Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Nagesh S Shewalkar

Tragedy


1  

Nagesh S Shewalkar

Tragedy


एड्सचे वादळ!

एड्सचे वादळ!

8 mins 1.2K 8 mins 1.2K

           

  नाथराव अस्वस्थपणे दिवाणखान्यात फेऱ्या मारत होते. सतत हसमुख असणारा त्यांचा चेहरा बराच काळवंडला होता. त्यांची शारीरिक भाषाही मरगळलेली वाटत होती. नेहमी टवटवीत असणारे कपाळावरील अष्टगंध, बुक्का यांचे पट्टे सुकल्याप्रमाणे भासत होते. गळ्यातील माळांचे तेज जणू लुप्त झाले होते. भरगच्च मिशांचा अक्कडपणा गमावल्यासारखा झाला होता. पंढरपूरचा वारकरी जणू हरिनामाचा गजर विसरुन गेला होता. असे घडले तरी काय होते?

    नाथरावांचे वय पन्नाशीच्या जवळचे. उंचीपुरी शरीरयष्टी, सडसडीत बांधा, गौरवर्ण! धोतर, नेहरू शर्ट असा साधा पेहराव. गळ्यात माळा, डोक्यावर टोपी असा सारा वारकरी थाट! त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा भरगच्च मिशा! परंतु गेली अनेक वर्षे नाथराव या ना त्या कारणाने आजारी असायचे. वयाची पस्तीशी ओलांडेपर्यंत औषधांची चव न चाखलेल्या नाथरावांना गेल्या दहा-बारा वर्षांपासून साध्या साध्या आजाराने ग्रासले होते. अधूनमधून येणारी ताप, मध्येच येणारी चक्कर, अतिसार असे रोग त्यांची पाठ सोडत नव्हते. त्यादिवशी डॉक्टरांनी त्यांना अत्यंत गंभीर आजार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे नाथराव मनोमन हादरले होते. त्यांना त्यांचे जीवन आज संपते की, उद्या अशी भीती वाटत होती. तोपर्यंत त्यांना जिवंतपणी मरणयातना सहन कराव्या लागणार होत्या. 

   बेचैन अवस्थेत फेऱ्या मारणाऱ्या नाथरावांनी स्वयंपाक घरात डोकावले. त्यांची पत्नी लक्ष्मी भाकरी करीत होती. सारा राग जणू ती त्या भाकरीवर काढत होती कारण भाकरी थापण्याचा तिचा आवाज दररोजच्या पेक्षा जरा जास्तच येत होता. तिचा चेहराही उदास झाला होता, ती कोमेजलेली वाटत होती. भाकरी थापताना तिच्या डोळ्यातून आसवं गळत होती. गेली पंचवीस वर्षे तिने ज्या विश्वासाने नाथरावांना साथ दिली होती, त्या गाढ विश्वासाला दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाहीतर तिच्या पतीनेच तडा दिला होता. अनेक वर्षांपासून नाथराव आजारी असले तरीही ती डगमगली नव्हती. परंतु त्यादिवशी ती पार खचून गेली होती. पार कोलमडली होती.

  लक्ष्मीच्या पुढे तिची बावीस वर्षीय कन्या कविता आणि अठरा वर्षाचा मुलगा विठ्ठल बसला होता. विठ्ठल कॉलेजमध्ये शिकत होता. गेल्या तीन चार वर्षांपासून कवितेच्या लग्नाचे प्रयत्न सुरू होते. परंतु योग जुळून येत नव्हता. आईपेक्षा काकणभर सरस असलेल्या कवितेच्या कुंडलीतील ग्रह वक्रदृष्टी करुन होते. विठ्ठल म्हणजे नाथरावांचे तारुण्य! अगदी नाथरावांसारखा दिसत असे.   "आई, काय झाले ग?"

"काही नाही.."

"मग तू अशी रडतेस का?"

"आई, काल तुम्ही डॉक्टरकडे गेला होता ना, काय म्हणाले ग डॉक्टर?"

"परवा केलेल्या तपासणीचे रिपोर्ट आले का?"

"आई, तुला बरे वाटत नाही का? मी करु का स्वयंपाक?"

"मला काहीही धाड भरली नाही. त..त...त्यांना ए..."

"काय झाले? काही सिरीयस आहे का?"

"कसे सांगू पोरांनो,आपल्या कर्माचे भोग ? त्यांना ए..ए..एड्स झालाय..."

"व्हा....ट?"

"एड्स आणि बाबांना? कसे शक्य आहे?" विठ्ठलने विचारले. 

"होय. डॉक्टरांनी तरी तसेच सांगितले आहे." लक्ष्मी म्हणाली आणि स्वयंपाक घरात स्मशानशांतता पसरली. त्या शांततेचा भंग करताना कविता म्हणाली,

"आई, खरेच का ग? पण बाबांचा स्वभाव तर तसा नाही ना."

"आजपर्यंत मलाही तसेच वाटत होते. परंतु ...."

"आई, आपण पुन्हा डॉक्टरला भेटू या. दुसऱ्या डॉक्टरचा सल्ला घेऊया..."

"काही नको. तोही तेच सांगणार. डॉक्टर बदलला म्हणजे का रिपोर्ट बदलणार आहे?"

"म्हणजे आई, बाबा आता काही वर्षच ..... मागे एकदा मी वर्तमानपत्रात वाचले होते की, एड्स झालेला माणूस काही वर्षांचाच सोबती असतो. खरेच का ग आई, बाबा आपल्याला सोडून जाणार?"

"बाबा तर जातीलच पण मलाही घेऊन जातील...."

"काय? म...म..."

"त्यांच्या शरीरातील रोगजंतूंनी माझ्या शरीरातही प्रवेश केला असणार. दोन वर्षे झाली मलाही औषधी घ्यावीच लागतात. डॉक्टरांचे म्हणणेही तसेच आहे..."

"नाही. आई, नाही. असे भलतेच काही बोलू नकोस. तुमच्या दोघांशिवाय आम्हाला कोण आहे? सांग. आई, सांग. तू बोललीस ते सर्व खोटे आहे." विठ्ठल म्हणाला.

"आई, हे काय ग? कुणाचा शाप आपल्याला लागला ग? कोणी अशी करणी केली ग?आपण काय असे पाप केले म्हणून देव अशी आपली परीक्षा पाहतोय. आमचे कसे होणार? माझे लग्न कोण करणार? कोण माझ्याशी लग्न करायला तयार होणार? आज ना उद्या बाबांचा आजार सर्वांना समजणार. त्यावेळी कोण माझ्याशी लग्नाला तयार होईल?"

"आई, आता माझ्या शिक्षणाचे काय होणार ग? मला खूप खूप शिकायचे होते ग. परंतु आता..."

विठ्ठल बोलत असताना दिवाणखान्यात फेऱ्या मारणारे नाथराव 'विठ्ठला...पांडुरंगा...' असे म्हणत जड पावलांनी घराबाहेर पडले. परंतु त्यांच्या चालीत नेहमीचा रुबाब, ऐट नव्हती. नाथराव मारोती मंदिरात पोहोचले. मारोतीचे दर्शन घेऊन तिथल्या भव्य मंडपात बसले. त्याच मंडपात त्यांनी अनेक कीर्तनं केली होती. स्वतःच्या रसाळ, मधाळ वाणीने ऐकणारांना मंत्रमुग्ध केले होते. सोबत हसविले होते, प्रसंगी रडविले होते. आज मात्र ते स्वतःच मूक आक्रोश करीत होते. त्यांना आदल्या दिवशीचा प्रसंग आठवला. तपासणी अहवाल आले असतील म्हणून ते लक्ष्मीबाईसह दवाखान्यात गेले होते. त्यांना पाहताच डॉक्टर म्हणाले,

"या. नाथराव, या." नाथराव आणि लक्ष्मीबाई डॉक्टरांच्या समोर बसताच डॉक्टरांनी अनेक प्रश्न विचारले. काही क्षण विचार करून डॉक्टर म्हणाले,

"नाथराव, तुम्हाला कसे सांगावे तेच समजत नाही..."

"काय झाले डॉक्टर? अहवालात काही दोष ...

"नाथराव, ऐका. बाई, मन घट्ट करून ऐका, नाथराव, तुम्हाला एड्स झाला आहे...."

   "नमस्कार, देवा..." कुणी तरी भक्त नाथरावांचे चरण स्पर्श करुन म्हणाला आणि वास्तवात परतलेले नाथराव उदासवाणे म्हणाले,

"नमस्कार.." तो भक्त निघून जाताच नाथरावांना पुन्हा विचारांच्या वावटळीने घेरले.....

'एड्स आणि मला? कसे शक्य आहे? विठ्ठला, हेच का रे तुझ्या भक्तीचे फळ? गेली दोन दशके तुझी वारी कधी चुकवली नाही. त्याचा हाच का प्रसाद? पांडुरंगा, का ही वेळ आणलीस? इतरांचे सोड परंतु तुला का माझे एक पत्नीत्व माहिती नाही? लग्नापूर्वी तर नाहीच पण लग्नानंतरही माझे पाऊल कधी वाकडे पडले नाही. लक्ष्मीशिवाय दुसऱ्या स्त्रीकडे मी त्या नजरेने पाहिले नाही. पांडुरंगा, सांग. सांग केव्हा आणि कसे माझे पाऊल वाकडे पडले ते? कधी पाप घडले ते दाखव. या भयाण रोगामुळे मृत्यू तर अटळ आहेच. परंतु याक्षणी मी कोणते पाप केले हे माझ्या लक्षात आणून दे. क्षणाची वाट न पाहता मी इथेच या मारोतीरायापुढे प्राण अर्पण करीन. देवा, कितीतरी प्रसंग आले पण माझा संयम ढळला नाही. दुकानात अनेक स्त्रिया येतात परंतु कुणालाही वाईट नजरेने पाहिले नाही. स्पर्शसुद्धा केला नाही. कैकप्रसंगी तोल गेला असता परंतु मी दुसऱ्या क्षणी सावरलो. आता जगाला काय तोंड दाखवू? सारे मला 'देवा' म्हणतात. त्यांच्याकडे कसा पाहू? त्या...त्या लक्ष्मीचा कसा सामना करु? तिच्या नजरेला नजर कशी मिळवू? काय वाटत असेल तिला? केवढा विश्वास तिचा माझ्यावर? तिचा विश्वासघात मी करीन का? ते पातक मला लागतेय. कोणत्या जन्माचे हे पाप? लक्ष्मी बिचारी साध्वी. पण आता तिचाही बळी जाणार का?....'

    "बाबा, अहो, बाबा....." विठ्ठलच्या आवाजाने नाथराव भानावर आले. विठ्ठल पुढे म्हणाला,

"चला ना घरी. जेवायला सारे वाट पाहतात." काहीच न बोलता नाथराव विठ्ठलच्या मागोमाग घरी पोहोचले. अपराध्याप्रमाणे त्यांची नजर जमिनीवर खिळलेली होती. सारे जेवायला बसले. कशाचे जेवण आणि काय? प्रत्येकाने कसे तरी दोन चार घास घशाखाली ढकलले. नेहमी हास्य, विनोदी वातावरण असे परंतु त्यादिवशी सारे एकमेकांशी अनोळखी असल्याप्रमाणे वागत होते. जेवणानंतर नाथरावांना फिरायला जाण्याची सवय होती. परंतु त्यादिवशी नाथराव फिरायला न जाता झोपायच्या खोलीत जाऊन पलंगावर जाऊन पडले. इतिहासाची पाने ते पुन्हा पुन्हा चाळत होते परंतु तसा अविचारी प्रसंग कधी घडला असल्याचे त्यांच्या लक्षात येत नव्हते. काही वेळाने लक्ष्मी खोलीत आली. नाथरावांकडे न पाहता, न बोलता ती नाथरावांशेजारी पहुडली. किती वेळ गेला कुणास ठाऊक. शेवटी त्या भयाण शांततेचा भंग करीत लक्ष्मी म्हणाली,

"असा का हो छळ मांडलात माझा? स्वतःला फार भाग्यवान समजत होते मी. हे असे वागायचे होते तर आधी माझ्या नरडीचा घोट घ्यायचा असता आणि मग वाट्टेल ते चाळे करायचे असते. तुमचे कीर्तन ऐकताना किती अभिमान वाटायचा मला तुमचा. का तुम्ही असे वागलात? काय चुकले माझे? काय कमी केले हो मी?"

"लक्ष्मी, खरे सांगतो. मी तस काही केलेले नाही. तुझ्याशिवाय इतर कोणत्याही स्त्रीकडे पाहिलेले नाही. तुझी शपथ..."

"पुरे झाला हा साळसूदपणा, नाटकी बोलणे...." म्हणत लक्ष्मीने नाथरावांकडे पाठ फिरवली. नाथरावांनीही काही बोलण्याचा प्रयत्न केला नाही. दोघेही रात्रभर तळमळत होते, या कुशीवरून त्या कुशीवर होत होते. 

सकाळी नाथरावांनी घराला लागून असलेले किराणा दुकान उघडले. स्थानिक वर्तमानपत्र येऊन पडले होते. ते त्यांनी उचलले. त्यावर सरसरी नजर टाकत असताना चौकटीतील त्या बातमीने त्यांचे लक्ष वेधले. नाथरावांना एड्स झाला असल्याची ती बातमी होती. ती वाचून नाथरावांना निष्प्राण झाल्याची जाणीव झाली. डोके गच्च धरून ते खुर्चीत बसले.विषण्ण मनाने बाहेर बघत असताना त्यांना जाणवले की, रोज आपणहून 'नमस्कार, देवा.' असे अभिवादन करणाऱ्या व्यक्ती न बोलता नजरानजर टाळत पुढे जात होत्या. कुणाची नजरानजर झालीच तर त्या नजरेत क्रोध, राग, हेटाळणी, अविश्वास अशा भावना होत्या. सकाळी सकाळी चहापत्ती घेण्यासाठी येणारे गिऱ्हाइक त्यांचे दुकान टाळून दुसऱ्या लांबच्या दुकानात जात होते. नाथराव थिजल्याप्रमाणे सारे पाहत होते. दररोज गिऱ्हाईकांची वर्दळ असायची. पण त्यादिवशी एकही गिऱ्हाईक फिरकले नव्हते. तास दीड तास तसाच गेला. नाथरावांनी दूकान बंद केले. ते घरात गेले. नेहमीप्रमाणे त्यांनी थंड पाण्याने आणि तितक्याच थंडपणे स्नान केले. स्नान चालू असताना 'विठ्ठला... पांडुरंगा...' असा धावा केला नाही. कपाळावर अष्टगंध, बुक्का लावला नाही. लक्ष्मीने मुकपणे ठेवलेले पाणी आणि चहा त्यांनी महत्प्रयासाने घशाखाली ढकलला. घरात भयाण शांतता होती. सारेच एकमेकांना टाळत होते.

"नाथराव, आहेत का?" बाहेरून आवाज आला. नाथरावांनी बाहेर पाहिले. डॉक्टर आवाज देत होते. त्यांना पाहताच नाथरावांचा चेहरा उजळला. क्षणभर त्यांना वाटले, अहवाल चुकीचा आहे हे सांगायलाच डॉक्टर आले असावेत. त्यांच्याप्रमाणेच लक्ष्मी, कविता, विठ्ठल यांचाही आशेचा दीप तेवला. कुणी काही बोलण्यापूर्वीच डॉक्टर म्हणाले,

"थोडी चर्चा करायची होती. कालच करणार होतो पण तुम्ही काही न बोलता नाराज होऊन निघून आलात म्हणून मी मुद्दाम भेटायला आलो आहे..."

"म्हणजे डॉक्टर, मला एड्स नाही, कालचा अहवाल ...."

"दुर्दैवाने तो अहवाल खरा आहे."

"प..प..पण..."

"नाथराव, 'त्या' कारणाने रोग होतो हे खरेच आहे परंतु ते एकच कारण नाही. एड्स होण्यासाठी दुसरीही कारणे आहेत.."

"द..द..दुसरी? ती कोणती?"

"तुम्ही कधी इंजेक्शन घेतले होते?"

"तसा आजारी असल्यामुळे नाही पण वारीला जाताना बसस्थानकावर देतात त्यावेळी दरवर्षी घेतो."

"बरे, तुमचा कधी अपघात झाला होता?"

"हो. झाला होता. आठ-दहा वर्षांपूर्वी आम्ही पायी वारीला चाललो होतो त्यावेळी एका ट्रकने आम्हाला उडवले होते..."

"करेक्ट!..." डॉक्टर काहीशा उत्साहाने पुढे म्हणाले,     " त्यावेळी रक्त घेतले होते का?"

"हो. तेव्हा रक्त घेतले होते."

"ते रक्त कुणाचे होते? ते रक्त घेताना तपासून घेतले होते का?"

"डॉक्टरसाहेब, ते मला काहीच माहिती नाही कारण मी बेशुद्ध होतो."

"नाथराव, तुम्हाला झालेल्या आजाराचे मूळ येथे आहे.."

"म्हणजे? मी नाही समजलो." नाथराव म्हणाले.

"ज्या माणसांचे रक्त तुम्हाला देण्यात आले त्यापैकी कुणाला एकाला निश्चितपणे एड्स होता. तुमची अवस्था पाहून गडबडीत डॉक्टरांनी केवळ रक्तगट तपासून तुम्हाला रक्त दिले. आणि त्या व्यक्तीच्या रक्तातील एड्सचे विषाणू तुमच्या शरीरात शिरले...."

"म्हणजे... म्हणजे... यांचा कुण्या बाईशी तसा संबंध..."

"मुळीच नाही. मी सांगतो तसेच झाले आहे. लक्ष्मीबाई, तुम्ही यांच्या पत्नी... गेली अनेक वर्षे तुमचा संसार सुरु आहे आणि तरीही तुम्ही असा प्रश्न विचारावा? यांना जे रक्त दिले त्यातून किंवा इंजेक्शन घेताना एखाद्या एड्सग्रस्त माणसाची सुई नाथरावांना टोचण्यात आली असावी आणि एड्सचे रोगजंतू शरीरात शिरले असणार आणि त्यातूनच हा नको असलेला रोग झाला असावा हे मी खात्रीने आणि शपथेवर सांगतो. तुम्ही दोघे रात्रभर झोपले नसणार हे ओळखून मी आलो आहे. तुमच्या कुटुंबाला मी अनेक वर्षांपासून ओळखतो त्यामुळे मलाही रात्रभर झोप लागली नाही. नाथराव असे वागू शकतात यावर विश्वास बसत नव्हता म्हणून चर्चा करावी, खरे कारण जाणण्याचा प्रयत्न करावा एवढ्याचसाठी आलो होतो. येतो मी. पेशंट वाट बघत असतील. एक सांगतो, आजार झालाय म्हणून हातपाय गाळून बसू नका. नेहमीप्रमाणे हसमुख रहा. यावर औषधी नसेल पण हा आजार सुसह्य तर करता येऊ शकतो. पुन्हा सविस्तर चर्चा करूया..."असे सांगून डॉक्टर निघून गेले. सर्वांचे डोळे अश्रूंनी भरले होते. अचानक लक्ष्मी पुढे होत म्हणाली,

"देवा, चुकले मी. एवढी वर्षे संसार करूनही मी तुम्हाला ओळखू शकले नाही. माझी मती गुंग झाली होती. माझ्या 'नाथाला' मी एका क्षणात विसरले. तुम्हाला नाही नाही ते बोलले. धनी, मला तुमचा अभिमान आहे. आता मरण आले तरी मी तुमच्या आधी हसत हसत सामोरी जाईन. नाहीतर सती जाईन...." असे म्हणत लक्ष्मी नाथरावांच्या पायाशी वाकली. नाथरावांनी तिला अर्ध्यातून उठविले. एड्सचे मनात आणि नंतर घरात निर्माण झालेले वादळ शमले होते. दोघांच्याही डोळ्यातून स्वच्छ अश्रूंच्या धारा वाहत होत्या. संशयाचे जळमट झडले होते........

                                            


Rate this content
Log in

More marathi story from Nagesh S Shewalkar

Similar marathi story from Tragedy