STORYMIRROR

RADHIKA DESHPANDE

Abstract Tragedy

2  

RADHIKA DESHPANDE

Abstract Tragedy

एमेझानची आग जागतिक प्रश्नचिन्ह

एमेझानची आग जागतिक प्रश्नचिन्ह

2 mins
63

"करा जिव्हाळा निसर्गाशी ,

देईल तो सुखाच्या राशी"

हे बोल कानी पडलेआणि विचारांचे वादळ मनात दाटून आले. निसर्गावर निर्व्याज प्रेम करावं तो आपल्याला सारं काही भरभरून देतो पण खरचं हे बोल प्रत्यक्षात कितपत अंमलात आणले जातात यावरही प्रश्नचिन्हच आहे.अलिकडे चर्चेतअसलेले जंगलातील वणवे आणि त्यांचे भयावह होणारे परिणाम अगदी डोळ्यासमोर येतात आणि मनात प्रश्नांचा भडीमार चालू होतो.

  एमेझान मथ्ये लागलेल्या आगीमुळे आपण चिंतीत व्हायचे कारण आहे का ? एखाद्या जंगलाला यापूर्वी वणवे लागले नाहीत का? भारतापासून खूप दूर असतानाही मग आपण त्याचा विचार कां करायचा ? असे प्रश्न आपल्याला ही आलेच असतील , पण जगाला२०%प्राणवायू देणारा हा प्रदेश बेचिराख झाल्यास हवामानावर जो विपरीत परिणाम होईल त्याचे परिणामआपल्यासही भोगावे लागतील.यासाठी आपण थोडा विचार केला तर लक्षात येईल की आपल्याकडे पश्चिम घाट म्हणून ओळखला जाणारा प्रदेश हा सदाहरीत जंगले असलेला प्रदेशआहे. ही जंगले एकप्रकारे वर्षावनांसारख्याचं प्रकारची असल्याने अन् त्यातही अशा आगी लागत असल्याने तेही काळजीचे मोठे कारण आहे .

  एमेझान च्या जंगलात लागलेला वणवा ही फक्त घटना नसून मानवजातीच्या सुनिश्चित होणाऱ्या भविष्याचा आरसा आहे.एमेझानचे जंगल नव्हे तर प्रुथ्वीचे फुफ्फुस जळतेय हे कुणालाच का कळत नाहीये.

ब्राझील चे राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांनी सुरुवातीला पर्यावरणवादी संस्थांवर आगपाखड केली.शेवटी त्यांचे खरे हेतू कळल्यावर जागतिक स्तरावर त्यांची नाचक्की झाली. नाईलाजाने का होईना ,त्यांना आग विझविण्यासाठी सैन्याला बोलवावे लागले. वणव्यात किती झाडे खाक झाली असतील ,किती वन्यजीव मेले असतील आणि किती आदिवासींचे विस्थापन झाले असेल याची गणतीच नाही. एकट्या एमेझान मध्ये भारतातील एकुण पक्षांच्या जातीपेक्षा जास्त पक्षी आढळतात .यावरून तिथल्या जैविक विविधतेची कल्पना येते .अशा माथेफिरू विकासाची ओढ फक्त ब्राझीलच्या अध्यक्षांनाच नाही तर जवळजवळ सर्व देशाच्या पुढाऱ्यांना आहे.

दुर्दैवाने ते राष्ट्रियत्वाचा मुखवटा लाऊन कार्य सिद्धीस नेत आहेत .प्रुथ्वीतलावर मानवी अस्तित्व संपवण्याकडे नेणारे कोणतेही धोरण राष्ट्रप्रेमी कसे काय असू शकते? याचा विचार सगळ्यांनी करणे गरजेचे आहे.

   एमेझान मधील वणव्याचे दुरगामी परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील ,प्रुथ्वीची यंत्रणा इतकी एकसंध आहे की एका देशातील नैसर्गिक हानीचा परिणाम त्या देशापुरता मर्यादित राहूच शकत नाही. एमेझान मध्ये लागलेल्या आगीचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की त्यामुळे वनक्षेत्राचे अपरिमित नुकसान होते. जैवविविधतेचाही मोठ्या प्रमाणावर नाश होतो त्यामुळे होणारे बदल लगेचच दिसणार नाही पण हे प्रमाण घटले नाही तर त्याचे भीषण परिणाम हवामानावर झालेले आढळतील.

सरकार व वनविभाग एकीकडे मोठ्या प्रमाणावर रोपे लागवड आणि त्यानंतर व्रुक्षसंगोपणाचा प्रयत्न करीत आहेत. त्याचवेळी काही चुकीच्या समजुतींमुळे शेती आणि वनांना आग लावण्याचा जो प्रकार होतो तो बंद व्हायला हवा. या समस्येचे गांभीर्य वेळीच लक्षात घेऊन सकारात्मक पाऊले टाकण्याची गरज निर्माण झाली आहे.

जमलेच तर आपणा साऱ्यांनाच या वाटचालीत सहभागी होत खारीचा वाटा उचलणे अत्यावश्यक आहे .

तरच आपण *वसुधैव कुटुंबकम्* चा नारा सार्थ व यशस्वी करु शकू हा मला विश्वास आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract