हिम्मत
हिम्मत


तनुजा विमनस्क परिस्थितीत लॅबोरेटरीमध्ये आली होती, तिच्या हातांची बोटे एकमेकांशी चुळबूळत,झगडत होती ,आणि बहुधा अंतर्गत,मनातल्या मनात स्वतःशीच युध्द करत होती ती आणी तिच्या ब्लड टेस्ट च्या रिपोर्ट ची अतिशय उत्कंठतेने वाट बघत होती.ती इतकी असहाय्य वाटतं होती की तिच्या शारीरिक हालचाली वरून कोणीही अंदाजा लावू शकेल की ती कोणत्या भयावह अवस्थेतून जात असावी !
तनुजा शेट्टी ??????? पॅथाॅलाॅजिस्टने आवाज दिल्यानंतरच ती भानावर आली. हो मी ! तिने रिपोर्ट घाईघाईनेच हातात घेतला आणि असं धस्सं झालं तिच्या हृयात की ते गळ्यापर्यंत आलं तिच्या ? तिचं तिलाच नाही कळलं ! धडधडत्या काळजानेच तिने मनाला सावरत आवंढा गिळला आणि थरथरतच लिफाफ्यात असलेला रिपोर्ट बाहेर काढला.मनाचा हिय्या करून तिने रिपोर्ट मध्ये सर्वात खालची महत्त्वाची ओळ वाचायला सुरुवात केली...काय ? पॉझिटीव्ह ? नाही....नाही.....नाही ? असं कसं होऊ शकतं?मी एवढी काळजी घेतली तरीही ? परत ? तिचे हात थरथरतच राहिले.......ती कशीबशी स्वतःला सावरत तो रिपोर्ट पर्समध्ये कोंबत रिक्षा मिळते का ? ते पहायला बाहेर आली...रिक्षा !.....रिक्षा !....... एमजी रोड ? रिक्षा वाल्याने मिटर डाऊन करताच तिने तिचं जड झालेलं मन तिच्या शरीरासकट रिक्षात झोकून दिलं.
तिचे डोळे पाण्याने तुडुंब भरले होते........ पण तिने ते डोळ्यांतच जिरवलं आणि आटवून टाकलं ते! ओसाड झाल्यासारखं वाटतं होतं तिला......का? का? हे दुष्ट चक्र लागलंय माझ्या मागे? सगळं व्यवस्थित रित्या काळजी घेऊन ही? जाऊ दे! सोडं! ती मनाला म्हणाली! ही तुझी पहिली वेळ थोडीच आहे? तिसरी वेळ ही! परत क्षयरोग (टी.बी)होण्याची. तनुजा तुला तर पाठचं झालं आहे की काय करायचे काय नाही ते!परत व्यवस्थित काळजी घे स्वतःची! स्वतःसाठी,मुलांसाठी,घरासाठी तुला बर व्हावंच लागेल. ह्या आधीही तू ह्या सगळ्यांतून यशस्वीरित्या बाहेर पडलीच होती ना?
ते काही नाही ? तू लवकरच बरी होशील.हिम्मत ठेव तनुजा ! बर होतं होतं एक वर्ष असा पटकन निघून जाईल. आणि मागच्या वेळी डॉक्टरांनी तिला सगळी माहिती दिलीच होती की तुला दोन वेेळा क्षयरोग ( टी.बी )झालाय ,तर तिसऱ्या वेळी होण्याची शक्यता आहे..........तुला जास्त काळजी घ्यावी लागेल,तुझी रोग प्रतिकारक शक्ती जर कमी झाली तर तुला टी.बी होण्याची दाट शक्यता आहे . हा क्षयरोगाचा जीवाणू आहे ..दबा धरुन वर्षानुवर्षे शरीरात सुप्तपणे पडुन राहु शकतो आणि योग्य संधी मिळताच हा आजार परत डोके वर काढतो.माझ्या बाबतीत हेच होतं आहे........! पण बास ! आता मी हा आजार होऊच देणार नाही.... मी स्वतःला खुश ठेवेन ..दुसरे काही का बोलेना ? माझ्या मनाची शक्ती सुद्धा माझ्याच हातात आहे ...मी अज्ञानी लोकांच्या टोमण्यांकडे लक्षच देणार नाही ... कारण हा आजार उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्यांना ही होतो आणि गरीबांनाही....आजाराने देखील हा भेदभाव केलाच नाहीये तर मग अशा लोकांना काहीही बोलायचा कोणता अधिकार आहे ?
चल तयार हो ! तुला बरं व्हायचं ना ? तू मरगळ झटकून टाक...तयार रहा.. बरं होण्याची प्रक्रिया सोपी नाही.ग्रंथींच्या आत सुई घालून ते आतलं पाणी इंजेक्शनने खेचुन काढून ते परिक्षणाला जाणारंच ..हे माहिती होतं तनुजाला, तिने आधी ही सगळी टोचणी,दुखणी काढलीच होती मग आता ती त्या गोष्टींना सामोरी जाण्यास परत एकदा सज्ज होत होती...औषधांचे दुष्परिणामही आहेतच, चिडचिड होणार, नैराश्य येणार, शरीरात कॅल्शियम कमी होणार, थकवा जाणवत राहणार,उदास..भक
ास जीवन वाटणार..चेहरा तेज हरवून बसणार आणि अजून बरेच काही........... ! तनुजा मनाची घट्ट बांधणी करत होती .ही सुज आलेल्या ग्रंथीची सुज औषधांनी गेली तर चांगलंच ..नाहीतर शस्त्रक्रिया करून काढावी लागेल ग्रंथी..मागच्या दोन वेेेळच्या शस्त्रक्रियांच्या खुणांवरून तिने हात फिरवला ........आणि तिला तिच्यातलं धैैर्य, संयम आणि हिम्मत ह्यांची परत एकदा जाणीव झाली..ती एक यशस्वी लढवय्या होती म्हणुनच ती एवढं सगळं होऊनही टिकून होती.या कठीण परिस्थितीतही मनाचं संतुलन टिकवण्यात यशस्वी होत होती.
सकारात्मक विचार करत होती तनुजा ! मागच्या वेळेसचे अनुभव होतेच तिच्याकडे त्यातुन ती बरंच काही शिकली होती.ह्या वेळेला तीने एकटीनेच ह्या सगळ्या गोष्टींना तोंड द्यायचं ठरवून टाकलं.मी कोणाला ही घरात माझ्या मुळे त्रास होऊ देणार नाही ! मी सामान्यपणे रोजचं आयुष्य जगेन...क्षयरोगच झाला आहे तो बरा होणारचं !मी बाऊ नाही करणार त्याचा...ठिक आहे...माझं शरीर ह्या रोगाला सारखं बळी पडत आहे.हे मी स्विकारून घेतलं ना की खूप सोपं जाईल मला हे सगळं.मी हे करू शकते...हो मी बरी होणारच.औषधंच खायची आहेत वर्षभर काही बाकी विचार नाही करायचा...हे चाॅकलेट समजेन मी आणि झालाच आहे तर उपचार हा एकमेव उपाय आहे त्यावर...मग आलीच तर येऊ देत अजुन एक शौर्याची निशाणी ! असं मनाशी बोलतं सकारात्मकतेनेे ती डॉक्टर काय सांगतात रिपोर्ट बघून ...काय खायचं ? काय नाही ? काय करावं ? काय नाही ? तेे सगळं निट सांभाळून..ती लवकरच बरी होणार असं मनाला बजावत होती आणि ह्या सकारात्मक विचारांंनी तिने अर्धी लढाई तर जिंकलीच होती!
पण तिने मनाशी ठरवलं ईतर क्षयरोगींची प्रेरणा व्हायचचं..त्यांना समजावून सांगायचं की मी करू शकते तुम्हीही करू शकता.ह्या आजारातून लवकर बाहेर येऊ शकता सकारात्मक विचारांनी ! फक्त औषधं,गोळ्या वेळेवर घ्यायच्या.. एकही गोळी चुकूनही चुकवायची नाही ! डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सगळं करायचं आणि तिला असंही वाटलं की आपण किती चांगल्या परिस्थितीत आहोत..उपचार घेऊ शकतो ! हवी ती कोणतीही तपासणी करू शकतो आणि आपल्याला कायमचा असा कोणताही आजार नाही हे विशेष .ज्यांना नाही जमत पैशांअभावी उपचार घेणे त्यांचं काय होत असेल?
आणि आपल्याला एक समजुतदार जीवनसाथी मिळाला आहे जो प्रत्येक वेळी ह्या आजारात मला साथ देत आहे त्यांच काय ?ज्यांच्या घरात अजूनही अज्ञानच आहे क्षयरोगा बद्दल? क्षयरोगीं प्रती घरच्यांचं आणि बाहेरच्या लोकांच वागणही चांगलच हवं नाहीतर....आधीच आजाराने वैतागलेला माणुस वैफल्य ग्रस्त आणि नैराश्यवादी होण्याचीच शक्यता जास्त ! तनुजाला आठवलं कितीतरी रोगींनी आत्महत्या केली होती.कित्येक क्षयरोगींनी औषधं अर्धीच घेऊन मधुनच बंद केली होती.बातमी पत्रात वाचलं होतं तिने आणि त्या वेळी तिला पहिल्यांदा हा आजार झाला होता.मग काय तिने संशोधनच सुरू केलं.तिला त्यातून हे कळालं की तिचा त्रास इतर पेशंट्स पेक्षा थोडा कमी आहे आणि तिने ती बातमी सकारात्मक पध्दतीने घेतली आणि स्वतःची आणी इतरांना तो आजार होऊ नये म्हणूनही काळजी घेतली होती !असा विचार मनी येताच क्षयरोगींसाठी काही करायचंच असा मनाशी चंग बांधला आणी ती निघाली पुढच्या प्रवासाला..एक अतुट..असिम असा दृढनिश्चय घेऊन की मी परत एकदा ह्या आजारावर मात करेनचं !आणि माझ्या सारख्या आजार झालेल्यांना मदत करेन धैर्य आणि हिम्मत देईन.. काहीच कठीण नाहीये ! मन घट्ट करायचं नी नेहमीच सकारात्मक रहायचं फक्त ! एक ध्येय उराशी बाळगून की मी बरी होतेय.....मी व्यवस्थित आहे !