इंग्लिश विंग्लिश चित्रपट
इंग्लिश विंग्लिश चित्रपट
गृहिणी म्हटले कि नेहमी तिला गृहीत धरले जाते. ती कुटुंबासाठी सर्व आपले करिअर आवडीनिवडी सोडून दिवसरात्र राबराब राबते. खरे बघितले तर तिला कधीही सुट्टी नसते. कुठे फिरायला कुटुंबासोबत गेली तरी सर्वात आधी सर्व कुटुंबीयांचा विचार करते स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवते. घरी ती सर्वात लवकर उठून मुलांना ,नवऱ्याला काय हवे नको ते बघून डबा बनवून देते, सर्वांच्या कपड्यांपासून, बुटांपर्यंत सर्वच गोष्टींची काळजी करते, पाहुण्यांचा आदर सत्कार करते. हे सर्व करतांना स्वतःच्या आरोग्याचीही हेळसांड करते.पण तरी नवरा, मुलांना नेहमी वाटत असते हि घरीच असते हिला काय काम असतात. घरी एकदम मजेत असते. घर सांभाळून फावल्या वेळात ती स्वतःच्या आवडीनिवडी जपण्यासाठी व स्वतःच्या स्वाभिमानासाठी नवरा चांगला कमावत असला तरी चार पैसे कमविण्याचा व घरातील बजेट सांभाळण्याचा प्रयत्न करते.
ह्या सर्व गोष्टींचे सादरीकरण गौरी शिंदे ह्या दिगदर्शिकेने "इंग्लिश विंग्लिश "ह्या चित्रपटात केले आहे. ह्यात श्रीदेवीने गृहिणीचा i भूमिका साकारून त्याला यथायोग्य न्याय दिला आहे. ह्या चित्रपटात श्रीदेवी हि शशीच्या भूमिकेत आहे. ती एक उत्तम गृहिणी आहे. नवरा चांगल्या पदावर असून चांगले पैसे कमावतो. तरी तिला स्वयंपाकाची आवड असल्याने निवांत वेळेत घर सांभाळून खाद्य पदार्थ जसे लाडू च्या ऑर्डर्स घेऊन विकते. त्यामुळे तिला स्वतःचे चार पैसे तर मिळतातच पण मानसिक समाधानही मिळते व स्वाभिमानही जपल्या जातो. हे करताना ती कुठलंही जबाबरीची हेळसांड होऊ देत नाही.पण ती घराच्या बाहेर न पडल्यामुळे व तिचे इंग्लिश कच्चे असते ह्यावरून तिची मुलगी व नवरा तिला नेहमी हिणवतात. ह्या चित्रपटात तो प्रसंग एकदम सुंदरपणे मांडला आहे जेव्हा ती मुलीच्या जाते व तिच्या इंग्लिशमुळे मुलीला स्वतःचा अपमान झाल्यासारखे वाटते व त्यावरून मुलगी तिला घालून पडून बोलते. ती मुलगी नेहमीच तिला हिणवते जी आई आपली एवढी काळजी घेते त्या आईचीच तिला लाज वाटते.
पुढे तिच्या बहिणीच्या मुलीचे लग्न अमेरिकेत असते त्यामुळे तिला एकटीला जाण्याचा प्रसंग येतो .व तिथे तिची बहीण व मुलगी ह्यांना तिचा खूपच अभिमान असतो. ती तिथे स्पोकन इंग्लिश क्लास जॉईन करते व जिद्दीने रोज तिथे जाते व मनापासून शिकण्याचा प्रयत्न करते.तिथे तिला एक मित्रही मिळतो व त्याच्यामुळे तिला आपल्यात काहीतरी चांगले आहे ह्याची जाणीव होते.भाचीच्या लग्नासाठी ती स्वतःच्या हातानी लाडू बनविते पण मुलांच्या खेळण्याच्या नादात वेळेवर ते खाली सांडतात व तिची पूर्ण मेहनत वाया जाते पण तरी ती त्यातूनही मार्ग काढते.
नंतर लग्नात ती तिच्या सर्व स्पोकन इंग्लिश क्लासच्या मित्र मैत्रिणींनाही बोलावते व तिथे इंग्लिशमध्ये स्पीच देऊन घरच्यांना अचंभित करते सर्व घरचे भारावून जातात व तिच्या मुलीला व नवऱ्याला त्यांच्या वागणुकीचा पच्छाताप होतो.
ह्या चित्रपटात असे दाखविले कि गृहिणी हि कुठल्याही बाबतीत कमी नसते. तिने मनावर घेतले तर ती काहीही करू शकते. कुठल्याही न्यूनगंडावर मात मिळवू शकते.
म्हणूनच इंग्लिश विंग्लिश चित्रपट मला खूपच भावला .ह्यात गृहिणींच्या आयुष्यातील यथायोग्य प्रदर्शन दाखविण्यात आले.
गृहिणी खरे तर घराची शान आहे तिच्याशिवाय घराला घरपण नाही. ती असल्यावर तिची किंमत कळत नाही पण ती नसली कि कुणाचेही पान हालत नाही. म्हणून गृहिणीचा सर्वांनी आदर करून तिला मानाचे स्थान द्यायला पाहिजे. तिला तिचेही आयुष्य जगण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे . तिलाही काळानुसार बदलण्याची संधी द्यायला पाहिजे.त्यासाठी हवे ते प्रोत्साहन द्यायला पाहिजे. तिने मनात आणले तर ती जगाला जिंकू शकते. इतकी ताकद तिच्यात आहे फक्त ती सिद्ध करण्याची तिला संधी मिळायला पाहिजे.गृहिणी घराचा पाय आहे. ती आनंदी असली तर पूर्ण घरच मजबूत होते.
म्हणून गृहिणींनीही स्वतःचे आरोग्य जपले पाहिजे. स्वतःला काळानुसार बदलायला पाहिजे. स्वतःचा स्वाभिमानही जपला पाहिजे.
