ओघळ काजळमायेचे - भाग पाचवा
ओघळ काजळमायेचे - भाग पाचवा
मार्गशीर्ष लागताच गिरणेची थंडी उतरली तशी तापीकाठच्या थंडीसही बारी चढून वर जावंच लागलं. संपतरावासोबत अक्षता अंगावर पडल्या व मोहना कुंकवाचं लेणं कपाळावर माखत बारी चढून बागलाणमधील टवकी गावात नांदावयास आली.
लग्नाआधी धर्मुनं मोहनाच्या लग्नासाठीच तुटपुंज्या पेन्शनमधील रकमेची मुदतठेव केली होती व कसायला घेतलेल्या शेतातूनही मोहनानं भरघोस मका व खिराचं उत्पन्न काढलं होतं. धर्मुनं गाजरे गुरुजीला मध्यस्थी टाकत त्यातून मोहन गुरूजीचे पैसे परत देऊ केले. पण मोहननं हात जोडत "कृपा करा आधी मोहनाचं लग्न पार पाडा मग उरलीच रक्कम तर भले परत करा!" असं म्हणताच गाजरे गुरुजींचं मोहनचं दातृत्व व समर्पण पाहून मन भरून आलं. मोहन उठून चालता झाला. गाजरे गुरुजी मग संतापले.
"धरमदासराव उचला ती रक्कम नी निघा इथनं." धर्मु खालमानेनं निघाला.
पगार होताच मोहननं ब्याराला जाऊन सरफाकडनं अंगठी सोडवून आणली. आता त्या अंगठीकडं पाहत त्यानं वरच्या मेघात पाहिलं. रेघोट्या आडव्या उभ्या तिरप्या जुळू लागल्या पण लहानपणीचा अस्पष्ट आईचा चेहरा स्पष्ट होईचना. मात्र, मग नेहमीप्रमाणे दुसऱ्या मेघाची रेल्वेप्रमाणं बसणारी टक्कर न बसता मेघांची दाटी झरझर बदलली व एक नवीनच आकार तयार झाला. मेघांचा पिंजरा बनत त्यात मैना घुसत राघूस आत येण्यास खुणावत होती. बिचारा राघू आधी टाळत होता. पण शेवटी मैनेच्या आग्रहानं व प्रेमापोटी तो आत घुसतोय असा आकार येऊ लागला. तोच वाऱ्याच्या गचबुच दाटीनं गचका देत मेघ आकार बदलू लागले नि निमिषात आत घुसलेली मैना आक्रंदत मागे वळून वळून पाहत उडत दूर जाऊ लागली.
मोहन मैना का उडून जातेय ते समजला. कुंकवासाठी मैनेला दूर उडून जावं लागतंय तरी आपण तिचा पाठलाग करत तिला माघारी फिरवणं वा तिच्या मागोमाग जात तिच्या संसारात विष कालवणं चूकीचं होईल.
मोहननं मोहनाच्या लग्नात हजर राहत तिच अंगठी तिला सप्रेम भेट म्हणून दिली. हृदयातील उमाळा डोळ्यात दाटत हळदीच्या अंगानं मोहना विदीर्ण होत मोहनकडं पाहत सप्तपदी चालली. बिदाईच्या वेळी हाफत हाफत खांबास धरून धर्मू रडू लागला. रडणाऱ्या बाबास आपला आकांत दाबून धरत मोहना धीर देऊ लागली.
"बाबा अश्रू आपणास जपून ठेवावे लागतील. कारण एकवेळ त्रिभुवनाच्या नाशाचं पातक माणसास माफ करून देईल पण तुटलेल्या काळजाची हाय तुमच्या या लाडक्या लेकीस माफ करणार नाही."
टवकीत आल्यावर आठच दिवसात संपतराव व सासू मथा यांचं मूळ स्वरूप प्रकट होऊ लागलं. नव्या नवरीस आठ दिवस होत नाही तोच संपतराव लालबुंद डोळे, सुटत जाणारा तोल सावरत रात्री-अपरात्री घरी परतू लागले. तर कधी दिवसभर बदफैली मित्रांना घरात थांबवत मटण कोंबडं, मच्छी शिजवं, चखण्यास शेंगदाणे खारव, बोंबील तळ, मच्छी फ्राय कर, बाटल्या, सोडा, असला अंगावर काटे आणणारा व किळसवाणा प्रकार. मथाबाईसही या गोष्टीचं काहीच वाटेना. उलट संपतरावाचं लग्न झालं म्हणजे मोठा जुगारच लागल्याचा आसुरी आनंद व त्याचा आसुरी जल्लोष. नवीन मुलीनं घरात येताच काही बोलणं बरोबर नाही असा विचार करत व मोहनचा विरह यात मोहना हा सारा तमाशा मुकाट्यानं सहन करत सारी निस्तयवार करू लागली. सकाळी मथाबाई आरामानं उठत. मग त्यांना दात घासण्यापासून तर अंघोळ चहा, नास्ता जागेवर व तो ही वेळेत द्यावा लागे. मग संपतराव तांबारलेल्या डोळ्यांनी उठत अंघोळ उरकत. तेवढ्यात फुकटभाऊ सोमे गोमे आठ दहा टाळकी अवतीभोवती गोळा असायचेच. त्यापैंकी एक जण पिटाळला जाई व बाटल्या हजर होत. मग मस्त बैठक. लगेच घरात चखण्याची फर्माईश. देवपूजा राहिली तरी चालेल पण आधी चखणा हवा. मग लगेच एखाद्याकडं खिशातून मिळेल ती नोट देत गावठी कोंबडं, मटण किंवा मासे आणले जात. मग ज्या मोहनानं माहेरात कधी मासांहार केला नव्हता तिला आठ-दहा दिवसानंतरच कोंबडं फटकारणं मासे साफ करणं शिकावं लागलं; मग ते काम होई. तेवढ्यात तीन पत्ती रंगात आलेली असायची. बाटल्या एकेक रिकाम्या होत आल्या असायच्या. शिजणाऱ्या मटणातून ताटल्या भरून भरून पीस चखण्यास जायच्या. तीन पत्तीत खाली होत फूल्ल टल्ली झाल्यावर संपतरावाचा मूड गेला की मग जेवण. दुपारून हेच पुन्हा परत रात्री उशीरापर्यंत. मग मोहनाच्या डोळयात गाढ झोप तरळत असताना धसमुसळेपणा दाखवत रानटीपणानं ओरबाडणं. नंतर मग तिचंच सवयीनं नाईलाजास्तव समर्पण.
घरातले संपत आले की मग गावातल्या दत्ताजी सौंदणकर नावाच्या सावकाराकडं जाऊन मागच्या व्याजाचा हिशोब वाढवत मोठी रक्कम उचल घेणं. ती घेतल्यावर मग गाडीनं थेट नाशिक वा धुळ्याला निघत मोठमोठे क्लब गाठत चार-पाच दिवस नुसती धूम. पैशाचा चुराडा. जिंकलेले किंवा थोडीफार रक्कम उरवून मग घरी पुन्हा तोच खेळ. मात्र, संपतराव बाहेरगावास असले की मोहनास मग थोडी उसंत मिळे. मग मोहनच्या आठवणी वस्ती, आई-बाबा यानं व्याकुळता दाटत मन भरून येई नि मग नुसतं रिकाम्या ढवंढायानं आढ्याकडं पाहणं.
संपतरावांचा व मथाबाईंचा हा जो जल्लोष चालू आहे याचा नेमका उत्पन्नाचा स्त्रोत काय हा प्रश्न गरिबी सोसलेल्या मोहनास लवकरच पडला. कुठलंच काम न करणं नि नुसतं चैन करणं कशावर? तिनं एकदा सासुबाईजवळ सहज वरवर विषय छेडला. पण तोच मथाबाई तिच्यावर डाफरल्या. "घरातल्या सुनेनं चूल न मूल यातच लक्ष ठेवावं नको तेथे नाक खुपसण्याचे रिकामे उद्योग करू नये." मोहना गप्प.
मोहनाला या रिकाम्या व 'खाना पिना सोना' संस्कृतीचा तिटकारा वाटू लागला. रात्री झोपताना तिनं रडतच संपतरावास छेडलंच. "तुम्ही कसं वागावं हे मी सांगणार नाही. कारण तो अधिकार मला या घरात कदाचित मिळणार नाही. पण निदान मी काय करावं याबाबत तरी मला मोकळीक द्या! हात जोडते!" दारूच्या नशेत असणाऱ्या संपतनं तिचं ऐकून तात्पुरती संमती देत तीच जबरदस्ती केली.
दुसऱ्या दिवशी तिला तो गाडीनं शेतात घेऊन गेला. शेत दाखवलं व तुला काय करायचं ते कर पण माझ्याकडून शेतात राबणं शक्य नाही. सांगत तिला कटवत परत आणलं. पाच-सहा एकराचं रान कसलं तर कमाई देणारं होतं. पण हल्ली ते त्यानं दुसऱ्याला कसायला दिलेलं. मोहनाने पुढच्या वर्षी स्वत:च करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून यांची घरातली मैफील टाळता येईल व शेतातून काही ना काही उत्पन्न काढू व हळू हळू संपतरावासही लाईनीवर आणू.
दिवस जाऊ लागले. नि शेजारी पाजाऱ्यांशी तिचे संबंध येऊ लागले तसं तिला यांचं आतलं रूप कळू लागलं. त्यातच तिला नववा महिना भरत आलेला. पावसाळा जवळ आलेला.
संपतरावांनी व थोरात बाईंनी वडिलांना लग्नाआधी जे सांगितलं होतं ते धांदात खोटं होतं. सासऱ्यांचं चक्करबर्डी सोडताच अपघातात निधन झालेलं. पाच-सात वर्ष सेवा म्हणून पेन्शन बसलंच नाही. थोरात बाईंनी मात्र मला पेन्शन मिळतंय अशी बतावणी केलेली. तसेच संपतरावांचा अनुकंपावर लागण्याचाही सुतराम संबंध नव्हता. म्हणून लग्नास आता वर्ष होण्यात येईल हळूहळू तरी तसली काहीच हालचाल नव्हती. राहिला प्रश्न शेतीचा. तर संपतराव लहान असेपर्यंत थोरात बाईंनी किरकोळ उत्पन्न व नंतर कर्ज करत मजेत दिवस घालवले. पण संपतराव वयात आले व हातात व्यवहार घेत व्यसनं बळावली. मग दत्ताजीराव सौंदणकर उचल देत गेले व अटीची खरेदी करत गेले व नंतर खरेदी. अशा रितीनं आधीच पाच एकर गेलं. लग्नाआधी पाच-सहा एकर नावावर होतं पण थोरात बाई व संपतरावांनी उचल घेत आधीच अटीची खरेदी केलेली. म्हणून मुदत संपताच व्याज व इतर रोखीनं टप्प्या टप्प्यानं देत चार एकर पुन्हा घेण्याची तयारी चालवल्याचं मोहनास शेजाऱ्याकडून समजलं. त्याही स्थितीत मोहनानं संपतरावास व सासूबाईस समजावलं. जे गेलं ते गंगेस मिळालं पण आता तरी दोन एकर वाचवा. सर्व हिशोब करत खरेदी करून मोकळे व्हा व उचल घेणं, मौज करणं थांबवा. पाया पडते. दोन एकरात मी राबेन व कमाई काढून दाखवेन पण कृपा करून हे दुष्टचक्र थांबवा. पण परिणाम उलटाच झाला. सासूबाईंनं कोघाट करत, "आताची आलेली तू आम्हास व्यवहार शिकवणार?" थोतांड करू लागली, "व्यवहार करणं, संसार चालवणं सोप्प नसतं! मी व माझा संपत आम्ही काय करतोय तुला काय कळणार गं!तुला फक्त दोन्ही सांज गिळणंच माहीत!"
"सासुबाई ज्याला तुम्ही व्यवहार नि संसार म्हणताय तो सारा उलटा आहे! हेच तर तुम्हास कळत नाही. अहो साधी गोष्ट आहे, जर एखाद्या अवयवाला गॅंगरीन झालं तर वेळीच तेवढा भाग कापण्यात शहानपण असतं. जर का तुम्ही जाणारा भाग वाचवण्यासाठी तसाच धरून बसलात तर किती तरी वर सरकत कापावं लागतं! म्हणून चार एकर जातंय तर जाऊ द्या, ईलाज नाही. पण आताच फैसला करून व्याज थांबवा, उचल घेणं थाबवा व दोन एकर तरी वाचवा. अन्यथा तुमच्या व्यवहारानं म्हणाल तर काही दिवसांनी तेही जाईल!" मोहनानं खडसावलं.
"संप्या आताची आलेली ही शेत विकायला लावते नि तू घुम्यागत ऐकत बसलाय! लाज असेल तर हिचं थोबाड रंगव!" मथाबाई थयथयाट करत ढोंग करू लागल्या.
संपत उठला व पोटूशा मोहनाच्या पाठीत लाथा बरसू लागल्या. पण त्या लाथांच्या मारापेक्षा मोहनास दुसरंच मोठं दु:ख होतं. त्या दिवसापासून ती गप गुमानं गंमत पाहत दिवस भरण्याची वाट पाहू लागली.
दिवस भरले व तिला मुलगी झाली. चार दिवस दवाखान्यात राहून ती टवकीत परतली. तोच चक्करबर्डीहून गज्जन काकानं फोन करून "पोरी एक दिवस येऊन जा गं माझ्या धर्म्या मित्राचा आता भरवसा नाही" भरल्या आवाजात सांगू लागला. मोहनाच्या आसवांचा बांध फुटला. लग्नानंतर दोन वेळा आई-बाबा टवकीत येऊन तिला भेटून गेले होते पण तिनं माहेरात पायच ठेवला नव्हता. कारण आई-वडिलांनी मरणाची भीती दाखवतच तिला मोहनचा त्याग करायला लावला होता. म्हणून तो कढ तिच्या मनात होताच व माहेरात जाऊन कपाळावरचं कुंकू कोणत्या तोंडानं मोहनला दाखवायचं म्हणून ती माहेराला जायचं टाळत होती. पण आता तिचा बांध फुटला. ज्या अर्थी गज्जन काका सांगतोय म्हणजे तब्येत नक्कीच जास्त असणार. ती सासूस विनवू लागली.
पण मथाबाईनं ओली बाळंत, पावसाचे झडी झडकनचे दिवस, लहान बाळ याचा विचार कर मगच घरातून पाय बाहेर टाक, सांगत तिला धमकावलं, "हवं तर संपतला पाठवते..." सांगत संपतला पाठवलं.
पण दुसऱ्या दिवसी सकाळीच गज्जन काकाने रडत आईच गेल्याचं कळवलं. वडिलांची तब्येत जास्त नि आई गेली? तिला कळेना. नि संपतराव तर गेलेत मग त्यांनी का नाही फोन केला? तो पावेतो गज्जन काकानं फोन कट केलेला. संपत जातो म्हणून निघाला व सरळ धुळ्याला जात क्लबमध्ये पत्ते खेळत थांबला होता हे तिला नंतर कळालं.
मोहना लहानशा पोरीला घेत रडतच सासूसोबत चक्करबर्डीला निघाली. सासूनं एकास संपतरावाच्या तपासाला पाठवत चक्करबर्डीलाच आणावयाचं सांगितलं.
चक्करबर्डीला पावसाला सुरुवात झाली ती न थांबण्यासाठीच जणू. एक सारखा पाऊस कोसळत होता. डांगमधील डोंगर फुटून निघत पाणी सैनधार बरसू लागले होते. तिन्ही नाले काठ सोडून वाहू लागलेले. धरणातलं जुनं पाणी वाहून जावं म्हणून पाऊस सुरू होताच सर्व दरवाजे एक महिना उघडले जात. आताही धरणाचे दरवाजे उघडेच होते. म्हणून तिन्ही नाल्याचं पाणी नदीत मावेना. ती ओसंडून चक्करबर्डीत घुसू पाहत होती. पाच-सात दिवस झडी. जुनी जाणती विचार करू लागली की पहिल्या पावसात सहसा झडी लागत नाही! मग? सूर्यनारायणाचं दर्शन होईना. जंगलात, गावात जिकडं तिकडं पाणीच पाणी. डांग जिल्यातील दरी खोऱ्यातून डोंगरातून मोठमोठी झाडे उन्मळून पाण्यासोबत वाहून येऊ लागली. फांद्या, लाकडं, पुरसंग वाहत काठावरून कुठं तरी अडकू लागलं. पहाडातले छोटे-मोठे जनावरंही पाण्यात सापडत वाहू लागली. साप, अजगर बिळात पाणी गेल्यानं कावरत पाण्यात वाहत वाहत काठ, लाकूड, फांदी शोधू लागली. चक्करबर्डीजवळ नदीनं वळण घेतल्याने असलं काहीबाही काठावर लागून वस्तीत हमखास घुसे.
वातावरण सर्द, ढगाळ व झड यानं धर्मूचा दम बळावला. तो हाफू लागला. त्या रात्री पावसानं उसंत देताच त्यानं आपली खाट मोकळ्या हवेत शाळेच्या कंपाऊंडला लागून टाकायला लावली.
मोहन एवढं होऊनही वर्षभरात विसरत म्हणा वा मनातलं कढ मनात दाबत म्हणा, तरी धर्मूस मदत वा देखरेख करतच होता. गज्जननं फोन करूनही मोहना आली नाही म्हणून वाटेवर डोळे लावलेल्या धर्मूनं संध्याकाळी आशा सोडली. मोहन आला तेव्हा तो रडतच "मोहन माफ कर मी चुकलो. मोहास बळी पडलो. खोट्या इभ्रतीत जात, पात, खानदान पाहत...." त्याचा उर भरला. श्वास फुलला. बोलणं थांबलं.
"बाबा का जुन्या गोष्टी काढून उगाच जिवास त्रास करून घेतात! मोहना तिच्या संसारात खुश आहे यातच मी भरून पावलो. नि माफ करण्याचा काय संबंध? तसं असतं तर मी तुमच्याकडं येणं जाणंच बंद केलं असतं!"
"मोहन! ......पोर सुखी!" धर्मू खोल श्वास घेत खिन्न झाला. पण अंधारात मोहनला समजलंच नाही.
"मोहन तू फोन कर .तरच ती येईल. गज्जननं फोन करूनही ती आली नाही. तू मोठ्या दिलाचा आहेस. तू माफ करशीलही. पण ती मला माफ करणार नाही आणि माझ्या मरणाआधी ती आली नाही तर मला शांती मिळणार नाही!"
"बरं आता उशीर झालाय, ती कशावर येईल? त्यापेक्षा उद्या सकाळी करतो..." सांगत मोहन धीर देत उठून गेला.
पाऊस थांबला म्हणून धर्मूनं मोकळ्या हवेतच खाट राहू देत झोपायचा प्रयत्न करू लागला. पोर आली, शेवटची भेट झाली म्हणजे आपण मोकळं; असा विचार करत तो झोपला. रात्री उशीरा जसोदा उठत नवऱ्याच्या खाटेकडं जात पाहून आली. श्वास चालू होता. तिनं पायातीला पडलेली गोधडी अंगावर टाकून देत ती घरात परतू लागली. तोच तिला पायावर काहीतरी टोचलं. ती अंधारात खाली वाकत पाय झटकत खाजू लागली. ती खाटेजवळ आली पण तिला चक्करसारखं जाणवू लागलं. घरातला मिणमिणता दिवा दोन दोन दिसू लागले. ती कलंडली. तोंडातनं फेस,पाय हात वाकडे होत झटके देऊ लागली. पण तिचा आवाजही निघाला नाही. सकाळी उशीर होऊनही जसोदी उठत नाही म्हणून धर्मू हाफत हाफत घरात गेला नी पाहताच त्यानं अस्थीपंजर झालेल्या छातीत दम भरत बोंब ठोकली. लोक आले. रात्री पाऊस बंद झाला होता पण काठावर लागलेलं कातावलेली जनावरे वस्तीत फिरतच होती. त्यांपैकीच एकानं रात्री उठलेल्या जसोदास डंख मारला (पान लागलं) व पाणीही मागू न देता संपवलं.
गज्जननं मोहनाला फोन केला. पण जसोदा गेल्याचं दुःख व पोरीचं वाटोळं केल्याचं दु:खं यानं धर्मूचा श्वास फुलला, की घुटू लागला? त्याला बिदाईच्या वेळचं मोहनाचं वाक्य आठवू लागलं. 'तुटलेल्या काळजाची हाय!' नी बस्स! धर्मूचं दिल पण त्याक्षणी तुटलं.
गज्जनला आता फोनही करता येईना कारण मोहना येण्यासाठी निघाली असल्यानं प्रवासात होती.