ईश्वरलीला
ईश्वरलीला


आकाश आणि राधाच लग्न झालं. दोघेही रंग रुपानं तसेच गुणानंही खूप चांगले. शेती बाडीत खूप कष्ट करायचे. दहा बारा वर्षे झाली पण मुलबाळ काही होईना. याच मात्र दोघांनाही दुःख व्हायच... दोघांनाही एकच दुःख ना मुल ना बाळ. आकाशला झोप लागत नसे. तो रोज दारु पिऊन राधाला मारायचा. रोज भांडण व्हायच. राधा कंटाळून गेली. रोज रडायची, पडायची. नशिबाला दोष द्यायची जगावं का मरावं ते ही तिला कळत नव्हते. या रोजच्या भांडण, मार, पिण्याला कंटाळून ती सरळ माहेरी निघून गेली. आकाश अजून लईच बिघडला. चार सहा महिने, वर्षे झाली. पण राधा नाही आली... आकाशनं दुसर लग्न केले. पण त्याचा सारा जीव मात्र राधा तच होता... आकाशन लग्न केले हे राधाला कळलं नी ती हादरूनच गेली. संसाराच वाटोळे झाले म्हणून खूप रडली, पडली नी थेट कोर्टात गेली. तिने आकाशवर कोर्टात दोन चार केसेस केल्या. नी दोघांची भेट कोर्टात होऊ लागली.
आता मात्र आकाशच पिण खूपच वाढल. काम ना धंदा फक्त दारू नी दारुच. आकाशचे खूप हाल झाले. दारूत त्यान शेतीही विकली. कोर्टात जाणे तेही बंद झाले... जाणार तरी कसा... त्याच्या दोन्ही किडनी गेल्या होत्या... किती दिवस जगणार ते ही सांगता येत नव्हते... आकाशचे सारे हाल ऐकून राधाचेही डोळे भरून आले. मोठ्याने ओरडून ती रडली... नशीबाला दोष देऊ लागली...
आकाशचे कधी काय होईल ते सांगता येत नव्हते. डॉक्टरनं सांगितले की आकाशचे आयुष्य संपले आहे... आता काही इलाज शक्य नाही... राधाला हे समजले... तिचे डोळे भरून आले... ती धावतच दवाखान्यात गेली आणि डॉक्टरला म्हणाली... आकाशला मरु देणार नाही... आकाश वाचलाच पाहिजे... त्याला वाचवण्यासाठी ती स्वतःची किडनी द्यायला तयार झाली... सर्व तपासणी झाली... नशीबाने साथ दिली. राधाने आपली किडनी देऊन आकाशचा जीव वाचवला... देवच पावला... आकाशचा पुनर्जन्मच झाला... राधाने आकाशला जीवदान दिले.
नशीबच पालटले सर्वांना आनंद झाला... आज त्याचा संसार सोन्याचा आहे... राधा आई झाली. आकाश बाप झाला... आणि खरा संसार फुलला... नशीबच पालटले... राधा आणि आकाशचा संसार बघून लोक मात्र वेडे होतात. म्हणतात संसार असावा तर असा अन् नवरा बायकोची जोडी असावी तर अशी...
ईश्वराचीच लीला झाली. नशीब पालटले, पुनर्जन्म झाला... राधेने किमया केली...