Sanjay Ronghe

Children

4.0  

Sanjay Ronghe

Children

" गोष्ट जांबाच्या चोरीची "

" गोष्ट जांबाच्या चोरीची "

5 mins
206


दामू आमच्या गावाचा सर्वसाधारण शेतकरी . आमच्या शेताच्या समोरच त्याचे शेत आहे. मी गावाला शेतात गेलो की त्याची भेट होते. तो मग मुद्दामहून माझ्या जवळ येतो आणि काहीबाही गोष्टी सांगत राहतो. आणि एकदा त्याची गाडी सुरू झाली की किमान दोन तीन तास तरी ती थांबत नाही. त्याच्या गोष्टी ऐकून मग हसून हसून पोट दुखायचे सुरू होते. आता मलाही त्याच्या गोष्टींची इतकी सवय झाली की , गावात शेतावर गेलो आणि दामुची भेट झाली नाही आणि त्याची एक नवीन गोष्ट ऐकली नाही तर गावाला गेल्यासारखेच वाटत नाही. दामुची गोष्ट ऐकली की मन ताजे तवाने झाल्या सारखे वाटते. उत्साह भरतो.


आजही मी गावात आलो आणि नास्ता करून सरळ शेतात गेलो. जाता जाताच दामूच्या शेताकडे लक्ष गेले तर दामू आपल्या कामात मग्न होता. मग मी आपल्या शेतात थोडं फिरावं म्हणून बांधाने निघालो. फिरता फिरता एक नवीनच बोरी चे झाड बरेच मोठे झाल्याचे लक्षात आले. त्याला बोरे लागली होती. लाल हिरवी बोरे पाहून माझ्या तोंडाला पाणी आले आणि सहजच माझे हात ते लाल लाल बोरे तोडण्यासाठी पुढे झाले. बोर पिकले असल्या मुळे थोड्याश्या धक्क्यानेही खाली पडत होते. मी प्रयत्न करून अगदी अलगद हातानी काही बोर तोडली आणि खिशात टाकली. बोर तोडता तोडता काट्याचे ओरफाटेही माझ्या हातांना सहन करावे लागले. आता माझा खिसा बोरांनी पूर्ण भरला होता. एक एक बोर मी तोंडात टाकत त्याचा आस्वाद घेत होतो. बोरांची आंबट गोड चव मला खूप छान वाटत होती. मी शेतात फिरून झाल्यावर ओट्यावर बसत नाही तोच दामू हजर झाला. बापा कवा आले जी, गाडी दिसली तुमची रोडवर मुन लक्षात आलं माया. मनलं चाला भेटून घ्यावं बापुले असं म्हणत तो माझ्या समोर दगडावर बसता झाला. मी त्याला माझ्या खिशातून चार पाच बोर त्याला दिले. दामुच्या गोष्टी सुरू झाल्या होत्या. गोष्टी गोष्टीत रानातल्या बोरं, पेरू ची गोष्ट आली आणि मग पेरू ची चोरी आणि त्याची झालेली त्याची फजिती ही गोष्ट त्याने सांगायला सुरुवात केली.


आजी त्या वकती मी असन चवदा पंधरा वर्षाचा. गँगच होती आमची पोट्यायची. लय उरफाट्या डोक्याचे पोट्टे होते सगळे. एक दिस मी आन थो वसंता न्हाई का दोघबी कुठूनका आता आठवत न्हाई त येत होतो. रस्त्यात एक मारोड्याची वाडी होती. वाडीत जांबाचे लय झाडं होते. आन मस्त पिकले पिकले जांब लागले होते. म्या त्या राखनी वाल्याले दोनचार जाम्ब मांगतले त थो बहिन मा वर असा बिथरला का सांगू नका. म्हने फुकटात भेटते का, इकत भेटन, लागते का सांग. जो थो इऊन जांब मांगते माही मेहनत कशी निंगन. रातचे चोरं बी घिऊन जातेत, बहिन रातची बी जागली करा लागते. तुले काय हाये. तसा वसंता म्हणे बावाजी आमाले काय दोन जांब दिले तरी चालते जी. पण रखवालदाराने त्यांना तिथून हुसकावून लावले. 


तसे दोघेही गावात आले आणि सगळ्या आपल्या दोस्तायले ती गोष्ट सांगितली. बहिन दोन जांबबी न्हाई दिले गा त्यानं आमाले म्हणत दामूने आपला रोष सगळ्यापूढे व्यक्त केला. मग सगळ्या नि ठरवले की आज रात्री लेकाची अख्खी वाडीच उतरून आणाची. इक म्हना मंग काय ईकतं तं. सगळ्यांनी रात्रीची तयारी केली सोबत खाली पोते घेतले आणि पाच सहा पोट्टे निघाले वाडीकडे. रात्रीचे सात आठ वाजले होते. सगळ्यांचा अंदाज होता की रखवालदार जेवायला गावात गेला असणार. पण बघितले तर तो तिथेच बसून शेकोटीवर हात शेकत होता. काय करावे याचा विचार करत सगळे तिथेच लपून बसले. रखवालदार जाण्याचे काही चिन्ह दिसत नव्हते. वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. तसा गँगमधला मधु म्हणाला बहिन किती वाट पहाची गा. चाला लेकले बुढ्याले उचलून इरित टाकू न आपलं काम करू. पण तो विचार कोणालाच पटला न्हाई. तसा काही वेळाने रखवालदार उठून उभा झाला. तशी सगळ्यांची नजर रखवलंदारावर लागली. रखवालदाराने थोड्या काड्या, कचरा जमा करून शेकिटी जवळ ठेवला आणि तोंडातून हूरर हूरर करत आवाज काढला. तो तिथे हजर असल्याची जाणीव करुन देत तो चुपचाप जेवायला म्हणून गावाच्या रस्त्याने लागला. तसे वाट पाहत असलेली गँग हळूच आत वाडीत घुसली. आणि माकडा सारखी सगळी बाग खाली करून टाकली. कच्चे पिकले सारे जाम्ब काढून घेतले. सहा सात पोते भरले. आणि प्रत्येकजण आपले आपले पोते खांद्यावर घेऊन परत निघाले. गाव जवळ येताच आता एवढे पोते ठेवायचे कुठे, घरी तर नेता येत नाही, नाहीतर चोरी फुटेल आणि बापाचा मार पडेल ते वेगळंच. मग सगळे पोते आमराईत झुडपामध्ये लपवून ठेवायचे ठरले. रस्त्याने येता येता सगळ्यांचे जांब खाणे सुरू झाले होते. मग सगळे आमराईत घुसले. मोठे झुडूप पाहून त्यात ते सगळे पोते लपवून ठेऊन सगळे गावात आले. 


आता दुसऱ्या दिवशी सकाळपासून पोरांचे एकच काम होते , बस जांब खायचे. दिवसभर सगळे जांबवरच होते. दुसरा तिसरा दिवस ही जांबवरच निघाला. मात्र दिवस थंडीचे आणि पोटात तीन दिवसांपासून पोटात नुसते जांब होते. सगळे पोर मस्तीत होते. रखवालदाराला धडा शिकवल्याचे समाधान होते. पण रात्री वसंता ची अचानक तब्येत बिघडली. तो नुसता थरथर कापत होता आणि उलटया करत होता. एक एक करता करता सगळी गँगच आजारी झाली. गावात बातमी पसरली. याचा पोरगा, त्याचा पोरगा करत सगळे पोरं बिमार होऊन राहिले होते. काय झालं कुणाला काहीच कळत नव्हतं. सगळ्यांची आजाराची लक्षणे सारखीच होती. कोणी म्हणत होतं काहीतरी हा करणीचा प्रभाव असेल, कोणी म्हणत होत गावावर हे भलतीच आफतच आली. कोणी काही कोणी काही बोलत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी रखवालदार गावात आला आणि सांगू लागला चार दिस अगोदर बहिन अक्खी वाडी उतरून नेली जी चोरायनं. बहिन दुपारी दोन पोट्टे आलते, जाम्ब मांगे, म्या त्यायले हाकलून देलत, त्यायचीच करामत असन असं वाटते, आता म्या कोनाले पाह्यलं नाही त नाव कसं घेऊ कोणाचं, माही सगळी मेहनत बेकार गेली म्हणून तो रडत होता. दामुच्या वडिलांनी ती गोष्ट ऐकली आणि त्यांना संशय आला. घरी येऊन ते दामू जवळ गेले. दामू थंडीने थरथर कापत होता. उलट्या करून करून चेहरा निस्तेज झाला होता. त्याच्याच्याने उठून बसने पण होत नव्हते. त्यानी दामुला विचारले. बाबू खरं सांग तुन काय खाल्लं . तुले इतकी थंडी भरली. जांब खाल्ले का गा. तसा दामू बोलला हो जी. मूनच असन अस झालं. झालं सगळ्यांच्या आजाराचे कारण कळले होते. गावातल्या एका जाणकार वैद्याने ताबडतोब सगळ्या पोरांना उपचार केला. आणि सगळे परत मस्त दुरुस्त झाले.


दामू सांगत होता त्या दिवसापासून त्याला जांबाची हिकच बसली. त्याने त्यानंतर जवळपास चार पाच वर्षे तरी कधी जांबाला हात लावला नव्हता. अशी झाली दामुची जांबाची चोरी. ती गोस्ट ऐकून मी ही खूप हसलो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Children