डर के आगे जीत है
डर के आगे जीत है
नदीच्या डोहात बुडणाऱ्या दोन शाळकरी मुलांचा जीव एका धाडसी युवकांने वाचविला अश्या आशयाच्या बातम्या वाचायला मिळते तेंव्हा त्या धाडसी मुलांचे मनोमनी कौतुक करावेसे वाटते. टीव्हीवर एका कोल्ड्रिंक्सची जाहिरात चालू होती. शेवटचे वाक्य फारच महत्वाचे होते, ते म्हणजे डर के आगे जीत है । भिऊन कोणते काम केलं नाही तर त्यात यश कसे मिळणार ? हेच त्या जाहिरातीमधून सुचवायचे असेल कदाचित. घाबरून घाबरून जगण्यात काही अर्थ नाही म्हणून शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगण्यात खरा अर्थ आहे असे म्हटले जाते. पण काही वेळा चार पाऊल मागे जाणे हे देखील शहाणपणाचे लक्षण समजल्या जाते. सिंह चार पावले मागे जातो ते हार म्हणून नाही तर अधिक त्वेषाने झेप मारता यावी म्हणून. त्यासाठी आपल्या अंगी धैर्य आणि धाडस असणे आवश्यक आहे. फक्त त्याचा वापर योग्य ठिकाणी करण्याचे शहाणपण ही गरजेचे आहे.
लहान असतांना मुलांच्या मनात काही गोष्टीविषयी अनाहूत भीती निर्माण केल्या जाते जे की आयुष्यभर त्याच्या सोबतीला राहते. अंधारात भूत राहते ही बालपणी सांगितलेली भीती आजीवन सोबत असते. म्हणून अंधाऱ्या खोलीत जायला कोणालाही भीती वाटते. दूर कुठल्यातरी विस्तीर्ण चिंचेच्या झाडावर भूतांचे वास्तव्य आहे असे लहानपणीच्या मेंदूला शिकवण दिली जाते. जे की अनेक वर्षे जात नाही. म्हणून बालपणी मुलांवर असे भीतीदायक संस्कार करणे टाळावे. बहुतांश वेळा आपल्या हातून नकळतपणे असे काही घडत जाते की, मुलांच्या मनात धैर्य निर्माण होण्याऐवजी भीती निर्माण होते. काही वेळा डरना मना है । असे सांगणारे डरावणी चित्रपट पाहून माणूस अजून घाबरून जातो.
ज्याप्रकारे राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणापासून रामायण व महाभारतातील प्रसंग सांगून त्यांच्यामध्ये धैर्य निर्माण करण्याचे काम केले. म्हणून तर ते बलाढ्य अश्या मुघलांच्या विरुद्ध उभे राहण्याचे धाडस करू शकले. औरंगजेबाच्या तावडीतून सुटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाईच्या पेटाऱ्यातुन बाहेर पडण्याचे धाडस दाखवू शकले म्हणून तर त्यांच्या तावडीतून बाहेर पडू शकले. असेच काही शौर्य आपल्या मुलांमध्ये निर्माण करायचे असेल तर त्यांच्यात साहस निर्माण करावे लागेल. त्यासाठी सर्वप्रथम आपण धाडसी असणे आवश्यक आहे. धाडसी माणसेच इतिहास घडवू शकतात हे आजपर्यंतच्या इतिहासाच्या अभ्यासावरून लक्षात येते. धाडस दाखविणाऱ्या शूरवीरांना भारत सरकार द्वारे शौर्य पुरस्कार दिल्या जाते. संकटात सापडलेल्या व्यक्तींना मदत करण्याचे जो धाडस दाखवितो त्याचे जीव देखील धोक्यात असते. पण आपल्या जीवाची पर्वा न करता हे धाडसी व्यक्ती पुढे येतात. रमेश सिप्पीच्या शोले चित्रपटात डाकू गब्बरसिंग म्हणतो, जो डर गया समझो वो मर गया. खरेच आहे, नाही का ? जेंव्हा मनात कशाची भीती निर्माण होते तेंव्हा आपण जणू मेल्यासारखेच वागतो. अश्या घाबरणाऱ्या लोकांना भित्रे भागूबाई असे संबोधले जाते.
शूर माणसासोबत राहिल्यास मनात शूर होण्याची अभिलाषा निर्माण होते तर डरपोक आणि घाबरणाऱ्या माणसासोबत राहिल्यास मनात अजून घबराहट होऊ लागते. सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचा कहर चालू आहे. संसर्गजन्य विषाणूचा फैलाव वाढत चालल्यामुळे आज प्रत्येकजण स्वत:ला घरात कोंडून ठेवले आहे. त्याच्यापासून वाचण्यासाठी घरातच थांबणे हेच सुरक्षित उपाय आहे. अशा काळात डॉक्टर, परिचारिका, आशा वर्कर्स, सफाई कर्मचारी, पोलीस या सर्वांच्या धैर्याचे आणि धाडसाचे करावे तेवढं कौतुक कमीच आहे. रुग्णाची सेवा करतांना अनेक डॉक्टर, परिचारिका आणि पोलिसांना देखील कोरोनाची लागण झाली. काही जणांना त्यात आपला जीव ही गमवावा लागला. सध्या प्रत्येक मानवावर आलेली ही संकटाची वेळ मोठ्या धैर्याने व धाडसाने पार करणे अत्यंत गरजेचे आहे. कोणीही बेजबाबदारपणे वागणे टाळायलाच हवे. आपली सुरक्षा म्हणजे आपल्या कुटुंबाची, घराची, गावाची अर्थात देशाची सुरक्षा आहे, याची जाण प्रत्येकांनी ठेवावी आणि तसे वर्तन करावे.
