एक हजाराचा बुरखा..!
एक हजाराचा बुरखा..!
सकाळचे दहा वाजले होते. आज रविवार ..! रविवार असल्यानं मी निवांत मटा वर्तमानपत्र वाचत बसलो होतो. माझी आई घराकामात व्यस्त होती आणि बाबा नुकतेच बाजारात गेले होते. इतक्यात बाबांच्या मोबाईलची रिंग वाजली. मी फोन उचलला,
"हँलो.." मोबाईलवर एक अनोळखी नंबर दिसत होता.
"मी सुमती शिरोडकर बोलतेय. अरे, तुझे बाबा घरी आहेत काय?" मी जरा गोंधळलोच. कारण, काकूंचा आवाज जरा विचित्र ऐकू येत होता.
"नाही, काकू. बाबा आताच बाहेर गेलेत. त्यांना यायलाही अजून बराच वेळ आहे. का.. काय झालंय??..काही सिरिअस मँटर आहे का, काकू? ..मला सांगा ना!!" मी काकूला धीर देत म्हणालो.
"अरे, ह्यांना पोलिसांनी अटक केलीये म्हणे. मला पण काही नीटसं कळलेलं नाही. मला ठाणे स्टेशनवरून एका पोलिस साहेबांचा फोन आला होता. त्यांनी मला अर्जंटली ठाणे स्टेशनला यायला सांगितलं आहे. तू एक काम करशील का ..मला ठाणे स्टेशनला भेटशील का? ..मी तिथेच येते. मग बोलू आपण..!" असं म्हणत काकूंनी फोन कट केला.
मला तर काहीच सुचत नव्हते. मी आईला काकूंच्या फोनबद्दल सांगितले. आईनं मला ताबडतोब निघायला सांगितले आणि पोहोचल्यावर फोन कर, असंही सांगितलं. मी घड्याळाकडे पाहिलं तेव्हा दहा वाजून पंधरा मिनिटे झाली होती. मी जाण्याची पटापट तयारी केली. तोंडावर रूमाल बांधला आणि सोबत थोडे पैसेही घेतले. मी काकूंनी सांगितल्याप्रमाणे डोंबिवलीहून गाडी पकडत ठाणे स्टेशनला पोहोचलो. ठाणे स्टेशनवर पोहोचल्यावर मी पहिला काकूंना फोन केला. काकूंनीही वेळ न दवडता लगेच माझा फोन उचलला,
"हा..काकू, कुठे आहात तुम्ही??..मी ठाणे स्टेशनला आलोय इथे!" मी दादर चढत म्हणालो.
"अरे, प्लँटफॉम नंबर एकच्या पोलिस ठाण्यात ये, मी तिथेच उभी आहे." अजूनही मला काकूंचा आवाज घाबरल्यासारखा वाटत होता. यावरून काकांनी काहीतरी मोठं कांड केलंय याची मला पक्की खात्री झाली.
मी दादर उतरून घाईघाईनं प्लँटफॉम नंबर एकला आलो. तिथून पुढे चालत गेल्यावर समोरच्याच एका खोलीत डोकावून पाहिलं तर काकू दरवाजाच्या बाजूला पदराआड रडत उभ्या होत्या. मी सरळ आत शिरलो तसं साहेबांचा आवाज कानी आला,
"ये..तू कोण?..इथे काय काम आहे?" साहेबांचा आवाज जरा भारी दिसत होता. इतक्यात काकूंनी मला पाहिलं आणि साहेबांना सांगू लागल्या,
"साहेब, माझा भाचा आहे हा...मी आता यालाच फोन केला होता." काकू डोळे पुसत तशाच माझ्या बाजूला उभ्या राहिल्या.
"बरं..बरं. कांबळे, त्यांना .. साहेबांना जरा बाहेर घेऊन ये." साहेबचा आवाज एका क्षणी बदलला. मला हायसं वाटलं. पोलिस ठाण्यात येण्याची ही माझी पहिलीच वेळ होती.
साहेबांच्या हुकूम ऐकल्यावर कांबळे सर आत गेले, तशा काकू आत पाहू लागल्या.
"घाबकू नका. आम्ही त्यांना मारलेलं नाही आहे. फक्त लॉक अपमध्ये बंद केलं आहे. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे तुमचे मिस्टर वाचलेत. नाहीतर, त्यांना थर्ड डिग्री काय असते हे आज दाखवूनच दिलं असतं." साहेब काकूंकडे बोलता बोलता माझ्याकडे पाहू लागले.
"सर, एक विचारू का..असं केलंय काय काकांनी??"
मी घाबरूनंच साहेबांना प्रश्न केला. खरं सांगायचं झालं तर, मला पोलिसांची फारच भिती वाटते.
"काय केलंऽऽ??..अहो, तुमचे काका लेडिज डब्ब्यातून प्रवास करत होते. तेही बुरखा खालून!!" साहेब माझ्यावर चांगलेच गरजले.
"काय??" मला पुढे काय बोलावं हेच सुचत नव्हतं. कारण, मला आश्चर्याचा जगातला सर्वात मोठा धक्का बसला होता.
"हो तर. बरं, हे साहेब लेडीज डब्ब्यातून एकदा नाही तर मागील एक महिन्यापासून प्रवास करित होते. आज आमच्या एका लेडी कॉन्स्टेबलनी यांना रंगेहाथ पकडलं आणि मुलुंडवरून इथे आणलं. आम्ही यांना लगेच लॉक अपमध्ये ठेवलं. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे प्रवाशांवर हाथ उचलू शकत नाही. नाहीतर .." साहेब बोलत असतानाच कांबळे काकांना घेऊन तिथे हजर झाले.
"या..या..साहेब. या..बघा! आपल्याला कोण कोण भेटायला आले आहेत?" साहेबांचा स्वर क्षणात बदलत होता. मी काकांकडे पाहिले आणि काकांनी माझ्याकडे..! काकू मात्र रडतच होत्या.
"अहो, ताई. आता रडता कशाला?? तुमचे साहेब आता आले आहेत ना!!" असं साहेबांनी म्हटल्यावर काकू शांत झाल्या.
"तर...मी काय बोलत होतो?..हां, तुमच्या या साहेबांना सोडावं असं जर तुम्हांला वाटत असेल तर आता तुम्हांला एक हजार रूपये दंड भरावा लागेल. नाहीतर, यांना आजची रात्र येथेच काढावी लागेल. आता काय करता ते सांगा." साहेब माझ्याकडेच बघत होते.
माझ्याकडे पैसे होते. पण, त्यात अजूनही पाचशे रूपये कमी होते. मी लगेच बाहेर पडलो आणि जवळच्याच एका एटीएममधून पैसे काढून आलो.
"हे घ्या साहेब. एक हजार रूपये!" असं म्हणत मी सरळ पैसे साहेबांच्या हातात दिले. साहेबांनी ते पैसे टेबलावर ठेवायला सांगितले.
"कांबळे, ही नोंदवही घ्या. यात यांचं पुर्ण नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर लिहून घ्या आणि या मुलाचंदेखील नाव आणि नंबर लिहून पटापट सर्वांना सोडून द्या. मी जरा बाहेर जाऊन येतो. आणि हां.. एक हजाराची पावतीदेखील बनवा." असं म्हणत साहेब ऑफिसच्या बाहेर पडले.
कांबळे सरांनी पटापट सर्व कारवाई केली. मी पैसे भरले आणि पावती घेतली. कांबळे साहेबांनी माझा नाव व नंबर घेतला. काही क्षणांतच आम्ही सर्व कारवाई करून ठाणे स्टेशनवर आलो.
"बरं झालं, आदित्य. आज तू आलास ते! या लॉकडाऊननं आधीच कंबरडं मोडलं आहे. त्यात यांनी हा नवा पराक्रम केलाय. तरी मी सांगत होते ..भाभीचा बुरखा लहान आहे. तुम्हांला तो नाही होणार..पण, माझं ऐकतंय कोण?" काकू बोलत होत्या आणि काका मान खाली खालून गुपचूप उभे होते. झालेल्या घटनेबद्दल काकांना खूप पश्चाताप होत होता. मी काकाकाकूंना धीर दिला. या सगळ्यांत काका मात्र सकाळपासून उपाशी होते. काकूंनीही सकाळपासून काहीच खाल्लं नसल्याने मी त्या दोघांना घेऊन जवळच असलेल्या एका हॉटेलामध्ये गेलो.
तिथं गेल्यावर आम्ही तिघांनी प्रथम पोटभर खाल्लं. काकांना मिसळपाव आवडतो हे मला माहित होते. काकूंनीही मिसळपाव मागवला. मी इडलीवर ताव मारत झालेल्या घटनेबद्दल काकांना विचारलं. तशी काकांनी आप बिती सांगायला सूरुवात केली.
गेल्या सहा महिन्यांपासून काका घरीच बसून होते. नोकरी चालू होती तोपर्यंत सारं आलबेल होतं. पण, लॉकडाऊन सूरु झालं आणि काकांना घर चालवणं कठिण जाऊ लागलं. काकांची घरची परिस्थिती तशी बेताचीच! काकांना पगारही जेमतेम. काकू शिलाईमशीनवर कपडे शिवून संसाराचा गाडा चालवीत. पदरात दोन लहान मुलं..सुरज आणि रजनी! अनुक्रमे दहा वर्षे आणि पाच वर्षांची ..लॉकडाऊनच्या पहिल्या काही महिन्यांत मालकाने पुर्ण पगार दिला. पण, नंतर मात्र मालकालाही पैसे देणं जड होऊ लागलं. काका एका छोट्या गाळ्यात काम करायचे. तिथे त्यांना दहा हजार महिना पगार असायचा. आता लॉकडाऊनमध्ये ते पैसेही येणे बंद झाल्यावर काकांची तारांबळ उडाली. मुलांची फी, घरचं वाणसामान आणि घरचं भाडं देणं मुश्किल होऊ लागलं. काकांचा स्वभाव शांत व खूपच मानी असल्याने त्यांनी कुणाकडेही हात पसरले नाही. पण, गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन हळूहळू शिथिल होऊ लागलं. लेडीज गाड्या सूरु होऊ लागल्या तसं काकांना धीर येऊ लागला. त्यांनी एकदा रेल्वेत जाण्याची तयारी दाखवली. पण, हातात पास नसल्याने काकांना परत घरी परतावं लागलं. यातच एकदा काकूंची शेजारी राहणाऱ्या रमिजाताईनं काकूंकडे बुरखा शिवायला दिला होता. तो बुरखा काही ठिकाणी फाटलेला होता. रमिजाताई मोठ्या विश्वासानं तो बुरखा काकूंकडे ठेवून गावी निघून गेल्या होत्या. काकांनी एक दिवस शक्कल लढवत तो बुरखा गंमत म्हणून अंगावर घालून पाहिला. तो त्यांना फिट बसला खरा, पण बुरखा पायाकडे लहान झाला होता. मग काकांनी काकूंची चप्पल वापरून पाहिली. ती ही शक्कल उपयोगी आली. तेव्हा रमिजाताईंचा बुरखा आणि काकूंची चप्पल घालून काकांनी कामावर जायचं मनाशी पक्कं केलं.
एक दिवस काका बुरखा घालून रेल्वेच्या लेडीज डब्ब्यात चढले. सुदैवानं लेडीज डबा त्यादिवशी बऱ्यापैकी खाली होता. काही मोजक्याच बायका आत बोलत बसल्या होत्या. त्यांचं बोलणं ऐकून काकांना धीर आला. ते हळूच त्यांच्याबाजूला जाऊन बसले. अशाप्रकारे त्यांचा नेहमीचा प्रवास सूरु झाला. ते दररोज हलक्या पावलाने रेल्वेच्या लेडीज डब्ब्यात जात आणि बसत. कोणी बोललंच तर त्याच्याशी काही न बोलता फक्त 'हुम्' असं म्हणत. असं करत ते गेल्या महिनाभर कामाला जात होते. मालक त्यांच्या कामाबद्दल जाणून होता, म्हणून तोही काही नाही बोलला. पण, हा प्रवास त्यांना आज महागात पडला होता. ऐरवी घर चालवायला मदत करणारा त्यांचा लाडला..रमिजाबाईंचा बुरखा आज त्यांना चक्क एक हजार रूपयांना पडला होता.
