि टिकली ताब्यात घेतली. 

आता तर काय मिस्टर बॉस च्या 24तासावरती  मिसेस बॉसचे कंट्रोलिंग आले.


 मिस्टर बॉस पण तसा रंगीला रतन होताच, पण तो जिथे जिथे जायचा तिथून तिथून बायको त्याला गाडी घेऊन जायची आणि परत घरी घेऊन यायची. 

एकाही शब्दाने त्याला कधी बोलायची नाही. 

पण तिच्या या वागण्याने मिस्टर बॉसच धाबं दणाणलं, कारण शेवटी ती कंपनी मिसेस बॉस च्या बापाची होती, . आणि हा घरजावई होता. 

त्यामुळे त्याचं वागणं एकदम सुधारल, पण त्यालाही कळत नव्हतं की आपल्या बायकोला आपण कुठे जातो ते कळतं कसं? त्याला देखील असेच वाटले की हिने आपल्या मागे एखादा डिटेक्टिव लावलेला आहे. त्यामुळे तो पण आता शांत झाला


तिने आपल्या नवऱ्याकडून दीप्ती चे काम करवले आणि त्या मोबदला मध्ये टिकली ताब्यात घेतली. 

तिने दोन दिवस आपल्या कपाळावरून टिकली काढलीच नव्हती.

 तिसर्‍या दिवशी मात्र आंघोळ करताना तिच्या चेहर्‍यावरची टिकली कधी आणि कोठे गायब झाली ते तिला कळलेच नाही. पण आता दिप्तिला बोलून काही फायदा नव्हता. कारण तिने आपले प्रॉमिस पूर्ण केले होते. ज्या बाईकडून तिने टिकल्या विकत घेतल्या तिला दीप्तीने खूप शोधले परंतु ती कधी दिसलीच नाही. परंतु इतक्या दिवसांनी आज मात्र अचानक तिच्या पुढ्यात उभी राहिली. 


ताई टिकल्या पाहिजेत का? 


तिने मिश्कीलपणे विचारले. 


दे बाई ! तीन पाकीट, तिने सांगितले. 

तिने आपल्या ट्रे मधून तीन पाकिटे काढली आणि तिला दिली. 

पण जाता जाता दिप्तिला उद्देशून एक वाक्य म्हणाली


 बाई! आपल्या नशिबातल दान दुसऱ्याला लाभत नाही. तुम्ही तुमची टिकली दुसऱ्याला देऊन चूक केली. असे म्हणून ती झटकन उतरून गेली .



त्यानंतर आजतागायत गेली दहा वर्ष , ती त्या बाईला शोधत आहे परंतु ती कधीच दिसली नाही. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy