बंधारा कोसळला
बंधारा कोसळला


रात्रीची वेळ होती. अमावस्या असल्यामुळे सर्वत्र काळाभोर अंधार पसरला होता. रावणवाडीत सर्वत्र सामसूम होती. रातकिड्यांचा आवाज कानावर पडत होता. गावातील मंदिरात पोथी सुरू होती. पोथीकऱ्याचा आवाज साऱ्या गावात ऐकू जात होता. मंदिरात दहा-बारा म्हातारी माणसे आणि तेवढ्याच म्हाताऱ्या बायका बसून पोथी ऐकत होत्या. मंदिराच्या चारही बाजूला वस्ती होती. त्यापैकी एका घरात विठोबा राहात होता. त्यावेळी घरात तो आणि त्याची पत्नी रखमा दोघेच होते.
"विठोबा....विठोबा..." कुणीतरी घाबरलेल्या आवाजात हाक मारत होते. दचकलेल्या विठोबाने दार उघडले. दारात नारबा उभा होता. तो फार दुरून पळत आला असावा. नारबा स्वतःच्या श्वासावर नियंत्रण मिळवत म्हणाला,
"विठ्ठला, अरे, पळ. तुझ्या शेतात फार मोठा जाळ दिसत होता, मी आत्ताच तिकडून येतोय."
"जाळ? माझ्या वावरात?"
"हो. चल. वेळ गमावू नकोस." नारबा तसा म्हणत असतानाच दोघेही धावत सुटले......रखमाला काहीही न सांगता. रखमाने सारे ऐकले होते. नशिबाला दोष देत ती दारातच बसून राहिली. नारबा- विठोबाचे बोलणे ऐकून पोथी ऐकणारे सारे बाहेर आले. एका म्हातारीने विचारले,
"रखे, काय झाले ग?"
"आत्या, शेतामंदी आग लागली म्हण..."
"अग, पर शेतात पिक-बिक तर न्हाई ना?"
"काल पाईपं आणून टाकल्यात की...."
"बाई...बाई...काय नशीब म्हणावं ऐकेकाचं...." एक बाई काळजीने बोलत असताना शेजारच्या घरातू रखमाचा दीर आणि विठोबाचा सख्खा लहान भाऊ बाहेर आलेला पाहून रखमा म्हणाली,
"दाजी, जरा जावून बघा ना हो.."
"वैनी, जावून म्या तरी काय करणार?" असे म्हणत त्याने दार लावून घेतले.....
तिकडे विठोबा आणि नारबा विठोबाच्या शेताजवळ पोहोचले. दुरूनच दोघांनाही शेतात पसरलेला आणि आकाशाकडे झेपावणारा जाळ दिसत होता.
"विठ्या, जाळ तर लय मोठा दिसतोय की..."
"म्हंजी मझे पाइपं जळायलेत की काय?"
बोलता बोलता दोघे घाईघाईने शेतात पोहोचले. पाहतात तर पाइपच्या मोठ्ठ्या ढिगाचा काळाभोर कोळसा झाला होता. ढिगाऱ्याखाली असलेल्या शेवटच्या पाइपनेही पेट घेतल्याचे दिसत होते. जवळपास पाणीही नव्हते.शेतातून गेलेल्या बंधाऱ्यातही पाणी नव्हते.वातावरणात वेगळाच जळका वास भरला होता.
"हाय रे दैवा! कोण्या जलमाचा बदला घेतोस रे बाबा? आर, म्या आस कोणत पाप केल हाय? सरकारच्या दाढेतून कसाबसा दोन एकराचा तुकडा वाचला हाय. त्यात ऊस, केळी अशी पिकं घ्यावी म्हणून रीन काढून मोटर घेऊन पाईपलाईन टाकली. काल दुपारी तर सम्दे पाईपं शेतात टाकले. पुरे चोवीस घंटे बी झाले न्हाई तर आर्धवट पाहात आसलेल्या सपनाला बी आगीत ढकललं"
"विठू, शांत हो. जरा दमाने घे."
"काय दमाने घेऊ, कसं घेऊ नाऱ्या? घात झाला रं घात झाला. म्या कोणाच्या अध्यात ना मध्यात. कोणी डाव साधला आसल रे?"
"आर, नशिबाचा खेळ हाय ..."
"मह्याच मागं कामून लागले रे नशीब हात धुवून? दोघांचे बोलणे सुरु असताना जाळ थंडावत होता. ढिगात कुठे कुठे कंदिलाच्या वातीप्रमाणे जाळ दिसत होता."
"चल. विठोबा, घरी जाऊ."
"आता काय त्वांड दाऊ रे रखमीला? आरे, किती सपनं बघले रे आमी दोगांनी. केळी लावायाची होती. पैल्या पैक्यावर रखमीला बांगड्या करायच्या होत्या रे. पर आता तिला काय सांगू?"
"चल आता. अंधारात बसून काय करणार ?"
"आर जिंदगानीत झालेल्या आंधारापरी ह्यो आंधार बरा म्हणायची येळ हाय. मझं काळं त्वांड रखमीला कसं दाखवू रे?"
शेवटी नारबाने विठोबाला बळेच उठवले. दोघे शेताच्या बाहेर आले. विठोबाने पुन्हा मागे वळून पाहिले. त्याच्या स्वप्नाची राखरांगोळी करणारी ती राख त्याला स्वतःच्या चितेच्या राखेप्रमाणे भासली. दोघे घराच्या रस्त्याला लागले. त्या भयाण शांततेत जणू दोघांचे श्वास एकमेकांशी संवाद साधत होते. परंतु विठोबाच्या मनात विचारांचे काहूर माजले होते........
'हे काम नक्कीच राम्याचेच आसणार. ल्हाना भाऊ हाय पर पक्का वैरी बनला हाय...' असा विचार करत असताना विठोबा नकळत मागे गेला.........
त्यादिवशी सकाळचे नऊ वाजत होते. सकाळी लवकर उठून शेतात गेलेला विठोबा शेतातून परतला.आल्या आल्या त्याने रखमाला विचारले,"राम्या, ऊठला न्हाई का?"
"न्हाई ना. रात्री उशिरा आलते. लागली आसल झोप."
"हे रोजचच झाल हाय. जरा त्याने बी ध्यान देयाला फायजेत की."
"लगीन झाले म्हणजे का लै मोठ्ठे झाले व्हय? हासण्या खेळण्याचं वय हाय त्येंच. जलमभर हायेच की, सौंसार आन वावर."
"पर मला बी आता आराम फायजे का न्हाई? लहानपणीच बाप मेला. तवापास्न बायकू येईस्तोवर रामाला सांबाळलं. आता त्यानं ...." विठोबा बोलत असताना खोलीतून बाहेर आलेल्या रामने विचारले,
"काय झाले, दादा, ओरडायला?"
"काय म्हणलास राम्या?"
"मग काय म्हणू ? ऊठलो न्हाई की तुझी भनभनी सुरु होते."
"भनभनी आन् मझी? चौदाव, पंद्रावी होईस्तोवर शिकवल तुला. कव्हा ढोराम्होर चारा बी टाकू देला न्हाई. आन् आता लगीन झालं की लागला का....."
"हे बघ दादा, लहानपणी बापू गेला, चार वर्षांनी माय गेली. तू मोठा व्हतास तव्हा तू जे काही केले ते तुझे कर्तव्य केलेस की. तुझ्या जागी मी असतो तर मी नसते का तुला सांभाळले?"
"मी काही म्हणलं का? पर आसं बघ राम्या, आता मला बी थोडा आराम नको का? पहाटे एखांदी चक्कर वावरात टाकली तर बिघडलं का?"
"दादा, ती शेतीची कामे माझ्याने नाही होणार?"
"मंग काय ईच्चार हाय तुझा?"
"मी नोकरी करणार आहे. मला माझा वाटा दे. तुला त्रास होतोय ना, वाटणीमुळे तुला शेतही कमी राहील आणि ......."
"काय झालं धनी? काय पेटलं होतं हो?" रखमाने विचारले तसा विठोबा भानावर आला. समोर पाहतो तर घरापुढे बरीच गर्दी जमली होती. त्यात रामही होता. तसा विठोबा दुःखी आवाजात म्हणाला,
"रखमे, कोण्या वैऱ्यानं डाव साधला ग. रिन काढून आणलेल्या पाइपाचा पार कोळसा झाला ग. त्या पाइपासंग आपलं सपान बी जळालं ग..."
"अरेरे! लई वाइट झालं की." कुणीतरी म्हणालं.
"आरं, पाटलाला सांगावा धाडा की..."
"काय व्हणार हाय वर्दी देऊन? मला ठाव हाय वैरी. आपलेच दात आन् आपलेच व्हट. काही नग पोलीस बिलीस." विठोबा म्हणाला. तसे एक-एक करीत सारे सांत्वन करून निघून गेले. परंतु रामा आणि त्याची बायको एकही शब्द न बोलता निघून गेले. विठोबाला घेऊन रखमा आत आली. दोघांनी एकमेकांकडे पाहिले. दोघांचेही डोळे आसवांनी गच्च भरले होते. दार लावून रखमा विठोबाला गच्च मिठी मारत हमसू हमसू रडत म्हणाली,
"धनी, आपून काय कोणाचे घोडे मारले हो? देवाने का डाव साधला जी...."
"जाऊ दे रखमा. आजून धडधाकट हाय. पुना कष्ट करीन पर तुला सोन्याच्या बांगड्या करीन."
"मी बांगड्याचं न्हाई म्हणत व्हो धनी. पर कवा कुठं सुखाचे सपान बघायला सुरुवात केली न्हाई की लगुलग काय तरी संकट येतेच येते." रखम म्हणाली आणि खाटेवर बसली. तसे विठोबाला आठवले......
विठोबापेक्षा चार वर्षांनी रामा लहान होता. लहानपणीच आईबाबा वारल्यानंतर अगोदर विठोबाने आणि लग्न झाल्यानंतर रखमाने रामाला सांभाळले होते. रामाला कधी आईबाबांची उणीव भासू दिली नाही. रखमा लग्न होऊन त्या घरात आली तेव्हा रामा कॉलेजमध्ये होता. त्याला कॉलेजला लवकर जावे लागे. त्यामुळे रखमाला सकाळी लवकर उठून त्याचा जेवणाचा डबा करून द्यावा लागे. सायंकाळी तो कॉलेजमधून येईपर्यंत ती त्याच्यासाठी गरमागरम जेवण तयार करून ठेवत असे. कधीही शब्दाने तक्रार न करता तिने चार पाच वर्षे सारे काही केले. रामाचे लग्न झाले आणि अवघ्या चार महिन्यात ती पहाट का उगवली हा प्रश्न त्या दोघांना नेहमी पडायचा. त्यादिवशी सकाळी सकाळी सहज बोलता बोलता भावाभावांचा वाद वाढला. वरवर सहज वाटणारा तो वाद रामाने ठरवून वाढविला असल्याचे स्पष्ट जाणवत होते.
"दादा, मला माझी वाटणी दे. मग तुला काय कमी..."
"काय म्हन्लास राम्या, वाटणी फायजेत?"
"होय. मला वाटणी पाहिजे... शेताची आणि घराची...."
"राम्या, टकरू ठिकाणावर हाय का तुव्ह?"
"दाजी, हे आस काय वंगाळ बोलता व्हय? अव्हो, तुमच्या बिगर या घरात आम्ही न्हाय ऱ्हाऊ शकणार व्हो? आस कायबाय नका बोल्." रखमा काकुळतीने म्हणाली.
"मग मी काय घरातच मरु?....."
"राम्या, शिकल्यायी बायकू मिळाली म्हणून...."
"दादा, अशा फालतू गप्पा मारायला मला वेळ नाही. काय ते सांग..."
"वाटणीच कशापायी? फायजेच तर सम्दचं घे की..."
"नाही. नाही. मला तुझी भीक नको. मला माझा हक्काचा वाटा तेवढा दे."
"ठीक हाय. होवू दे तुह्या मनासारखं. बलाव पंचांना...." विठोबा म्हणाला आणि पडत्या फळाची आज्ञा घ्यावी त्याप्रमाणे रामाने अर्ध्या तासात पंच मंडळी जमवली. प्रथम शेताची वाटणी झाली. सोळा एक्कर शेतीचे दोन तुकडे झाले. धाकटा असल्याने वाटणी उचलायचा पहिला मान रामाला मिळाला. त्याने शेतातला वरच्या बाजूचा चांगला तुकडा घेतला. नंतर घराचीही वाटणी झाली.
दुर्दैवाचा तो दुसरा दिवसही उजाडला. त्यादिवशी दिवा लावून स्वयंपाक करून रखमा विठोबाची वाट बघत होती. खूप वेळ झाली होती. रखमा आतबाहेर करू लागली. कितीतरी वेळा नंतर तिला दुरून येणारा विठोबा दिसला. तिची निराशा पळाली. चेहरा उजळला पण क्षणभरच कारण येणारा विठोबा असला तरीही त्याची चाल वेगळीच होती, ओळखीची वाटत नव्हती. त्याला पाहून भांड्यात पडणारा रखमाचा जीव पुन्हा गुदमरू लागला, कासावीस होऊ लागला. झोकांड्या देत आणि बडबडत येणारा विठोबा जवळ आला आणि त्याने रखमाला विचारले,
"रखमे, तू येथे काय करतेस?"
"धनी, हे काय तुम्ही दारू....." रखमा चिंतायुक्त आवाजात विचारत असतानाच विठोबा म्हणाला,
"व्हय. म्या दारु पिलो. कोणाच्या बापाचे काय जातेय? स...स...साला वाटणी मागतोय मला...." असे म्हणत म्हणत कोसळू पाहणाऱ्या विठोबाला आधार देत रखमाने आत आणले. आत येताच विठोबा भडाभडा ओकला. त्यानंतर तो प्रकार रोजच घडू लागला. दिवसभर शेतात काम करून घरी परतणारा विठोबा गुत्त्यावर जाऊन दारू पिऊनच येऊ लागला.
त्यादिवशी दुपारी विठोबाची भाकरी घेऊन शेतात आलेल्या रखमाला शेतात नवीनच माणसं दिसली. मोठमोठी लाकडे, त्यावर कोणते तरी यंत्र बसवल. ते पाहून रखमाला आठवले, शहरात फोटो काढण्याच्या दुकानात असेच काहीतरी असते. परंतु दुसऱ्याच क्षणी गोंधळलेल्या अवस्थेत तिने विठोबाजवळ जाऊन विचारले,
"धनी, काय व्हो हे?"
"मोजणीचे साहेब आहेत. आपल्या वावरातून क्यालन जाणार म्हणत्यात. आपलं शेत बी जाईल."
"हे बघा, कॅनॉलमध्ये तुमचे सहा एकर शेत जाईल. त्याची तुम्हाला भरपूर रक्कमही मिळेल. त्या पैशातून तुम्ही दुसरीकडे शेत घेऊ शकता. उरलेल्या शेतात पाइपलाइन करून तुम्ही केळी, ऊस अशी पिके ....."
"पर सायेब, ही इस्टेट मझ्या बापजाद्याची हाय वो."
"काय बापजादा घेऊन बसलात हो."
शेवटी जे व्हायचे तेच झाले. सरकारपुढे कुणाचे काय चालणार? विठोबाचा सहा एकराचा तुकडा सरकारच्या घशात गेला मात्र बाजूला असलेला रामाचा तुकडा तसाच राहिला. काही महिन्यात बंधाऱ्याचे काम पूर्ण. मोठ्या थाटामाटात कॅनॉलचे उद्घाटन झाले. ज्यांच्या ज्यांच्या जमिनी गेल्या होत्या त्यांना मंत्र्यांच्या हस्ते मोबदला देण्यात आला. हातात पडलेली रक्कम पाहून सारेच शेतकरी हादरले. सरकारने विश्वासघात केला असल्याची सर्वांची भावना झाली. अत्यंत कमी प्रमाणात मोबदला शेतकऱ्यांना मिळाला होता. सारे शेतकरी मंत्र्याला भेटले.'प्रयत्न करतो' असे गुळगुळीत आश्वासन देऊन मंत्री निघून गेले. नशिबाला दोष देत इतरांसोबत विठोबा घरी परतला.
काही दिवसांनी रखमाचा भाऊ आला. चहापाणी झाल्याबरोबर त्याने विचारले,
"काय मग दाजी, काय ठरवले?"
"कशाचे हो?" विठोबाने विचारले.
"जमीन गेली पर पैका मिळाला. तव्हा मिळालेल्या पैक्यातून दुसरी जमीन घेणार आहात ना ?"
"तर मग जमीन तर घ्यायचीच हाय की."
"दादा, कहाची जमीन आन् काय? पंद्रा हजारातले चार पाच हज्जार तर अशेच गेले. दारू..."
"रखे, गुपचाप बस."
"दाजी, तुम्ही कव्हा बी जमीन घ्या. त्याच काय हाय, म्या चार यक्कर जिमीन घेतलीया. उंद्या त्याची रजिष्ट्री हाय. तव्हा मला ध्धा हज्जार रूपै द्या. तुम्ही जमीन घेतल्याबरुबर आर्ध्या राती तुमचा पैका देतो. ईश्वास नसल तर कागुद लिहूत की."
"कागुद? तस न्हाई पर...."
"अव्हो, जरा बाहीर या...." रखमा बाहेर जात म्हणाली. तसा विठोबा बाहेर आला. त्याला रखमा म्हणाली,"हे फा. मझा भाऊ हाय. पर येवढा पैसा दिवू नका."
"अग, तुहाच भाऊ हाय. दिल की आज ना उंद्या. आपण बी कुठ आजच वावर घेतल हाय....." म्हणत विठोबा घरात येऊन म्हणाला,
"ठीक हाय, दाजी. देतो तुमाला."
जेवण खाऊन दहा हजार रुपये घेऊन रखमाचा भाऊ निघून जाताच रखमा म्हणाली, "तुम्ही माझे ऐकले नाही ना....."
"चूsssप! ...." दाजीबरोबर पिऊन तर्रर झालेला विठोबा म्हणाला.
काही दिवसातच बंधाऱ्यातून पाणी वाहू लागले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात केळी, ऊस, गहू अशी नगदी पिके डोलू लागली. मोटार आणि पाइप घेण्याची ताकद नसलेला विठोबा धुऱ्यावर उभा राहून बाजूच्या रामाच्या शेतात उभी असलेली पिके बघत स्वतःच्या नशिबाला दोष देत असे. सहा महिने झाले तरी रखमाच्या भावाने पैसे परत केले नाहीत. दोन चार वेळा विठोबा पैसे मागायला जाताच दारू पाजून, कोंबडा खाऊ घालून फारच झाले तर शे-दोनशे रुपये देऊन बोळवायचा. दोन एकराच्या तुकड्यात काय पिकणार? त्यामुळे रखमाही रोज मजुरीला जाऊ लागली.
नगदी पिकांच्या जोरावर अनेक शेतकरी लखोपती झाले. गावात मोटारसायकली, जीप, कार, ट्रॅक्टर अशा वाहनांची खरेदी होत होती. विठोबाच्या शेजारी राहणाऱ्या रामाने दुमजली तारस बांधले. लोकांनीही माड्या, तारस बांधण्यासाठी कॅनॉलचे सिमेंट स्वस्तात विकत घेऊन वापरले.
काही दिवसांनी रखमाच्या भावाचे आगमन झाले. बोलता बोलता रखमाने पैशाचा विषय काढला. तेव्हा तो म्हणाला,
"रखमे, पैक्याचं मला काय इच्चारती, दाजीला तर कव्हाच देऊन बी टाकले."
"दाजी, मला कव्हा देले व्हो...."
"मंग मी काय खोटं बोलतो की काय? आल्यासरशी शंभर, दोनशे, पाचशे आणतच राहिलात की. बघा. मी सम्द लिहून ठेवलं हाय. पैक्याचा मामला हाय. तरी म्या म्हणत व्हतो, दाजी, पैसा एकदाच न्या पर तुम्ही मझं ऐकलच न्हाई...." म्हणत रखमाच्या भावाने आपल्या निरक्षर बहिणीला सारी उचल तारीखवार वाचून दाखवली. बहीण-भावाचे खूप भांडण झाले. जेवण झाल्यावर भाऊ निघून जाताच रखमा म्हणाली,
"बघा. मी म्हणले व्हते ना, पैका देऊ नका म्हणून. पर तुमाला लय पुळका आलता ना, भोगा आता त्याची फळं...."
"चूप ग. मला काय ठाव? नशिबात आसल तस व्हईल...."
"ईकाची परीक्षा घेयाची आन् मरण नशिबात व्हतं आस म्हणायचं...."
"आता गप्प बसतीस का देऊ थोबाडीत....." चिडलेला विठोबा म्हणाला.
बँकेकडून मोटार आणि पाइपसाठी कर्ज मिळते म्हणून विठोबा बँकेत गेला. साहेबांनी बऱ्याच फॉर्मवर त्याचे अंगठे घेतले. नंतर चार-पाच चकराही मारल्या, परंतु गोष्ट जमत नव्हती. एक दिवस साहेब हळूच म्हणाले,
"विठोबा, अरे, कर्ज काय एका तासात मिळेल रे, पण जरा आमच्याकडे पहा."
"म्हंजी? म्या न्हाई समजलो."
"काम लवकर करायचे असेल तर दोन हजार रुपये..."
"दोन हजार?" विठोबाचा आवाज नकळत वाढला.
"हळू बोल. पैसे दिले तर काम होईल. नाही तर ...." म्हणत साहेबांनी विषय संपविला.
शेवटी रखमाच्या गळ्यातले विकून आलेले दोन हजार रुपये त्याने साहेबांना दिले.तिसऱ्या दिवशी मोटार आली. पाइपाचा ढीग शेतात पडला. रात्री जेवताना चांगला मुहूर्त बघून पाइप लाइनचे काम सुरू करावे असे ठरवून बऱ्याच दिवसांनी रंगलेल्या श्रुंगारात थकून दोघेही झोपी गेले. रात्री दहा वाजता नारबाने पाइप जळाल्याची बातमी आणली........
दुसऱ्या दिवशी दुःखी अंतःकरणाने ते दोघे शेतात पोहोचली. कोळसा झालेल्या पाइपाचा ढीग त्यांनी शेताबाहेर फेकला. मृत माणसाला सावडताना हाडे सापडावीत त्याप्रमाणे कुठे कुठे अर्धवट जळालेले पाइपचे तुकडे सापडत होते. गळ्यातले गेले, सोबत पाइपही गेले. दिवसभर काम करून दोघे घरी परतत असताना विठोबा नेहमीप्रमाणे देशी दारुच्या दुकानात गेला आणि रखमा घरी परतली. दुकानात गावातील दोन गुंडं आधीच पीत बसले होते. एक जण म्हणाला,
"आर, त्यो राम्या काही पैका देत नाही बघ."
"पैका? कशाचा? "
"दोन वरीस झाले बाबा, त्याच्या भावाच्या म्हणजे विठोबाच्या शेतातले पाइप मीच जाळले होते. त्याचे चार हजार रुपये ठरले होते पर काम झालं आन् राम्याची नियत फिरली...." त्या दोघांच्या मागे बसून बोलणे ऐकणाऱ्या विठोबाला चक्कर आली आणि तो खाली पडला. सर्वांना वाटले, दारू जास्त झाली असेल म्हणून पडला असेल. मालकाने नोकर देऊन त्याला घरी पाठवले.
"राम्या, का जाळलस रे? काय घोडं मारलं व्हतं तुव्ह?..." बरळत बरळत विठोबा झोपी गेला.
त्यादिवशी शेताच्या समोर जीप थांबलेली पाहून विठोबा बाहेर आला. त्याला पाहतच जीपमधून उतरलेल्या शिपायाने विचारले,"तूच का विठोबा? तू दोन वर्षांपूर्वी बँकेकडून कर्ज घेतले होते का?"
"व्हय साहेब."
"मग परतफेड नाही केलीस?"
"अव्हो सायेब, घात झाला. मोटार, पाइप आणले त्याच रात्री वैऱ्यानं डाव साधला. पाइपचा पार कोळसा झाला हो."
"मग पोलिसांना, बँकेला का नाही कळवलं ?"
"कळवून काय व्हणार? पाइप का परत मिळणार आहेत? "
"पाइप परत मिळाले नसते परंतु कर्ज माफ झाले असते ना. आता पूर्ण रक्कम भरावी लाग."
"पर साहेब, पाइप तर ....."
"तुझे खरे आहे बाबा पण नियम वेगळे असतात..." असे म्हणत साहेबांनी शिपायाला खुणावले.
शिपायाने विठोबाला बाजूला नेले आणि हलकेच म्हणाला,
"हे बघ विठोबा, झाले गेले त्याला कोण काय करणार? जळालेल्या पाइपचे सारे कर्ज माफ होते आणि नवीन पाइप घेण्यासाठी चार दिवसात नवीन कर्ज मिळते."
"सम्दे कर्ज माफ होते?"
"हो. तू फक्त पाच हजार दे. मागचे कर्ज माफ करून साहेब नवे कर्ज देतील."
"पर पाच हजार म्हंजी?"
"नाही दिलेस तर साहेब, पाइप तू स्वतः जाळलेस अशी तक्रार पोलिसात करतील.उद्या पैसे घेऊन बँकेत ये...." म्हणत जीपमध्ये सारे निघून गेले.
मोह वाइट वाटतो. शिवाय नियमाचा हिसकाही मोठा वाइट असतो. विठोबाने दोन एकराचा शेताचा तुकडा गावातील सावकाराकडे गहाण टाकला या आशेने की, नवीन पाइप मिळताच ऊस लावता येईल आणि पहिल्याच हंगामात शेत सोडवता येईल. पाच हजार रुपये देताच पुन्हा साहेबांनी विठोबाचे बरेचसे अंगठे घेतले. पुन्हा चौथ्या दिवशी पाइप शेतात येऊन पडले. त्या रात्री विठोबा शेतात पाइपच्या जवळच झोपला. मुहूर्त पाहण्याच्या भानगडीत न पडता दुसऱ्याच दिवशी शेतात पाइपलाइन करुन घेतली. मोटार बसवली. मोटार सुरु करण्यासाठी तीन दिवसांनी चांगला मुहूर्त होता. त्याप्रमाणे मुहूर्ताच्या दिवशी दोघेही लवकर उठले. पूजा करण्यासाठी सांगितलेले सारे साहित्य घेतले. रखमाने नवे नऊवार लुगडे नेसले. विठोबाने नवीन धोतर नेसून वर नवाच सदरा घातला. घराला कुलूप लावून ते दोघे शेताकडे निघाले. गावाची वेस ओलांडून होत नाही तोच समोरून नारबा पळत येताना दिसला. ते पाहून दोघांच्याही काळजात धस्स झाले. जवळ येताच धापा टाकत नारबा म्हणाला,
"कोठे निघालात दोघे?"
"आरं, आजचा दिस चांगला हाय तव्हा म्हण्ल पूजा करून मोटार सुरु कराव."
"काय बी उपेग न्हाई रं बाबा."
"का रं, काय झालं?" विठोबाने घाबरून विचारले.
"आरे, शिवापुरीजवळ बंधाऱ्याची भिंत कोसळली. दोन वरीस लागतील दुरुस्ती व्हायला. आता पाण्याचं काही खरे नाही."
ते ऐकून विठोबा, रखमा दोघे एकमेकांना पाहात राहिले. विठोबाने विचारले,"काय म्हणतो तू?"
"हे बघ, पेपरात फोटू आला हाय. क्यानाल बांधत असताना सिमीट हालक तर वापरलच म्हणं पर बरेच कमी सिमीट वापरलं. आरं, बंधाऱ्याची एवढी मोठी भिंत कोसळली. आता पाण्याचं काही बी खरं न्हाई..." नारबा सांगत असताना रखमाच्या हातात असलेले पूजेचे ताट गळून पडले....विठोबाने रखमाकडे पाहिले तेव्हा त्याला तिचा मंगळसूत्र नसलेला रिकामा गळा दिसला..........