ग्रामगीता
ग्रामगीता


🚩 *।।जय जय राम कृष्ण हरी।।* 🚩
आत्तापर्यंत ही *तुकोबांची अभंग वाणी* आणि *कबीर के दोहे* सुप्रसिद्ध महाराष्ट्रभर अनेक वाचक आवडीने वाचत असतात आणि त्यांच्याच प्रेरणेने अशीच संत साहित्याची सेवा माझ्या या देहाकडून होईल. ही भगवंत चरणी प्रार्थना.
आज हिंदू धर्माच्या नववर्षापासून एक नवीन संकल्प आणि नवीन संतांचे विचार आपणासमोर विस्तृतपणे लिहिण्यास सुरुवात करणार आहे. ते म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्यांनी गावांचा विकास व्हावा गावातील अनिष्ठ प्रथा दूर होऊन लोक भक्तिमार्गाला लागावे आणि गावाचाही विकास व्हावा ह्यासाठी प्रयत्न करत त्यांनी आपल्या ग्रामगीतेतून अनेक प्रकारे गावाच्या भल्याचे मनुष्याच्या देहाच्या भल्याचे विचार विस्तृतपणे ग्रामगीता या ग्रंथामध्ये वर्णन केले आहे तेच विचार मांडण्याची बुद्धी भगवंत मला नक्की देईल आणि माझा देह फक्त निमित्तमात्र असेल. कर्ता करविता हा भगवंतच आहे. काही चुकत असेल तर लेकरू समजून अपराध पोटात घ्यावे जे काही योग्य आणि चांगले आहे ते संतांचे आहे जे काही वाईट आहे ते माझे दोष समजावे.
🚩 *।।ग्रामगीता।।* 🚩
*।। अध्याय १ ला - देवदर्शन ।।*
*।।ओवी क्रमांक १ ते१०।।*
*।।श्रीराष्ट्रसंत तुकडोजी महाराज।।*
ॐ नमोजी विश्वचालका ! जगदवंद्या ब्रह्मांडनायका !
एकचि असोनि अनेकां । भासशी विश्वरूपी ॥१॥
आपणचि झाला धराधर । उरला भरोनि महीवर ।
अणुरेणूंतूनी करशी संचार । विश्वनाटक नटावया ॥२॥
आपणचि मंदिर , मूर्ति , पूजारी । आपणचि पुष्पें होऊनि पूजा करी ।आपणचि देवरूपें अंतरी । पावे भक्तां ॥३॥
गणेश , शारदा आणि सदगुरू । आपणचि भक्तकामकल्पतरू ।
देवदेवता नारद तुंबरू । आपणचि जाहला ॥४॥
नाना चातुर्यकला - व्यापें । आपणचि गाये नाचे आलापे ।
प्रसन्न होऊनि आपणचि सोपें । भक्तिफळ दावी ॥५॥
गुरूशिष्य एकाच स्थळीचे । भिन्न नाहीत पाहतां मुळींचे ।
सुखसंवाद चालती भिन्नतत्वाचे । रंग रंगणी आणावया ॥६॥
हें जयाचिया अनुभवा आलें । त्याचे जन्ममरणदुःख संपले ।
आत्मस्वरूप मूळचें भलें । ओळखलें म्हणोनिया ॥७॥
त्यासि नाही उरला भ्रम । विश्व आपणासह झाले ब्रह्म ।
तो जे जे करील तें तें कर्म । पूजाच तुझी ईश्वरा ! ॥८॥
तुझ्या शक्तीची ही पूर्णावलि । अजूनि नाही जीवाभावांत शिरली। म्हणोनीच अज्ञानदशा उरली । आम्हांपाशी ॥९॥
जेव्हां तुझे दर्शन घडे । उघडतीं विशाल ज्ञानाची कवडें ।
मग मी - तूं - पणाचे पोवाडे । कोठचे तेथे ? ॥१०॥
*अर्थ* -
हे ओमकार रुपी भगवंता तुझा आकार हा ओमकार रुपी आहे. हे ओंकार रूप तुझे सर्व विश्वात भरून आहे. तू जगात वंदनीय आहे. तू ब्रह्मांडनायक आहेस. तरीही तू एकच सर्वात वसलेला असून तु अनेक रूपी आहे. असेही भासत आहेस. तूच सर्व विश्वाच्या अणु रेणु तही वसलेला आहे. ह्या विश्वाच्या कणाकणात भरूनही तू पुरून उरला आहेस. हे विश्व एक नाटक आहे आणि या नाटकाचा सूत्रधार तुच आहे. पुढे उदाहरण देताना तुकडोजी महाराज म्हणतात तूच मंदिर आहे, तूच देव आहे आणि तूच पुजारीही आहे. आणि फुले हि तूच आहेस आणि भक्त ही तूच आहेस. भक्ताच्या अंतरी वसणाराही तुच आहेस. हे भगवंता गणेश ही तूच आहेस शारदा ही तूच आहेस आणि सद्गुरु ही आमचा तूच आहेस. आमच्या भक्तांचा कल्पतरू तूच आहेस. नारद तुंबर देव-देवता ही तूच आहेस. तूच सर्व कलांचा अधिपती आहे. तू सर्व कला निर्माण केल्या आहेस. तूच सर्व कलेत वास करत आहे. आणि तूच त्या कलेवर प्रसन्न होऊन भक्तीचे फळ देत आहे. गुरु आणि शिष्य पहायला गेला तर वेगळा कधीच नसतो. ते एकरूप असतात त्यांचे कार्य एकच असते विश्वकल्याणाचे. असा ब्रह्मस्वरूप गुरु ज्यांना मिळाला आहे. त्यांचा सुख संवादच होत असतो. तुकडोजी महाराज पुढे म्हणतात हे ज्याच्या ध्यानात आले अनुभवास आले. त्याचे जन्म दुःख व मरण दुःखाचा अंत होऊन. त्याने आत्मस्वरूप जाणले आहे. आणि ज्याची भावना आपणच विश्वरूप आहे आणि विश्व आपल्यात आहे. सर्व आपण एकच आहोत असा ज्याचा विश्वास झाला आहे. तो मनुष्य त्याचे विचार अत्यंत विश्व कल्याणकारी असतात आणि अशा महात्म्य कडून जे जे कर्म घडेल ते ईश्वराची पूजा ठरते. इतके त्यांचे कर्म व निष्काम आणि निर्मळ असते. हे भगवंता तुझी पूर्ण शक्ती आणि तुझे विश्व व्यापक विचार आमच्यात अजूनही शिरले नाहीत. म्हणूनच आम्ही अजूनही आज्ञान आहोत. आम्ही जर तुझे विचार आत्मसात केले की विश्वरूप सर्व एकच आहे तर आमच्याकडे आज्ञान आणि भेदभाव राहणारच नाही. आणि हे सद्गुरु भगवंता जेव्हा तुझे दर्शन घडते तेव्हा सर्व अज्ञानांचा मुळापासून नाश होतो आणि आमचे मि तु पणाचे, अहंपणा चे पोवाडे सर्व नष्ट होतात तेथे फक्त करता आणि करविता भगवंतच आहे अशी भावना होते.