हिशोब
हिशोब


हे माझं, ते माझं करत करत माझं नेमकं काय आहे? कोण आहे? किती आहे? ह्या प्रश्नांची उत्तरे मिळता मिळता आयुष्यच माझं उरणार नाही कदाचित. आता या क्षणी माझ्यापुरतं माझं काय याचा हिशोब करावा म्हटलं तर आता प्रवासात, या धावत्या गाडीत बसून काय हिशोब लावावा या विवंचनेत.. पण तरीही बाहेर दिसणारं हे धावतं जग माझं म्हणू वाटलं. ज्या खिडकीच्या चौकटीतून बाहेर पाहतेय त्यातून दिसणाऱ्या बऱ्या वाईट गोष्टी माझ्या.
बऱ्याच दिवसांनी अंगावर झेललेली सोनपिवळी, कोवळी, उबदार, सुखावणारी उन्हे माझी.
गाढ झोपेतून जागं होताना आई जवळ असल्याच्या जाणिवेने अर्धवट झोपेत छान निरागस हसणाऱ्या बाळासारखी कोवळ्या उन्हात हसत कूस बदलणारी सारी हिरवळ माझी.
आपला आजच्या पोटाचा प्रश्न घेऊनही उंचच उंच झेपावणारी पाखरे माझी.
या चौकटीतूनही तितक्याच वेगाने उधळणारा मुजोर वारा माझा.
या चौकटीतले नजरेला सुखावणारे, जाणवणारे सारे नजारे माझे, ही चौकट माझी..!
तसेच माझ्या मनाची 1चौकट माझी फक्त माझी..! त्या चौकटीत मी जपलेले सारे सुख-दुःख माझे.
साऱ्या जीत-हार माझ्या.
स्वतःचच स्वत:पाशीच केलेलं कौतुक माझं.
स्वतःशीच चाललेल्या शीतयुद्धाचे यश-अपयश माझचं.
मी कमावलेले नाजूक हळवे अन बोचरेही क्षण माझेच.
या साऱ्या जाणीवा पेलूनही जराही न थकता पुन्हा पुन्हा नवीन अनुभव देणारं माझं मनही माझं..
अन या मानला प्रत्येक परिस्थितीत उभारी देणारी मी सुध्दा माझी..फक्त माझीच...!