Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Vasudev Patil

Thriller Others


0.6  

Vasudev Patil

Thriller Others


छपऱ्याची मंजा

छपऱ्याची मंजा

25 mins 1.0K 25 mins 1.0K

चैती अष्टमीस देवीच्या भंडाऱ्याचं कढाणीतलं मटण खाऊन खिरणीकर तृप्त ढेकर देत गरमाईत झोपण्याच्या तयारीस लागले. पण पाटलाचा गणा मात्र मटण खाऊन खलाटीत निघाला. गुढीपाडव्यास बऱ्याच वावरातला गहू कापला गेला होता. पण गणाचा गहू पसाद असल्यानं शेवटचं पाणी फिरवून तो ही कापणी करणार होता.म्हणून शेवटचे राहिलेले दहा-बारा पाळगे आज भरले की झालं,असा विचार करत तो खलाटीत निघाला.जातांना सब-स्टेशन लागलं.मागच्या यादेनं व दिवसभराच्या मटणाच्या वासानं त्याच्या अंगावर काटा उभा राहिला.

 गोवंडी वाटेतून फपाट्यातून तो चालू लागला. तसं आभायातून उगवलेला अर्धा चांद ही त्याच्या पुढे पुढे सरकू लागला.वाटेच्या कडेच्या साबरीतून चांदाचा रूपेरी प्रकाश झिरपत फपाट्यात सांडत होता.वर पाहता पाहता फपाट्यात फिश सुई सुई सू आवाज आला नी गणानं चांदावरची नजर खाली फेकत उडी मारत दौड लावली.त्याचं सारं अंग शहारलं.नाडीचे ठोके वाढत छाती धडधड करू लागली.घरून निघतांनाच बाबानं काठी ठोकत चालायचं बजावलं होतं.'या दिवसात रात्री फपाट्यात गोवंडीत जनावर पडलं असतं' हे आठवलं नी तो हातातली काठी आपटत लांब लांब फर्लांगी भरू लागला.

  मळ्यात येताच उंबराच्या छायेतली धाव त्याला घाबरवू लागली.उंबराखालचं बैलाचं गोळा करून ठेवलेलं शेण उचलत थाळण्याजवळच्या कुंड्यातून भरलेल्या बादलीत कालवत पाईपात टाकलं.फुटबाॅलची झडप खाली पडून चार-पाच बादल्यात पाईप भरला.त्यानं ओले हात मनिला पॅन्टला पुसत स्टार्टर उचलताच 'गुईंग टर्रर्र फट' आवाज करत मोटारीनं पाणी धरलं.गणा दांडातून सरकणाऱ्या पाण्यासोबत गव्हाच्या राहिलेल्या पाळग्याकडं सरकू लागला.दांडाच्या पाण्यातून अष्टमीच्या चांदव्याचं चांदणं वाहत चाललं होतं.वातावरणात दिवसाची गरमाई कमी होत थंड सुरकी चालायला लागली होती.पिवळ्या भरलेल्या गव्हाच्या लोमा त्या सुरकीत लईत डुलत होत्या.चांद आता वर वर चढत होता.गव्हाच्या पाळग्यातून गजा विहीरीकडं पाहू लागला.भलं मोठं उंबराचं झाड सुरकीनं हालत असेल तरी अंतरावरून त्याला झटाधारी साधू ध्यानास बसल्यागत भासत होतं.त्याची सावली मात्र आता धावेकडून हळूहळू सरकत चांदाच्या प्रकाशानं विहीरीपलिकडे जात विहीरीवरील चुन्या सिमेंटात बांधलेल्या थाळण्याच्या हुडाच्या भिंती चमकत होत्या.

 एका पाठोपाठ पाचेक पाळगे भरले गेले.आता अर्धा चांद फिकट तांबूस होत मावळणीकडं झुकायला लागला.तोच निरव शांततेत मोटारीचा 'खट' आवाज होत सुरू असलेला गुईंग असा आवाज बंद होत मोटारीनं पाणी सोडलं.गजाला विहीरीकडं जायला भिती वाटत असतांनाही जाणं भाग होतं.पाळग्यातून तो खालच्या बांधावरनं होत चिंचेच्या झाडाकडनं विहीरीकडं येऊ लागला.चिंचेच्या झाडावर वाऱ्याच्या सुरकीत पिकलेल्या चिंचा एकमेकींना ठोकल्या जात होत्या.गजाच्या याच झाडाच्या चिंचाची चिंचवाणी करत खिरणीकरांनी सिमग्याला शेवाळ्या चोपल्या होत्या. महिना उलटायला आला होता तरी झाड चिंचांनी लगडलेलंच होतं.आता आखाजीस येणाऱ्या सासुरवाशिणी लेकीबाळीदेखील आपल्या सासरी वानवळा म्हणून याच चिंचा नेतील.

गणाचा सासुल लागताच झाडावरील भारद्वाज पंखाची फडफड करत उडाला . त्यानं गजाच्या अंगाचा थरकाप उडाला व तो वर पाहू लागला.भारद्वाज उडत उडत विहीरीच्या उंबरावर विसावला.गजानं विहीरीवर येत फ्यूज पाहीले.नंतर पाळणकडं श्रीपत पाटलाच्या मळ्यातील लाईटकडं पाहताच तो बंद झालेला दिसतात एक डिवो गेल्याचं त्याच्या ध्यानात आलं.त्यानं कुंड्यात पाय धुत खिशातनं कातरलेली सुपारी काढली व तोंडात टाकली.आता कोणी तरी ट्रांन्सफाॅर्मरवर जाऊन डिवो टाकेल तेव्हाच मोटार सुरू होईल.पण शिवारातले बरेच गहू कापले गेल्यानं भरणा जवळपास आटोपलाच होता.पण त्याला तरी विहीरीवर थांबायला भिती वाटू लागली.मागच्या वर्षापासुन त्यांनी मळ्यातला मुक्काम सोडलाच होता.आज मात्र काही करून राहिलेला गहू भरावाच लागणार होता व श्रीपती पाटलांचा भुईमुग व ऊस असल्यानं ते जातीलच म्हणून तो धावेपासुन लांब कापूस काढुन रिकाम्या झालेल्या शेतात आला.थंड सुरकी,मटनाचं चेपलेलं जेवण यानं डोळे जड झाले.खालचे ढेकळं साफ करत त्यानं लाईटची वाट पाहत अंग टाकलं.नी भितीवर गाढ झोपेनं मात करत गजा घोरू लागला.

 चांद बुडाला.कुणीतरी डिवो टाकला असावा.स्टार्टरची पेटी लटकवलेल्या पोलवरील बल्ब पिवळा प्रकाश धावेवर, थाळण्यात फेकू लागला. पण गजा मात्र गव्हाला पाणी भरायचं सोडून फर्राट घोरत होता.घोरता घोरता त्याला पहाटेच्या थंड वाऱ्यानं की हसण्याच्या आवाजानं तीनच्या सुमारास थोडी जागेची जाणीव आली. त्याला पडल्या पडल्या हसणं कानावर ऐकू येऊ लागलं.सुरुवातीस आपण कुठं झोपलोय, हे त्याला कळेना. पण खाली टोचणाऱ्या खड्यांनी व गोवंडी वाटेकडनं येणाऱ्या कर्णकर्कश 'टिटीव टिव,टिटीव टिव,टिटिटीव' टिटवीच्या आवाजानं आपण मळ्यात झोपलोय हे समजण्या इतपत सुध त्याला आली.पण हसतंय कोण?म्हणुन त्यानं पडल्या पडल्या डोळे किलकिले करत विहीरीच्या धावेकडं पाहिलं. बल्ब सुरू दिसताच लाईट आलीय हे त्यानं ओळखत नजर थेट आवाजाकडं थाळण्यात नेली.थाळण्यात त्याला पडल्या जागेवरून जे दिसत होतं त्यानं त्याची सारी उरलीसुरली झोपेची धुंदी पळून त्याच्या काळजाची धडधड जोरात वाढू लागली.कुणीतरी थाळण्यात आभाळाकडं तोंड करून झोपलं असावं.त्यानं आपले पाय वर करत पावलावर एका छोट्या मुलाला पोटावर तोललेलं होतं.हातानं मुलाचे हात धरत तो मुलाला पायानं वरखाली करत होता व तो मुलगा जोरजोरात हसत होता

"बाबा गुदगुल्या होताहेत उतरवा ना.बाबा , बाबा सांभाळा हळू ना! विहीरीत पडेन बरं!" मुलगा हसता हसता विनवत ही होता.

"नाही रे नाही पडू देणार!"असं म्हणत खालचा माणुस जोरजोरानं मुलाला पायानं वर खाली करत हसवत होता.

गजाला आता तो माणुस थाळण्यात दिसत नसला तरी त्यानं तो छगन छपरी असल्याचं मुलावरून ओळखलं.गजाला पडल्या जागी थंड वाऱ्यातही दरदरून घाम फुटला व त्याचं सर्वांग ओलं झालं.आता काय करावं त्याला सुधरेना.उठुन पळावं तर त्याच्या अंगातली शक्तीच ,सारी गात्रे गलितगात्रे झाल्यागत झालं. तो पडून पडून तसाच पाहू लागला.

 "गटल्या माफ कर.....मी खादाड, हाफशा, अप्पलपोट्या आहे,असं तुझ्या मंजा मायला वाटतं.पण तुझ्या मंजा मायला दाखवू रे आपण की मरुनही मटण खायला नाही येता येत.नी मरू पण मटण खाणारच नाही आपण....चल"असं म्हणत त्या छगण्यानं पायानंच गटलूला फुटबाॅलसारखं विहीरीत उडवलं. पोरगं "बाबाsssssssss.बा..."आक्रोश मांडणार तोच "चुबाॅक..टुब ⚡⚡💦💦 करत विहीरीत आवाज व पाठोपाठ पाणी उडालं.नी छगण्यानंही "गटल्या थांब मी पण आलोच म्हणत पाण्यात उडी घेतली......

गजाची झोपल्या जागेची ढेकळं भिजून केव्हा मऊ झाली हे कळायच्या आत गजानं उठत वाऱ्याच्या वेगानं गावाकडं धूम ठोकली.तोच मागून छगन्या व पोरगं गटलू पाठलाग करू लागलं.

"गजा पाटील! पळू नका थांबा थांबा.अहो ऐका ना पळू नका .मी छगन छपरी.आमच्या मंजीस निरोप द्यायचाय हो." छगन सारखा पाठीमागं धावतोय व आपलं मानगूट पकडेलच म्हणून गजा ऊर फुटेस्तोवर धावत होता.इतुकलं बारकं गटलू ही आपल्या बापासोबतच भन्नाट धावत गजाला टिपायला करत होतं.

"गजा पाटील,एका वर्षात ओळख विसरलात का?थांबा जरा नी ऐका . आमच्या मंजीला फक्त एवढं सांगा की आज खिरणीच्या गावदेवीच्या भंडाऱ्यात साऱ्या गावानं मटण चेपलं पण तरी आम्ही नाही आलोत मटण खायला!आम्ही इतके खादाड नाहीत की मरूनही खायला येऊ!द्या हो एवढा निरोप"

गजा पाटील गोवंडी वाट ,साबरी ,बांध जे लागेल ते तुडवत धावत होते.दम फुटुन ऊर बाहेर यायला करत होता.गजा पाटील गावाकडं धावत होते असं त्याला वाटत होतं पण पहाटेचा झेंडू फुटेस्तोवर गजा पाटील सारं शिवार धावतच होता .पण त्याला गाव काही सापडत नव्हतं.खिरणीत पहाटेचा कोंबडा आरवण्या आधीच टिटव्यांनी कल्लोड करत लोकांना जागं केलं.तोच एकानं गावात सब स्टेशन जवळ गजा पाटील पडल्याची बोंब ठोकली.सारा गाव गोळा झाला.पण गजा पाटील तर केव्हाच गाव सोडून गेला होता.कालचं मटण तर बाधलं नाही?असा जो तो शंका व्यक्त करू लागला.पण अंगावरच्या फाटलेल्या कपड्यांनी ती शंका ही बाद केली.उशीरानं आलेल्या डाॅक्टरानं 'ह्रदयविकाराचा झटका' इतकंच त्रोटक सांगत साऱ्या शंका बाजुला करत गजा पाटलाला अखेरचा निरोप देण्यासाठी अंगणात लाकुड,गोवरी पेटवत हलगी घुमवली.

पण आता खिरणीत जेव्हा जेव्हा मटणाचा भंडारा व गोंधळ होणार होता. तेंव्हा तेंव्हा छगन छपरी गटलूसहीत मंजाला सांगण्यासाठी येणारच होता अशी पुसट देखील शंका कुणास आली नाही.


       भाग::-- दुसरा


  सब-स्टेशनच्या गेटजवळ सकाळी सकाळीच एवढी गर्दी पाहून आॅपरेटर मंजिरी दातेनं पुढे जात पाहिलं असता तिच्या अंगाचा थरकाप उडाला.एका वर्षांपासून ती सहसा कुणाच्याही भानगडीत न पडता आपापलं काम पाहत राहत होती.गजा पाटील नाव ऐकताच याच्याच मळ्यातील विहीरीत मागच्या वर्षी छगनराव व गटलू ......

होय एक वर्ष झालं तरी तो आघात आपण विसरू शकलो नाही.घातकी गेला तर गेला गटलूसही घेऊन गेला.निदान गटलू राहिला असता तर जिवनाचा आधार तरी..! 

"मॅडम रात्री गव्हास पाणी भरण्यासाठी गेला होता मळ्यात नी अचानक गेला बिचारा!लोक म्हणताहेत कि कालच्या देवीच्या भंडाऱ्याचं मटण बाधलं." शिपाई विचारतंद्रीत हरवलेल्या मंजिरी मॅडमला सांगत होता.'मटण' शब्द ऐकताच तिची विचारतंद्री तुटली.मटणावरुन तर झालं होतं नी गेला कुंकवाचा नामधारी असलेला! काल भंडाऱ्यात मटणाच्या कढाणी पाहूनही तिला छगन व गटलूविषयी मनात कढाचा उकळ फुटलाच होता.नी आज ज्याच्या मळ्यातल्या विहीरीत दोघे गेले तोच मरुण पडलाय!तोही नेमका आपल्या आॅफिस समोर? कालचा भंडारा व आजचा प्रकार काय संबंध असावा आपल्या जिवनाशी?... मंजा विचाराच्या वावटळीत गुंतली.

  दिवसभर नंतर तिचं चित्त कामावरही थाऱ्यावर नव्हतं.सारखे तेच तेच विचार येत होते.कढाणीत रटरट शिजतं मटण, सुटलेला वास, नी छगन! मटणासाठी हपापलेला छगन!खाताना साऱ्या जगाचा विसर पडलेला छगन.आपली तर त्याला सुधबुध ही नव्हती.नाहीतरी आपणही कुठं त्याला...! मंजा कढाणीतल्या बोकडाच्या मटणानं शिजत शिजत वरखाली फिरावं तशी भुतकाळ वर्तमानात फिरू लागली. त्याच तंद्रीत तिनं रजेचा अर्ज रखडला व केंद्रातल्या क्वाॅर्टरवर आली.

  रुममध्ये घुसताच तिला मटणाचा वास आला.आणि मग तिचं डोकं जास्तच भणाणलं.नेमकं काय बिनसलं की एका वर्षात पुन्हा आपणास छगन,गटलू आज पुन्हा पुन्हा स्मरताहेत.ती पडल्या पडल्या विचार करू लागली.डोळ्याच्या पाणावू लागल्या.आपल्या आयुष्याच्या कॅनव्हांसवर चितारणारा येतो नेमकं त्यावेळीच घोळ का व्हावा... ? दोष कुणाचा?नंदन नायकाचा? वडिलांचा?छगनचा? की ..त्या नराधमाचं तर नाव ही नको! मग आपल्या प्रारब्धाचा?की आपलाच? गाठीत गाठी अडकू लागल्या.ती गाठी सोडू लागली पण गुंथनकाला वाढू लागला.

  मंजिरीचं आय टी.आयमधील इलेक्ट्रीशियनचं दुसरं वर्ष. होस्टेलमध्ये राहुन ती राहिलेले चार महिने काढू लागली.मैत्रिणीच्या गावाचाच रंजन गाडेकर काॅलेजसमोरील इंजिनिअरिंग काॅलेजला डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला होता. दोन्ही काॅलेजला लागुन असलेल्या कॅन्टीनला अधुनमधून नजरेस पडू लागला.मैत्रिण त्याच्याच गावची म्हटल्यावर तिला चहा काॅफीसाठी आग्रहानं बोलवू लागला.घरची परिस्थिती गडगंज .चहा काॅफीवरून रविवारी सुटीला बाहेर जेवणासाठी आग्रह होऊ लागल्यावर मंजिरीनं साफ धुतकारत मैत्रिणीलाच टाळलं. मंजिरी होस्टेलवरच थांबत मैत्रिणीला बाय बाय केलं.पण रंजन माघार घेणारा नव्हता.

 शहरात चिकनगुणीयाची साथ सुरू झाली.त्यात पावसाळाही सुरू झाला.परिक्षा जुलै अखेरीस होणार होत्या.मंजिरी तापानं फणफणली.त्यात जवळ पैसे ही नव्हते.हाता पायाचे सांधे दुखू लागले.तिला उठणं ही मुश्कील झालं.मैत्रिणीनं रंजनच्या मदतीनं तिला अॅडमीट केलं.पुढचे दोन दिवस सारं रंजननच पाहिलं.सर्व धावपळ बिलींग सारं त्यानच केलं.नंतर गावाहून वडिल आले व त्यांनी आठ दिवस गावाला नेलं.पण त्या उपकारानं मंजिरीचा रंजनबाबतचा ग्रह बदलला.आता ती मोजकं का असेना पण बोलू लागली.नंतर मात्र परीक्षा होईपर्यंत रंजननं मोहिनीच टाकली.

  परिक्षा संपली.सर्व मित्र मैत्रिणींनी घाटात हिल स्टेशनवर एक दिवशीय रेनी ट्रिप ठरवली.मंजिरीनं नकार दिला पण तरी रंजन व मै्त्रीणीपुढं हार मानत ती निघाली. रंजननंच घरून आणलेल्या गाडीनं सर्वजण निघाले.

  घाटाचा वळणा. वळणाचा रस्ता गर्द झाडोऱ्यानं वेढलेला. नदी घाटावरून खाली फेसाळत उतरत होती तर रस्ता काठाकाठानं घाट चढत होता. पावसानं तर तुफान फटकेबाजी लावलेली. घाटाच्या पायथ्याला गाडी लावत तेएथून भाड्यानं बुलेट घेतल्या.रंजनच्या गबुलेटवर मंजिरी मागं बसली.थंडगारर वाऱ्यात पाऊस अंगाला झोंबत होता.वळणावळणावरर कच्चकन ब्रेक दाबताच मंजिरीचा ओलेता स्पर्श रंजनच्या काळजाचा ठाव घेत गाडीप्रमाणच धाडधाड ठोके वाढवतत होता.पूर्ण ओल्या कपड्यात तर मंजिरीच्या सौंदर्यात उठाव निर्माण होत होता. वरती पोहोचल्यावर साऱ्यांनी थांबत एका ठिकाणी चहा घेतला.चहावाला रंजनच्या ओळखीचा असावा.रंजननं त्याच्या कानात काहीतरी सांगितलं.तो हसतच मध्ये गेला.मंजिरीला आलं टाकलेल्या चहाची वेगळीच चव लागली पण थंडीनं गारठलेल्या मंजिरीनं तो घोटला.नंतर वरती बऱ्याच ठिकाणी फिरत आडोशाला फोटोसेशन करत धबधब्यावर मनसोक्त भिजले.मंजिरीला कैफ जाणवू लागला. फिरून आल्यावर पुन्हा त्याच ठिकाणी सर्वांनी जेवण घेतलं.नी घाटात दरड कोसळल्यानं रस्ताच बंद झाला.नाईलाजास्तव साऱ्यांना रात्र तिथंच घालवावी लागणार होती.घाटावर स्थानिक शेतकऱ्यांनी लागवड करत पावसाचा फायदा उचलला.

दुसऱ्या दिवशी सकाळीच घाट सुरू होताच सारी परतली.मंजिरीचं डोकं, अंग ठणाणू लागलं.

 मंजिरी गावाला आली.रंजन एम.टेक साठी गुवाहाटीस गेला.मध्यंतरी दाजीबा दातेची चुलत बहिण -मंजिरीची आत्या दाजीबाकडं आपल्या पुतन्यासाठी मंजिरीला मागणी घालायला आली.चुलतबहिणीचं हंबर्डीला दोन तीन एकर शेत होतं.पण तिला मुलबाळ नव्हतं.आपला पुतण्या छगनला तिनं आपले दिर जाऊ गेल्यावर सांभाळलं व त्यालाच दत्तक घेतलं.त्याच छगनसाठी आपली भाची सुन म्हणून करण्यास ती आली होती. पण एकुलती एक आय टी आय झालेली मंजिरीस आपल्या वेडपट गयबान्या चुलतभाच्यास देण्यास दाजिबानं साफ नाकारलं."आक्के माझी एकुलती एक परीसारखी शिकलेली लेक सोडून तू काहीही मांग मी नाही म्हणणार नाही पण पोरीचं नाव नको काढूस.आली आहेस सुखानं दोन चार दिवस रहा.पण पोरीचं जमणार नाही.तुला राग आला तरी चालेल.चुलत बहिण तोऱ्यातच निघून गेली.तिचीही मजबुरी होती की पुतण्या छगन पुरता गयबान्या असल्यानं दुसरी मुलगी मिळणं दुरापास्त होतं.

 घाटावरील पठारावर पेरली गेलेली ज्वारी आता छातीस लागत होती.व पुढील बहर पेलण्यासाठी ती पोघ्यात आली.

   मंजिरी ला आपल्यातले बदल जाणवू लागले.तिनं मैत्रिणीकडुन रंजनचा नंबर मिळवत संपर्क साधला.रडत रडत तिनं रंजनला घाटावर चहा, जेवनात काय मिसळलं व नंतर.... सारं विचारत आता काय म्हणून प्रश्नाचा भडिमार केला.रंजनला लगेच निघून येण्या विषयी परोपरीनं विनवलं.सुरवातीस रंजन तिला झुलवू लागला.मंजिरीची लक्षणं व बदलती वागणुकीनं दाजिबा हादरला.त्यानं प्रेमानं पोरीला विश्वासात घेत सारं विचारताच मंजिरी नं रडतरडतच वडिलांना सत्य कथन करत आपल्याला न कळत कसं फसवलं ते बया केलं. दाजिबाचा उभा देह होळीसारखा पेटू लागला.त्यानं रजनच्या घरच्यांची भेट घेत सारा प्रकार कथन केला.पण दामोजी गाडेकर एक बडी असामी.त्यांनी हसतच दाजिबाला उखडून लावलं.

"दाजिबा!त्याचं काय असतं,पोर नी रानातली बोर सारखीच.त्याची रखवाली व्यवस्थित करणं हे बापाचं काम!तरी बघतो आमचे रंजनराव काय म्हणतात."

"रंजनराव काय म्हणतील पेक्षा तुम्ही निर्णय घ्याना दामोजीराव!" दाजिबा काकुळतीला येत म्हणाला.

"मारत्या तुला गाडी काढायला लावली ना!मी रिकामा वाटतोयय का तुला!"दामोजीराव संतापून बोलताच दाजिबाकाय ते समजले व उठून चालायला लागले.

मंजिरीनं रंजनला नंतर संपर्क करत बरंच विनवलं पण त्यानं साफ उडवून लावत "हवं तर काय खर्च येतोय तो लगेच पाठवतो पण आता लगेच लग्न मला तरी शक्य नाही.या घडीला मला लग्नापेक्षा करिअर महत्वाचं आहे.नी एक मंजिरी,तु सांगतेय पण घाटात माझ्याकडून काही घडलंच नाही तर मी जबाबदारी का घेऊ..."

मंजिरीला या वाक्यानं तर तप्त कढईत आपल्याला कुणीतरी तळतंय असाच भास झाला.दिवस भराभर जाऊ लागले.गावात भब्रा होऊ लागला.दाजिबानं आता काही निर्णय घेतला.त्यांनी बहिणीस निरोप पाठवला.

"मंजिरी अजुनही रंजन तयार असेल तर माझी ना नाही.पण आता मात्र लवकरच काही तरी निर्णय घेणं मला भाग आहे.पोरी"

"......."मंजिरीच्या तोंडाऐवजी डोळेच बोलू लागले. खाली ओघळणारे आसवे हीच मूक संमती समजत दाजिबा उठला.

एव्हाना आत्याच्या कानावर सारा प्रकार जाऊनही ती धावतच आली.त्याला कारण थकलेलं वय व आपला गयबान्या पुतण्या.

"दाजिबा शहाण्या माणसांनं जातीचं लेकरू काळं का गोरं पाहू नये!नाहीतर बघ असं शेण खाण्यापेक्षा माझा छगन्या इज्जतदार आहे!" आत्यानं येता येताच दु:खावर डागण्या दिल्या.

दाजिबा उ की चू नाही, शांत घुम्यासारखा ऐकू लागला.

आठच दिवसात चाफेकळी नाकाची,दोन्ही गालावर चंद्ररकोरीच्या आकाराच्या खळ्या पडणारी,चवळीच्या शेंगेगत शेलाटी,गोरीपान मंजिरीचं छगनशी लग्न ठरत लागलं.लग्नाआधी आत्याचा पुतन्या गयबान्या आहे हे मंजिरी ऐकून होती पण पाहिला नव्हता.व तो किती गयबान्या आहे हे तिला अक्षता पडण्याआधी साफ कळलं.अंतरपाट खाली करत छगन "काकी लगीन ,ढिंच्याक ढिच्यांग करत मंजिरीकडं पाहत नाचू लागला. मंजिरीला आपल्या नकळत चुकीची इतकी कठोर शिक्षा मिळेल याची स्वप्नातही कल्पना नव्हती.तरी आपलं पाप माथी घेतोय म्हटल्यावर छगनचं कुंकू तिनं माथी लावलं.

आत्या जणू पुतन्याच्या लग्नासाठीच थांबली असावी या न्यायानं लग्नानंतर दोन महिन्यांनीच घाई घाईत देवाघरी निघून गेली‌ .

 छगन सकाळी सकाळीच दोन तीन शेळ्या ,म्हैस सोडून चरायला घेऊन जाई.दुपारी आला की भरगच्च पोटाला तडस लागेपर्यंत खाई.जेवण करतांना मंजिरीसाठी उरेल की नाही याचं त्याला सोयरसुतक नसायचं.रात्रीही तसच.जेवण उरकलं की मस्त मारतीच्या पारावर झोपायला गोधड्या घेऊन निघून जाई.जातांना मात्र गल्लीला ऐकू जाईल अशा आवाजात "मंजा जातो गं पारावर झोपायला,ऊशीर होतोय!"असा पुकारा करी. मंजिरीला मग रात्र खायला उठे.सारी रात्र ती तळमळत काढी.नी मग रंजनचा दगा तिला नागागत डसे.आता साऱ्या आयुष्याचाच विस्कोट झालाय या जाणिवेनं तर ती आणखी जास्तच सुन्न होई.गटलूचा जन्म झाला.मंजिरीला तर त्याकडं पहावसं ही वाटेना.मात्र छगनला गटलू झाल्याचा कोण आनंद झाला.तो दुपारी जेवायला आला की त्याला उचलून आनंदानं घरात जोजवी.यानं मंजिरीला जास्तच घिण येई.असल्या नवऱ्यासंग आयुष्य काढायचं या विचारानं घिण येत तिचं मस्तक भणके.पण नंतर मग भर निघून गेल्यावर त्याची कीव वाटे.

  छगनला ती शिकवायचा प्रयत्न करी.सकाळी दात घासण्यापासुन तर बोलणं चालणं,उठणं बसणं.पण सारं व्यर्थ.जेवतांना त्याला बघणं तर तिला ओकारीच येई.त्यात भरमसाठ खातांना पाहिल्यावर तर पाहणंच नको.

 गटलू चार पाच महिन्याचा झाला.मंजिरीनं पदरी पडलं नी पवित्र झालं या न्यायानं व आपली चुकच म्हणावी,नकळत का असेना;त्याची शिक्षा समजून ती छगनच घर उठवू लागली.आत्याचं दोन तीन एकर शेत जे पडून होतं तीन चार वर्षापासून ते मंजूनं कसायला घेतलं.ती सकाळीच पोराला घेत शेतात निघे.मागून छगन शेळ्या म्हैस घेऊन चाले.ते दृश्य पाहणाऱ्यास वेगळंच वाटे.कारण मंजू लावण्यवती तर छगन पुरता गयबाना.

"काय रे छगन्या कुठं निघालास?"एखादा तिरसट मुद्दाम डिवचे.

"शेतात चाललो"

"कोण घेऊन चाललंय ,म्हैस?"हसू दाबत तो खोडा घाली.

"च्याक,म्हैस कशाला!मंजा!"छगन वेडपट हसत उत्तरे.

"बायो,मजा मग छगनराव!"नी मग हशाचा कल्लोड उठे.

मंजिरी खाली मान घालून रस्ता कापे.

मात्र पाहणाऱ्यास हा लवाजमा पाहतांना मजा वाटे.

  दिवस जात होते.

रात्री जेवण आटोपलं.बाहेर आभाळ कुंद होतं.पाऊस बरसूनही येण्याची चिन्हे.

"गटलू,तुझ्या मंजा मायला सांग मी चाललो मारतीच्या पारावर!उशीर झाला." छगननं नेहमीप्रमाणं पुकारा दिला.

"अयss,आज इथंच पडा !कुठं चाललेत पावसाचं" मंजिरीनं दम भरला.

"गटलू झोपतो.पण तुझ्या मंजा मायला सांग काकी गेली तेव्हापासुन मटण झालंच नाही.कधी आणणार मटण" छगन रुसल्यागत बोलला .

मंजिरीला आपण काय सांगतोय नी याला खायची पडलीय.पण एक तेही खरच सकाळी आणू मटण यांचेसाठी असा विचार करत ती गटलूस झोपवू लागली.बाहेर पडणारा पाऊस गारवा टिपकवत होता तर मंजिरीच्या मनात आग. अकरा वाजले.मंजिरी उठली‌.छगन पावसापेक्षाही जोरात घोरत होता.त्या ही स्थितीत त्याच्या तोंडाची व अंगाची दुर्गंधी मंजिरीच्या नाकात किळस आणत होती.ती त्याकडं दुर्लक्ष करत गारवा शोधू लागली.छगन उठला.आणि हसतच गोधडी घेत पडत्या पावसात मारतीच्या मंदिरात पळाला.मंजिरी मात्र पडत्या पावसात पाणी अंगावर घेत भिजत राहिली.पण वरूण राजाही तिला हवा असलेला गारवा देण्यास असफल राहिला.

 मंजिरीनं सकाळी छगनलाच पाठवत अर्धा किलो मटण आणलं.मटण शिजू लागलं तसा छगन जिभल्या चाटत चुलीभोवती भिंगरू लागला.शिजताच त्यानं जेवायला सुरुवात केली.वाढता वाढता मंजिरी थकली.तिनं सरळ मटणाचं पातेलं व भाकरीची दुरडीच छगनजवळ ठेवून गटलूस पलंगावर झोपवू लागली.सारं मटण फस्त करत छगननं ढेकर दिला व बाहेर गेला.मंजिरीनं दुरडीत उरलेली चतकोर भाकर तेलतिखट सोबत खात मटणाच्या उलट्या पातेल्याला सुलट करत संतापात घासलं. लग्नानंतर रात्रीचा प्रसंग व आणि आताचं छगनचं वागणं पाहून वडिलांना आठवत तिनं आक्रोश मांडला.दुपारच्या चार वाजेपर्यंत ती रडतच होती.नी चारच्या गाडीनं दाजिबानं पोरीच्या लग्नानंतर पहिल्यांच हंबर्डीत पाय ठेवला.बहिणीला पोहोचवायलाही तो आला नव्हता.पण सरतेशेवटी पाठ नाही पण पोटा (लेक)साठी त्याला यावंच लागलं.

......     भाग::--- तिसरा


  हंबर्डीत, आपल्या मुलीच्या गावात दाजिबानं पाय ठेवताच पावसानं पुन्हा रतिब घालत दमदार हजेरी लावली.काळी काड्याची छत्री सांभाळत दाजिबा अंगणात आला.दिड दोन वर्षाचा गणू - गटलू ओट्यावर उभा राहत मावठीच्या पत्र्याच्या नळ्यातून खाली उतरणाऱ्या धारा इवल्या हातांनी पकडण्याचा प्रयत्न करत होता.मंजिरी घरात भिंतीला टेका लावत आढ्याकडं शून्यात पाहत होती.धाब्यात केलेल्या बिळात पाणी भरलं असावं की काय उंदरं ओली व सैरभैर होतं आढ्या-कड्यातून आसरा शोधत होती.धक्का लागून पाटीवर ठेवलेला रिकामा डबा दणाण आवाज करत खाली पडला. पण उठून तो उचलावा असं ही मंजिरीला वाटेना.भरला असता तर उचलला ही असता.आपल्या नशिबी खाली डबाच का यावा...यानं तिच्या डोळ्यातली काजळकाया पाझरली.त्याचवेळी दाजिबानं छत्री बंद करत झटकत ओट्यावरील खुंटीला टांगली.गटलू धारा झेलण्याचा खेळ थांबवत अनोळखी नजरेनं पाहू लागला.दाजिबाला त्याच्याकडे पाहताच रंजन व दामोजीराव दिसू लागले.तिकडे हंबर्डीच्या शिवारात दूर विजेचा आगडोंब कडकड आवाज करत कोसळला असावा मात्र आगिठा दाजिबाच्या अंतरात उठला.तरी विजेच्या आगडोंबानं जळणाऱ्या झाडाचा काय दोष असा विचार करत शेवटी आपल्या लेकीचाच पोटचा गोळाच!असा उदार विचार करत त्यांनी पोरास उचललं.गटलू भेदरून भिरभिरत्या नजरेनं पाहत 

'माय! माय!' हाका मारू लागला. 

 बापास अचानक पाहताच मंजिरीचा बांध फुटू पाहत होता.पण महा मुश्किलीनं दाबत ती उठली.

बापास पाणी देत चहाचं आंधण ठेवलं.दाजिबानं आपलं अर्धवट भिजलेलं डोकं रुमालानं पुसत बैठक मारली.घरात मुआयना करण्यासारखं काही नव्हतंच.चार पाच पारलेचे गंज लागून सडलेले व धुरानंं काळपटलेले डबे, उतरंडीत जुने हारीनं मोठे होत गेलेले माठ ,पातेल्या, ग्लास तांबे.दाजिबाच्या काळजात चर्र झालं.आपण आपली गाय कसायाच्याच दावणीला बांधली याची त्यांना पुरती जाणीव झाली.

"मंजू पोरी कशी आहेस?" आवंढा गिळत त्यांनी कसंबसं विचारलं.चहाचा कप हातात देत "बाबा, एकदम स्वर्ग सुखात..."

तोच बाहेरुन छगन आत प्रवेशता झाला.

"मामा केव्हा आलात!अरे व्वा" तो हारिखानं म्हणाला.

त्याला पाहताच तिला रात्रीचा वाकडी घेऊन मारतीच्या पारावर पळणारा तो आठवला नी तिचा बांध पुन्हा जोरात उसंडी मारत फुट लागला.

"मंजा ! मामा आलेत काही तरी चांगलं बनव!" छगननं म्हणताच पुन्हा मटण चेपणारं किळसवाणं रुप दिसू लागलं.

 रात्री जेवण आटोपून मंजिरी व दाजिबा आपापल्या चुकीचा उमाळा काळजातच दाबत रात्रभर जागले.

सकाळी दाजिबानं सोबत आणलेला 'महाराष्ट्र राज्य विद्युत' मंडळाच्या 'आॅपरेटर' पदाच्या भरतीच्या अर्जावर मंजिरीच्या सह्या घेत तिचे

आय. टी.आय. चे सर्व कागदपत्रे जोडली. नंतर छगनला सोबत घेत दुकानातून एक दोन महिने पुरेल इतका किराणा भरुन दिला व गावास परतले.

 छगन म्हैस , शेळ्या चारुन आणल्या की जेवण करून मस्त बस स्टॅण्डवर जाऊन बसे.गावातली चारदोन टारगट पोरं मजा घेण्यासाठी मुद्दाम "काय छगनराव काय मग निवडणुकीत आमदारसाहेब तुम्हास उभं करताय म्हणे!" सांगत चढवत.

छगन मग गालात गोड हसत पायाचा आकडा टाकून रेलून बसे.

"ऐकलंय मी. पण सवता आमदार घरी येऊन विनवणी करतील तरच उभं रायचंय!"छगन तावात येई.

मग मुलं खी खी हसत .

"छगन राव गुलाल नी धुरळा आपलाच"

जाणारे येणारे हासून "छगन्या लेकाचा छपऱ्या हाणण्याचं बंद कर नी काही. तरी पोटापाण्याचं बघ!"म्हणत दमकावत. 

"लोकांना आपलं खरं चालत नाही पहा!म्हणून मी राजकारणात पडत नाही.नाहीतर हंबर्डीला कुठल्या कुठं नेली असती" छगन जास्तच तावानं बोलू लागे.

"या छपऱ्याला हाकला रे! त्या टारगट पोरांनी वात लावायची नी यानं बत्ती द्यायची! येडं बांदर चाललं पुढारी व्हायला !"एखादा शहाणासुरता केकले.म्हणून छगनला सारा गाव छपरीच म्हणत नी आता आता मंजिरीही छपऱ्याची मंजाच झाली.

सकाळी सकाळी गाव दर्ज्यातून मंजिरी डोक्यावर टोपली,कडेवर गटलूस घेऊन निघे.मागून छगन शेळया व म्हैस घेऊन चालला की एखादा

 "कोण रे ही ?" म्हणून विचारी.मग लगेच आजुबाजुला बसलेली एकदोन टाळकी "काका ही आपल्या छपऱ्याची मंजा!" हसत परिचय करून देई.पुढं पुढं मंजिरीनंही छगनला सुट न होणारं आपलं 'मंजिरी' नाव सांगणं सोडलंच व सरळ 'छपऱ्याची मंजा' सांगून मोकळं होई.पण आत उठणारी वेदनेची कळ मेंदूत थेट रंजन गाडेकरचा उद्धार करूनच शांत होई.

 एका वर्षातच लेखी, तोंडी होत मंजिरीला खिरणीची पोष्टींग मिळाली.सुरुवातीस छगन नं "मंजा जाऊ नकोस,तू जर गेलीस तर माझं कसं होईल गं!"म्हणत‌ एकच हुडदंग माजवला.मंजिरीला हसावं की रडावं तेच कळेना.पण हा जंजाळ पुढे नेटण्यासाठी नोकरीच आपणास तारेल असा पक्का विचार करत तिनं त्यास समजावत माहेरात वडिलांसोबत पाठवलं.ती गटलूस घेत रूजू होण्यासाठी निघाली.

  खिरणी पंधरा सतरा हजार डोईचं मोठं बाजारपेठेचं गावं. गावात काळी कसदार बागायत जमीन.सर्व जिनसा सहज मिळतील अशी मोठी बाजारपेठ.सब स्टेशन गावापासून अंतरावर एकांतात वसलेलं.

  नंदन नायक म्हणून अभियंता व इतर बराच मोठा कर्मचारी वृंद.

 "मी मंजिरी दाजिबा दाते!आॅपरेटर म्हणून रुजू व्हायला आलीय!मंजिरीनं हातातला आदेश सरकवला.

नंदन नायक साहेबानं मंजिरी कडं पाहिलं.साधी, सालस , नैसर्गिक कलाकृती वा शिल्प एखाद्यानं पहातच रहावं..एकवेळ तर त्यांना पहिला पावसानं वा वळिवानं सारा आसमंत मृदगंधानं भरतोय असाच भास झाला.कसलंही लेपन नाही,कृत्रीमतेचा लवलेशही नाही.भानावर येत नायक साहेबानं समोर खुर्चीकडं निर्देश करत बसायला लावलं.टेबलावरची बेल वाजवत शब्बीर शिपायास चहा सांगितला.चहा येईपर्यंत जुजबी बोलणं.मंजिरीस कार्यालयाचा कुठलाही अनुभव नसल्यानं खुर्चीतही ती अंग आकसून बसली.बोलतांना नजरेला नजर येणार नाही या बेतानं ती त्रोटक उत्तर देऊ लागली.चहा आला इतर सहकारी पण आले.चहा पितांना साऱ्याकडं दुर्लक्ष करत साहेब आपल्याकडंच पाहतोय हे मंजिरीला जाणवलं.पण मंजिरीचं आरसपाणी अस्सल सौंदर्य नायक साहेबास भुरळ घालत होतं. पण गळ्यातलं मंगळसुत्र पाहताच नायक साहेबांना अपराधीपणाची जाणीव झाली.दोन तीन दिवस मंजिरीची सोय महिला सहकाऱ्याकडं क्वाॅटरवर करण्यात आली.नंतर मंजिरी गावाला परतत वडिलांना शेळ्या, म्हैस विकायला लावली.त्यावेळेस छगननं लहान पोरासारखा आकांत मांडला.

"मंजा नको विकू ना म्हैस शेळ्या!नविन गावाला मी काय करणार मग?"

"तुम्हास तिथं गाडी शिकायचीय.मग नविन ट्रॅक्स घेतली की मस्त तालुक्याला भाडं कमवायचं."मंजिरीनं समजूत काढण्यासाठी काही तरी सांगायचं म्हणून सांगितलं.

मग रात्री छगन गटलूसोबत गाडी चालवायचाच सराव करत बसला.मंजिरीस नविन गावात छगनचं कसं करायचं याचाच मोठा प्रश्न पडला.

 दाजिबानं मंजिरीस क्वाॅटर ऐवजी खिरणीत खोली करून दिली.सारं सामान लावून स्थीर स्थावर होताच दाजिबा परतला.मंजिरी नियमित कामावर जाऊ लागली.छगन गटलूस घेत खिरणी फिरू लागला.खिरणीतीलं दुकानं पाहू लागला.बस स्थानकावर प्रवाशी वाहतूक करणाऱ्या जीपचालकाशी संधान साधत गाडी शिकवायला सांगू लागला.ड्रायव्हर लोकांनी छगनची अचुक पारख करत क्लिनर म्हणून त्यांच्याकडून गाडी पुसायचं,प्रवाशी भरण्याचं काम करवून घेऊ लागले. छगन आता बसस्थानकावरच रमू लागला.बस स्थानकानं त्याला छगन्या म्हणून अलगद स्विकारलं.छगन आरोळ्या मारून मारून प्रवाशी गोळा करू लागला.

 नायक साहेबानं गळ्यातलं मंगळसुत्र पाहून याचा धनी कोण ते ही पाहण्याचं ठरवलं.नी अवघ्या आठ दिवसातच छगनशी त्यांची भेट बस स्थानकावर झाली.गयबान्या छगनला पाहताच त्यांना कळायला काही त्रास झालाच नाही.'येडं बांदर काय नशीब काढून आलंय! एवढं आरसपाणी सौंदर्याचा मालक होऊन बसलाय. पण नंतर त्यांना जशजशी माहिती मिळत गेली,त्यानुसार मंजिरी सारखं रत्न छगनकडं नुसतं पडून आहे.म्हणजे रत्नही मनासारखं कोंदण मिळालं तर अलगद कोंदणात बसेन म्हणून त्यांनी कपाळावरील कुंकू व मंगळसुत्र पाहायचंच नाही असं पक्क ठरवलं.

  "बसा दाते मॅडम,कसं वाटलं गाव?आपलं कार्यालय?"नायकांनी दुपारी चहा पिता पिता विषय छेडला.

"छान आहे"मंजिरीनं साहेब म्हटल्यावर नरमाईनं उत्तर दिलं.नायकाच्या मनात मंजिरीचं सालसपण उठत होतं.आजही मंजिरीनं लिंबोणी कलरची साडी घातली होती.केसाचा चापून चोपून अंबाडा घालतांनाही तजेलदार चेहऱ्यावर मस्त बटा डेरेदार गोल आम्रतरूवर देठा-देठानं कैऱ्या लगडाव्यात तशाच भुरभुरत होत्या.मंजिरी हळूच नजाकतीनं त्यांना पुन्हा चेहऱ्यावर येतील अशा रितीनं मागं सारत होती.एकटक पाहणाऱ्या साहेबाकडं मंजिरीनं एखादा चोरटा कटाक्ष टाकताच नायक साहेब आपण ट्रॅपमध्ये असंच अडकून पडावं या विचारानं पुन्हा जोमानं पाहू लागत.

   दिवस महिने जाऊ लागले.मंजिरी नायक साहेबांशी कळत असुनही योग्य अंतर राखत रुळू 

 मात्र गटलूस साथीला घेत खिरणीत यात्रेत मटनाचा भंडारा, गावातील गोंधळ आमंत्रण असो नसो मस्त सपाटून वरपू लागला.तरी त्यांची मटणाची लिप्सा भागेच ना.

मध्यंतरी आंबोलीला प्रशिक्षण निघालं.नायक साहेबानं आपल्या मित्राकरवी आदेश बदलवत स्वत:च्या व मंजिरीच्या नावाचा आदेश काढावयास लावला.आदेश येताच आपल्या नावाचा आदेश पाहताच पाच दिवसासाठी बाहेर जाणं म्हणजे छगन व गटलूची सोय कशी लावावी या विचारानं ती धास्तावली.

"साहेब प्रशिक्षण रद्द नाही का होऊ शकत?"विनतीच्या सुरात समोर उभी राहत मंजिरी उद्गारली.

"नविन लोकांना प्रशिक्षण कंपलसरी असतं.शिवाय ही सुवर्णसंधी असते.तरी काही समस्या आहे का?"

"तसं नाही सर पण कौटुंबिक समस्या" मंजिरी अडखळत बोलली.

"ठिक आहे मी करतो बदल काही तरी" नायक साहेबांनी सांगितलं.

पण मंजिरीला आपण नविनच असल्यानं प्रशिक्षण रद्द करणं योग्य वाटलं नाही. ती बाहेर पडत गावात एस टी डी बूथ वर येत वडिलांना फोन लावत गटलू व छगनला माहेरीच घेऊन जाण्याबाबत सांगू लागली.नेमकं त्याच वेळी त्या ठिकाणी जिल्हा बॅंकेच्या शाखेत नंदन नायक आपल्या कामा करिता आले होते.त्याच ठिकाणी बस स्थानकावर चार पाच ड्रायव्हर दारूत फुल टल्ली होऊन छगनला डुकराला मारावं तसं बेदम मारत होते.पोटात लाथा बुक्क्यांनी बदडतांना छगन ढोरासारखा ओरडत मदतीसाठी याचना करत होता.मंजिरीस हे दिसताच ती धावतच छगनच्या अंगावर आडवी झाली.तरी नशेत चूर असलेल्या एक दोघांनी मंजिरीला बाजूला ढकलत मारहाण सुरु केली.नायक साहेबांनी पाहताच दोघा तिघांना दमदाटी करत बाजूस सारलं.मंजिरी थरथर कापत पाहू लागली.

"काय केलंय त्यानं एवढं मारता आहात त्याला?" नायक साहेबानं दुट्टी भरत विचारत त्यांना दूर लोटलं.

"साहेब हा लई बेरका नी हावरट आहे.आमचं सारं मटण यानं एकट्यानंच चेपलं. याला सोडणार नाही आम्ही. तुम्ही मध्ये पडू नका!"

झालं असं होतं की.गाडी नंबरला लावल्यावर चार पाच ड्रायव्हर बस स्थानकामागं रिकाम्या घरात जमुन पत्ते कुटत बसत.ज्यांचा नंबर तो जाई व त्याची जागा दुसरा घेई.त्या दिवशी एकानं पत्त्यात बराच मोठा हात मारला.कुणी तरी बाहेर गावचा कापसाचा व्यापारी पत्त्यात हरला होता.ज्यांनं हात मारला त्यानं सर्वांना पार्टी दिली.छगनला बोलवत त्यांनी सुरुची डाब्यावर दिड हंडी मटणाची आर्डर दिली.छगन सुरुची ढाब्यावर जाऊन हंडी शिजेपर्यंत बसला.तो वास त्याच्या नाकात जाताच त्याचा जठरानल पेटला.त्यानं कळ सोसत दिड हंडीचं पार्सल बाजरीच्या भाकरी जिरा राईस रिकाम्या घरात आणलं.खेळणारे जेवण येताच पततते खाली टाकत पिण्यासाठी बारवर पळाले.तो पावेतो छगननं इकडं खायला सुरूवात करून दिली.बारवर त्यांना प्यायला उशीर होऊ लागला तसा छगननं पार्सल पुरतं बसवत ढेकर दिला.वर्दी टाकून आलेल्या एकानं हे पाहिलं.छगन खाऊन बस स्थानकावर गाडीत येऊन बसला.पिऊन आलेल्यांना हे कळताच नशा व भूक यानं चवताळत त्यांनी छगनवर हल्ला चढवला होता.हे सारं कळताच नायकानं त्यांना पुरते पैसे देत छगनला मोकळं केलं.मंजिरीला मेल्याहून मेल्यासारखं झालं.पण आज नायक साहेब नसते मध्ये पडले तर?छगनचं काय झालं असतं? विचार करतच ती छगनला घेत घराकडं निघाली.नी दुसऱ्या दिवशी नायक साहेबासोबत आंबोलीला गेली.नायक साहेबाला आश्चर्य वाटलं पण त्याहून जास्त खुशी.रात्रीच्या एशियाडनं ते दोघे आंबोलीकडं रवाना झाले.

     भाग :: -- चौथा


  आंबोली हून परततांना ठाण्यास मंजिरी नकार देत असतांना नायक साहेब शाॅपिंग माॅलला जबरीनं घेऊन गेले.त्यांनी मंजिरीस अनेक वस्तू देऊ केल्या पण तिनं नम्रपणे नकार देत काहीच घेतलं नाही.त्यांनी रेड अॅण्ड चिफ चे शूज चे आठ नंबरचे दोन जोड घेतले. खिरणीत नायक साहेब परतले तेच नाराज होत.तर ट्रेनिंग सेंटरला मस्टरवर सही करतांना नायकानं मंजिरीस आपल्याजवळील आॅर्डर दिली. त्यावर मिसेस जोशीच्या खोडलेल्या नावावर आपलं नाव पाहून मंजिरीस आपल्याला मुद्दाम आणलं गेलं हे लक्षात आलं व तिचा पारा चढला . म्हणून पाच दिवस मंजिरीनं नायकास फडकू ही दिलं नाही.

 परतल्या परतल्या नायकानं मंजिरी नसतांना छगनला गाठून रेड अॅण्ड चिफ शूज दिले.छगन तर ते पाहताच खूश झाला.व तो बाॅक्स छातीला लावत पळतच घरी आला.मंजिरी पिठ कालवून पोळ्या करत होती.भरलेल्या हातांनी ओट्यावर येत तिनं पाहिलं .छगन खोक्यातून शूज काढुन पायाऐवजी हातात घालून मस्त गालावर फिरवत नव्या कोऱ्या शूजचा वास घेत खुशीत लहरत होता.

मंजिरीनं ठाण्यास नायक साहेबानं घेतलेले दोन जोड आठवले.तिला तेव्हाही प्रश्न पडलाच होता की दोन जोड का बरं घेतोय हा!पण ती घरी परतण्याच्या धुंदीत नायकास टाळत असल्यानं व विचारणं संयुक्तिक नसल्यानं तिनं तसं विचारणं टाळलं होतं.पण छगनच्या हातात एवढे महागडे शूज पाहताच ती समजली.नायकानंच याला दिले असावेत.ती संतापली.

"कुठुन आणलेत बूट?कोणी दिले?"

"मंजा,मी नाही मांगितले.तुझ्या साहेबानंच स्वत: दिले.नी मला खूप आवडले."म्हणत छगनचं गालावर फिरवणं सुरूच होतं.

"परत करा ते!कुणाकडुन फुकटात असल्या वस्तू घेऊ नयेत!" ती संतापत छगनला समजावू लागली.

" नाही मी परत करणार नाही!साहेब किती चांगला आहे.त्यानं मला स्वत: दिलेत ते!"छगन बूट घट्ट धरत म्हणाला.

मंजिरीस कळून चुकलं की याला सांगून उपयोग नाही.हे हा वापरणारही नाही तरी नाहक आपणास दोन हजाराचा हा भुर्दंड सोसावा लागेल.

 दुसऱ्या दिवशी आॅफिसला जाताच कोणी नाही पाहून नायकाच्या टेबलावर मंजिरीनं पैसे ठेवले.

"दाते मॅडम ,काय हे?"

"आपण शूज दिलेत त्याचे हे पैसे, धन्यवाद."

"मॅडम ते कळतंय मला पण ते मी माझ्याकडून दिलेत छगनरावांना.नी तुम्ही मला पैसे देऊन माझीच किंमत करता आहात!"

"तसं नाही साहेब पण काही कारण नसतांना भेट स्विकारणं मला नाही आवडतं,माफ करा पण ..."

नम्रपणे हात जोडत ती चटकन निघाली.

नायकानं संतापानं विव्हळत त्या नोटा फाडून फाडून तुकडे करत मंजिरीजवळ ठेवलेल्या डस्टबीनमध्ये टाकल्या. 

मंजिरीनं मनातल्या मनात' तू फाड की काहीही कर मला घेणंदेणं नाही पण मी बोज्यात राहिली नाही' म्हणत ती समाधान पावली.नायक मात्र हिनं तर काही घेतलंच नव्हतं ठाण्यास पण छगनरावास दिलेलंही ....म्हणून दिवस त्याच जोड्याचे वळ गालावर उमटवत घालवला.तर छगन तेच बूट उशाशी घेत रात्री मस्त झोपला.मात्र पायात घालावयाची वस्तू डोक्यावर घेणाऱ्यासाठी आपण आपल्या मनास मारतोय ! देवा तुझा न्याय ही किती अजब!कसल्या जोड्या जुळवोस रे तू! मनासारख्या जोड्या न बनवायला काय जातंय तुझं?,म्हणत मंजिरी रात्रभर जागत तळमळत राहिली.नायकास दुखवल्याबद्दल तिला वाईट ही वाटलं.

  बस-स्टॅण्डवर मार खाल्ल्यापासून छगन तिकडं जाणं टाळू लागला.तो आता मंजिरीच्या आॅफिसातच गटलूस घेऊन येऊ लागला.आवारात पडलेल्या वस्तू घेत गटलूबरोबर टाईमपास करू लागला.मंजिरी त्याला खुणेनं घरी जाण्यास दटावू लागली तर हा मंद लाजिरवाणं स्मीत देत तिच्याकडं पाहणं टाळू लागला. तोच नायक साहेब त्याला दिसले.त्यानं हातानच बुट छान असल्याचं खुणवलं.त्याचा इशारा पाहून नायक साहेबास हसू आलं.

"काय छगनराव या बसा!"नायकानं मुद्दाम त्याला बोलवत बसवलं.मंजिरीला जी भिती होती तेच घडलं.मग नायकानं छगनशी गप्पा मारत बऱ्याच गोष्टी काढून घेतल्या.

 नंतर मात्र मंजिरीनं घरी जाताच छगनला दुट्टी भरत आॅफिसमध्ये येण्याचं बंद केलं. मग छगन कोणत्याही किराणा दुकानावर जाऊन तिथं सटरफटर मदत करत टाईमपास करू लागला.

नायकाला मात्र एक ना एक दिवस मंजिरीचं आपण मन वळवूच याची अजूनही खात्री होती.

 गावातील तुका जाधवानं शेतात विहीर खोदली.आधीच्या दोन ट्युबवेल फेल गेल्यानंतर या विहीरीस भरपूर पाणी लागलं.साहेबाकडनं वीज कनेक्शन त्वरीत मिळालं.पहिल्या वर्षीच त्याला बक्कड कमाई झाल्यानं त्यानं गावास गोंधळ करत बोकडांचा भंडारा द्यायचं ठरवलं. साहेबानं कनेक्शन दिल्याचे उपकार म्हणून तो साऱ्या स्टाॅफ ला आमंत्रण देत साऱ्यांनी पाचला सोबत जेवायला याच म्हणून विनंती करून गेला.

"काय मंजिरी मॅडम येणार ना सोबत जेवायला?"नायकानं विचारलं.

मंजिरीचा सहवास त्यांना हवा हवासा वाटे.

"आले असती पण घरी ते व गणेश एकटेच म्हणून माफ करा आपण या.मला नाही शक्य." मंजिरीनं नकार दिला.

"या हो मॅडम!जाधव प्रेमानं आमंत्रण देऊन गेलेत.व सारे राहणार नी तुम्हीच नाही म्हटल्यावर...!" जोशी मॅडमही बोलल्या.

तरी मंजिरीनं नम्रपणे माफी मागत नाकारलं.तिला ही आत कुठे तरी साऱ्यासोबत जावं, फिरावं वाटेच.पण साऱ्यांचे जोडीदार असणार व आपण एकटं!बरोबर वाटणार नाही, नी छगनला सोबत नेणं म्हणजे उरलीसुरली सारी इज्जत घालवणं.म्हणून तिनं घरीच मटण आणून छगन, गटलूस खाऊ घालण्याचं ठरवलं. मधल्या सुटीत तिनं घरी येत छगनला मटण आणावयास पैसे दिले.व गोंधळात जायचं नाही मी घरीच दुपारून मटण शिजवते म्हणून सांगत परतली.छगननं मटण आणून घरी ठेवलं.पण येतांना गोंधळात शिजणाऱ्या मटणाच्या वासानं तो उफाणला.त्यानं विचार केला,मंजिरी येईल स्वयंपाक करेल तो पावेतो आपण गोंधळात मस्त बत्ती देऊन परतू.असा विचार करत त्यानं गटलूस घेतलं व निघाला.

मंजिरी आॅफिसला परतली तर सारेजण आधीच जाण्याच्या तयारीत होते.नायक साहेबांनं एकांत साधत मंजिरीस पुन्हा विनंती केली.पण छगनचं कारण दाखवत नाही म्हटलं.

सारे निघून जाताच ती ही घरी परतली.तिनं स्वयंपाकास सुरुवात केली.गटलू छगन असतील इथंच कुठं तरी असा विचार करत ती स्वयंपाक करू लागली.

 ज्याच्यासाठी मंजिरी आली नाही तो गोंधळाच्या मंडपात एका कोपऱ्यात बसुन दोन पंगतीपर्यंत खातोच आहे ,लोक हसत आहेत,वाढणाऱ्यानं संतापानं मटणाची बादलीच त्याच्याजवळ ठेवून दिली. हे पाहून नायकास वाईट वाटलं.तो तसाच उठला व मंजिरीच्या घरी आला.

त्याला पाहताच मंजिरी घाबरली.ती ततफफ करु लागली.पण तरी हा पहिल्यांदाच घरी आलाय व साहेब आहे याला दारातच उभं करणं योग्य नाही.निदान पाणी तरी द्यायला हवं.

"या "म्हणत तिनं पाणी दिलं.

पलंगावर बसत नायक घरात इकडं तिकडं पाहू लागला.

"मंजिरी तू ज्याच्यासाठी सोबत आली नाही तो तर मंडपात बसून मस्त जेवतोय! का ? का? स्वत:वर इतका अन्याय करतेस!"नायक कळवळून बोलला.

पण आपला एकेरी उल्लेख ऐकताच मंजिरी सावध झाली.ती कोपऱ्यात सरकत " का आलात?" विचारती झाली.

"ऐक माझं....छगन आहे राहू दे....पण मी ही...."

मंजिरी बिथरली दरवाज्याकडं जाऊन बंद होऊ पाहणारा दरवाजा उघडत "निघा लवकर.माझा नवरा घरी नाही.तो आला की या!मग तुम्हास जे सांगायचं ते सांगा.पण माणुस घरी नसतांना इज्जतदार स्त्रीनं परक्या माणसाची बोलणं रितीला धरून नसतं"

"मंजिरी ऐकून तर घे मी काय सांगतोय!"

"निघायचं म्हणतेय ना!"मंजिरी संतापानं कडाडली नी त्याच वेळी तिकडणं अचानक छगन येतांना दिसला.घाबरून साहेब निघाला.घरात मंजिरी पलंगावर पडत रडू लागली.

"मंजा काय झालं गं?"छगननं आत येत विचारलं.

गटलू कोपऱ्यात उभा राहत आई का रडतेय हे भांबावून पाहू लागला.

विचारणाऱ्या छगनला पाहताच ती कडाडली "चरुन आलात!,खाल्लं मटण!तुला आणलं होतं ना मटण?तरी गेलास! का? हे कमी पडलं असतं ना तुला मटण?तू अप्पलपोट्या आहेस!खादाड आहेस!जा चुलीवरचं ही खा!"ती थरथरत कडाडू लागली.

तिचा अवतार पाहून छगन घाबरुन म्हणाला, "तसं नाही गं मंजा, हा गटलू सांगत होता म्हणून गेलो"

"तू इतका खादाड आहेस ना तुला ना बायकोची पडलेली ,ना मुलाची!तू मटणासाठी मेलेला जिवंत होशील" तिचा तोंडपट्टा चालूच होता.

"मेलेला मटणासाठी कसा जिवंत होईल,मंजा!काहीही सांगतेस"छगन आपला तारे तोडतच होता.

"मरून बघ!मेला नी कुठं गावात मटणाचा भंडारा असू दे येशीलच तू !खादाड!"

छगन मंजिरीच्या बोलण्याकडं दुर्लक्ष करत ओट्यावर आला. जेवायला जातांना आपण घरी टाकून गेलेले बूट त्याला मिळेतचना.त्या जागी त्याला त्याच्यासारखेच दुसरे बूट दिसले .ते नंदन साहेबाचे आहेत हे त्यानं अचुक ओळखलेत. साहेबांचे बूटच त्याने पायात घातले.त्याच्या बधीर गयबान्या मेंदूतल्या नसा ताठरल्या. तो आतून धगधगला.मंजिरी का इतकी संतापलीय हे त्याला कळलं.एव्हाना मावळून अंधारानं खिरणीला गच्च आवळलं.तसंच छगनला ही मेलेला माणूस मटण खायला खरच परत येईल का या विचारानं आवळलं.त्यानं वाकळ घेत गटलूस घेतलं.

"बाहेर जाण्याआधी ते चुलीवरचं मटणं चेंद मुकाट्यानं मग हवं तिथं जा!"मंजिरी रडतच कडकडली.तिचा संताप अजुनही गेला नव्हता.

छगन गटलूस घेऊन निघाला.

मंजिरी जेवलीच नाही.तशीच पडून राहिली. मटण चुलीवर तसच पडून होतं.पडुन पडुन तिला झोप लागली.

छगननं गटलूस घेऊन साऱ्या खिरणीस चक्कर मारली. वाकळ देवळाच्या पारावर ठेवल्या व तो रानाच्या वाटेनं निघाला.गजा पाटलाच्या मळ्यात आला.बरीच रात्र झाली होती.थाळण्यात बसुन तो गटलूस खेळवू लागला. गटलू त्याला घरी परतण्यास विनवू लागला.

"गटलू तुझी मंजा मायला दाखवायचं रे आपण,की मरणानंतर माणुस मटण खायला येऊच शकत नाही." गटलू जास्तच आग्रह करू लागल्यावर त्याला आकाशाकडं तोंड करत तो पाठीवर झोपला व गटलूस पायानं उचलत वर खाली करत गुदगुल्या करू लागला.व नंतर फुटबाॅल सारखं उडवत त्यानं एका झोक्यात गटलूस विहीरीत फेकलं.व स्वत: ही नायक साहेबाच्या बुटासहीत विहीरीत उडी घेतली.

 पहाटे मंजिरीस जाग आली.उठत अंघोळ करून तिनं मटणाचं सारं पातेलं जसंच्या तसं उकिरड्यात दाबलं.भकभकलं तरी देवळात झोपायला गेलेला छगन गटलू का परतला नाही म्हणून मंजिरी वाट पाहू लागली.आपण रात्री इतकं संतापायला नको होतं.पण आपण त्याच्यासाठी गेलो नाहीत व घरी मटण आणुनही तो गोंधळात गेला याचाच तिला राग आला होता. शिवाय नायकानं घरापर्यंत यावं यानंच ती बिथरली.जर नवरा चांगला असता तर नायकाची काय मजाल की तो घरी आला असता!यानंच ती संतापून छगनला अद्वातद्वा बोलली.

उजाडून दिवस वर चढू लागताच ती छगन व गटलूस देवळात पहायला आली.पण तिथं तिला मिळालेच नाहीत .मग ती बस स्टॅण्ड,दुकान, साऱ्या खिरणीत फिरली.पण गटलू व छगन चा तपासच लागेना.रात्री आपण नको ते बोललो याचा तिला पश्चात्ताप वाटू लागला.तिनं वडिलांना एस टी डी बुथवरून फोन करत बोलवून घेतलं.मंजिरी आली नाही म्हणून घाबरून व बूट बदलवण्यास नायक शिपायासह आला.छगन नाही म्हटल्यावर तो ही घाबरला.त्यानं धीर देत पोलीसात मिसींग केस दाखल केली.

तो दिवस व रात्र शोधण्यात गेली.दाजीबा आल्यावर ते ही चिंतेत पडले. तिसऱ्या दिवशी सकाळी मळ्यात गेलेल्या माणसास विहीरीत प्रेतं तरंगतांना पाहताच माणसानं खिरणीत येत बोंब ठोकली.सारी खिरणी विहीरीवर पळाली. मंजिरी गटलूसाठी झिंज्या तोडू लागली.ज्याला वाचवण्यासाठी आपण छगनशी लग्नाची तडजोड केली तो गटलूच आपणास सोडून गेला की छगनच घेऊन गेला? यानं तिनं आकांत मांडला....


  क्रमश::


Rate this content
Log in

More marathi story from Vasudev Patil

Similar marathi story from Thriller