STORYMIRROR

ninad rajpathak

Abstract

3  

ninad rajpathak

Abstract

गुलाबाच्या कळीचे शेवटच्या श्वासाचे मनोगत वाऱ्यासाठी

गुलाबाच्या कळीचे शेवटच्या श्वासाचे मनोगत वाऱ्यासाठी

2 mins
7

संध्याकाळी वाटले होते तू येऊन जाशील पण तू आलाच नाहीस.कधी नव्हे ते मनाचा हिय्या करून तुला सांगणार होते. गुलाबाची कळी म्हणून खुलले ते वसंत आला म्हणून, आणि त्याच्या प्रेमात पडले बिनशर्त.वसंता नंतर माझी पहिली ओळख झाली ती तुझ्या मंद झुळकीशी.

    वसंत नव्हतास रे तू माझा पण सखा,मित्र तर नक्कीच होतास.वसंता पेक्षाही तुला माझ्या सुवासाचे कवतुक त्याला हाताला धरून बागभर बागडून माझ कवतुक करायचास ज्यांना आवडला त्यांना कवतुक करायला मोहात पाडलस.उन्हाने काहिली झाली आणि तू फुंकर घातली नाहीस असे कधीच झाले नाही.तुझी रूप तरी किती ...? कधी मंद झुळुक, कधी थंड बोचरा व्हायचास कधी चिडलास की सैरभैर होऊन सोसाट्याने वाहायचास.

     वसंत नव्हतास रे तू माझा पण वसंतालाही हेवा वाटेल असा सहवास होता आपला.तुझ्या सवे झुलताना तुझ्या सवे खुलताना चे क्षण आठवले तरी आताही अंगावर काटा येतो.तु सुद्धा अगदी शहाणा होतास पण थोडा वेडाही तुला फक्त इतकेच माहिती होते की तू माझा वसंत नाहीस पण ....इतरांच्या पेक्षा वेगळा होतास जवळचा ज्याच्या असण्याने मी खुलायचे माहिती असून वसंत नाहीस तू तरी एक ओढ तर होतीच रे तुझी.रक्ता नात्याच्या पाना फांद्यांच्या पेक्षाही नेहमी तूच जवळचा वाटलास "कारण" हेच की तुझ्या करण्याला कोंणते "कारण" नव्हते.मगाशी वेडा म्हणाले न ते यासाठीच.

      वसंत नव्हतास रे तू माझा पण तुझ असण तुझ बागडण यात कधी गुंतले कळलेच नाही.स्त्रीच्या पोटी जन्माला येऊन सुद्धा पुरुषाला स्त्री पूर्ण कळलीच नाही.तिथे आपली काय कथा ? पण तसा शहाणा सुद्धा होतास आपल्या मर्यादा ओळखून कसलीच अपेक्षा न ठेवता.तुझ अस असण हेही एक कारण तू हवासा वाटायचे,काय माहित तुझ्या मनात काय ? पण कधी अस जाणवले नाही.वाटले ही असले तरी तुझ्याही शहाण्या मनाने कधी तोल जाऊ दिला नसेल. आता याला न व्यक्त झालेले प्रेम म्हणायचे की नाही माहीत नाही आणि आता विचार करायची वेळ टळून गेलीय.जस जशी रात्र वाढत जाईल एक एक पाकळी गळत जाईल.उद्या 

 तू येई पर्यंत फक्त देठ उरला असेल. सकाळी तू येशील एरवी देठावर असले माझे अस्तिव पहायची सवय तुला.अचानक बोडका देठ पाहून दुःखी होशील इतका की माझ्या गळून पडलेल्या अस्तित्वाचंही तुला भान उरणार नाही. सैरभैर होऊन वेड्या सारखा वहात सुटशील....अरे थांब थांब म्हणत माझ्या पाकळ्या तुझ्या मागे धावत सुटतील.तू शांत झाल्यावर धुळीने माखलेल्या प्रत्येक पाकळीलाही जाणवेल ......तुझ्याही मनात होत तर.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract