किशोर राजवर्धन

Inspirational

4.6  

किशोर राजवर्धन

Inspirational

बोक्याची डायरी

बोक्याची डायरी

13 mins
2.1K



सदर लेखन काल्पनिक असून निवळ साहित्याचा आनंद घेण्याकरिता लिहिली आहे.

या लेखातील लेखनाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित असून पुस्तकाचे किंवा त्यातील अंशाचे पुनमुद्रण वा नाट्य चित्रपट किंवा इतर रुपांतर करण्यासाठी लेखकाची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. तसे न केल्यास कायदेशीर कार्यवाही होऊ शकते.

दि.01.01.2017

आज रविवार सर्वात व्यस्त दिवस . सकाळी सकाळी तीन ठिकाणी मासे खायला जावं लागलं. खुप धावपळ झाली. “काळ्या” ही लपत छ्पत मेजवानीला आला होता. मी कधीच पाहिलं होतं त्याला, पण आज त्याच्याकडे लक्ष द्यायलाही मला वेळ नव्हता. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त हादडायच होत ना.!

जेवण मात्र अगदी फस्ट क्लास होतं. पोट तुडूंब भरलं. मग समाधानाने पंजे चाटत पाण्याच्या टाकीवर लवंडलो आणि मस्तपैकी ताणून दिली. पण मध्येच कसल्याशा आवाजाने दचकून जाग आली. डोळे किलकिले करुन बधितलं तर पहिल्या मजल्यावरची लठ्ठ बाई “चुक-चुक” आवाज करुन मलाच बोलावत होती हातात एक अख्खी चपातीही दिसतं होती. (मनात विचार आला.. ही बाई कधी चपातीचा टीचभर तुकडाही खायला घालत नाही…आणि आज चकं एक अख्खी चपाती? नक्कीच चार-पाच दिवसांची शिळी असणार..!) खुप आग्रह करत होती (पण मी लक्षच दिलं नाही. मनात म्हंटलं बस बोंबलत.. कावळे ही खाणार नाहीत ती..फुकटची झोपमोड केली यार…!)


दि.10.01.2017

आज दिवसाची सुरुवात फारच खराब झाली. नेहमीसारखा फाटकापाशी सकाळची कोवळी उन्हं खात बसलो होतो. एवढ्यात पाठीमागून अप्पा कांबले आले आणि कंबरेत एक सणसणीत लाथ घालून गेले..! (वरुन अगदी शांत – सरळ दिसणारी मांणसही किती ‘ डेंजर ’ असू शकतात हे आज कळलं


दि.15.01.2017

आज भल्या पहाटे बासुंदीचा वास नाकात शिरला.. उठल्या उठल्या कोणी बासुंदी करायला घेत असेल असं वाटतं नव्हतं. पण तरीसुध्दा खात्री करुन घ्यावी म्हणून वासाच्या अनुषंगाने शोध घेत घेत पुढे चाललो होतो तर वाटेत काळ्या आडवा आला. मग काय, गप्पकन मानगुटच धरली त्याची. तसा लागला गयावया करायला. मग आवाज जरा चढवूनच म्हणालो “अबे..ए मच्छर, तुला दहा वेळा सांगितलंय ना मी की हा माझा एरिया आहे. इथे पाऊलसुध्दा टाकायचं नाही. तरी देखिल माझ्याशी पंगा घेतोस. थांब, तुझी धुलाईच करतो आता. ” असं म्हणताच काळ्याने सपशेल लोळणच घेतली पायावर. मग मी पण थोडा विचार केला. काळ्याच्या धुलाईपेक्षा बासुंदीचा शोध घेणं जास्त महत्वाचं होत. शिवाय काळ्याने स्वत:ची हार मान्यही केली होती. म्हणून एक शेवटची वॉर्निंग देऊन त्याला सोडून दिलं शेपूट खाली पाडून धूम पळाला बिचारा. अरे आपली वटचं आहे तशी ! एवढ्यात मागच्या पायाजवळ काहीतरी जाड आणि केसाळ हलल्यासारखं वाटलं केवढ्यांदा दचकायला झालं..! पण पुढच्याचं क्षणी कळलं की ती माझीच फुगलेली शेपूट आहे!!


दि.18.01.2017

आज दुपारी अचानक पाठीला खाज सुटली. थांबता थांबेना. शेवटी बाजूच्या मैदानात जाऊन गडाबडा लोळलो तेव्हा कुठे जरा बरं वाटलं. पण सगळं अंग धुळीनं माखलं , मग कठड्यावर बसून निवांतपणे अंग चाटू लागलो.. मनात विचार आला, “ ही माणसं अंग साफ न करता वर्षानुवर्ष कशी काय राहतात बुवा..!” वाटलं आताच जावं आणि एकेकाचं अंग चाटून चाटून स्वच्छ करावं..!

********************************************************************************

दि.15.02.2017

पाटलांच्या दारात त्याच्या प्रंचड अल्सेशियन कुत्र्याने माझे भरगच्च स्वागत केले. प्रथम माझ्या डाव्या पायाची चव त्याने घेऊन पाहिली, त्यानंतर आपटून की घाबरुन पुढल्या दोन पायांनी आलिंगन दिले आणि कानाचा धावता टोक चाटला. ( गडबडीत पाटलांच्या पंच्यापासून काचा सुटला, पण कमरेपासून पंचा सुटला नाही.!) काही वेळाने एक लूंगीवाला माणूस धावत आला अणि त्याने नुसत्या “अबे @#%$@%#....” एवढ्या दिन शब्दांनी त्या भयानक जनावराला लोळण घ्यायला लावली. लूंगीवाल्याच्या थाटावरुन हा दुधवालाच अशी माझी समजूत झाली आणि त्याला घासून जवळीक निर्माण केली. एक डोळा कुत्र्यावर तर दुसरा लूंगीवाल्यावर ठेऊन मी पाय दुमडून बसून राहिलो. लूंगीवाल्याने मला प्रेमाने उचलून घेतलं अणि “ कितनी प्यारी बिल्ली है ” असे म्हंटलं. माझ्यासारख्या राजबिंड्या बोक्याला “ बिल्ली ” म्हणताच मी मात्र माझा स्वाभिमान जपू की रोज दुध पिण्याची सोय करु याचा हिशोब करु लागलो. पण माझे प्राण वाचवले म्हणून पारडे त्याच्याबाजूने झुकले आणि रोज दुध प्यायला मिळेल या विचाराने त्याच्या पायाजवळ घुटमळट राहिलो. पण पाटलांनी मला गोंडस मांजर म्हंटलं. मग मात्र मी थेट तिकडून काढता पाय घेतला. वाटेल मला काळ्या भेटला त्याने मला शेपटी हालवून सलाम केला. तेव्हा कुठे माझा मुड ठिकाण्यावर आला.

तिथुन कंपाउंड वर बसायला निघालो, तर तिथे नेहमी सारखा पर्शा बसलेला, त्याची प्रिया आता या वेळेला समोरच्या खिडकीत विंचरत उभी असते तिला न्याहाळत हा बसतो. मला हा पर्शा अगदी आवडत नाही. ( ह्याला हिच जाग भेटते प्रत्येक वेळी……. बिचारी प्रिया किती सुंदर मुलगी आणि शेंड फळ कुठलं..प्रिया बाबत काय सांगायच तर प्रियाने एकदा… मी निवांत कंपाउंड बसलेला पाहून मला जवळ घेतलं होतं आणि माझ्या गालला गाल घासून म्हणाली होती “ हाय....हँडसम ”)

थोड्या वेळाने प्रिया ट्युशनसाठी बाहेर पडली, लगेच हा निघाला तिच्या मागे मग आपलं डोक जाम सरकलं, गोलो सरळ त्याला आडवा, पर्शा एकदम दचकला आणि पुट्पुटला “ साला , गेलं मांजर आडवं, म्हणजे आजही ती बोलणार नाही.”

इकडे मी मस्तपैकी त्याच्या रिकाम्या जागेवर जाऊन बसलो… मनातून अगदी उकळ्या फुटत होत्या.


दि.28.02.2017

पहाटे पहाटे कानात कोणीतरी शिरलं काय या भितीने उठलो पाहतो काय शेजारी जाधवांचा मुलगा माझ्या कानात केरसूणी घालून मला हाकलत होता. हा मुलगा मला कालपर्यंत दुध आणि पाव खाउ घालून माझेच अंग घुसळून काढायचा तेव्हा माझ्या डोक्यावर प्रश्नचिन्ह आलेलं मी जाणवलेल कारण यांना इतके उबदार घरे असताना हे इथे गच्चीत का बरे कलंडतात..? म्हणून मी हुशार डॉली आणि चुणचुणीत मनीला बोलावून आणलं तेव्हा मला समजलं की , आता या मुलांची परीक्षा सुरु आहे. घरात त्यांची मोठा आंबाडा घालणारी आणि कुंकूवाचा गोल लावणारी आई तोंडाचा पट्टा चालवतं असते. म्हणून अभ्यासाला तो आणि चाळीतली सर्व मुले इथे येऊन अभ्यसाला येतात मी आणि मनी उगाचचं पप्याच्या पाठीला अंग घासून त्याची पँट मळवत होतो. मघाच्या केरसूणीचा डॉलीने चाऊन चाऊन चांगलाच फडशा पाडला होता. मला डांबिस म्हणणारा वश्या आज अभ्यासाच्या नादात दोनदा शेपटीवर पाय देता बचावला. बाकी आपलं जिण काही या लोकांसारख तडजोड करण्यात वाया न घालवता मी आजचा दिवस यांच्या मांडीवर तर कधी त्याच्या मांडीवर संपवला. दिवस संपता संपता वश्याने दोनदा माझा उशी म्हणून वापर केला. म्हणजे त्याला किती मार्क मिळतील हे मी आज सांगू शकतो.

दि.08.03.2017

कालचा दिवस खुपच खराब गेला. काय भयानक प्रसंग होता, आठवलं तरी अंगावरचे केस ताठ उभे राहतात. त्याचं काय झालं, काल जरा चव बदल म्हणून शेजारच्या थेटरमधे गेलो होतो. तिथे काय मस्त चवदार घुशी मिळतात म्हणून सांगू…. एकदम झकास एक अख्खी झोडली मी एकट्याने पोट जाम तठ्ठ भरलं तिथुन रेंगाळत परत आलो, आता मस्त ताणून द्यावी म्हणून चिंगीच्या घरी गेलो. नेमकं चिंगीन पकडलं माझे छान लाड केले आपली एक लाल रिबन माझ्या गळ्यात बांधली, आपण एकदम हिरो दिसू लागलो, एकदम चिकणे , अरे यार आपली पर्सनालिटीच वैशी है..

पण साला तिथेच तर वांधा झाला ना?

आपलं चिकणं थोबाड मनी पुढे मिरवायची हौस आली ना आपल्याला म्हणूनच तर सगळा घोळ ना राव. तिथुन निघालो थेट मनीकडे वरच्या कौलांवरुन जरा लवकर पोहोचावं म्हणून गेलो झालं.. आता एक लाँग जंप की आलं मनीचं घर समोरच मनी आपलं अंग चाटत बसली होती. एक जोरदार उडी मारली आणि पोटातल्या घुशीनं राडा केला…. आपण समोरच्या कठड्यावर पोहोचलोच नाही. गेलो तो सरळ खालच्या मजल्याच्या पन्हाळीत, एक पाय नळकांड्यात आणि तीन पाय बाहेर लटकत… वर चढताही येईना, खाली पडताही येईना..लटकलो झालं…किती वेळ माहिती आहे…? तब्बल अ-डि-ज तास असली वेळ दुश्मनावरही येवू नये रे बाबा..! समोर दचकून उभी राहिलेली मनी आणि इकडे लटकलेले आम्ही…छे..छे..! अगदी आठवण देखिल नको वाटते….

********************************************************************************

दि.12.03.2017

आज चार दिवस झाले नुस्ता दुध –भात खातोय. नाइलाज आहे यार, लटकणे प्रकरण जरा जास्तच अंगाशी आलं पुढचा पंजा चांगलाच दुखावला आहे, अजूनही तीन पायाची लंगडीच चालू आहे. त्या दिवसापासून शेवटच्या खोलीतल्या जोशी आजींच्या खोलीत मुक्काम आहे. त्यांच्याशिवाय दुसर कोण थारा देणार होत..? बिच्या-या आजी अगदी मनापासून माझी सुश्रूशा करताहेत. साला आपणच हरामखोर, आजपर्यंत या खोलीकडे चुकूनही फिरकलो नाही. आजी कडे मासाही नसतो, दुधा-तुपाच्या बरण्याही नसतात. जोशी आजी गेले कित्येक दिवस एकट्याच राहतात. बिच्यारी म्हतारी नुस्त्या प्रेमाची भुकेली आहे. कदाचित नातवंडावर प्रेम करता येत नाही. म्हणून मला लळा लावते. सालाअ आपलं चुकलंच. खरी माया कधी ओळखताच आली नाही. आता एक मात्र नक्की, बरं वाटायला लागल्यानंतरही रोज एक तरी फेरी आजीकडे मारणारचं. माया करायला आणि करुन घ्यायला काही पैसे पडत नाहीत.

दि.18.03.2017

चार – पाच दिवस झाले , आता इथून मुक्काम हलवला पाहिजे. ऐतं बसून खाणारी आपली जात नाही. स्वत: कमवून खाण्यावर आपला विश्वास आहे दोन वेळेच्या दुध भाकरीसाठी कुणाचे तरी पाय चाटायला आपण काही मोती नाही. नाही तरी दुध-भाताचाही आता जाम कंटाळा आलाय. नाही म्हणायला परवा आजींचा मुलगा आला होता, त्या दिवशी गोडाचा शिरा मिळाला होता. छान होता.

आजीच्या मुलासोबत एक गुट्गुटीत बाळही होतं. आजींचा नातू असावा सारखं मलाच धरुन ठेवलं होतं. सारखे केस काय ओढत होता. शेपूट काय पकडत होता…. जाम वैताग आला होता. तसं तर आपलं लहान पोरांबरोबर जास्त जमंत नाही. पण आजींकडे बघुन गप्प बसलो झालं. म्हंटल छ्ळ लेका किती छ्ळतोस ते, आजीच्या खुशीसाठी आपण हे सुध्दा सहन करु.

आज मात्र निघायलाचं हवं. एकदम गेलो तर आजीला वाईट म्हणून , आजी भाजीला निघाल्यावर सोबतच निघालो. कोप-यापर्यंत गेलो. तिथुन सरळ मच्छी मार्केटचा रस्ता धरला. नाही तर काय , दुसरं कुठे आयती मासळी खायला मिळणार….


दि.20.03.2017

सालं आयुष्य असं का आहे? आता असं म्हणजे कसं ते विचारू नका. त्या दिवशी मच्छी मार्केट मधे तब्बल दिड तास तपश्चर्या केल्यावर संधी मिळाली, एक मोठा पाप्लेट एक बाईच्या हातून पिशवित घालताना निसटला, मी बरोबर संधी साधली आणि त्याला बरोबर हवेतच पकडला. तिथुन सुसाट निघालो ते थेट जिन्याच्या वळचणिशी येवून थांबलो. ताज्या माशाचा वास नाकात घुसला होता. भुक जाम खवळली होती. वळचणिचा अंधारा कोपरा पकडून निवांत आडवा हात मारायला सुरुवात केली. जेमतेम अर्धा मासा संपला होता. ब-याच दिवसांनी स्व:ता मिळविलेलं अन्न खात होतो. इतक्यात बारिक आवाजातं म्याव-म्याव एकू आलं अंधारात डोळे रोखून पाहिलं तर सहा इवलेसे हिरवे डोळे दिसले. नीट निरखुन पाहिलं मग लक्षात आलं – अच्छा हि तर माझ्या राणीची बछडी.. बघा- मी अजूनही “माझ्या राणीची ” म्हणतोय . अरे लेका आता तरी शहाणा हो.

राणी तुझी होती कधी? सालं , पुन्हा जुन्या जखमेची खपली निघाली.

कसे का असेनात पण छान होते ते दिवस … याच राणीसाठी रात्र रात्र खिडकीखाली उभा राहुन आर्त प्रेम गीत आळवायचो मी, विव्हल सुरात विनवण्या करायचो.. पण कसलं काय…? राणीला शेवटी त्या टम्याने गटवलं.. आपण बसलो हात चोळत… आता तर काय पुरते मामाच झालोय…

दि.05.04.2017

आज सकाळ पासून उगाच आळसावल्या सारख वाटतं होतं.. उगाच शिकारीच्या नादाला न जाता , सरळ पेंडशांच्या दुधावर डल्ला मारला. जरा उन्हं खात पडावं म्हणून निघालो. गॅलरीच्या कठड्यावरुन सरळ चालतं निघालो, मला असं चालणं खुप आवडतं निमुळत्या कठड्यावरुन एकापूढे एक पावलं टाकतं जाण माझा रिकामापणाचा छंद आहे. तिथुन सरळ लिंबोळीच्या झाडावर चढून दोन फांद्याच्या मधली मस्त जागा शोधली. पुढच्या दोन पंजांची अढी घालून त्यावर मान ठेवून छानपैकी ताणून दिली. डुलकी लागून थोडाच वेळ गेला असेल, एकदम कोणीतरी फांदीखाली लोंबणार माझं शेपुट ओढतय असा भास होतो न होतो, मी सरळ खाली पडलो वर पाहिलं तर सुखटणकरांचा नान्या खदाखदा हसतोय. असं टाळकं सटकलं म्हणता काय...? ज्याचं नाव ते सालं निरुध्योगी कार्ट ..मी आजपर्यंत त्याच्या वाटेला कधीही गेलो नाही. आज याच्या का अंगात आलं ? लेका तुला बघुन घेतो.

अरे , याच्या घरच्या उदंरांच्या लोकसंख्येवर सिर्फ अपून का नियंत्रण है… क्या समझे…

आजपर्यंत याच्या आईकडे बघुन इमानदारीनं याच्या घरचे फक्त उंदीर खात अलो…कधी दुधाकडे नजरही वळवली नाही….त्याचे चांगले पांग फेडले हरामखोरांनं...आता बघच तू….

********************************************************************************

दि.05.06.2017

काल कोकिळेची कुहुकुहु एकून कावळ्याच्या घरातली अंडी पळवायचा बेत करुन निघालो. मागच्या गल्लीत आंब्याच्या झाडावर अनेक घरट्यांच्या निरिक्षणानंतर एक घरट नक्कि केलं. दोन्ही बाजुंनी मोर्च्या बांधायला अगदी मस्त, घरटं अंड्यांनी गच्च भरलेलं आणि राखणीला एकच कावळी अगदी हळू आवाज न करता दबा धरुन बसून राहीलो. अन एकदम कावळीवर झेपावलो. कावळी हेलपाटत उडाली. ती सावरुन परतण्याच्या आत मी घरट्यावर झडप घातली. , दोन अंडी झपाट्याने मटकावली आणि खाली निघलो. समोर नजर गेली आणि माझी जाम टरकली……समोर बंड्या बोका… त्याची ती हिरवीगार थंड नजर , हा असा मोठा जबडा, त्याचं थोराड अंग लहानशा फांदीवर तोलत माझ्याकडेच रोखुन पहात होता. अंड्याच्या मोहात पडून मी त्याच्या हद्दीत घुसायचा गुन्हा केला होता. माझ्या मीशीपासून शेपटीपर्यंत भीतीची एक लहर गेली. त्याच्या डोळ्यासमोर मी त्याचा मुद्देमाल पळवला होता , आता माझी खैर नाही. बंड्या आहेच तसा त्याच्या नुसत्या दर्शनानेच समोरच्यावर जरब बसते. पर्सनेलीटी पण एकदम मस्त. मी उसनं अवसान आणून तसाच त्याच्याकडे बघत राहिलो आणि काय आश्चर्य बंड्या चक्क मजेत अंग फुगवून त्याची पसंती दाखवत होता…च्या म्हणजे माझ्याबद्दल त्याची काही तक्रार नव्हती. त्याचा अर्थ त्याने मला आपला मित्र मानला म्हणायचं…मग काय मीही पुढचे पाय वावून त्याला रामराम घातला आणि त्याला आदर दाखवत तिथुन सटकलो.

अपघातानं का होईना मी एक दमदार दोस्त मिळवला आता आपल्या वाटेला कोणी जाणार नाही…


दि.28.06.2017

पावसाळ्याचे दिवस चालू झाले होते…..रिमझिम पाऊस सुरु होता….आज सकाळी मच्छी मार्केट मध्ये जाऊन चागंल्या तीन मासोळ्या चापल्या आणि तिथुन शॉर्टकट घेऊन शहाच्या बंगल्याच्या कंपाऊंडवरुन आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये निघालो होतो. सहजच समोर लक्ष गेलं आणि काय सांगू……….

समोर पोर्च मध्ये झुल्यावर एक स्वप्नसुंदरी….वा-याबरोबर उडणारी तिची पांढरी फर, झुपकेदार शेपटीचा वळणदार वळसा, आणि त्या शुभ्र फरीमधुन उठून दिसणारे तिचे काळेभोर डोळे… गुबगुबीत तर अशी की जणू कापसाचागोळा व्वा…! सत्य म्हणू की स्वप्न जागेपणी पाहिलेले….धडधडणारे माझे ह्द्य म्हणू की सदाफुलीच नाजुक फुलं….माझे उचलेले पाउलं पुन्हा खाली ठेवायचेही मला भान राहिले नाही….

पहिल्या नजरेत तिने पुरता माणुस करुन टाकलं..(प्रेमात माणसाचं माकड होतं म्हणतात….. तसं मांजराच माणुस होत असणार….कारण राणीच्या प्रेमात मला अर्धा माणुस बनवलां आणि मी डायरी लिहीण्याच्या उद्योगाला लागलो…आता तर कविता बिविता सुचू लागल्या आहेत.)

नजर तिच्यावरुन काढताच येईना, कितीवेळ तिच्याकडे पहात राहिलो कुणास ठाऊक..? इतक्यत आतून एक बाई आली आणि तिला उचलून घेऊन गेली…

नाईलाजाने तिथुन घरी आलो खरा पण डोळ्यासमोरुन तीची छबी जातच नव्हती..छे..छे..! मी आज पुरता कामातुन गेलोय… नांनांच्या पलंगाखाली पडून , डोळे मिठून तीचीच स्वप्न बघत झोपलो होतो…इतक्यात कानाशी वळवळी झाली..वळलो तर एक धिटूकला उंदीरबच्या माझे केस ओढत होता. छे…! हे काही खरं नाही. त्या बारक्या उंदरड्यानं एव्हढ धाडस करावं आणि मला त्याचा पत्ता लागू नये..खरं सांगतो या पोरी आपल्याला पुरता निकम्मा करुन टाकतात…सावध हो बेट्या……

********************************************************************************


दि.03.07.2017

शेवरीच्या प्रेमात मला डायरी लिखाणाला वेळच भेटत नाही. चोहीकडे तीच ति दिसते….भाऊ…काय सांगु..!

पांढरी फर, झुपकेदार शेपटू

काळेभोर डोळे… गुबगुबीत अंग..

शेवरीच्या प्रेमात मी दिनरात दंग..


दि.03.08.2017

शेवरी आणि माझी ओळख होऊन नुकतेच पंधरा दिवस उलटले आहे. माझा सध्या एकच उपक्रम चालू होता. सकाळपासून ते रात्रीपर्यंत फक्त शेवरीच्या सहवास, मी पुरता बुडालो होतो. तिला खुष करण्यासाठी काल मी एक भलीमोठी घुस पकडली आणि तिला घेऊन तिला देण्यासाठी चाललो होतो. तेवढ्यात रस्त्यात बंड्या भेटला म्ह्णाला. “भाई…! जरा जपून ह्या घरगुती मन्या कधी टांग देऊन जातील त्याचा भरवसा नाही… ” मी मान हालवून त्याच्या बोलण्याला होकार दिला आणि दुर्लक्ष केलं. पण साला आता वाटतं बंड्याच एकलं असत तर बरं झाल असतं. साल तिला ति ताजी मोठी घुस घेऊन गेलो तर त्याच्या बद्ल्यात ति माझ्या अंगावर धाऊण आली आणि रागाने दात दाखवतं माझ्या थोबाडावर झोका आपटलेला…


दि.30.10.2017

आज सकाळी शहाच्या घरात जरा नेहमी पेक्षा जास्त गडबड चालू होती… मी दररोज प्रमाणे शेवरीला भेटायला गेलो तर एक बाई शेवरीला कुशीत घेऊन लाल गाडीत बसली. मला शेवरीशी बोलाच होत. पण साला नशिबाने साथ दिली नाही. गाडीने वेग घेतला तसं मी तिच्या प्रेमात शेवरी..! शेवरी…! ओरडत तिला हाक्क मारत होतो. माझ्यातले प्राण पायत आणू मी त्या गाडीच्या पाठी धावत होतो. पण शेवटी माझी शेवरी माझ्या नजरेपासून खुप लांब निघुन गेली…आणि मी त्या चौकात अश्रु ढाळत हताश होऊन उभा होते…


दि.18.10.2017

मित्रांनो… काय सांगू , प्रेमात माणसाचं माकड होतं म्हणतात….. मगं मांजराच काय होत असेल तुम्ही कल्पना करा. अगदी पार पार कामातून गेलो होतो रे मी.. ना कोवळी उन्ह सुखवतं होती , ना मासा गोड लागत होता. माझा तिने अगदी पोपट करुन टाकला होता रे फार वाईट आवस्था होती.. पण शेवटी पदारात काय पडलं. शेवरीचा एक मऊशार केसही हाती नाही लागला. गेले काही दिवस मी कसे काढले माझे मलाच माहित.. आता आपलं दु:ख तरी कोणाला सांगणार , म्हणुन पुन्हा डायरी जवळ केली.. शेवटी डायरी शिवाय माझं आहे तरी कोण..?

दि.01.11.2017

आज तब्बल एक महिना होत आला… पण शेवरी मनातून जात नाही.. हुं…शेवरी कसली काटेरी नुसती तिच्या मागे धावून काय मिळालं मला..? तसा हिशोबच मांडायचा तर …. 1. एक भल्यामोठ्या घुशीच्या बद्ल्यात – माझ्या थोबाडावर आपटलेला झोका (या पाळलेल्या मन्या घुशी खात नाहीत हे मला खरचं माहित नव्हतं …अगदी माशाची शप्पथ..) 2. एका माशाच्या बदल्यात – एक प्रेमळ कटाक्ष (हं..हे.ठिक होतं) 3. आणि … एका कच-याच्या डब्यातुन आणलेला ( हो..तिच्यासाठी मी कच-यातही तोंड घातलं) चिकनचा तुकड्याच्या बदल्यात – तिचा शेवरीसारखा मऊ रेशमी स्पर्श…

अजून आठवतोय तो मउशार स्पर्श… खरचं किती मस्त….



दि.25.12.2017

थॉमस अंकलच्या बंगल्यात गेला आठवडाभर साफ सफाई चालू आहे. कुंडीतील झाड छान सजवलयं पांढरा शुभ्र कापूस, चमचमत्या चांदण्या आणि छोट्याशा सोनेरी घंटा प्रत्येक फांदीवर लावल्याने ते लहानसं झाड खुप छान दिसतंय. आज बंगल्यात काही अनोळखी माणसही दिसत होती. लहान मुलंही आहेत सगळेजण अगदी आनंदात आहेत. थॉमस अंकल खुप चांगले आहेत. नेहमी मासे खाऊ घालतात. ते नेहमीच आनंदात राहोत अशी देवाजवळ प्रार्थना केली.. तेवढ्यात दोन छोटीशी मुलं जवळं आली आणि माझ्या डोक्यावरून , शेपटीवरुन प्रेमाने हात फिरवू लागली. मी ही खुश झालो आणि सुखाने डोळे मिटून घेतले. डोळे उघडले तेव्हा माझ्या गळ्यात एक सोनेरी घंटा लटकत होती..!

दि.26.12.2017

आज थॉमस अंकलनी एक ‘ सोलीड ’ डिश खाऊ घातली. खमंग वासाचा, लुसलुशीत पदार्थ होता. रात्री समोरच्या सोसायटीतल्या मनीला विचारलं तेव्हा कुठे कळलं त्याला केक म्हणतात ते ! इतक्यात माझ्या गळ्यातली घंटा तिला दिसली. तशी हसता हसता पुरेवाट झाली तिची…! म्हणते कशी, “आता डोक्यावर एक टोपीही ठेव म्हणजे हुबेहूब ‘ सांताक्लोज ’ दिसशील..” आता हा सांताक्लोज कोण बुवा आणखीन..? “मी बावळटासारखा प्रश्न केला..!” इतक्यात समोरच्या रस्त्यावरून जाताना अप्पा कांबले केळ्याच्या सालीवरुन घसरुन पडले. लंगडत लंगडत चालत होते……(जगात देव आहे..म्हणायचा..!!)


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational