कल्पनेचे मनोरे
कल्पनेचे मनोरे


आपलं अर्ध अधिक आयुष्य आपण कल्पनेचे मनोरे रचण्यातचं घालवत असू असं वाटतं मला तर. असंच कल्पनेच्या जगात फिरतांना विचार आला मनात की, मला काय व्हायला आवडेल बरं..? क्षणात वाटून गेलं की, मला पेन व्हायला आवडेल. हो, पेन!...लेखणी..! तुझ्या खिशाला कायम असणारं छानसं पेन व्हायचंय मला. कायम तुझ्या हृदयाशी रहायचंय. तुझं मन शांत असतांना एकाच लयीत होणारी हृदयाची धड-धड, अप्रिय वेळी थोडी मंदावलेली धड-धड, अगदीच आनंदाच्या क्षणी धाड-धाड करून उडणारी धड-धड, एखाद्या अनपेक्षित वेळी चुकलेला ठोका सांभाळत धडपडणारी धड-धड... हे सारं अनुभवायचंय मला तुझ्या हृदयाशी घट्ट बिलगून.
व्हाईट फॉर्मल शर्ट वर ब्लू जीन्सच हवी असा आग्रह असणारा, एखादीच चुकार रंगीत रेघ असलेला पूर्ण शुभ्र परीटघडीचा हातरूमाल कायम खिशात बाळगणारा, ड्रेस कुठल्याही रंगाचा असू दे पण बेल्ट, वॉलेट अन शू एकाच रंगाचे (शक्यतो ब्लॅकच) वापरणारा असे सभ्य पुरूषाचे सारे वैशिष्ट्य एकवटलेला तू... तुझं अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे ज्याला पेनशिवाय फार करमत नाही तो. त्या पेनचं महत्व तू कायम जाणत असतोस. शर्ट, टि-शर्ट खरेदी करतांना त्यावर पेन लावायला खिसा आहे की नाही हे न चुकता तपासणारा. अगदी सुट्टीत फिरायला म्हणून गेला अन कितीही इनफॉर्मल कपडे घातले तरी नाखुशीने पेन दूर ठेवणारा, टि-शर्टला खिसा नाही म्हणून निदान जीन्सच्या खिशात तरी पेनाला सामावू पाहणारा तू जेव्हा पेन जवळच बाळगायला मिळावा म्हणून धडपड करीत असतोस ना ते भारी वाटतं. तशी तुझी माझ्यासाठी होणारी धडपड अनुभवायचीय मला. म्हणून मला पेन व्हायचंय, तुझ्या खिशाला लावलेलं, कायम तुझ्या हृदयाजवळ असणारं..!