Pratibha Tarabadkar

Drama

4.7  

Pratibha Tarabadkar

Drama

डंख-भाग २

डंख-भाग २

6 mins
308


भाग २

 आकाश म्हणतोय त्याला शलाकाशी लग्न करायचं नाहीये. 'मनोहरराव एका दमात बोलले. 'काय?'शलाकाचे आईबाबा ओरडले.'होय, तुम्ही ऐकलंत ते बरोबर आहे.आकाशला शलाकाशी लग्न करायचे नाहीये.'मनोहरराव ठामपणे म्हणाले.पाण्याचे ग्लास आणणाऱ्या शलाकाच्या हातांना कंप सुटला.

 'अहो पण का?' शलाकाच्या बाबांचा स्वर थरथरला.'त्याला वाटतंय तुमची मुलगी त्याच्यासारख्या आय.टी.मध्ये काम करणाऱ्या इंजिनिअरला सूट होत नाही.'मीनाताई ठसक्यात म्हणाल्या. 'तुमची मुलगी'...शलाकाच्या काळजात कळ उठली. त्या शब्दाने एका क्षणात दंडग्यांनी शलाकाला परकी करून टाकलं होतं. शलाकाच्या तळहातावरील फिकट होत चाललेल्या मेंदीवर अश्रूंचे दोन थेंब ओघळले.'अहो पण शलाका बी.एड.आहे, शाळेत नोकरी करतेय ही गोष्ट तर आधीपासूनच माहीत होती आकाशला. इतके दिवस त्याच्या लक्षात आलं नाही? आणि आता साखरपुडा झाल्यावर लगेच त्याला हे जाणवलं?' शलाकाच्या आईचा संयम सुटू लागला.

 'हे बघा, लग्न झाल्यावर काही कॉंप्लिकेशन्स नकोत म्हणून आधीच लग्न मोडलेले बरे. 'प्रत्येक शब्दावर जोर देत मनोहरराव म्हणाले तशी शलाकाचे बाबा उसळलेच. 'असं कसं म्हणता साखरपुडा मोडला म्हणून? ती काय भातुकली आहे ? लहर आली मांडली, लहर फिरली, मोडून टाकली? 'बोलता बोलता शलाकाच्या बाबांचा आवाज चढला.' आधी सांगितलं असतंत तर साखरपुड्याचा घाट घातलाच नसता आम्ही!' बोलतांना शलाकाच्या बाबांचा आवाज चिरकला. नाकपुड्या फुगल्या, कपाळावरच्या शीरा तटतटल्या.

 'काय साखरपुडा साखरपुडा सांगताय सारखं? हवंतर झालेला खर्च भरून देतो.' दंडग्यांनी खिशाकडे हात नेण्याचा आविर्भाव केला फक्त! त्यांचा तो अभिनिवेश ,त्यांचा पवित्रा बघून शलाकाचे आईबाबा अवाक् झाले. त्यांची ती आक्रमकता स्वतः ला वाटणारी अपराधीपणाची भावना लपविण्यासाठी तर नव्हती? पण दंडगे पती-पत्नी बसले होते चेहऱ्यावर बेफिकिरी झळकवत.लगेचंच दोघेही गुर्मीत उठून निघून गेले.

 शलाका बधीरावस्थेत बसली होती.सुन्न, निःशब्द!


त्या दिवशी प्रथमच शलाकाच्या घरी देवाजवळ दिवा लागला नाही.आईच्या श्लोकांचा आवाज घुमला नाही की अगरबत्तीचा सुगंध दरवळला नाही.होती निव्वळ उदासीन, निःशब्द शांतता!

 नेहमीप्रमाणे सरुबाईने दारावरची बेल वाजवली.शलाकाच्या बाबांनी दार उघडले.त्यांच्या चेहऱ्यावरील विषण्ण भाव पाहिले आणि ती आत गेली. डायनिंग टेबलच्या खुर्चीवर कपाळाला हात लावून बसलेल्या शलाकाच्या आईला बघून ती म्हणाली,'उठा बरं शलाकाच्या आई,अवं आयुष्यात चांगले वाईट प्रसंग येणारच, आपण त्याला तोंड द्यायची तयारी ठेवली पाहिजे.'शलाकाच्या आईने दचकून तिच्या कडे पाहीले.'म्हणजे? तुला पण बातमी कळली?'अहो ताई,'हातात केरसुणी घेत सरुबाई समजुतीच्या स्वरात म्हणाली,'चांगली बातमी रांगत रांगत घराबाहेर पडते पण वाईट बातमी तोपर्यंत गावाला प्रदक्षिणा घालून आलेली असते'.

 'लोकांना काय वाटलं असेल ही बातमी कळल्यावर? 'शलाकाची आई उद्विग्न स्वरात पुटपुटली.'ताई, लोकांचं काय घेऊन बसलात? त्यांना चघळायला काही तरी लागतंच. त्यांचा तो फक्त टाईमपास असतो. उद्या दुसरी बातमी कळली की तिकडे पळतील. आपण ताठ मानेने रहायचं. आपले प्रश्न सोडवायला लोक येणार आहेत व्हय! चला उठा शलाकाताई',बेडरुमचे पडदे उघडत सरुबाई उशीत डोकं खुपसून मुसमुसणाऱ्या शलाकाला उठवत म्हणाली.'काही आभाळ नाही कोसळलं. याच्यापरीस चांगला नवरा मिळणार आसंल म्हणून देवानंच अशी योजना केलीय अशी श्रद्धा ठेवा आणि उठून आंघोळीला जावा.'

 दुपारी शलाकाचे मामा मामी भेटायला आले.'असं कसं वागू शकतात दंडगे? इतके दिवस शलाकाचं शिक्षण,तिची नोकरी त्यांना माहित नव्हतं?आपण त्यांच्यावर फसवणुकीची केस लावू. पोलिसस्टेशनमध्ये तक्रार करू. 'मामा तावातावाने म्हणाला.

'त्याने काय होणार? त्यांना शिक्षा होईल एक वेळ पण शलाकाचं काय? देव वरुन बघतोय सगळं'.शलाकाच्या बाबांच्या थंड प्रतिक्रियेवर शलाकाची आई संतापली.'खड्ड्यात घाला तुमचं ते अध्यात्म. इतके दिवस श्रद्धेनं केलं देवाचं, काय फळ दिलं त्यानं आपल्याला?'

 शलाका बेडरूममध्ये बसून बाहेर चाललेले वादविवाद ऐकत होती. तिने निर्णय घेतला, उद्यापासून शाळेत जायचं. घरात बसलं तर तोच विषय सतत निघणार.बरं त्याने परिस्थितीत काही फरक पडणार आहे का?

 एक बरं झालं की लग्न मोडल्याची बातमी शाळेत कळूनही कोणी त्याचा उल्लेखही केला नाही. शाळेच्या हेडमिस्ट्रेस ब्रह्मे मॅडम अतिशय समंजस होत्या. त्यांनी सर्व टीचर्स ना आधीच कल्पना देऊन ठेवली असावी. शलाकाला सुटल्यासारखे झाले. तिचा दिनक्रम रोजच्या प्रमाणे सुरू झाला. मात्र एक गोष्ट ती कटाक्षाने पाळत असे. बिल्डिंगबाहेर पडल्यावर चुकूनही आकाशच्या घराकडे पहायचे नाही.बाबापणऑफिसला जाऊ लागले. लग्नाची खरेदी,साड्या वगैरे कपाटातील एका वापरात नसलेल्या खणात बंदिस्त झाले.

 'सरुबाई, समोरच्या बिल्डींगमध्ये कसली एव्हढी धामधूम चालली आहे?'शलाकाच्या आईने पोळी लाटता लाटता विचारले.'त्या दंडग्यांच्या पोराचं लगीन हाय नव्हं,'सरुबाई भांडी घासता घासता म्हणाली.'काय?' पोळीवरुन लाटणं फिरवणारे हात तटकन् थांबले.'मंग, म्हणून तर एव्हढ्या रुबाबात आपल्या शलाकाताईशी ठरलेलं लग्न मोडलं नव्हं,'सरुबाई तोंड वाकडं करीत तुच्छतेने म्हणाली.इतके दिवस 'जावायबापू' म्हणून कौतुकाने उल्लेख होणाऱ्या आकाशचा उल्लेख 'दंडग्यांचा पोरगा' असा केला. 'कोनीतरी हपिसातली हाय म्हनं, 'सरुबाई ने माहिती दिली. शलाकाच्या आईचं तोंड उतरलं.


 माझ्या बरोबर स्वप्नं पाहणारा आकाश, ज्याचं पान माझ्याशिवाय हलत नसे, मुलगा झाला तर आलोक नाव ठेवायचं इथपर्यंत बेत करणारा आकाश...दुसरी कोणी मिळाली तर आपल्याशी असलेले बंध इतक्या निर्दयीपणे तोडूनही टाकले? एव्हढी प्रतारणा? शलाकाच्या डोळ्यातून घळाघळा आसवं वाहू लागली.

 दंडग्यांच्या बिल्डिंगवर रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा सोडल्या होत्या.मंद सूरात शहनाईचे स्वर ऐकू येत होते.संध्याकाळी वरच्या मजल्यावर रहाणाऱ्या पिटकरवहिनी यायला आणि शलाकाचे बाबा ऑफिस मधून आल्याने दार उघडायला एक गाठ पडली.पिटकरवहिनी भारी साडी तर नेसल्या होत्याच पण कधी नव्हे तो मेकअप ही केला होता.शलाकाच्या आईला दारात बघून मुद्दाम पोंक्षेवहिनींशी मोठ्याने बोलू लागल्या,'आकाशच्या लग्नाचं रिसेप्शन फाईव्हस्टारमध्ये ठेवलंय हे बरं केलं बाई,नाहीतर एखाद्या हॉलमध्ये लग्न लावून मोकळे होतात लोक ,' पिटकरवहिनींचं ते ठसकेबाज बोलणं ऐकून शलाकाची आई अवाक् झाली. याच का त्या बाई, ज्या शलाकाच्या थाटात संपन्न झालेल्या साखरपुड्याचं तोंड भरून कौतुक करत होत्या!

एकाच स्थितीत बसल्याने शलाकाचे अंग आंबून गेले होते.सतत पेपर्स तपासल्यामुळे डोळ्यांवरही ताण आला होता.तिने हातातील लाल पेन खाली ठेवले आणि हात उंचावून आळोखेपिळोखे दिले.आता पेपर्सचा एकच गठ्ठा उरला होता.

 पेपर्सचा गठ्ठा घेऊन वर्गात शिरताच मुलांचा होणारा हल्लागुल्ला आठवून शलाकाच्या चेहऱ्यावर स्मित उमटले.डोळ्यावर पाणी मारुन परत पेपर्स तपासण्याचे ठरवून ती उठली आणि बेसिनवर डोळ्यांवर पाणी मारू लागली.

 धाडकन् दार लावण्याचा आवाज ऐकून ती दचकलीच.आई संतापाने फणफणत होती.'मुद्दाम मला ऐकू जाईल अशा आवाजात ती दंडगीण आपल्या सुनेचं कौतुक करत होती.किती हुशार आहे, आकाशला कशी शोभते,त्याच्या बरोबरीने कमावते,'आई नक्कल करीत बोलत होती.'दंडगीण',शलाकाला हसू आले.इतके दिवस आई बजावत असे, आकाशच्या आईला, दंडगेकाकूंना 'अहो आई' म्हणायचं, तुझ्या भावी सासूबाई आहेत त्या!


'जाऊ दे लता, सोडून दे आता सगळं.आकाश आणि शलाकाचं लग्न हा विषय संपला आहे.आकाशने आपल्या ऑफिसमधल्या मुलीशी लग्न केलंय हे सत्य तुला पचवायलाच हवं. 'शलाकाचे बाबा बायकोला मृदू आवाजात समजावित होते.'अशी कशी सोडून देईन?' आई तावातावाने म्हणाली. 'इतकी वर्ष एकत्र फिरले, सर्वसंमतीने साखरपुडा झाला आणि नंतर ऑफिसमधली मुलगी आवडली म्हणून लग्न करून मोकळा झाला?'आईचा संताप शीगेला पोहोचला होता.शलाकाने आवेगाने आलेला हुंदका परतवला. काय खोटं बोलत होती आई?

 'झाले ते झाले, आता शलाकाचं नाव वधू वर सूचक मंडळात घालायला हवे.' बाबा आईला म्हणाले तशी शलाकाच्या हातातील पेन थरथरले. माझं लग्न? आकाश सोडून दुसऱ्याशी? कसं शक्य आहे? आकाशच्या जागी दुसऱ्या कुणाला आपण स्वीकारू शकतो? नाही, शक्यच नाही. शलाकाने जोरजोरात मान हलविली.आकाश लग्न झाल्या झाल्या बायकोबरोबर नोकरीसाठी बंगलोरला निघून गेला असं कळलं तेव्हा शलाकाला हायसं वाटलं होतं.'दृष्टीआड सृष्टी'. पण अजूनही आपण त्याला विसरलो नाही हे तिला पदोपदी जाणवे. त्याच्या बाईकच्या हॉर्न‌‌‌ सारखा आवाज आला की तिला त्याचा भास होई. शाळेतही हजेरीच्या वेळी आलोक मेहताला ती चुकून आलोक दंडगे म्हणून पुकारत असे तर कधी आकाश तिच्या कानात 'अहो आलोकच्या आई' म्हणून कुजबुजतोय असा भास होत असे.

 मनातील वादळ लपविण्यासाठी शलाका स्तब्ध होऊन उभी होती. तिची मूकसंमती समजून आईबाबांनी तिचं नाव शुभमंगल वधू-वर सूचक मंडळात घालायचे ठरविले.आईने शेजारच्या पोंक्षे काकूंना घेऊन एका ज्योतिषाकडून शलाकाची पत्रिका करून आणली आणि बाबांबरोबर वधू वर सूचक मंडळात गेली.मंडळाच्या बाईंनी दिलेला फॉर्म काळजीपूर्वक भरला.मुलीची रास, नक्षत्र,गण इत्यादी...पण marital status या रकान्यापाशी थबकले.लोकांपासून सत्य लपवून ठेवायचं नाही कारण ते कुठून तरी उघडकीस येतंच या मताचे शलाकाचे आई-बाबा असल्याने त्या रकान्यात त्यांनी साखरपुडा होऊन लग्न मोडले असे स्पष्ट लिहिले.पैसे आणि फॉर्म बाईंकडे सुपूर्द केला.बाईंनी तो काळजीपूर्वक तपासला.त्या साखरपुडा मोडला या वाक्यावर थबकल्या.'चौकशी केली नव्हती का?'त्यांच्या या प्रश्नावर आईबाबांनी एकमेकांकडे हताशपणे पाहिले.जो मुलगा रात्रंदिवस डोळ्यासमोर होता त्याची चौकशी काय करायची?

फॉर्म भरल्यानंतर शलाका साठी स्थळं येऊ लागली. शलाकाच्या आई-बाबांना उत्साह आला.पण हळूहळू लक्षात येऊ लागले की लोकांना स्थळ म्हणून नव्हे तर शलाकाचा साखरपुडा का मोडला यातच जास्त इंटरेस्ट आहे. एका मुलाने शलाकाशी फोनवरून बोलल्यावर तिला तो बरा वाटला.दोघांनी हॉटेलमध्ये भेटायचे ठरविले.त्याप्रमाणे दोघे भेटलेही.पण आल्यावर शलाकाने सांगितले की तो तिच्याशी लग्न करून तिच्यासारख्या साखरपुडा मोडलेल्या मुलीशी लग्न करून तिचा उद्धार करणार आहे, तिच्यावर उपकार करणार आहे असा आव आणत होता.ताबडतोब सर्वांनुमते त्याला नाकारण्यात आले.साखरपुडा मोडला म्हणजे काय मोठा गुन्हा झाला? त्याला शलाका जबाबदार होती?

 दुसऱ्या मुलाशी शलाका chatting करू लागली. प्रत्यक्ष भेटण्याचा अनुभव घेतल्यावर तिने हा निर्णय घेतला होता.थोडा वेळ chatting करून झालं आणि शलाकाने laptop बंदच करून टाकला.'आई, बाबा माझ्या लग्नाचा विषय बंद. मी मुळीच लग्न करणार नाही.'शलाका संतापाने थरथरत होती.आईबाबा धसकलेच.'काय झालं?'आईने चाचरत विचारले

 'साखरपुडा झाला होता म्हणजे किती पुढे गेला होतात म्हणून विचारत होता निर्लज्ज',शलाकाच्या डोळ्यात शरमेने पाणी जमा झाले होते.'किती पुढे म्हणजे?अरे देवा',त्याचा अर्थ लक्षात येऊन आईने कपाळाला हात लावला.काय काय भोगावं लागतंय माझ्या बाळीला' शलाकाच्या आईचं मन मायेनं,काळजीनं भरुन गेलं.

 तेव्हापासून शलाकाचं लग्न हा विषय मागे पडला.शलाका आपल्या शाळेत, विद्यार्थ्यांमध्ये रमली होतीच आता वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटीजमध्ये गुंतून राहू लागली.दिवस पुढे सरकत होते.

 पोंक्षेकाकू दुपारी सहज म्हणून शलाकाच्या आईकडे आल्या.'शलाकाच्या आई, कळलं का? दंडग्यांच्या आकाशचा घटस्फोट झाला'.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama