नासा येवतीकर

Inspirational Others Children

3  

नासा येवतीकर

Inspirational Others Children

इंजेक्शन

इंजेक्शन

3 mins
285


टिण .... टिण...... टिण .... दहाची घंटा वाजली. तशी सारी मुले शाळेच्या पटांगणात जमा झाली. समीर, राहुल आणि शिवाजी हे वरच्या वर्गातील विद्यार्थी परिपाठासाठी पुढे उभे राहिले.


सावधान .... विश्राम ..... एकसाथ राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरु कर... म्हटल्याबरोबर सर्व मुलांनी एका सुरात जन गण मन म्हणण्यास सुरुवात केली. शाळा पहिली ते चौथीपर्यंतची. शाळेत जेमतेम 36 विद्यार्थी होते आणि दोन शिक्षक पवार सर आणि जाधव सर त्याठिकाणी मुलांना शिक्षणाचे धडे देत होते. खरा तो एकचि धर्म या साने गुरुजींच्या प्रार्थनेने सारा आसमंत प्रसन्न झाला होता.


परिपाठ संपला सारी मुले आपापल्या वर्गात गेली. दोन वर्ग खोल्यात दोन शिक्षक आपापल्या विद्यार्थ्यांना घेऊन शिकवीत होते. सुमारे अकरा वाजले असतील तेवढ्यात शाळेच्या पटांगणात प्राथमिक आरोग्य केंद्राची टाटा सुमो गाडी येऊन थांबली. शाळेचे मुख्याध्यापक या नात्याने पवार सरांनी दवाखान्यातील डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले.


डॉक्टर पवार सरांना म्हणाले, "आज मुलांची वैद्यकीय तपासणी आणि लसीकरण करायचे आहे. तेव्हा वर्गनिहाय विद्यार्थ्यांची नावे लिहा, त्यांची वजन व उंची त्यात नोंद करा आणि आमच्या टीमकडे पाठवा.” हे ऐकून पवार सर चार कागद घेऊन जाधव सरांकडे गेले आणि डॉक्टरांनी सांगितलेली सूचना सांगितली. एरव्ही शिक्षकांचे बोलणे न ऐकणारे विद्यार्थी कान लावून ऐकत होते. राहुलला समजले होते की, आज आपणाला इंजेक्शन देण्यात येणार आहे. ही बातमी त्याने शेजारच्या समीरला सांगितली, आणि बघता बघता ही बातमी वर्गात पसरली.


चौथ्या वर्गात बजरंग नावाचा एक विद्यार्थी होता, ज्याला इंजेक्शनची खूप भीती वाटत होती. त्याला जसे ही दवाखान्याची गाडी दिसली आणि इंजेक्शन देणार असल्याचे बातमी कळाली तसा तो अस्वस्थ झाला. कावराबावरा होऊन इकडे तिकडे पाहू लागला. काहीतरी बहाणा करून वर्गाबाहेर जाण्याची तो शक्कल लढवू लागला.


जाधव सर विद्यार्थ्यांची नावे लिहिण्यात गुंग होते. बजरंग हळूच उभा राहिला आणि म्हणाला, “सर, लघवीला जाऊ का?” यावर लिहिण्यात गुंग असलेले जाधव सर म्हणाले, “आताच तर शाळा भरली, एवढया लवकर कशी येते रे तुला लघवी, बस खाली.”

”तसं नाही सर, जोरात आली सर, जाऊ द्या की...”

”बरं ठीक आहे, जा, लवकर ये, पळून जाऊ नको, इंजेक्शन घ्यायचे आहे.” समोर बसलेला राहुल बजरंगकडे पाहत म्हणतो, “सर, बजरंगला लघवी बिघवी काही आलं नाही, इंजेक्शन देणार म्हणून तो बाहेर जात आहे, बाहेर गेला की तो येणार नाही.”

”का रे बजरंग, राहुल म्हणतोय ते खरं आहे का ?”

”नाही सर, लघवी केलो की लगेच येतो सर.”

“ठीक आहे जा मग ...”


बजरंग राहुलकडे रागाने बघत बाहेर गेल्यावर तुला दाखवतो असं पुटपुटत तो बाहेर पडला. जाधव सर लिहिण्यात गुंग होते. 

बराच वेळ झाला तरी लघवीसाठी बाहेर गेलेला बजरंग अजून परत आला नाही. घाई गर्दीत सरांच्या लक्षात देखील आले नाही. पहिल्या वर्गाची वजन-उंची करून त्या वर्गाची यादी पवार सरांकडे गेली आणि त्या वर्गातील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून लसीकरण टिका म्हणून इंजेक्शन देण्यात आले. मुंगी चावल्यासारखा त्रास होतो असे समजावत पवार सर मुलांना धीर देत होते तर सिस्टर बाई विद्यार्थ्यांना नाव विचारत विचारत हळूच सुई टोचत होती. एक-एक करत सर्व विद्यार्थी संपले. यादीत फक्त बजरंग तेवढा अनुपस्थित होता.


पवार सरांनी बजरंगला पकडून आणण्यासाठी जाधव सरांना गावात धाडले. जाधव सरांनी दोन चार मुलांना घेऊन बजरंगच्या घरी गेले. तेथे तो नव्हताच, त्याला माहित होतं सर शोधायला इथे सरळ येतात. पण बजरंग कुठे लपू शकतो हे माधवला माहीत होतं त्यामुळे त्याने सरांना त्याच्या पाठीमागे यायला सांगितलं. त्याच्या घराच्या पाठीमागे एक झोपडी होती आणि त्या झोपडीत एक कणगी ठेवलेली होती. त्याच्या पाठीमागे बजरंग लपलेला होता. लंपडाव खेळताना तो नेहमी येथे लपून राहतो हे माधवला माहीत होतं. जाधव सरांनी त्याला धरलं आणि शाळेत घेऊन आले. डॉक्टर साहेबांच्या पुढे त्याला उभं केलं. डॉक्टर साहेबांनी त्याच्या मनातील भीती घालविण्यासाठी त्याच्याशी ते बोलत राहिले. सिस्टरने त्याचे नाव विचारत हळूच त्याला सुई टोचली, त्याला पत्तादेखील लागला नाही. त्याला त्याचे आश्चर्य वाटले. उगीच मी इंजेक्शनला भीत होतो असे मनातल्या मनात म्हणाला. इंजेक्शन देऊन डॉक्टरांची टीम बाहेर पडली. पवार सरांनी सर्व मुलांना दुपारून शाळेला सुट्टी असल्याचे जाहीर करताच सारी मुले इंजेक्शन दिल्याचे दुःख विसरून आनंदाने उड्या मारू लागली. त्यात बजरंगचा देखील समावेश होता. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational