STORYMIRROR

Vasudev Patil

Drama Tragedy

3  

Vasudev Patil

Drama Tragedy

ओघळ काजळमायेचे - भाग नववा

ओघळ काजळमायेचे - भाग नववा

6 mins
287


सरतेशेवटी मैना ज्या कुंकवापायी उडून आली होती ते कुंकूही नाही टिकलं. मोहनानं ते टिकावं म्हणून शर्थीचे प्रयत्न केले. पण.....!

  

संपतरावानं ट्रकवर जाणं बंद केलं. मोहिनी वीट भट्टीवर राबू लागली. संपतरावास राहत्या घराच्या कोरीवरच भाजीपाला आणून देई. संपतराव बसून बसून तो विकी. पण पाच-सहा महिन्यात तेही त्याला जड होऊ लागलं व त्यानं अंथरूण पकडलं. मग दवाखान्यात दाखल करत डायलेसीस करणं गरजेचं झालं. धनाबापूनं फकिरा शेठला विनवत सारं सांगितलं. त्यांचा मोठा पसारा. त्यात एका ट्रकवरील ड्रायव्हर कोण लक्षात ठेवतो. पण धनाबापूनं सारं सांगताच त्यांनी मनावर घेत डायलेसीसचा खर्च करत ती सोय उपलब्ध करून दिली. मोहिनी कधी दवाखान्यात तर कधी कामावर अशा दोन्ही आघाड्या सांभाळू लागली. डाॅक्टरांनी एक किडनी रोपणचा सल्ला दिला. आईचं झालेलं वय त्यामुळं शक्य नव्हतं तर मोहिनीची मॅचच झाली नाही. दाता शोधनं महाकठीण. गरीबास दाता मिळणं शक्यच झालं नाही. संपतरावाची आंतरीक इच्छाशक्ती संपली. त्यानं कच खाल्ली. पुढे पुढे अंथरूणात त्याला पाहताना मोहिनीस होणाऱ्या वेदना असह्य होत. दिवसा काम व रात्री सतत संपतरावासाठी जागरण यानं मोहिनीही ढासळली. गालाची चिपाडं आत बसली. कानाच्या पाळीजवळच्या लटा पांढऱ्या होऊ लागल्या डोळ्याभोवती काळी वर्तुळं आतल्या चिंतेच्या छटा दर्शवू लागल्या. घरात फाके पडायची वेळ आली. तरी मोहिनी धीर सोडत नव्हती कारण तिला माहीत होतं की आपणच धीर सोडला तर घर चालेल कसं? व संपतराव तर मग आणखीनच....! पण संपतरावानं तर आधीच धीर सोडला होता. नियतीपुढं हारला होता.


"मोहिनी! आता हा आटापिटा सोड! आता माझी यात्रा उठण्याची वेळ आलीय! तू कितीही प्रयत्न केला तरी नाही शक्य!"


"अहो चालू आहेत उपचार! तुम्ही निश्चीतच उठणार या आजारातून! आणि असला धीर सोडू नका!"


"मोहिनी! जीवनात मी खूप मोठी चूक केली गं! वाहवत गेलो! माणसं ओळखता आली नाहीत मला! आणि तू हुशार, मला भरपूर अडवलं. पण पुन्हा तीच गफलत केली मी! तुलाही ओळखलं नाही व तुझं म्हणणंही धुडकावून लावलं नि सर्वांना उघडं करून चाललो मी! मला माझ्या गुर्मित मित्रांवर खूप भरोसा होता! खल्लास! माझी सोन्यासारखी लेकरं उघडी करून रणांगण सोडून चाललोय मी! तसं पाहता रणांगणात लढलोच नाही मी! पण तू लढत होती तर निदान साथ तरी द्यायला हवी होती मी! तू नक्कीच जिंकवलंच असतं मला! मला माफ कर गं!" नि संपतराव रडू लागले.


"अहो असलं काही मनात आणू नका. जे झालं ते झालं. गेलं ते नशिबात नसावंच आपल्या! तुम्ही का मनास लावता! उगाच त्रास नका करुन घेऊ. झोपा बरं!"


"मोहिनी खूप वाईट वाटतं गं! जे माझ्या जिवावर नऊ-दहा वर्ष जगले, चैन केली, त्यांनी माझ्या पडत्या काळात ढुंकूनही पाहू नये?"


"हे तुमच्या बाबतीतच नाही तर जगाची रीतच आहे ती! जबतक जेब मे आणा तब तक ....! आणि येतीलही कदाचित पण त्यांना अजून कळलं नसावं! तुम्ही मनावर घेऊ नका!"


"मोहिनी एक विनंती होती गं?"

संपतला बोलता बोलता ढास लागली. त्याला बोलणं जड जाऊ लागलं. मोहिनीही घाबरली. तिनं जवळ झोपलेल्या म्हाताऱ्या सासूस उठवलं. तिलाही उठता येणं मुश्कीलच होतं. ती, देवा मला उचल बाबा पण माझ्या पाखरास आऊख दे रे बाबा! म्हणत कशीबशी उठत पोराजवळ जात अश्रू ढाळू लागली.


"मोहिनी, आई काहीही करा पण माझ्यानंतर तुम्ही इथं नका राहू. हवंतर चक्करबर्डीला जा, किंवा खर्डीला जा पण इथं नका राहू."


मोहिनीचा आता मात्र महत्प्रयासाने रोखून धरलेला बांध फुटला. तिला समजलं ही निर्वाणीची आवराआवर चाललीय. ती तोंड फिरवत रडू लागली. पण एवढ्याशा खोलीत तरी ते दिसलंच.


"मोहिनी रडू नको गं! माझी वाघीण मला धिरोदात्त उभी असलेली पाहताना डोळे मिटू दे! तुझं तसलंच रूप माझ्या डोळ्यात कायम राहू दे! अस्वलाला फाडणारी! म्हणजे माझ्या लेकरांना ती हमखास सांभाळेन याचं मला मरतानाही समाधान व भरोसा वाटेल!"

 

मोहिनीनं पदराच्या शेवास अश्रू पुसत "नाही हो नाही रडणार मी! कधीच नाही!" हुंदका दाबला.


"आता कसं! बरं माझ्या श्लोक व श्रुतीला आण गं!"


मोहिनीनं गाढ झोपलेल्या पोरांना धरत संपतरावाच्या कुशीत झोपवलं. पण श्लोकचे डोळेच उघडेनात. त्यानं त्याही स्थितीत दोन्ही पोरांचे पापे घेतले.

 

मग त्याचा श्वास जड होऊ लागला. घशात घरघर‌ वाढली. मथाबाईनं चिरका आकांत करत पाणी द्यायला लावलं. मोहिनी रडतच मांडीवर डोकं घेत पाणी देऊ लागली. मथाबाईनं नंतर सीप टाकली ती तशीच गालावरनं ओघळत उशी ओली करू लागली. दोनच्या सुमारास बारा एकराचा व पवबंधी घराचा राजा असलेल्या संपतरावानं

झोपडपट्टीतल्या खोलीत जीव सोडला. 

  

सकाळी ट्रकांवरील चार-पाच ड्रायव्हर लोकांना घेऊन धावतपळत धनाबापू आला. भाच्यासाठी अश्रू ढाळून कामास लागला. बोळवणी व इतर बाजार करत रामरथ आणला. दुपारी रडणाऱ्या लहान्या श्लोकला कडेवर उचलून घेत धनाबापू पुढं चालू लागला. संपतराव निघाला. कायम पिण्यासाठी आठ-दहा लोकं मागे पुढे फिरवणाऱ्या संपतरावाच्या अंत्ययात्रेस जेमतेम चार खांदे मिळाले. त्यांनी रामरथात ठेवताच अमरधामाला संपतराव निघाले...


मोजून दहा दिवसानंतर गरीबीनं मोहिनीस नवऱ्याचं दु:ख आत साठवत पोरांसाठी कामावर काढलं.


धनाबापुंचीच फक्त तिला साथ होती. बाकी सर्वत्र अंधार व धुत्कार. महिन्याच्या आत मोहिनी व धनाबापूनं निर्णय घेतला. कारण झोपडपट्टी असली तरी तिथं राहून एवढा कबिला पोसणं तिला शक्यच नव्हतं. खोलीचं भाडं, भाजीपाला, गॅस, दूध सारं सारंच न परवडणारं.

    

धनाबापूचं खर्डीला फळ खरेदीचं मस्त बस्तान बसलेलं होतं. फकिरा शेठनं खर्डीलाच मध्यवर्ती ठिकाण करत आजुबाजूचा सारा माल भरलेल्या ट्रका तिथंच येत तिथूनच मग रवाना होत व सकाळी पण इथूनच मजूरांना घेत. म्हणून इथं मोठा गोडावून व पाच सात खोल्या बांधल्या होत्या. भरलेल्या ट्रकांचा तोल काटाही इथंच होता. धनाबापूनं काही गरीब कुटुंबांनाही तिथंच नेत खोल्या रहायला दिल्या होत्या. त्यांनी बापाच्या नात्यानं मोहिनीस समजावत खर्डीलाच सामान नेण्याची विनंती केली. मोहिनीसही संपतरावांची मरतानाची हीच अंतिम इच्छा होती. चक्करबर्डीला तर परतणं शक्यच नव्हतं ना टवकीत. मग खर्डी सासुबाईंचं माहेर व रोजगाराचं ठिकाण. तसं तिनंही काही दिवस संपतरावासोबत आधी तिथं काम केलंच होतं. मग या झोपडपट्टीत राहण्यापेक्षा आपल्याला आता तोच आसरा! म्हणून तीही तयार झाली.

    

फळांच्या ट्रकवरच धनाबापूनं सामान भरत आपली चुलत बहिण मथा, लेक मानलेली मोहिनी, दोन्ही चिमणी पाखरं खर्डीला नेली. गोडावूनजवळील खोलीत सामान टाकला. नंतर लवकरच पोरांचा दाखला आणत श्रुतीला चौथीत व श्लोकला पहिलीत खर्डीच्या जि. प. शाळेत दाखल केलं. गाव तसं तीन-चार हजार डोई वस्तीचं. खाऊन पिऊन सुखी. आधी हा भाग दुष्काळागतच. पण शासनानं वरच्या सिमेजवळच्या डोंगरात धरण व नदीनाल्यांवर बंधारे बांधले. त्यांचा फायदा या आठ-दहा गावांना होत जुन्या विहीरी जिवंत होत भुजल पातळी कमालीची वाढली. काही शेतकऱ्यांनी बॅंकेकडून कर्ज घेत, शासकीय सोईंचा लाभ घेत विहीरी खोदल्या. पण आधीच्या दुष्काळापासून बोध घेत पाणी जपून वापरण्यासाठी अनुदानाचं ठिंबक सिंचन केलं. ठिबक सिंचनानं कमी पाण्यात जास्त क्षेत्र ओलिताखाली आणलं. आधुनिक तंत्र वापरत, बॅंकेकडनं कर्ज घेत नवनवीन प्रयोग करू केले. त्याचं फलित या भागात हलकी लाल मुरमाड जमिनीत ही डाळींब, पपई, केळी, सिताफळ, आवळा अशा फळबागा विकसीत झाल्या. पावसाळ्यात कांदा होऊ लागला. उत्पादन वाढलं तशा प्रत्येकाकडं गाड्या आल्या राहणीमान सुधारलं. फकिरा शेठचा फ्रुटसेलचा धंदा वाढला.

   

गोडावुन गावाच्या बाहेर नदीकाठी पूर्वेला होता. गावकऱ्यांशी सहसा संबंधच येत नसे. गोडावूनच्या उत्तरेला थोड्या अंतरावर जि. प. ची‌ शाळा.

   

मोहिनी बोरं तोडायला, कांदे काढणीला, सिताफळ-आवळा तोडणीला, पपई भरायला जाऊ लागली. इथं तिला बारमाही काही ना काही काम मिळू लागलं. मोकळी हवा, शुद्ध वातावरण व दररोज मिळणारी मजुरी यानं तिच्या बऱ्याचशा चिंता मिटल्या. जसजसे दिवस जाऊ लागले तसतशी संपतरावाच्या आठवणीही विस्मरल्या जाऊ लागल्या. आता श्रुतीही घरच्या कामात तिला मदत करु लागली. ती आईचं पाहून पाहून भाकरी थापायला शिकली.

   

धनाबापुचे मात्र कौटुंबिक हाल सुरू झाले. एकटा मुलगा नोकरी लागताच सुनेला घेत मुंबईला गेला तो येण्याचं व धनाबापूस ओळखण्याचं नावच घेईना. बापूचं व बाईचंही वय होऊ लागल्यानं म्हतारपणीचा आधार त्यांना हवा होता तर तोच त्यांना विसरला होता. म्हणून काम होत नसतानाही ते काम करीतच होते. फकिरा शेठही जुना कामसू व विश्वासू माणूस म्हणून जसं होईल, जेवढं होईल तेवढं पण बापूस सोडत नव्हते.

   

मोहिनी आता संपतराव नसूनही संसार पुढे रेटत मुलांना वाढवू लागली. सासुचं मात्र मुलगा गेला नि फिरणं, उठणं, बोलणं बंद झालं. मोहिनी मात्र तरी काम सांभाळूनही सासूची पूर्ण काळजी घेई. त्यानं त्या म्हाताऱ्या जिवास समाधान वाटे. पण मनात पश्चात्तापही होता की खऱ्या सोन्यास ओळखायला आपण खूप उशीर केल्यानंच आपणास आपला मुलगा गमवावा लागला. पण त्या बिचारीला कुठं माहित होतं की काळ पुन्हा जिभल्या चाटत घोंगावत येत होता व तो घास घेण्यास टपून बसला होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama