गुणी गुणा
गुणी गुणा
'गुळाची वाडी' या छोट्याशा गावात गुणाजी आणि सगुणा हे जोडपे आपल्या टुमदार घरात आनंदाने राहत होते. घरापुढे लहानशीच पण रंगीबेरंगी हसऱ्या, गोंडस फुलांनी सजलेली बाग होती. बागेतल्या फुलांप्रमाणे दोघांचाही चेहरा सतत हसतमुख असायचा. वाडीतील सगळ्या लोकांशीच या जोडप्याचे संबंध आपुलकीचे होते.
या गावातच 'गुणाई' देवीचे मंदिर होते. गुणाजी गुरव असल्याने देवीची पूजा आरती ही कामे तो करायचा .अंगणातील बागेत उमललेली सुंदर फुले देवीच्या चरणी वाहायचा आणि हसतमुख असणारा गुणाजी एकदम खिन्न व्हायचा. कारणही तसेच होते . या दाम्पत्याला अजून मुलबाळ नव्हते .गुणा देवीला नेवैद्य ठेवायचा आणि साकडे घालायचा की आता तरी सगुणाची कूस उजवू दे.यंदाच्या गुढीपाडव्याला त्यांच्या लग्नाला 10 वर्षे झाली होती पण अजून घरात पाळणा हलला नव्हता .
साऱ्या गावाशी गुणाजी आणि सगुणा गुण्यागोविंदाने , मिळून मिसळून राहायचे म्हणून सारा गाव त्यांच्या या दुःखात सहभागी होता .कोणी कुठून कुठून औषधे आणून द्यायचे ,नवस बोलायचे पण कशाचाही उपयोग झाला नाही.शेजारी बायांना सगुणाचे मन कळायचे. म्हणून त्या आपले लेकरु सगुणाकडे सांभाळायला द्यायच्या,अंघोळ घाल, जेऊ घालून बाळाला झोपव अशी कामे सांगून निघुन जायच्या . बाळ पाहून सगुणा आनंदून जायची .तिचा आनंद तिच्या चेहऱ्यावर साफ दिसायचा . बाळाची खरी आई आडून आडून हा ओसंडून पाहणारा आनंद पाहायची आणि डोळ्यातले पाणी हलकेच पदराने पुसत आपल्या कामाला निघून जायची . सगुना पोटच्या मुलाप्रमाणे त्या बाळाचे सगळे मनापासून करायची .न्हाऊ - माखू घालायची, मायेने घास भरवायची आणि बाळ झोपीला आले की लुगड्याचा झोका बांधायची आणि बाळाला झोपवायची . दुसऱ्या आया आपली बाळे सगुणाकडे सोपवायच्या आणि अगदी निश्चिंत मनाने कामे करायच्या . सगुणाचे घर जणू पाळणाघर भासायचे.
असेच दिवस भरकन जात होते . झोका हलवता हलवता सगुणाच्या मनात एक विचार आला आणि तिचे डोळे आनंदाने चमकले.रात्री जेवण झाल्यावर तिने गुणाला आपल्या मनातले गुपित सांगितले.
"धनी,माझ्या मनात एक ईचार आलाय."
"काय गं?बोल की."
"आपुन एक पाळणाघर सुरु करू."
"अगं,पाळणाघर !अन् ते कशाला आणिक?"
"आवो ,दिसभर मी एकटी बसून असते. तेवढीच् माझी करमणूक होईल अन् दुसऱ्या बायास्नी मदत हुईल."
"अगं पण तुला झेपेल का ?अन् पैशाची काही कमी नाही आपल्याला."
"पैशासाठी नाही म्हणत मी . मला आवड आहे त्याची आणि बायका जातातच की पोरं माझ्या सांभाळी घालून.फरक एवढाच की आता रितसर नाव देतेय याच कामाला"
"बरं ठीक आहे . मी बघतो पुढे काय करायचे."
एक चांगला मुहूर्त पाहून 'वात्सल्य' नावाचे पाळणाघर अगदी थाटामाटात सुरु झाले. गुणाजीने शहरात जाऊन आवश्यक साहित्य सगुणाला आणून दिले . गावातील नव्या आया तर आणखी खुश झाल्या . आता त्यांना बाळाची काळजी उरलीच नव्हती . सगुणाच्या हाती पोर देऊन त्या बिनघोर व्हायच्या . आता सगुणाचा व्याप वाढला होता . तिला मदतीची गरज होती. शेजारच्या गावातील एक बायजा नावाची बाई मदतीला धाऊन आली . सगुणाला तिचा मोठा आधार झाला . बायजेची गैरसोय होऊ नये म्हणून सगुणाने तिला आपल्याच घरी नेहमीसाठी ठेऊन घेतले .
एक दिवस अचानक दुपारच्या वेळी सगुणाची तब्येत बिघडली . बायजाने धावत जाऊन गुणाजीला सांगितले . गुणाजी लगेच डॉक्टरांना घेऊन आला . तपासणी अंती समजले की सगुणाला दिवस गेलेत. बातमी ऐकताच एवढा आनंद झाला की कुणाच्याच् तोंडून शब्द फूटत नव्हते . गुणाजीची निस्सीम भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली की सगुणाचे निर्व्याज प्रेम पाहून देवीला दया आली की बायजाचा पायगुण होता, का औषधांना गुण आला काही कळत नव्हते . पण सगुणा आई होणार हे मात्र नक्की . सगळीकडे आनंदीआनंद. सगळ्या वाडीत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली .जो-तो सगुणाला भेटायला येऊ लागला , कौतुक करू लागला,काळजी घ्यायला सांगू लागला.बायजा सगुणाची सर्वतोपरी काळजी घेई . पण पाळणाघराकडे सगुणाने अजिबात जराही दुर्लक्ष केले नाही.आता तर तिची जवाबदारी आणखी वाढली होती . ती सर्व गोष्टीकडे जातीने लक्ष देत होती.
दिवस सरत होते . मोठ्या उत्साहात सगुणाचे डोहाळजेवण झाले . गुणाजी , बायजा सगुणाला आता एकटी सोडत नव्हते. गावातील 2-4 अनुभवी बायका ओसरीवर बसून असायच्या .कधी गरज भासेल सांगता येत नव्हते . अशातच तो सोन्याचा दिवस उगवला . सगुणाने एका गोंडस ,गुबऱ्या गालाच्या ,लालचुटुक ओठाच्या मुलीला जन्म दिला. 'पहिली बेटी धनाची पेटी' या विचाराने मुलीच्या जन्माचे ढोल ताशे लावून स्वागत झाले .सगळ्या गावाला जेवण दिले .यथावकाश मुलीचे बारसे झाले आणि तिचे नाव गुणवंती ठेवले . सारा गाव तिला गुणा म्हणायचा.
पाळणाघरातील इतर मुलांसोबत गुणाही वाढू लागली . स्वतःची मुलगी झाली म्हणून सगुणाने पाळणाघराकडे दुर्लक्ष केले नाही . आता तर आणखी उत्साहात ती कामाला लागली . व्याप वाढला म्हणून आणखी गरजू स्त्रियांना सोबतीला घेतले . दिवस वाऱ्यासारखे भराभरा जात होते गुना मोठी होतं होती. नावाप्रमाणेच ती अतिशय गुणी नम्र आणि हुशार होती . ती सगुणाला आई म्हणायची तेव्हा सगुणाला मोरपीस फिरवल्यागत वाटायचे. तिचे ऐकून ऐकून पाळणाघरातील सगळी मुले आणि आता सगळी गुळाची वाडी सगुणाला 'आई ' म्हणू लागली.
गुणाच्या पाठीवर पुन्हा सगुणाला दूसरे अपत्य झाले नाही . गुणा लाडाची एकुलती एक लेक .आई -वडिलांनी तिला योग्य संस्कारासह तळहाताच्या फोडासारखे जपले होते . गुणाही आता अंगणातील बागेच्या फुलांचे हार देवीसाठी बनवायची . तिलाही फुले खुप आवडायची म्हणून आणखी गुंठाभर जागेत तिने फूलबाग फुलवली . उन्हाळ्याच्या रणरणत्या उन्हात गुणाने लावलेला गुलमोहर आणि पळस जास्तच फुलायचा .
कळीचे फूल व्हावे तशी गुणा आता वयात आली . जनरीतीनुसार आता तिचे लग्न करावे लागणार होते . आपली मुलगी दूर जाणार या विचाराने गुणाजी- सगुणाचे मन चिंतातुर झाले. काळजाचा तुकडा आता परक्याच्या स्वाधीन करावा लागणार या काळजीने दोघेही धास्तावून गेले. गुणालाही ही गोष्ट मनोमन समजली होती .याच बाबतीत तिने एक ठाम निर्णय घेतला होता .
शेजारच्या गावातील भागुबाईच्या गुणवान आणि रूपवान डीगू नावाच्या मुलाशी गुणाचा विवाह ठरला . लग्नाआधी गुणाने डिगुला भेटून आपला निर्णय ऐकवला . डिगुने होकार दिला आणि त्याने आपल्या आईचीही संमती मिळवली. मोठ्या थाटात लग्न पार पडले . गुणा आता सासरी जाणार म्हणून साऱ्या गावाच्या डोळ्यांत पाणी जमा झाले . तितक्यात डीगु सर्वाना उद्देशून बोलू लागला ."मी गुणाला सासरी नेणार नाही. " सारा गाव आ वासून ऐकू लागला . काय झाले असावे याचा विचार करू लागला पण कोणालाच काहीच उमगत नव्हते .
डीगु पुढे बोलू लागला-" गुणा खरंच गुणवंती आहे . तिचे नाव तिला साजेसेच आहे . मी स्वतः ला भाग्यवान समजतो की गुणा माझी पत्नी आहे .तिच्यामुळे आज मला बाईचे मन समजले .परम्परेनुसार मुलीला लग्नानंतर सासरी जावे लागते पण मी गुणाला सासरी नेणार नाही. ती इथेच तिच्या माहेरी तिच्या आईवडिलांसह राहणार आहे . मीच काही दिवसानंतर माझ्या आईला घेऊन इथे राहायला येणार आहे . गुणाला तिच्या आईवडिलांची काळजी वाटते आणि ते साहजिक आहे कारण गुणाला भाऊ नाही मग सासरी गेल्यानंतर तिच्या वृद्ध आई वडिलांना कोण सांभाळणार? तर मीच त्यांचा मुलगा होऊन माझ्या आईसारखी त्यांचीही सेवा करणार . "
सारा गाव अवाक होऊन ऐकत होता . क्षणभर नीरव शांतता होती .लगेच टाळ्यांचा कडकडाट झाला . सगळ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले . आपली गुणा आपल्याजवळ राहणार म्हणून वाडीला आनंद झाला . सगुणा आणि गुणाजीच्या डोळ्यांतून आनंदाश्रु ओघळू लागले .
लग्नानंतरची सगळी कामे आटोपल्यावर डीगु आणि भागुबाई गुळाच्या वाडीत राहायला आले . वात्सल्याचा सारा कारभार गुणाने आपल्या ताब्यात घेतला आणि तिला सोबत केली ती डिगुने . यापुढेही डिगुने एक पाऊल पुढे टाकले आणि गरजू वृद्धांसाठी 'आधार' वृद्धाश्रम सुरु केले तेही अगदी विनाशुल्क . गावातील तरुण मुलेही त्यांच्या मदतीला धाऊन आली .
सगुणाने आवडीखातर लावलेल्या रोपट्याचा आज महाकाय असा वृक्ष झाला .गुळाची वाडी म्हणजे नुसते गाव राहिले नाही तर एक मोठे कुटुंबच झाले . त्यांच्या निःशुल्क सेवेची बातमी मंत्र्यांपर्यंत पोहोचली . खुद्द मंत्रीसाहेब भेटायला आले . त्यांनी या पवित्र कार्याची दखल घेऊन दरवर्षी निधी उपलब्ध करून दिला .आता तर सगुणाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. वात्सल्य आणि आधार यांच्या बातमीने वर्तमानपत्र झळकू लागले. जगभरात गुळाच्या वाडीचे नाव सर्वश्रुत झाले. काही जागतिक संस्थांनी आर्थिक मदत देऊ केली.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 8 मार्च या जागतिक महिला दिनी सगुना आणि गुणवंती या दोघी मायलेकींचा जाहीर सत्कार करण्यात आला. याच दिवशी गुणाने हे कार्य आजन्म करत राहणार असा निर्णय सर्वांपुढे जाहीर केला. मनोमन आपल्या पती डीगू चे आभार मानले. त्याच्या समजुती शिवाय आणि सहकार्याशिवाय हे सारे काम पार पाडणे एकट्या गुणाला केवळ अशक्यच होते. गुणाच्या सासुबाईचाही यात महत्त्वाचा वाटा होता. जनरीतीला बाजूला ठेवून तिने गुणाचे एका स्त्रीचे मन जाणून घेतले .
या मोठ्या सत्कारानंतर सरपंच साहेबांच्या पुढाकाराने गुळाच्या वाडीनेही या पूर्ण कुटुंबाचा सत्कार केला . आदर्श घेण्यासारखेच काम या सर्वांनी केले म्हणून ढोल - ताशाच्या गजरात सर्वांची मिरवणूक काढली . यापुढे गुळाची वाडी न म्हणता 'गुणाची वाडी' असे गावाचे नामकरण सरपंचांनी केले.सारा गाव आनंदात न्हात होता आणि बागेतली फुले वाऱ्यावर डोलत, हसत टाळ्या पिटत होती.