दान
दान
आज हा फोटो पाहिला आणि डोळे पाणावले. रोज खायला अन्न मिळेल की नाही याची शाश्वती नसतानासुद्धा फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरला आपल्या घासातला घास काढून देणारे हे लेकरू मनाने अंबानीपेक्षाही श्रीमंत आहे. यावरून आजोबांनी लहानपणी सांगितलेली गोष्ट पुन्हा आठवली ती पुढील प्रमाणे जशीच्या तशी देतो.
डोक्यावर मध्यान्नीचा सूर्य आग ओकत होता, अठरा विश्व दारिद्र्य झोपडीत ठाण मांडून बसलेले. घरातली स्त्री आज मुले शाळेतून घरी आली तर त्यांना खायला द्यायला घरात अन्नाचा दाणा नाही आता लेकरांची भूक कशी भागवायची? या चिंतेत असतानाच बाहेरून माई भिक्षा दे म्हणून आवाज देत एक संन्यासी दारात उभा राहिला. महाशिवरात्रीच्या घरी जणू एकादशी जेवायला आली.
आपल्या दुःखाने गांजलेल्या त्या माऊलीने जरा त्रासिक चेहरा करूनच संन्याशाला, जा बाबा पुढे माझ्याकडे काही नाही तुला द्यायला, असे सांगितले. पण संन्याशी मात्र जणू हट्टाला पेटला अशा स्वरात म्हणाला, माई जे काही असेल ते दे नाही म्हणू नकोस.
आता मात्र त्या माऊलीचा संताप झाला, रागाने ती म्हणाली, अरे माझ्याच लेकरांना काही खायला नाही तुला काय देऊ, चुलीतली राख? संन्यासी विनम्रपणे म्हणाला, चालेल चुलीतली राखसुद्धा चालेल मला. चिमुटभर राख घाल झोळीत माझ्या. त्या माउलीला क्षणभर काही कळले नाही पण ही ब्याद निदान जाईल तरी म्हणून तिने रागारागात उठून चुलीतली चिमुटभर राख संन्याशाच्या झोळीत टाकली.
तसे संन्याशाने तिला तोंड भरून आशीर्वाद दिले. त्याने दिलेले आशीर्वाद ऐकून मात्र ती माऊली चकित झाली आणि ओशाळून म्हणाली, अरे बाबा मी तुझ्या झोळीत चिमुटभर राख टाकली भिक्षा म्हणून तरी तू मला तोंड भरून आशीर्वाद का दिलेस? संन्यासी हसून म्हणाला, माई आज तुझी परिस्थिती नाही. तुझ्याकडे देण्यासाठी फक्त चुलीतली राख होती. उद्या तुझे हे दिवस जातील, चांगले दिवस येतील. पण ही जी तुला नाही म्हणायची सवय आहे ती मात्र तशीच राहील. तुझ्या हाताला देण्याची सवय आतापासूनच लागावी म्हणून मी तुला चुलीतली राख का होईना माझ्या झोळीत भिक्षा म्हणून टाकायला सांगितली. ही दान द्यायची सवय मोडू नकोस, तुझेही चांगले दिवस येणार आहेत, परमेश्वरावर विश्वास ठेव.
आता मात्र माऊलीच्या डोळ्यातून अश्रुंच्या धारा वाहू लागल्या आणि नकळतच तिचे हात जाणाऱ्या संन्याशाला नमस्कार करू लागले. माझी आई मला नेहमी सांगायची आपले हात हे देणाऱ्याचे असावेत. देव देणाऱ्या हाताला कधी कमी पडू देत नाही.