दर्पणात मी
दर्पणात मी
दर्पणात मी पाहून
माझीच छबी न्याहळते
मुरकते,सजते त्या समवेत
माझीच मी न राहते....
दर्पणातील छबी माझी
सुंदर,देखणी ठेंगणी नार
पाहत राहते मी छबीस
निरखते मी त्यास वारंवार....
दर्पणी पाहते विचार करते
मी का ही वसुधा ?लाजरी बुजरी
कोणीही बोलले तरी देखील
चटकन व्हायची कावरी बावरी....
दर्पणी पाहून सौभाग्य लेणं ल्याते
कुंकुम भाळी ठसठशीत कोरते
दर्पणास विचारते मी कशी दिसते?
माझे प्रतिबिंब गाली गोड हसते.....
दर्पणातून माझीच छबी
मला सारखे खुणावते
मग मी परत परत पाहते
सुंदर ललना मी सुखावते....
दर्पणी शोधतेय मी हो
माझेच हरवलेले अस्तित्व
शब्दाशब्दांवर मिळवणार
आता नक्कीच मी प्रभुत्त्व...