हृदयाची गोष्ट
हृदयाची गोष्ट


अवघा बत्तीस वर्षाचा मयूर ऑफिसमध्ये मीटिंग सुरू असताना अचानक धाडकन खाली कोसळला आणि त्याचे सर्वच सहकारी घाबरले. त्यांनी मयूरसाठी तातडीने ऍम्ब्युलन्स बोलावली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
ऑफिसमधून मयुरच्या वडिलांना फोन केला, तेव्हा ते घरीच होते. मयुरच्या अचानक चक्कर येण्याबद्दलची बातमी ऐकून त्यांचे हातपाय लटपटायलाच लागले. प्रसंगावधान राखून त्यांनी कसंबसं हॉस्पिटलचं नाव विचारलं, पत्ता लिहून घेतला. त्यांनी ही बातमी आपल्या बायकोला - मयुरच्या आईला- सांगितली आणि असं अनपेक्षित ऐकून तीही गळाली. भांबावलेल्या अवस्थेत दोघेही घराबाहेर पडले. वयाची साठी ओलांडलेल्या दोघांना लिफ्टची वाट पाहण्याएवढाही धीर नव्हता. सैरभैर झालेले दोघं तिस-या मजल्यावरून तळमजल्यापर्यंत पाय-यांवरून धावत आले. खाली आल्यावर सोसायटीतल्या सामंतांनी त्यांची धावपळ आणि घाबरलेला चेहरा पाहून त्याबददल विचारलं तेव्हा, "मयूरला के. एस. पी. हॉस्पिटलमध्ये नेलयं. त्याला ऑफिसमध्ये अचानक चक्कर आली", एवढंच घाईत सांगितलं आणि धावत जाऊन त्यांनी रिक्षा पकडली.
"अजून पूर्ण शुध्दीवर नाही आलेला. आत्ता मी फार काही सांगू शकत नाही." डॉक्टरांचे हे शब्द ऐकून मयूरच्या आईच्या डोळयांतून अश्रुधारा सुरू झाल्या.
" याच्या आधी असं काही झालं होतं ? काही मेडिकल हिस्ट्री ?" डॉक्टर गडबडीत विचारत होते.
"नाही, नाही हो डॉक्टर. हे असं पहिल्यांदाच झालंय." घाबरल्यामुळे वडलांच्या चेहऱ्याावर घाम आला होता. ते पुढे डॉक्टरांना काही विचारणार इतक्यात डॉक्टर घाईत मयूरला ठेवलेल्या अतिदक्षता विभागात निघूनही गेले. पुरते धास्तावलेले मयूरचे आई-वडिल परमेश्वराकडे मयूरसाठी साद घालू लागले. तेवढयात हॉस्पिटलमध्ये त्यांच्याजवळ मयूरचे काका आणि मयूरची धाकटी बहीण रीनाही आली. आई-वडिल हॉस्पिटलकडे येताना रीना कॉलेजला गेली होती. ती घरी आल्यावर सोसायटीतल्या सामंतांनी तिला सगळं सांगितलं. मघाशी धावपळीत रीनाला फोन करायचंच राहिलं होतं, हे आत्ता आई-वडलांच्या लक्षात आलं.
"मम्मी, कसा आहे गं दादा आता ?" रीना भांबावली होती. आई काही बोलणार तेवढयात डॉक्टर घाईत त्यांच्याजवळ आले. आता डॉक्टर काय बोलणार म्हणून आई-वडिल जागेवर एकदमच उभे राहिले.
" हार्ट अटॅक होता." वडिलांच्या पाठीवर हात ठेवून डॉक्टर सौम्य शब्दांत म्हणाले.
' हार्ट अटॅक ' हे ऐकून जणू आई-वडलांच्या काळजाचा ठोकाच चुकला. आई एकदम खालीच बसली. रीनाला रडू फुटलं.
"आता... आता कसा आहे तो ?" वडलांच्या तोंडातून कसेबसे शब्द बाहेर पडले.
"आत्ता एवढचं सांगू शकतो, वी आर ट्राईंग अवर बेस्ट... काही औषधं लगेच आणायची आहेत. " डॉक्टरांनी औषधांची चिठ्ठी मयूरच्या काकांच्या हातात दिली.
"हो, डॉक्टर. मी घेऊन येतो लगेच. रीना, तू मम्मी पप्पांजवळ थांब." मयुरचे काका औषध आणायला गेले.
'अवघा बत्तीस वर्षाचा आपला मयूर......... आणि त्याला हार्ट अटॅक ? काय झालं असेल ? अचानक त्याचं बी. पी. वाढलं असेल का ? कामाचा स्ट्रेस खूप होता का ? गेले काही दिवस तसा तो ऑफिसमध्ये वर्किंग अवर्सनंतरही थांबत होता. त्याचाच सगळा ताण असेल ? साधी चक्कर असेल ? का यापैकी काहीच नसून, हे सगळं काम इच्छेविरूद्ध, मनाविरूद्ध असल्यामुळे त्याचा ताण असेल?' सर्वच शक्यतांच्या विचारांचं वादळ मयूरच्या आई-वडिलांच्या डोक्यात सुरु झालं.
मयूर गेली जवळपास दहा वर्षे आयटी क्षेत्रात काम करत होता, तेही मोठ्या कंपनीत , मोठ्या पगारावर, पण त्याचं मन मात्र यात रमत नव्हतं. तो इथे मन मारून काम करत होता. तसं तो आयुष्यात आत्तापर्यंत अनेक वेळ मन मारतच आला होता. त्याला संगीत क्षेत्राची विशेष आवड होती. शाळा-कॉलेजमध्ये असताना त्यानं अनेक सांगितिक स्पर्धांमध्ये बक्षिसंही मिळवली होती. बारावीनंतर त्याला या कलेशी निगडितच पदवीसाठी प्रवेश घ्यायचा होता, पण अकरावी बारावी सायन्स सार्इड आणि नंतर जर क्षेत्र बदलंल तर सगळे हसतील, शिवाय भविष्याच्या दॄष्टीनंही हे किती चुकीचं आहे, असे पटवून देऊन त्याच्या वडलांनी त्याला अभियांत्रिकीला प्रवेश घ्यायला भाग पाडलं. ‘कला वगैरे छंद म्हणून ठीक आहे, पण जगण्यासाठी पैसाच महत्वाचा असतो. ’ आजूबाजूच्या व्यवहारी जगानंसुध्दा त्याला हाच कानमंत्र दिला. भांबावलेल्या अवस्थेत आणि अजाणत्या वयात मयूरनं तेव्हा लोकांचं म्हणणं ऐकलं, आपल्या आतल्या आवाजाला आतच कोंडलं आणि अभियांत्रिकीला प्रवेश घेतला.
अभियांत्रिकीचे सुरूवातीचे दिवस तसे बरे होते. मयूर रिकाम्या वेळेत आपली संगीताची आवडही जोपासत होता. त्यानं एक चांगली गिटारही खरेदी केली. नंतर एकदा पहिल्या सेमिस्टरचं सबमिशन सुरू झालं, तशी सर्व धावपळ सुरू झाली. धावपळीत मयूरची गिटारही माळ्यावर धूळ खात पडली. नंतर तोंडी परिक्षा, प्रात्यक्षिकं या सगळ्यात तो पूर्ण व्यग्र झाला. असंच प्रत्येक सेमिस्टरला होत राहिलं. त्याच्या ह्रदयाच्या टिकटिकणाऱ्या ठोक्यांना त्याच्या छंदाची पुरेपूर उणीव भासत राहिली. मयूरलाही कॉलेजमधल्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे दिवस आणि प्रत्येक सेमिस्टरनंतर येणारा सुटटयांचा काळ सोडला, तर आपल्या ह्रदयाच्या हाकेकडे ‘ओ दयायला कधी फारसा वेळच मिळाला नाही. मग त्याचं ह्रदय आतून नाराज होत राहिलं. एका सेमिस्टरच्या एका अवघड गेलेल्या पेपरच्या रात्री तर कहरच झाला. आपण या विषयात पास होऊ का नाही, या भीतीनं रात्री त्याचं ह्रदय धडधडू लागल. दुसऱ्या दिवशीच्या पेपरची तयारी करायची असल्यामुळे ही भीती आणि हा विचार थांबवणं गरजेचं आहे, म्हणून आपल्या ह्रदयाची धडधड थांबवता थांबवता त्याची तारांबळच उडाली. असंच त्याचं ह्रदय आतल्या आत नको त्या हालचाली करत राहिलं. त्याच्यावर नाराज होत राहिलं आणि त्यालाही याकडे लक्ष दयायला जणू वेळच नसायचा.
‘एकदा का इंजिनीयरिंगची डिग्री मिळाली, की आपण संगीत क्षेत्रात शिक्षण घेऊन त्यातच करीअर करायचं’असा विचार त्याच्या मनात आलाही, त्याचवेळी अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात असताना तो सुरू असणाऱ्या एकाही विषयात नापास नसल्यामुळे ‘कॉलेज कॅम्पस’ साठी येणाऱ्या कंपन्यांच्या परीक्षेस आणि मुलाखतीस जाण्यासाठी त्याला त्याचे आर्इ-वडिल, मित्र-मैत्रिणींना प्रेरणा दिली आणि नशिबानं त्याची एका कंपनीत निवडही झाली.
‘सध्या स्पर्धा किती आहे माहितंय ना? मार्केट कंडीशनही डाऊन आहे. ’ ‘अरे, कित्येकजण नोकरीसाठी वणवण फिरतात. तुला ती अशी सहजासहजी मिळतेय, तर सोडू नकोस. पहिली दोन वर्षे तरी अनुभव घे. मग ठरव नंतर. ’ आजूबाजूच्या आवाजांनीच त्याला सूचना दिल्या.
मयूर आय. टी. कंपनीत नोकरीला लागला. तिथे नव्याची नवलार्इ त्याला चांगली वाटली. नंतर हळूहळू जबाबदारी वाढत गेली, तसा कामाचा व्यापही वाढत गेला. रस नसलेल्या गोष्टीत तो यांत्रिकीसारखा काम करू लागला. पुन्हा त्याला कशाची तरी उणीव भासू लागली. आपण हवं ते करत नाही, याची खंत वाटू लागली. कामाच्या रगाडयाबरोबर त्याची जीवनशैली बदलत गेली. त्याच्या ‘फ्रायडे नार्इट पार्टीज’ सुरू झाल्या. ‘स्ट्रेस बस्र्ट‘ म्हणून ड्रिंक घ्यायची सवय लागली. आरोग्यदायी खाणं, जीवनशैली हरवून गेली. खाण्यात जंकफूड सारखच येत राहिलं. कामाचा ताण असताना तो रात्री झोपेत, स्वप्नातही काम करत राहायचा आणि ते काम अपूर्णच राहायचं. नोकरीला लागून तीन वर्षे झाल्यानंतर मयूरनं पुन्हा घरच्यांना आपलं या क्षेत्रात मन लागत नसल्याबददल सांगितलं. त्यानं संगीताचा वीकेन्ड क्लास लावून त्यातलं बरंच ज्ञान आत्मसात केल होतं पण आता त्याला यासाठी जास्तच वेळ दयायचा होता. नोकरी सोडून त्याला संगीत क्षेत्रासाठी पूर्ण वेळ देऊन त्यात आपण किती यशस्वी होऊ शकतो, हे पाहायचं होतं. शिवाय नंतर शिक्षक म्हणून काम करण्यातही त्याला रस होता. त्या क्षेत्रात नव्यानं झगडण्याचीही त्याची तयारी होती.
“अरे मयूर, एवढया चांगल्या जॉबमध्ये सेटल्ड असताना काय विचार करतोयस तू हा? तुझ्या पप्पांची रिटायरमेन्ट आता जवळ आली आहे. रीना अजून शिकतेय. घरात कुणीतरी कमावतं हवं की नको?” मयूरची
आर्इ त्याला जबाबदारीची जाणीव करून दयायची. त्याचे वडिलही त्यालाच फेरप्रश्न करायचे, “शिवाय आता तुझं लग्नाचं वय जवळ आलंय. नोकरी सोडलीस, तर कोण देर्इल मुलगी?”
“ कितीदा सांगू तुम्हाला, मला इतक्यात लग्न नाही करायचं. तुम्हाला माझी जी सेटलमेन्ट वाटतेय, ती माझ्यासाठी सेटलमेन्ट नाहीये. आय नीड सम मोर टार्इम. “ मयूर समजवायचा.
इथेही शेवटी मयूरला आपल्या आर्इ-वडलांचं ऐकावं लागलं आणि नंतर एक-दोन वर्षात त्यांनीच पसंत केलेल्या मुलीशी मयूरचं लग्न लावून दिलं. मात्र मयूरचं आणि त्याच्या पत्नीचं टयूनिंग काही जमलं नाही. मयूरचे विचार तिला पटत नव्हते. मयूर अगदी साधा, तिच्या राहणीमानाबददल मोठया अपेक्षा होत्या. मयूरच्या सांगीतिक महत्त्वाकांक्षेला त्याच्या पत्नीनं कधीच पाठिंबा दिला नाही. अखेर लग्नाला वर्षे होतं ना होतं तोच त्यांचा घटस्फोट झाला. मयूरला आणि त्याच्या कुटुंबालाही या संघर्षातून सावरायला काही महिने लागले.
पुन्हा मयूरचं ‘ह्रदय त्याला आवडणारी गोष्ट करण्याबददल हाक देत राहिलं, पण मयूरच्याच मनात आता कुठेतरी भीती होती, त्याचा आत्मविश्वास ढासळला होता. त्याच्या आर्इ-वडलांसाठी मात्र त्याची उच्च पगाराची नोकरी हा कुठेतरी ‘स्टेटस सिम्बॉल’ होताच.
वर्षोनुवर्षे मयूरचं आपल्या ह्रदयाचं ऐकायचं राहूनच गेलं होतं आणि आता त्याचं हृदयच हार्ट अटॅकचं स्वरूप घेऊन त्याच्यावर नाराज झालं होतं, तरूण वयात पावलोपावली त्याच्या आत झालेल्या उलथापालथी, जाणिवा या सगळ्याकडे त्यालाच कधी डोकवायला उसंत मिळाली नाही.
डॉक्टर मयूरच्या खोलीतून बाहेर येताना दिसले,तसे पुन्हा मयूरच्या आर्इ-वडलांचे श्वास रोखले गेले. डॉक्टरांचा चेहरा थकलेला दिसत होता. मयूरचे वडील डॉक्टरांना काही विचारणार, इतक्यात डॉक्टरांनी त्यांच्या खांदयावर हात ठेवला,
“ही इज फार्इन नाऊ.पूर्ण शुध्दीवर आलाय. ” हे शब्द ऐकताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
“म्हणजे सगळं ठीक आहे ना आता डॉक्टर? आम्ही त्याला भेटू शकतो ना?” मयूरचे वडील आतुर झाले होते.
“हो, आता तर सगळं ठीक आहे, पण हार्टची अँजिओप्लास्टी करावी लागेल. ”
“अँजिओप्लास्टी?” मयूरचे वडील.
“हो. वय तर तसं खूप कमी आहे त्याचं. कसल्या स्ट्रेसमध्ये होता का? आहार वगैरे वेळेत असायचा?” डॉक्टर.
“अं| तसा काही खास स्ट्रेस नव्हता. फक्त जॉबमुळे धावपळ जास्त होत होती आणि खाण्याकडे व्हायचं दुर्लक्ष, पण कधीतरीच. मयूरची आर्इ म्हणाली.
“ अच्छा, एनीवेज, जा तुम्ही. पेशन्टला भेटून माझ्या केबिनमध्ये या. आपण डिटेलमध्ये बोलू. मात्र एक महत्त्वाचं सांगतो. यापुढे पेशन्टवर स्ट्रेस येर्इल अशी कुठलीही मतं त्याच्यावर लादता कामा नयेत आणि ऑपरेशन जितक्या लवकर करता येर्इल तेवढं चांगलं. आपण बोलूच यावर. ” डॉक्टर आपल्या केबिनमधे निघून गेले.
‘पेशन्टला स्ट्रेस येर्इल असं काहीही त्याच्यावर लादता कामा नये. ’ डॉक्टरांचं हे वाक्य दोघांच्याही मनात खोलवर कोरलं गेलं आणि त्यांच्या मनात विचार स्पर्शून गेला ¹ मयूरच्या बाबतीत नकळत हेच होतं गेलं का आत्तापर्यंत?' ते दोघं, रीना आणि मयूरचे काका मयूरला भेटायला गेले.
“मयूर, आता बरं वाटतय ना? असं कसं झालं रे हे एकदम?” संमिश्र भावनांनी मयूरची आर्इ विचारत होती.
“ठीक वाटतय आता. अचानक छातीत दुखायला लागल आणि एकदम जोरात कळ येऊन खाली कसा कोसळलो कळलंच नाही. शुध्द आली तेव्हा हॉस्पितलमध्ये होतो. ”
मयूरचं हे बोलणं ऐकून त्याला आणि स्वत:लाही दिलासा देण्यासाठी त्याचे वडील म्हणाले,
“डॉक्टरांनी सांगितलंय आता काळजीचं काही कारण नाही. ”
“अरे एवढा स्ट्रॉंग आणि यंग तू. असं कसं झालं एकदम? काही स्टे्रस होता का?” आपल्या काकांच्या या प्रश्नावर मयूर स्वत:तच हरवून बोलू लागला, "कशामुळे झालं, याचं उत्तर अजूनही सापडल नाहीये. कदाचित ते शोधायला लागलो, तर खूप मोठी यादी होर्इल.”
मयूरच्या या बोलण्यावर सगळेच शांत झाले. त्याच्या आर्इ वडलांच्या मनात नकळत अपराधीपणाची भावना येऊन गेली.
“तू काही टेन्शन घेऊ नको दादा. ऑपरेशन केल्यानंतर परत पूर्वीसारखाच स्ट्रॉंग होशील तू”. रीनाच्या बेलण्यानं वातावरणातील शांतता दूर झाली.
मयूरचं ऑपरेशन व्यवस्थित झालं आणि काही दिवसांत पुन्हा तो आपल्या नोकरीवर स्वच्छेने रूजू झाला. त्याचे आर्इ वडील त्याला न रूचणारे सल्ले देत नव्हते. एके दिवशी मयूर ऑफिसमधून आनंदात घरी आला आणि आपल्या आर्इ वडलांना म्हणाला, “मम्मी पप्पा आय अँम व्हेरी हॅपी टुडे. एक गुड न्युज सांगायचीये तुम्हांला. ”
त्याचे आर्इ वडील काय गुड न्यूज आहे या अर्थानं त्याच्याकडे बघू लागले पण त्याची न्यूज ऐकून दोघंही क्षणभर स्तब्ध होऊन एकमेकांकडे पाहू लागले. कारण "मी आजच जॉब रिझार्इन केलाय कायमसाठी. पुन्हा मला या क्षेत्रात जायचं नाही. फायनली आय टुक ऍक्शन टुडे. ”
अशी त्याची ‘गुड न्युज’ होती.
“तुम्हांला माहीतच आहे मम्मी पप्पा. मला आधीपासूनच यात रस नव्हता पण तरी करत आलो. स्वत:वर जबाबदारी होती म्हणून. कधी तुमच्या आग्रहाखातर. डोक्यात आर्थिक गणितही सतत सुरूच असायचं पण हार्ट ॲटॅक आला आणि त्यानं खूप काही शिकवलं. मरणाच्या दारापर्यत नेऊन जगण्याचा अर्थ शिकवला त्यानं. का म्हणून नावडत्या गोष्टीत,नावडत्या ठिकाणी आयुष्याची इतकी वर्ष खर्च करायची? फक्त पैशांसाठी? जगाचं मला नाही माहीत. हा निर्णय माझ्यापुरता माझ्या आयुष्याचा आहे. मला ज्यात आवड आहे,मला तेच करायचं. पैसा कमी मिळाला तरीही. सगळा व्यवहारीपणा एका बाजूला आणि माझं जगणं दुसऱ्या बाजूला. जो मॄत्यूच्या दारातून पुन्हा जीवनाच्या प्रवासाकडे आला आहे, त्याच्यासाठी व्यवहारीज्ञान कवडीमोल आहे. धिस इज माय लार्इफ ,मला आता हवं तसं जयायचंय आणि आपण का विसरावं…… लार्इफ इज टेम्पररी……मी आत्तापर्यत माझ्या ह्दयाचं कधीच ऐकलं नाही. ह्दयातलं कधीच कुणाशी जास्त शेअर केलं नाही, म्हणूनच माझं ह्दय मला सोडून चाललं होत. ”मयूरचं अंतर्मन उलगडत होतं.
“ खरं सांगू मयू बेटा, तू हा निर्णय तुझ्या हार्ट अटॅक आधी सांगितला असतास, तर आम्ही कदाचित आकांडतांडव केला असता. पण आता आम्हाला हे थोडंसं अनपेक्षित असलं, तरी धक्का वगैरे काही बसला नाही. तुझ्या हार्ट अटॅकने आम्हालाही खूप काही शिकवलंय...”
मयूरच्या वडलांच्या डोळ्यांतले अश्रू बघून त्याच्या आर्इलाही रडू आलं.
“तुझ्यापेक्षा आम्हाला काहीच महत्त्वाचं नाही बेटा. तुला संगीतक्षेत्रातच करीअर करायचंय ना? तुला शाळेतल्या मुलांना शिकवायलाही आवडतं ना? कर. तुला हवं ते कर. तुला मिळणाऱ्या पैशांपेक्षा तुझा आनंदच आमच्यासाठी लाखमोलाचा आहे. तू योग्यच पावलं उचलशील याचाही विश्वास आहे आम्हाला. आम्ही तुझ्यावर आमची मतं लादत होतो का, याचा विचारही आम्ही तुला अटॅक येर्इपर्यंत केला नव्हता. तो विचार मनात आला, तेव्हा पश्चातापाची सल खूप जीवघेणी होती. कर, हवं ते कर तू.”
खूप वर्षांनंतर आज तिघांनाही पालक पाल्याच्या नात्यातलं नवेपण जाणवत होतं. तिघांच्याही डोळ्यांतून आनंदाचं पाणी तरळत होतं.