देव भावाचा/भक्तीचा भुकेला
देव भावाचा/भक्तीचा भुकेला


नाव वाचून तुमच्या मनात काय आले?? खरेच आहे... चला तुम्हाला आज अशीच एक कथा मी सांगणार आहे... या गोष्टीची सुरुवात झाली ५० वर्षापूर्वी... पण संपते या आताच्या काळात....
शांती बाई आणि शशिकांत दामले एक जोडपे... त्यांचा मुलगा शंतनू यांची ही कथा आहे....
जेव्हा शांती बाई आणि शशिकांत तरुण होते तेव्हा या कथेची सुरुवात झाली.... त्यांचे लग्न होऊन ५-६ वर्षे झाली तरी त्यांना मूल होत नव्हते... आणि मग शांती बाईंना दिवस गेले... मुलगा झाला, सर्वांना आनंद झाला... पण मुलगा काही दिवसातच गेला... मग काही वर्षाने मुलगी झाली... ती जगली... पण तो काळ असा होता की, मुलगा हवाच मग गणपतीला नवस बोलले... मुलगा झाला तर तुला दरवर्षी घरी आणून दीड दिवस तुझी मनोभावे सेवा करू...
मुलगा झाला सर्वांना आनंद झाला... म्हटल्याप्रमाणे गणपती आणला, त्याची मनोभावे सेवा केली... मुलगा दोन वर्षाचा झाला... अन् परत गोड बातमी आली... आता मुलगी झाली... मुलगा म्हणून शंतनूचे खूप लाड होत होते... तो काळ तसाच होता... मुलगा आणि मुलींच्या मध्ये भेदभाव केला जाई....
हळूहळू ती सर्व भावंडं मोठी झाली... त्यांची लग्न झाली... आपल्या संसारात सर्व रमले... शांती बाई आणि शशिकांत त्यांचे आता वय झाले... दामले कुटुंबात आता सून, जावई आले होते... फक्त शांती बाईंच्या मनात एकच खंत होती की त्यांना सर्व नातीच होत्या... नातू नाही... त्या जुन्या विचारांच्या होत्या... नातींवर त्यांचे प्रेम होते पण मनात कुठेतरी त्या अडकल्या होत्या या जुन्या विचारात...
त्यात नवस बोलून आणलेला गणपती... त्यामुळे त्याचे नीट व्हायला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे... अर्थात तो बरोबर होता.... पण शंतनूला दोन्ही मुली.. त्यांच्या मुलींना पण मुली त्यामुळे त्या थोड्या चिडचिड्या झाल्या होत्या... आणि आता मुली मोठ्या झाल्या होत्या त्यामुळे त्यांची पाळी... आणि गणपती एकत्र आले की त्या घर अगदी डोक्यावर घेत असत... बरे मुलींना जवळच दिले होते, त्यांच्याकडे गणपती नाही त्यामुळे सर्व मामाकडे यायच्या... त्यांची सून शुभांगी अगदी मनापासून करत असे सर्व.. सासूबाई काही बोलू नये.. म्हणून पाळी पुढे ढकलायच्या गोळ्या घेणे.. हे सर्व पण ती करत होती...
पण जसे वय वाढत होते तसे शांती बाईंचे वागणे अगदी हाताबाहेर जात चालले होते... सर्व थकले होते त्यांना समजावून... मागच्या वर्षी गणपती आला आणि पूर्ण काळजी घेऊनसुद्धा शुभांगीची पाळी आली... झाले यांनी खूप तमाशा केला... सून बिचारी घाबरून गेली होती... पण या वेळेस त्या ठाम होत्या.. त्यांनी कोणाला न विचारता स्वतःहून परस्पर घोषीत केले की पुढच्या वर्षीपासून गणपती आणायचा नाही... या एवढ्या पोरी.. कोणाची ना कोणाची पाळी असणारच... "त्या देवाचे मी एवढे केले पण त्याला दया नाही माझी.. एक नातू दिला असता तर काय बिघडलं असते त्याचे....!!!"
आता सर्वांना कळले की हिला गणपती का बंद करायचा आहे?? सर्व त्यांना समजावून आधीच दमले होते... पण त्यांच्या विचारात काही बदल होत नव्हता... आणि त्यांचा हेका त्या सोडत नव्हत्या.. असे झालेच पाहिजे.. अन् तसे झाले पाहिजे... आणि मुली असल्यामुळे काही ना काही तरी अडचणी येत होत्या... त्या दिवशी त्या खूप चिडल्या... न जेवताच झोपल्या...
घरात सर्वांचा विरस झाला, सगळ्या जणी आजोबांकडे गेल्या... शेवटी शशिकांत रावांनी मनावर घेतले, त्यांनी सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका... मी बघतो काय ते... त्यांनी एक युक्ती केली...
त्यांनी छोटी गणपतीची मूर्ती घेतली.. अन् आजीच्या उशीजवळ ठेवली... अन् स्वतः लपून बसले.. आजीने त्या मूर्तीला हात लावताच ती मूर्ती बोलू लागली... आजोबांची कमाल होती.. पण आजीबाईंना मात्र खरेच वाटले....
मूर्ती बोलत होती, "अगं बालिके तुझी भक्ती बघून मी प्रसन्न झालोय.. म्हणून आज मी तुला भेटायला आलोय, आज तुझ्यावर मात्र मी रागावलो आहे, मला जास्त काही नको गं, मी फक्त खऱ्या भक्तीचा भुकेला आहे, मला हा मखर, सजावट, पंचपक्वान्न काही नको गं... मला एका पाटावर बसवून माझी श्रद्धेने पूजा केलीत तरी मी प्रसन्न होतो गं... मुली झाल्या म्हणून तू रागवले आहेस माझ्या वर पण भेद करू नको... तुझ्या नाती खूप गुणाच्या आहेत... त्या तुझे नाव नक्की रोशन करतील... काही अडचणी आल्या तर मला साध्या पाटावर बसव, पण मला तुझ्या घरी यायचंय, साधी केली तरी चालेल पण मला तुम्हा सर्वांकडून सेवा करून घ्यायची आहे...अगदी साध्या पद्धतीने केले तरी चालेल... पण असे बंद करू नको मला..."
शांती बाईंना खरे वाटले...त्यांनी धावत जाऊन गणपतीची क्षमा मागितली... घरात सर्वांना हाक मारून घडलेली हकीकत सांगितली... आणि बाप्पा दरवर्षीप्रमाणे आणायचा असे सांगितलं... घरात आनंद झाला...
आजोबांची आयडिया काम करून गेली... एवढे दिवस सगळ्यांनी सांगून जे समजले नाही... तें त्यांना आता पटले...
अजूनही समाजात बऱ्याच ठिकाणी परंपरेच्या नावाखाली बऱ्याच गोष्टी अतिशयोक्ती म्हणून केल्या जातात.. त्यावरून ही कथा सुचली आहे....