Vasudev Patil

Drama Action

4  

Vasudev Patil

Drama Action

ओघळ काजळमायेचे - भाग चौथा

ओघळ काजळमायेचे - भाग चौथा

11 mins
448


      चक्करबर्डीत श्रावण अमावास्या उगवली.वस्तीतल्या लोकांनी आपापल्या बैलांना विसावा देत सकाळीच धरणाकडं डोंगरात चरावयास नेलं. उंचच उंच हिरवंगार गवत खाऊन बैलं डिरक्या फोडू लागले.माणसांनी तेवढ्यात मऊ लुसलुशीत गवताचा भारा कापला.दुपारपावेतो बैलांना तुडुंब भरलेल्या धरणात धुतलं.नी वस्तीकडे परतू लागले.तोच डोंगरातून धोधाणा फुटावा तसा धो धो पाऊस कोसळू लागला.तरणेबांड सांड डिरक्या फोडत शेपट्या वर झुलवत चिंब पावसात वाट तुडवू लागली.

 मोहन गुरूजी कालच शाळा सुटताच गाजरे गुरूजीच्या गावाला पोळा करण्यासाठी निघून गेले होते.व आज दुपारीच पोळ्याचं जेवण करुन रात्री आठच्या रेल्वेनं परत यायचं ठरलं होतं.


मोहनानं आई-वडिल घरी नसल्यानं दुपारीच साधंसुधं जेवण करून शेताची वाट धरली.पंधरा दिवसांपासून शेतातील कामं खोळंबली होती ती कुतर ओढ करीत निपटारत होती.मक्याची कणसं आता पक्की व्हायला येत होती.म्हणून या पाच सहा दिवसात जेवढी हिरवी कणसं फेरीवाल्यांना विकली जातील तेवढेच अधिक पैसे येतील म्हणुन अकोल्याहून आल्या आल्या ती सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळ स्टेशनात घेऊन जात होती. आजही सकाळी ती स्टेशनावर कणसं घेऊन गेलीच होती. दुपारून पोळा असल्यानं बरीच लोक आज व उद्या सकाळी कणसं घेऊन जाणार नाहीत म्हणून ती आज जास्त कणसं काढण्यासाठी जेवण आटोपून लगेच शेताकडं निघणार तोच धो धो पाऊस सुरू झाला. तिनं घरातूनं दोन्ही पलिते (मशाली ) फडक्यांनी भरगच्च गुंडाळून तयार करत पाऊस असल्यानं डब्यात जास्त राॅकेल घेतलं व पाऊस थोडा कमी होताच पलिते व दुसऱ्या हातात धाऱ्या घेऊन निघाली.रस्त्यातनं लोक वस्तीत आपली गुरं परत घेऊन येतांना तिला भेटत होती. घरापासून कसायला घेतलेलं सावंताचं शेत दोन-अडिच किमी लांब नदीकाठाच्या अलिकडं होतं. या दिवसात रानात अस्वलांचा धुमाकूळ असे.धरणाच्या वरती काही अंतरावरच डांग जिल्ह्याची सिमा होती.तो भाग पूर्ण डोंगराळ व दाट जंगलानी राखलेला होता.तेथूनच अस्वलं ऋतूमानानुसार खाली उतरत.


 होळी आधी मव्हाची झाडं फुलांनी बहरली की पहाटे दिवस उगवायच्या आधी अस्वलं चुकार वाटसरूना हमखास दिसायची.आणि पावसाळ्यात या दिवसात मक्याची कणसं तयार झाली की संध्याकाळनंतर ती खाली उतरून रात्रीत मक्याची कणसं फस्त करत. म्हणुन शेतकरी मका तयार झाला की रात्री मुक्कामासाठी शेतात दोन टप्प्याचा माळा (मचाण) तयार करत. दिवसा उन्ह, पाऊस पासून बचाव म्हणून माळ्याचा खालचा टप्पा तर रात्री पाऊस नसला की झोपायला वरचा टप्पा.अस्वलाचा थोडा ही सासुल लागला की पलिते पेटवत , डबे वाजवत आरोळ्या मारत. मग शेजारच्या मळेवाला ही गलका करी.तरी एखाद आडदांड जनावर अंगावर यायचंच मग पलिते धाऱ्या घेत सारी चालून त्यास हुसकारत.तर कधी एकट्या दुकट्यास अस्वलंच भोसकारून फाडत. दरवर्षी वर्षातून एकमेकांना घाबरवत आपला जीव वाचवायचा हा निसर्गाचा खेळ एक-दोनदा घडेच.

   

मोहनानं पलिते, धाऱ्या शेतात आल्या आल्या मचाणाजवळ ठेवले. भराभरा कणसं मोडत चार गोण्या भरल्या. दोन गोण्या पळतच ती रेल्वेस्टेशनवर ठेवून आली.व परत मळ्यात येत दोन गोण्या घेऊन आली. सातला रेल्वेची क्राॅसिंग होताच फेरीवाल्यांनी पटापट कणसं घेतली. मोहनानं चहा घेतला व ती परत मळ्यात आली.आता पटापट चार गोणी कणसं मोडून ठेवली की घरी परतू म्हणजे सकाळी लवकर स्टेशनात घेऊन जाता येतील.म्हणून ती घाई करू लागली. मचाणाजवळ येताच तिला शेतात सळसळ आवाज आला.ती घाबरली.पण परत शांतता झाली.तरी तिनं दोन्ही पलिते लगेच हातात येतील असे ठेवत राॅकेलचा डबाही उघडून ठेवला. जवळच्या गंजीतून वरच्या ओल्या काड्या बाजूला करत खालून मधल्या सुक्या काड्या काढून मचाणाजवळ ठेवल्या. काडपेटी मचाणाच्या लाकडात ठेवली.धाऱ्या घेत ती मचाणाच्या आसपासच कणसं मोडू लागली.दोन गोण्या झाल्या, ती पुढं पुढं सरकू लागली. नी तिला परिचीत धडका भरवणारी खुळबूळ जाणवली पण तो पावेतो उशीर झाला होता. धाऱ्या जवळच गोणीजवळ दहाएक फुटावर पडलेला.ती थरथरली.सर्वांगास दरदरून क्षणात घाम फुटला.काळेकभिन्न अजस्त्र धूड पाठमोरं तिरकस तिला तिच्यापासून काही अंतरावर अमावस्येच्या गडद अंधारातही जाणवलं. पण तिचं नशीब बलवत्तर की हवा उलटी असल्यानं त्या धूडाला मोहनाचा वास जात नव्हता.


काय करावं? पळालो तर मचाण गाठण्याआधीच ते आपणास लपकेल. मग तर खेळ खल्लास. रानात पोळ्यामुळं सारीच गावात असल्याने मदतीलाही कोणीच येणार नाही. हळुवार ती अलगद खाली झोपली व धाऱ्याकडं सरपटली. धाऱ्या हातात आला. पण तो पावेतो त्या काळ्या धुडास कोण जाणे सासूल जाणवला असावा. ते मागे वळलं व नाकपुड्या वर करत वास घेऊ लागलं व कणसं खात खात मोहनाकडं सरकलं. मोहना निपचित पडली. फक्त पापण्याआड अलगद डोळ्याची बाहुली फिरू लागली. लालबुंद डोळे चमकले नी तिची खात्री झाली अस्वलच आहे. आता आपण मेलो. तिला आई वडिल आठवले.ते जर आज घरी असते तर आपल्याला असल्या अमावास्येला सणासुदीला येऊच दिलं नसतं. आपल्याला आपला स्वार्थ नडला. पण क्षणात ती सावरली. ही वेळ पश्चात्तापाची नसून लढण्याची आहे. पण आता तर आपण मचाण गाठूच शकत नाही.मग तिनं धडधडणारी छाती आवरली. श्वास कमी कमी करत नियंत्रणात आणला. शरीर एकदम ढिलं सोडलं. अगदी निष्प्राण. तो पावेतो अस्वल कणसं खाणं थांबवत मोहनाकडं सरकलं. नी तोच मंदावलेला श्वास ही रोखला गेला. शांत शांत निवांत. अस्वल आलं.त्या नं तोंडानं सर्वांग सूंघलं. नाकपुड्या वर केल्या. नी परत मोहनाच्या नाकाजवळ लावल्या पण अगदी देह निमाल्यागत. त्याची खात्री झाली. त्यानं एकटक पुन्हा पाहिलं नी आल्या पावली माघारी परतलं नी कणसं खात पुढे तुरकू लागलं. हळूहळू बाहुल्यात प्राण चेतवत बाहुल्या फिरल्यानी रोखून धरलेला श्वास सुटला. हात पाय चेतावले. पण संकट अजुन डोक्यावर होतंच. तिनं पाहिलं. आता पळायला हरकत नाही. धाऱ्या घट्ट पकडला. नी गोळीच्या वेगानं सुटली. मक्याची धाट कडकडा मोडू लागली. पण तोच तेही माघारी फिरलं नी चवचाळत चालुन आलं. बांध नी मग मचाण आलं, ती कोसळलीच. हातात काडपेटी आली डबा सांडला गेला पण तोच नख्यानी पालथ्या पडलेल्या मोहनाच्या दोन्ही पायाचा वेध घेतला. मक्याच्या कणसावरील पापुद्रा सोलावा तशी कापडं व पोटऱ्या सोसल्या गेल्या. तोच असह्य वेदनेने चित्कारत पलटत मोहनानं धाऱ्या उचलला. त्याच वेळी चवताळलेलं अस्वल आपल्या पंज्यानं तिच्या तोडांचा वेध घेण्यासाठी खाली झुकायला लागलं नी मोहनानं धाऱ्याच टेकवला. पलोते पेट घेऊ लागले. एकच भणकाऱ्यात धाऱ्याचं दांडकं मोडत दूर भिरकावलं गेलं पण हातात आलेल्या पात्यानं मोहनानं त्याच्या अंगावर वार केला. त्याच वेळी ओझरते ओरखडे हाता पोटावर पडले. तोपर्यंत पलिते धुमसायला लागले. मोहनाने पेटता पलिता उचलत फिरवला. आग धडाडली नी चवताळलेलं धूड पुन्हा वार करत माघारलं ती संधी साधत मोहनानं दुसराही पलिता हातात घेत उठू लागली. भडकणारी आग पाहताच ते पुन्हा माघारलं. आग पाहून माघारी फिरणारं अस्वलानं पुन्हा पळत येत वार केला पण पलिते पुढे करत तिनं आपला चेहरा वाचवला तरी हातावर पंज्याच्या नख्या ओढल्याच गेल्या. आग वाढलेली पाहून ते आरडा करत चवताळत पळालं. जातांना मक्याची धाट मोडतच डोंगराकडं गडप झालं. तरी त्या धुंदीत तिनं काड्यावर डब्यात उरलेलं राॅकेल सांडत कान्ड्या पेटवल्या. आगीच्या उजेडात तिचं अंगावर लक्ष गेलं. रक्ताच्या धारा व ओरबाडून चिरलेले हातपाय पाहुन तिला चक्कर येऊ लागले. त्याही स्थितीत ती घराकडं जाण्याचा प्रयत्न करू लागली. पण ते शक्य न दिसल्याने धुमसणाऱ्या आगीजवळच पडली.


   आठच्या रेल्वेने मोहन गाजरे गुरुजीच्या घरून दुपारीच पोळ्याचं जेवन करून परतला.व वस्तीची वाट धरली.स्टेशनाबाहेरच त्याच गाडीतून उतरलेला गज्जन त्यास भेटताच ते सोबत वस्तीकडं येऊ लागले. बोलत चालत शेताच्या बांधावरून डोक्यापार मका ज्वारीतून ते नदीजवळ आले.दुपारच्या पाण्यानं नदी दुथडी भरून वाहत होती.धरण भरून ओसंडा बाजुला काढल्यानं त्यानंच नदीही वाहत होती.कशीबशी नदी पार करून ते वाटेला लागले. तोच धर्मुच्या कसायला घेतलेल्या सावंतांच्या शेतातून गज्जनला आगीचा पपेटलेली दिसली. गज्जन फुल टल्ली होता तरी रानाशी खेटणाऱ्या अनुभवी गज्जननं लगेच ओळखलं.आग दिसतेय म्हणजे काही तरी नक्कीच गडबड आहे. त्यानं डोलत डोलतच सावध होत मोहनला तिकडं नेलं तर मचाणाजवळचं दृश्य पाहून ते दोघे थरारले.रक्तात न्हालेली मोहना अर्धवट ग्लानीत होती.

" पोरी मोहना !काय केलस हे! सणासुदीला काय गरज होती यायची! माझ्या धर्मू दोस्तास आता मी काय उत्तर देऊ.मोहनला तर हे कशानं नी काय झालं हेच कळेना.गज्जननं तिला बसतं केलं.

" गज्जनकाका काय झालंय हे?" मोहन घाबराघुबरा होत विचारू लागला.

" गुरुजी पोरीला अस्वलानं झडपलं.तरी आमची पोर वाघीण म्हणून तिनं अस्वलास पिटाळलेलं दिसतंय." गज्जन मोहनास उचलू लागला.पण झालेलं वय व टल्ली म्हणून मोहनास उचलता येईना.

" गुरूजी उचला पोरीला! वस्तीवर नेऊ!"

मोहन मागे सरकत " मी? मी कसा उचलू?" मोहनला साबणाचा प्रसंग आठवला व आता तर धाऱ्याचं रक्तानं माखलेलं पातं जवळच पडलेलं.

" गुरुजी कसला विचार करताय!कोण बोलेल तर मी आहे!इथं पोरीचा जीव मोलाचा आहे.उचला पटकन"

मोहननं मोहनास उचलत खांद्यावर घेतलं व वस्तीकडं निघाले.अर्धवट ग्लानीत मोहना " मोहन!मोहन!धूडाला जितं सोडलंच नसतं रे!पण या धाऱ्याचं दांडकंच मोडलं!नाहीतर जिताच फाडला असता!"


मोहन मात्र कधी न बोलणारी मोहना थेट आपणास एकेरी 'मोहन' नावानं बोलतेय यानं तिला धरून चालणं मुश्कील होत असतांनाही वस्ती जवळ करत होता.गज्जननं वस्ती येताच आरडा ओरडा करत वस्ती गोळा केली.गज्जननं मोहनास त्याच्याच घरी न्यायला लावलं.मोहन तिला बाजल्यावर टाकत बाजुला सरकू लागला.पण मोहनानं त्याचा हात गच्च पकडला.मोहनला दूर जाताच आलं नाही.वस्तीतली सारी गोळा झाली.बायांनी फडक्यांनी रक्त पुसत जखमामध्ये हळद भरली.कुणी तरी वस्तीतून गाडी आणली. रात्रीच गाडीतून गज्जन, मोहन यांनी मोहनास ब्यारास नेलं.गाडीतही मोहना वेदनेने कण्हत मोहन मोहनच करत होती. रात्री डाॅक्टरांनी इंजेक्शन देत उपचार केले. व नंतर बऱ्याच जखमांना टिचेस घातले. एकट्या पोरीनं अस्वलाचा हल्ला परतवलाच कसा? तेही बऱ्याच केसेस मध्ये अस्वल नाक कान जबडा याचा लचका घेत तोंडाचाही लचका तोडतं. मोहनाच्या तोंडाला तर काहीच नव्हतं.याचं सर्वांनाच कौतुक वाटलं. दोन तीन दिवस उपचार झाल्यावर डाॅक्टरांनी डिस्जार्च दिला.पण गज्जन कफल्लक.गावातून येणारे पाहून परतत.पावसाळा असल्यानं अजुन कोणतंच ठोक पिक हाती आलेलं नाही.त्यामुळं जो तो कडकीत.व कुणाकडं असले तरी धर्मूसारख्यासाठी कोण करणार.मोहनची सारी शिल्लक जसोदाबाईसाठी खर्च झालेली.दोन दिवसांपासून खिशातले सर्व खर्च.गज्जन मोहनकडं तर मोहन गज्जनकाकाकडे पाहू लागला.मोहनचं लक्ष बोटातल्या अंगठीकडं गेलं.पोलीसांनी काकाजीकडं व काकाजींनी जाण आल्यावर त्याच्याकडं दिलेली.पुढे बोटात बसु लागल्यावर त्यानं ती बोटातच वापरायला लागला..आपल्या जिवनाच्या सातबाऱ्यावर वडिलोपार्जित एवढीच मिळकत.अंगठी बोटात असली की मोहन तिच्याकडं पाहत आकाशातील मेघाकडं पाही.आकार बदलणाऱ्या मेघात पुसटशी आकृती तयार होऊ लागे.मोहन त्या आकृतीकडं व अंगठीकडं डोळे फाडून फाडून पाही पण आकृतीचा चेहरा पुसटच राही.स्पष्ट होऊ पाहतोय तोच एखादा मेघ गाडीचा आकार घेई व जोरानं टक्कर मारी मग सारं क्षणात उध्वस्त.आपलं जवळचं कुणीतरी तो मेघात व अंगठीत शोधण्याचा प्रयत्न करी पण कुणीच दिसेना ,अस्पष्ट चेहऱ्या शिवाय.मग त्याला अनोरकर काकाजीचा हसरा चेहरा दिसला की तो‌ रडतच किती तरी वेळ धुमसे.मोहननं ब्यारातील सराफाकडं अंगठी ठेवली व बील पेड केलं. तो पावेतो संध्याकाळ झाली.


  गज्जननं पोष्ट आॅफिसात फोन करत रेल्वेस्टेशन वर गाडी पाठवायला सांगितली.मोहन व मोहना रेल्वेने परत फिरली. गज्जनकाकाला मात्र काम असल्यानं ते ब्यारालाच थांबले. रेल्वेत गर्दी नव्हतीच. मोहन व मोहना बसले.तोच मोहना मोहनच्या कुशीत शिरत गच्च धरत रडू लागली.मोहनला एकदम विचीत्र वाटू लागलं.तो तिला समजावू लागला.पण ती ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हती.मग मोहनच्या हाताची मऊ जखड तिच्या भोवती पसरताच तिचं रडणं थांबत ती पुर्णपणे विरघळली.गढुळ वाहणारी पाण्याची धार नितळ होताच पात्राचा ठाव दिसावा त्याप्रमाणे वाघिणीसारख्या मोहनाचं कोमल ,निर्मळ मन स्वच्छ दिसू लागलं.मोहनाचं मनरूपी पात्र अकोल्याहून परतली तेव्हाच नितळ व्हायला सुरुवात झाली होती पण मोहनला ते आज कळालं.नी बोटात अंगठी नव्हती तरी अंधाऱ्या आकाशातील मेघात आपल्या आईचा चेहरा शोधणाऱ्या मोहनला आज विना सायास आईचा नाही पण मोहनाचा चेहरा स्पष्ट दिसू लागला.आई नाही पण आपल्या काळजातलं कुणी तरी आपलं माणुस सापडलं म्हणून कित्येक वर्षानंतर त्याचं धुमसणारं मन आज शांत झालं.

    

धर्मू व जसोदा परतले.मोहन गुरुजी शाळेत रममाण झाले.मोहना आता दिलखुलासपणे वावरू लागली.बदललेली मोहना गाजरे गुरूजीनी ओळखली.त्यांना आनंद झाला.त्यांनी मुलीच्या नात्यानं मोहन बाबत विचारलं.होकार मिळताच त्यांनी मोहनला ही विचारलं .मग त्यांनी धर्मुस त्याबाबत छेडलं.त्यांची अपेक्षा होती की धर्मूस कोण आनंद होईल.पण धर्मूनं तो विषय टाळत उठून निघून गेला.धर्मू परतला तेव्हापासून मोहनबाबत जरा दुरावलाच होता कारण अनाथ मोहन ही कल्पनाच त्यांना सहन होईना.तरी त्याची वागणूक, त्याचे उपकार म्हणून मोहनचा 'गुरूजी' म्हणुन आदर करणं त्यास ठिक वाटे.तशी तडजोड ही त्यानं करून घेतली.पण परतल्यावर मोहनाची बदलती वागणुक ,गज्जनंंही मोहन मोहनाच्या लग्नाबाबत कालच काढलेला विषय यानं धर्मू भडकला. त्यातच आज पुन्हा गाजरे गुरुजींनी तोच विषय काढला. मोहन अनाथ असुन आपण गुरुजी म्हणून त्यास स्विकारू पण जावई म्हणून कदापि नाही.म्हणून त्यानं उत्तर न देताच उठणं पसंत केलं.

  

धर्मू ज्या शाळेत शिपाई होता.त्याच शाळेत पंचवीस वर्षांपूर्वी थोरात म्हणून शिक्षक होते. पाचेक वर्षानंतर ते बदलून गेले.व वारल्यानंतर काही कागद या संस्थेत होता तो घ्यायला थोरात बाई आली होती.त्यावेळचे जुने संबंध .ओळख निघताच उजाळा मिळाला.धर्मू त्यांना घरी घेऊन आला.मुलगा ही सोबत होता.विषया मागून विषय निघाला.बापाच्या जागीच अनुकंपावर मुलाचं काम होतंय.शिवाय पाच सहा एकर शेती आहे , गाडी आहे.देवाच्या कृपेनं चांगलं आहे,फक्त आता पोराचं लग्न झालं की मोकळं. थोरात बाई मोहनाच्या सौंदर्याकडं पाहत सांगत होत्या पण धर्मूचं लक्षच नव्हतं. बाईनं धर्मूस मुलाकरीता मुलगी शोधायला सांगत बागलाणमधील गावाचा पत्ता देत दाणे टाकत निघून गेली.मुलगा ही मोहनाकडं वळून वळून न्याहाळत होता.

    

धर्मूनं आता शाळेकडं फिरकणं बंद केलं.पण मोहनाला वाटलं तेव्हा ती बिनधास्त मोहनशी बोले. जे आता धर्मू व जसोदास खटकू लागलं.माणूस कितीही गरीब असला तरी तो खानदान इभ्रत, धर्म, जात याबाबत गरीब नसतो, याबाबत धर्मूही अपवाद नव्हता.

  गाजरे गुरूजीनं गज्जनला पकडत धर्मुला समजावण्यासाठी धर्मूच्या घरी आणलं.मोहना जसोदाही होतीच.मोहनानं चहा ठेवला.

" धर्म्या ,गुरूजींचं काय म्हणणं आहे!" गज्जन म्हणाला.

" काय?" कपाळावर आठीचं जाळं आणत धर्मू म्हणाला.

" मोहन गुरुजी व मोहना जोडं छान बसतंय,पोर सुखी होईल!"

" मला अजून मोहनाचं लग्न नाही करायचं!" धर्मू ताठ्यातच.

" अरे मग थांबू त्यात काय एवढं,पुढच्या वर्षी कर!"

" नाही पुढच्या वर्षी पण नाही!"

आता गज्जनची सटकली.

" धर्म्या सिधा सिधा चाल, उगाच आडवं मुतू नको.मनात काय ते साफ सांग!"

" गज्ज्या, लेक माझी आहे ,माझी मर्जी!"

" लेक तुझीच आहे.आम्ही कुठं नाही म्हणतोय. पण आम्हीही तुझेच आहोत.पोरीचं कल्याण व्हावं म्हणुन सांगतोय!"

" पण मला नाही द्यायची!"

" धर्म्या !विसरलास का? मरणाऱ्या जसोदी वहिणीस गुरुजीनं मरणाच्या दारातून परत आणलं.शिवाय मोहनाला ही अस्वलानं झडपलं तेव्हाही तेच उभे राहिले!नी मोहनाही तयार आहे.मग तू का नाही म्हणतोस?"

"गज्ज्या गुरुजीचं उपकार आहेत मी मान्य करतोय.माझी मुदत ठेव भरली की आलेल्या पैशातून त्याची पै पै चुकती करीन!"

" आरं पण गुरुजीनं कुठं पैशै मांगितले?ते तर उलट तुझ्याशी नातं जोडताहेत!"

" नाही मला ते मान्य नाही"

" मान्य नाही !का?"

"गज्जू साऱ्या गोष्टी उलगडून नाही सांगता येत!पण नाही."

"धर्म्या दोन जिवांचा प्रश्न् आहे.'का नाही' ते सांग?"

" गज्ज्या , मोहन गुरुजी अना....थ!"

" धर्म्या तोंड सांभाळ! नाही तर मुस्काट फोडीन!" गज्जन संतापला.

" अरे पन .....जो मोहन अनाथ आहे तो माझ्या मोहनाचा नाथ कसा होऊ शकेल?" धर्मू ही जोरात बोलला.

आता पावेतो शांत बसलेली मोहना उठली.

" बाबा अनाथ मोहन गुरुजीचं भांडवलं तुम्हास चालतं, आई साठी सुरत, अकोला मुंबई केलीली धावपळ चालते, त्यासाठी त्यांनी साठवलेली जमापुंजी औषधासाठी खर्च केलेली चालते.या तुमच्या जखमी पोरीला शेतातून खांद्यावर उचलून आणत दवाखान्यात घेऊन जाणं चालतं, बील देण्यासाठी अंगठी मोडणं चालतं मग तोच तुमच्या मुलीचा नाथ म्हणून का चालत नाही?"

मोहना संतापली होती.

" मोहने! तोंडाला लगाम दे! तू लहान आहेस अजुन! तुला काही गोष्टी कळत नाही! त्यांच्या जातीचा, धर्माचा, इतकंच काय.बा..पा...चा पत्ता नाही!"

" धर्म्या.....! देवमाणसाची जात, बाप काढतांना तुझी जीभ कशी झडत नाही!" गज्जननं त्यांची छातीच पकडली.

पण गाजरे गुरूजीनं मध्ये पडत गज्जनला आवरलं.

" आरे आहे गुरुजी अनाथ....पण तुझ्या घराला वाचवण्यासाठी कोणता सनाथ धावून आला? सांग?"

विषय वाढतोय व धर्मू ऐकत नाही म्हणून गुरूजींनं गज्जनला उठवलं.व नाराजीनं ते माघारी फिरले.

त्या रात्री रात्रभर जसोदा- धर्मू व मोहनात भांडण चाललं .शेवटी टोकास गेलं.जसोदाला पुन्हा फिट आलं व घरात लोळू लागली. तर धर्मू दम्यानं हाफसू लागला.

  सकाळी धर्मू बागलाण मध्ये निघून गेला.व दुसऱ्या दिवशी गाडीनं थोरात बाई नी मुलगा संपत यांना घेऊन आला.संपतनं मोहनास एका पायावर पसंत केलं.रडून रडून डोळे सुजलेल्या मोहनाच्या मर्जीचा प्रश्नच नव्हता. देव उठताच मथा थोरात बाईंनी पोराचं लग्न उरकवलं.मोहना सुन्न! आजारी आई, कफानं भरलेल्या छातीचा दमेकरी बाप वाचावेत म्हणून मोहनानं सारं दु:ख गिळत मोहनला समजावलं.

पण मोहननं आश्रम गाठत काकाजीच्या मिठीत शिरत हमसून हमसून रडतांना सवाल केला ,

" काकाजी अनाथाचं कोणीच नसतं का? "

" पोरा कोणी आहे किंवा नाही हे न पाहता अनाथांनी साऱ्यांना जवळ करत एकट्यानं वाटचाल करायची असते.तुला तरी मी आहे! तुझ्या नावामागं भक्कम पणे उभा! मात्र मला कोण? सारी वादळवाट मी एकटाच तुडवत आलोय व तुडवत राहणार!फक्त माझी छाया तुझ्यावर नको पडो हीच त्या अलक्षा कडं मागणी करतोय!" नी काकाजी पण अश्रू ढाळू लागले.

  मोहनला वाटलं आपणास दुखात लोटत मोहना सुखी झाली .पण येथूनच तिच्या दुर्दशेला सुरुवात होणार होती


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama