Vasudev Patil

Others

4  

Vasudev Patil

Others

ओघळ काजळमायेचे भाग तिसरा

ओघळ काजळमायेचे भाग तिसरा

5 mins
286


भाग तिसरा


    श्रावणाला सुरूवात झाली. भुरभुरणाऱ्या सरी व कोवळ्या पिवळ्या उन्हात डोंगर, शेते, वस्ती न्हात हिरवळ शाल पांघरू लागलीत. धर्मूच्या शेतातला मका मस्त तुर्रे काढण्याच्या बेतात आला. मोहनच्या शाळेचा पट या वर्षी आणखी वाढला व एका नविन शिक्षीकेची बदली होत भर पडली.

  मोहना सकाळीच शेतात निघाली व जसोदाला अचानक त्रास होऊ लागला. त्रास असह्य झाल्यानं धर्मुनं गावातल्या गाडीनं ब्याराला नेलं. तेथील डाॅक्टरांनी विविध चाचण्या केल्या पण निदान न झाल्यानं त्यांनी पेशंटला तात्पुरतं इलाज करत सुरतेला किंवा मुंबईला रेफर केलं.धर्मू घाबरला. तो दोन दिवसानंतर सरळ घरी घेऊन आला. संध्याकाळी तो गाजरे व मोहन गुरूजीकडं शाळेत आला व खाल मानेनं रडू लागला. गाजरे गुरूजीनं त्यास धीर दिला. व मोहनला सुरतेला सोबत जायला विनवलं.

   दुसऱ्या दिवशी रेल्वेनं मोहन, मोहना, धर्मू सुरतेला निघाले.सुपर स्पेशालिस्टकडं दाखवलं. त्यांनी परत विविध चाचण्या केल्या. नी निदान सापडलं. त्यांनी धर्मूस आत बोलावलं.पण धर्मूची हिम्मत होईना व डाॅक्टर काय सांगणार ते ही आपणास समजत नाही.म्हणून मोहन व मोहनास पाठवलं.

  " हे पहा तुमच्या पेशंटची स्थिती खूपच क्रिटीकल आहे. त्यांना दोन मेजर प्राॅब्लेम्स आहेत. एक तर फिट जे सांगता ते वेगळंच आहे. मूळ म्हणजे मेंदूत गाठ झालीय.आणि दुसरी समस्या ही तशीच किचकट. ह्रदयापासुन शरीराला रक्त पुरवठा करणाऱ्या महारोहीणीला फुगा आलाय. त्याला आमच्या भाषेत 'एओर्टीक एन्युरिझम' म्हणतात. तो फुगा फुटण्या आधी एओर्टीक रूट रिप्लेसमेंट करणं म्हणजे शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे. ते ही लवकरात लवकर.अन्यथा पेशंट वाचवणं महा मुश्कील होऊन जाईल. ताबडतोब निर्णय घ्या."

 " बरं सरजी खर्चाचा अंदाज ...?"

 संस्थेचं हाॅस्पीटल असुनही जो अंदाज सांगितला त्यानं मोहनलाही गरगरायला लागलं. तो "खर्चाची तजवीज करून लगेच कळवतो" सांगत बाहेर पडला.मोहना तर बाहेर येताच बाबास बिलगत रडायला लागली.मोहननं धर्मूबाबास समजेल तितकंच सांगत पैशाचा अंदाज सांगितला.धर्मूबाबानं आकडा ऐकताच  जसोदीला घरीच नेत सुखानं खाऊ पिऊ घालण्याचं ठरवलं. सरकारी दवाखान्यातही इतर खर्च करण्याची त्याची पत नसल्यानं त्याच्या साऱ्या आशा मावळल्या.पण तितक्यात मोहनला अनोरकर काकाजी आठवले. त्याच्या मनात एक अंधुक कवडसा दिसला.

 त्यानं खिशातनं डायरी काढत एस. टी.डी.बूथवरनं आश्रमाचा नंबर घुमवला .नशिबानं काकाजी आश्रमातच होते.

" काकाजी मी मोहन!"

"अरे मोहन ,बोल बाळा.तू फोन कसा नी कुठुन केलास?काय विशेष?"

" काकाजी एक मोठी अडचण आहे.आपली मदत हवीय!" मोहन केविलवाणं तोंड करुन बोलू लागला.

" मोहन झालंय काय ते तर सांग मोकळं आधी!"

मग मोहननं धर्मू बाबा ,जसोदा, वस्ती, आपल्यास केलेली मदत, त्यांची परिस्थीती, शस्त्रक्रिया ते खर्च सारं सारं एका दमात सांगितलं.व खर्चाबाबत मदत मागितली.

 काकाजी थोडा वेळ शांत झाले.फोनमधुन आवाज येणंच बंद.

 " तू असं करं त्यांना आधी अकोल्याला घेऊन ये अथवा पाठव. पुढचं काय करायचं ते पाहू" म्हणत मग फोन ठेवला.

" धर्मू बाबा! काकीस आपण परस्पर अकोल्याला नेऊ" मोहन धर्मूबाबास म्हणाला.

 पण कोणताच खर्च करायची ऐपत नसल्यानं मोहना व धर्मू काका नकार देऊ लागले.

 " हे पहा वस्तीवर घेऊन काकीच्या मरणाचीच वाट पाहणार तुम्ही! त्यापेक्षा प्रयत्न करायला काय हरकत आहे. खर्च खूपच सांगितला तर परत आणू हवं तर!" मोहननं समजावलं.

  मोहननं मुंबईस घेऊन जातोय सांगत फाईल घेत दवाखान्यातून सुटी घेतली व स्टेशनवर आणलं. रेल्वेनं अकोला गाठलं.व सरळ आश्रम जी संस्था चालवत होती तिच्याच दवाखान्यात नेलं.प्रवासानं जसोदाची तब्येत आणखीनच बिघडली.काकाजी आले.डाॅक्टरांनी साऱ्या फाईल्स पाहत काकाजींना इथं शक्य नसुन मुंबईच्या आपल्या संस्थेच्या दवाखान्यातच अर्जंट हलवावयास सुचवलं.

  काकाजीनं मोहनला बाजुला बोलवत " मोहन पेशंट नेमकं कोण? कारण मुंबईस आपल्या कुटुबातल्या वा संस्थेतल्या सदस्यासाठीच मोफत असतं. इतरांना पंचवीस टक्के खर्च लागेलच.व तो खर्चही...."

" काकाजी आपल्या सारख्या अनाथाचं कोण असतं? पण आम्ही मात्र साऱ्यांनाच आपलं मानतो.या हिशोबानं माझी आई, मावशी ,काकी काही समजा हवं तर पण हात जोडतो वाचवा!"

मोहनचं काळीज पिळवणारं बोलणं ऐकून काकाजीस भरून आलं.

' लेका तुला तरी नाव देणारा मी आहे पण मला तर तो ही मिळाला नाही' वार्धंक्याकडं झुकलेल्या अनोरकर काकाजी मनात म्हणाले व त्यांनी मोहनचा कळवला ओळखून अॅम्ब्युलंस रवाना केली. मग मुंबईतील आपल्या साऱ्या ओळखी पणाला लावत स्पेशल‌ केस करत लाईन लावली.

मुंबईला पाच-सहा दिवस मोहन व मोहना थांबली. धर्मूबाबाला ते आश्रमात अकोल्यालाच ठेवून गेले होते. आठ दिवसांत सारे उपचार करत संस्थाननं पेशंट पुन्हा अकोल्याच्या दवाखान्यात पाठवला. मोहनची भविष्यासाठी पगारातील दोन हिश्याची जी बेगमी साठवली होती ती सुरत ,अकोला ,मुंबई यात कुठंच गेली.कारण दवाखान्याचा मुख्य खर्च नसला तरी इतर खर्च, औषधी ,राहणं खाणं यात चुराडा झालाच.पण त्याला आपण समाजाचं देणं चुकवतोय यात वेगळंच समाधान वाटत होतं. मोहन शाळेसाठी परत वस्तीत निघाला.धर्मूनं जसोदाची तब्येत पाहून मोहनासही शेतासाठी त्याच्या सोबत परत पाठवलं.

 रेल्वेत रात्रीच्या प्रवासात दगदगीनं मोहन झोपला.त्यास शांत पहुडलेलं पाहत मोहना समोरच्याच आसनावर बसली होती. त्याच्या चेहऱ्यावरील निष्पाप, निरागस भाव झोपेतही स्पष्ट जाणवत होते.मोहनानं मोठा सुस्कारा टाकत मनातल्या मनात विचार केला.

' किती चुकलो आपण माणूस ओळखताच आला नाही आपणास. नको त्या ढोल्याचं ऐकून त्याच्या आग लावणाऱ्या शब्दावर विश्वास ठेवला व मोहन गुरुजीबाबत मात्र विश्वास नाही ठेवला. का तर ढोल्या गावातला तर हा परका म्हणून? त्याच तिरमीरीत केवळ किल्ली घेण्यासाठी आलेल्या या देवमाणसाची काहीही चूक नसतांना अनावधानाने नको त्या वेळी आला म्हणून आपण फेणाचं(दगड)भिरकावला.खरं तर क्षणासाठी त्यावेळी आपण लाजलोच होतो.पण रात्रीचा संताप उफाळून येताच भिरकावला दगड.जेवणाचा डबाही बंद केला.हा काही फुकट जेवत नव्हता.उलट आपल्या बाबाच्या फाटक्या संसारास त्या बदल्यात मदतच करत होता.एवढं होऊनही या माणसानं परोपकार सोडलाच नाही. शेतासाठी भांडवल ही हाच पुरवतोय. नी आता तर आपल्या आईस मरणाच्या दारातून ओढून आणलंय या माणसानं. कदाचित हा माणूस नसता तर आपली आई.....?' तिच्या गालावरून अश्रू ओघळू लागले.नी या साऱ्याच्या मोबदल्यात यानं आपल्या कुटुंबाकडून कधीच काही अपेक्षा केली नाही. तिला आसवांचा बांध आवरणं मुश्कील झालं. बाहेर पावसाला सुरुवात झाली असल्यानं खिडकीतून पाणी व थंडगार वारा आत येऊ लागला.मोहननं झोपेतच आपलं अंग आकसून घेतलं. मोहना उठली तिनं खिडकी बंद केली.पिशवीतून शाल काढली व झोपलेल्या मोहनच्या अंगावर टाकली.शाल अंगावर पडताच मिळणाऱ्या ऊबेनं मोहन झोपेतच सुखावला .त्याच्या चेहऱ्यावरील सुखावणारा भाव पाहत मोहनाही निद्रादेवीच्या अधिन झाली.

  पंधरा दिवस धर्मू, जसोदा अकोल्यात राहिली.वस्तीतल्या शाळेचं रंगकाम करायला आलेली पोरं धर्मूबाबासं हवं नको ते सारं पाहत होती.

  पंधरा दिवसात जसोदा ,धर्मूस मोहन बाबत सारं कळालं. त्या पोरांनी मोहन बाबत सारी माहिती दिली.

  सदानंद अनोरकर (काकाजी) हे मोहन गुरूजीचे वडील नाही तर ते अनाथालय चालवतात. संस्थेत त्यांच्या नावाचा खूपच दबदबा.त्यांनी आजपर्यंत कितीतरी अनाथ मुलांना आश्रय दिला, नाव दिलं, शिक्षण देत समाजात उभं केलं.

   मोहन ही असाच एक.रेल्वेपटरीवर दिडेक वर्षांचं पोर कापलेल्या कोथळ्याजवळ रडत होता. आईनं पोरास जवळ ठेवत रेल्वेत उडी घेतलेली.पोलीस आले.पोरास उचललं.आईची ओळख पटलीच नाही.अनोरकर काकाजीस पोलीसांनी बोलावलं. रडणाऱ्या पोरास काकाजीनं छातीस लावलं ते कायमचंच.पोलीसांनी शवाच्या तुटलेल्या पंज्यातील बोटातून सोन्याची अंगठी काढत ओळखीसाठी ठेवली.पण ओळखणारं कुणी आलंच नाही .मग नंतर काही दिवसांनी ती काकाजीकडं दिली. काकाजींनी मोहन जाणता झाल्यावर ती अंगठी मोहनला दिली. जणू कोऱ्या सातबाऱ्यावर वाडवडिलांची इस्टेट मिळाली मोहनला !

  आश्रमातला मोहन सहाव्या वर्षी शाळेत दाखल झाला तोच सदानंद अनोरकरांचं नाव लावतच. काकाजीनं मोहनला बाप म्हणून आपलंच नाव दिलं व 'मोहन सदानंद अनोरकर ' शिकू लागला. त्याच्या वडिलांचा, जातीचा, धर्माचा पत्ताच लागला नाही.

  धर्मू व जसोदाबाईस हे ऐकून धक्काच बसला. त्यांनी आधी गुरजींना कुटुंबाबात बोलतांना ऐकलंच नव्हतं. व लहान तोंडी मोठा घास किंवा गुरुजी कुटुंबाचा विषय टाळतात म्हणुनही ते विचारतच नसत.पण आता हे ऐकताच मोहन गुरुजीबाबत त्याच्या मनातील प्रतिमेच्या बिलवरास तडाच गेला . पण तरी ही आपणास त्याच्या खाजगी आयुष्याशी काय घेणंदेणं! आपणास हा माणूस देवदुतासारखी मदत करतोय म्हणून दोघांनी तो विचार झटकला.

 पण त्यांनी तो विचार कितीही झटकला तरी नियतीनं वेगळाच खेळ खेळायला सुरूवात करून टाकली होती. ज्याचा परिणाम धर्मू जसोदावर झाल्याशिवाय राहणार नव्हता.


Rate this content
Log in