Nishigandha Upasani

Horror Thriller

3  

Nishigandha Upasani

Horror Thriller

भय इथले संपत नाही

भय इथले संपत नाही

8 mins
171


   जामनगर नावाच्या गावात खतरनाकवाडी हे एक छोटं खेड होते. तस पाहायला गेले तर गावाची लोकसंख्या वगैरे अगदी मर्यादित होती. अशा या गावात एक गरीब दाम्पत्य राहत होते. त्यांची परिस्थिती अगदी हलाखीची होती. पण राहायला छप्पर आणि देवाच्या कृपेने थोडी पडीक वाड्यासमान असणारी जागा त्यांच्या मालकीची होती. या दाम्पत्याचे वयही खूप होते, हातपायही थकलेले होते, कुठे जाऊन काम करतील किंवा काही करतील आणि पैसे जमवून आणतील अशीही परिस्थिती नव्हती. दोन वेळेची भाकरी मिळणे अगदी कठीण होऊन गेलेले होते. कधी कधी तर गावकऱ्यापैकी कोणी काही आणून दिले तर खाणे व्हायचे नाहीतर भुकेने व्याकूळ होऊन पाणी पिऊन वेळ मारून न्यायची असे सगळे विदारक दृश्य होते. एक दिवस असेच दोघे गप्पा मारत असताना "आपण आपला उदरनिर्वाह कसा करू शकतो ?" याबद्दल चर्चा झाली. यातच असलेला पडीक वाडा साफ करून घेऊन त्यात शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींना ठेवूया,त्यांची पण राहण्याची वगैरे सोय होईल आणि आपल्याला पण आधार होईल. मिळालेच कोणी जिवाभावाचे तर आपल्याला पण हक्काने खायला - प्यायलाही करून देईल व काळजी पण घेईल अशी कल्पना मांडली आणि दोघांनीही ती मान्य पण केली.

       ही कल्पना सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने वर्तमानपत्रात जाहिरात दिली, काही मजूर बोलावून वाड्याची साफसफाई करून घेतली, गॅस शेगडी वगैरे किरकोळ गोष्टींची व्यवस्था करून घेतली. आता हळूहळू तिथे जवळच्या तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी ज्या मुली परगावाहून येतात त्या राहण्याची सोय व्हावी या उद्देशाने चौकशीसाठी येऊ लागल्या पण खतरनाकवाडी गावच विचित्र. या गावाबद्दल सगळे म्हणायचे की इथे भूत, पिशाच्च, मुंजे यांचा वास आहे, या गावात गेलं म्हणजे आपले काही चांगले होणार नाही. कोणी जर राहण्याच्या हेतूने आले आणि बाकी इतर गावातील कोणाशी जर गाठ पडली तर ती व्यक्ती भयापोटी परत तिथे फिरकायचीच नाही. हेच सत्र अनेक दिवस चालू होते. त्यानंतर अथक परिश्रमानंतर जवळपास ७-८ मुलींचा एक समूह चौकशीसाठी आला आणि आम्ही लवकरच राहायला येऊ अशी ग्वाही देत ठरलेल्या रकमेतील काही पैसे आगाऊ देऊन गेल्या. त्यांनाही जाताना आजूबाजूच्या गावातील काही इतर गावकऱ्यांनी "तो वाडा चांगला नाही, पडीक आहे, भूत बंगला आहे तो, तिथे राहू नका, स्वतःच वाईट करून घेऊ नका, खतरनाकवाडी गावच विचित्र, का उगाच स्वतःचा बळी देत आहात ?" अस काहीबाही सांगितलं पण त्या मुलींनी "भूत वगैरे अंधश्रद्धा आहे, बिचारे ते गरीब दाम्पत्य !, असले काही नसते, माणुसकीने रहायला हवे, काहीही विचार करून उगाच अंधश्रध्दा पसरवू नका" असे म्हणत आपल्या विचारावर ठाम राहत तिथेच राहण्याचा आपला निर्णय नक्की केला व फेर विचार न केल्याने गावकऱ्यांचा मनसुबा मोडून पडला.

       सगळे अगदी सुरळीत झाले. त्या मुलींच्या गटाने शिक्षणासाठी महाविद्यालयातील प्रवेश निश्चित केला आणि ठरल्याप्रमाणे ठरलेल्या दिवशी त्यांच्या सामानासकट दाखल झाल्या. महाविद्यालयीन शिक्षण, अभ्यास, त्या हतबल दाम्पत्याची काळजी घेणं, स्वयंपाक बनविणे, मज्जा- मस्ती सगळे अगदी मस्त चालू होते. नशिबाने त्या गरीब जोडप्यासाठी ह्या मुली "वरदान" ठरल्या असे म्हटले तरी त्यात काही वावगे ठरणार नाही. त्या मुली सगळे स्वतःच पण करायच्या आणि बरोबरीनेच या गरीब जोडप्याची काळजी पण घ्यायच्या. त्यांनी जे बनवलं असेल ते त्या दोघांना द्यायच्या, आपले आजी आजोबा असल्याप्रमाणे त्यांच्याशी वागायच्या, सर्व मनातले मनमोकळेपणे त्या दोघांशी बोलायच्या. एकंदरीत काय तर त्या गरीब बिचाऱ्या दाम्पत्याला या मुलींमुळे सुगीचे दिवस आले.

     असेच चालू असताना अचानक एक दिवस अमावस्येच्या रात्री त्यांच्यातील एक मुलगी अभ्यास करून झाल्यावर तिच्या रूम मध्ये जाण्यासाठी निघाली आणि कसलातरी आवाज येतोय म्हणून जरा थबकली. तिने इकडे तिकडे सगळीकडे बघितले मग तिच्या लक्षात आले की आपल्या अंगणात असलेला झोपाळा जोरात हलत आहे, तिच्याच सख्यांपैकी कोणीतरी झोप येत नसेल म्हणून किंवा अभ्यास करण्यासाठी झोपाळ्यावर बसली असेल किंवा त्या आजी आजोबांपैकी कोणालातरी एकाला त्रास होत असेल, अस्वस्थ वाटत असेल म्हणून ते असतील तर जाऊन विचारपूस करावी या हेतूने ती झुल्यापाशी पोहचली. तिथले सगळे दृश्य बघून ती पुरती घाबरली, तिला दरारून घाम फुटला, तिच्या तोंडातून शब्द फुटेना कारण त्या झुल्यावर कोणीही नव्हतं तरीही तो हवापणी नसताना खूप जोरात इकडून तिकडे कोणीतरी झोका घेत आहे असा हलत होता. हा प्रकार पाहून ती तिथेच कोसळली. ती एकटीच खोलीत नाही म्हणून तिचा शोध घेतला असता इतर मैत्रिणींना ती झोक्याजवळ बेशुद्ध अवस्थेत दिसली. तिला त्यांनी खोलीत नेले, तिच्या तोंडावर पाण्याने सपकारे मारले आणि तिला शुद्ध आली. ती उठली आणि तेच दृश्य आठवून पुन्हा घामाने ओली चिंब झाली. "काय गं काय झालं ?" अशी विचारणा केल्यावर तिने सर्व घडलेली हकीकत सांगितली व सगळ्यांच्याच अंगावर शहारे आले. तरीही असे काही नसते, तुला भास झाला असेल, अस कधी होत का ? असे काही काही सांगून तिची समजूत काढली आणि पुन्हा एकदा सर्वच गुण्यागोविंदाने नांदू लागले.

       नंतर पुन्हा जवळपास ८/१५ दिवसांनी त्यांच्यातीलच दुसरी एक मुलगी संध्याकाळी जवळपास ८/८:१५ च्या सुमारास काहीतरी लागणारी गोष्ट घेऊन परतत असताना अचानक तिला असे वाटले की माझ्या मागे कोणीतरी चालत येत आहे कारण तिला मागून घुंगरांचा स्पष्ट आवाज ऐकू येत होता पण तिने मागे वळून बघितले तर कोणीच नाही, अस साधारणपणे ३-४ वेळा घडले असेल. पुन्हा चालायला सुरुवात केली की तेच. नंतर शेवटी तिला चाहूल लागल्यावर ती थांबली आणि "कोण आहे तिकडे?" असे मोठ्याने विचारले, पण उत्तर काहीच नाही, मग ती निघाली पण पुन्हा तिला मागे कोणीतरी आहे अशी चाहूल लागली. मागे वळून बघितले व तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या पाठीमागे एक जवळपास मध्यमवयीन बाई दिसली, जिने गर्द हिरव्या रंगाची साडी नेसलेली, त्यात भलेमोठे केस पूर्णपणे मोकळे, कपाळावर हळदीचे आडवे पट्टे आणि मोठे कुंकू अशा पद्धतीने भरलेला मळवट, डोळे अगदी लालबुंद, ओठांना एकदम भडक लाल रंगाची लिपस्टिक लावलेली, हात पाय उलटे, पायात जाड आणि स्पष्ट आवाज येईल असे भरगच्च घुंगरू. खरतर हा अवतार बघून ती खूप घाबरली. तिने खूप बळ एकवटून आणि हिंमत करून विचारलं, "कोण तुम्ही? काय पाहिजे आहे तुम्हाला ?". भयाण शांततेनंतर उत्तर आल, "मला जीव हवाय तुझा, तुझा जीव घेण्यासाठीच आली आहे मी, मी तुला वाड्यात बघितल, तू आवडलीस मला, आता काय मी तुला घेतल्याशिवाय जात नाही, मी तुझा जीव घेणार तेव्हाच माझा आत्मा शांत होणार". ती मुलगी हे सगळ ऐकून घाबरली आणि जीवाच्या आकांताने पळत सुटली. तिने धावतपळत घर गाठले. जशी ती अंगणात पोहोचली, ती तापाने फणफणली, तिच्या अंगातली त्राण अगदी गळून गेले. ती फकत एव्हढच बोलत होती, "मला सोडा, मला वाचवा, माझा जीव घेऊ नका, मी काय बिघडवल आहे तुमचं, कृपया असे मला जिवानिशी मारू नका". हा प्रकार तिच्या एका मैत्रिणीने बघितला आणि तिने बाकी मैत्रिणी व ते आजी आजोबा सगळ्यांना तिथे एकत्र केले. ते सर्वजण तिला सारखे विचारत होते, " काय ग काय बडबडतेय, काय झालं, काही घडलं का? अशी काय बोलतेय, कोण जीव घेणार तुझा?". पण तरीही ती सारखं एव्हढंच बोलत होती, "मला वाचवा, मी निष्पाप आहे, माझा जीव घेऊ नका." तिला जरा आराम करायला सांगितलं, आणि त्यांनी डॉक्टरांना बोलावले. तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितले, "त्यांना आराम करू द्या, त्यांची ही अवस्था भीषण भीतीपोटी झालेली आहे, त्यांनी भयानक काहीतरी बघितल आहे किंवा अनुभवलं आहे, आणि ती भीती खोलवर मनात घर करून राहिली आहे, मी सध्या एक इंजेक्शन आणि काही गोळ्या देतो त्या घ्या, २४ तासानंतर बरे वाटेल". यानंतर गोळ्या वगैरे घेतल्यावर तिची प्रकृती ठीक झाली. उठल्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला, हे ऐकून सगळेच घाबरले पण तिला त्रास होऊ नये वगैरे या उद्देशाने काहीही न बोलता आपल्या दैनंदिन कामाला लागले.

       पुन्हा काही दिवसाने ते असेच एकत्र बसले होते आणि गप्पांची मैफिल अगदी रंगात आली होती. तेव्हढ्यात अचानक आवाज आला, "हॅलो, कोणी आहे का ?". सगळे जरासे घाबरले. एकदम भयाण शांतता पसरली. पुन्हा गप्पा मारायला लागले, पुन्हा तेच. शेवटी एक जण दंडुका घेऊन उठलीच व विचारू लागली, "कोण आहे रे तिकडे, काय हव आहे, हिंमत असेल तर समोर येऊन बोला, नुसत काय कोणी आहे का?, कोणी आहे का?". हे ऐकले आणि समोर एक आकृती. ती पाहून परत भयाण शांतता. सगळेच भीतीने कंप पावत होते. तेव्हढ्यात ती आकृती जवळजवळ येऊ लागली. ती आकृती म्हणजे एक डोळा नाही, त्या ठिकाणी थेट मोठ छिद्र, एक डोळा अतिशय लालबुंद, डोके धडापेक्षाही मोठे, रक्ताने माखलेले ओठ, खूप आक्राळ विक्राळ दाढी, पाय उलटे, हात एकदम लांबलचक म्हणजे दूरवरून काहीही पकडू शकेल इतके लांब, त्यात पूर्ण काळीकुट्ट आकृती, आवाजही तसा भसाडाच. हे सगळे बघून सगळ्यांचे धाबेच दणाणले. त्यात त्या आकृतीने अचानक हात लांबवला व एका मुलीच्या गळ्याला धरून तिला वर उंच उचलून घेतले आणि वर बोलू लागली, "आता मी काही तुम्हा कोणालाच सोडत नाही, आज चांगलीच मेजवानी मिळाली आहे, अतृप्त सर्व इच्छा पूर्ण होणार, एकेकाला मी गिळून टाकणार, आता तेव्हाच शांत होणार जेव्हा तुम्हा सर्वांचं रक्त पिणार". हे ऐकले आणि सगळेच लटपट लटपट कापू लागले. ती वर उचलली होती ती मुलगी रडू लागली, मला सोडा म्हणून गयावया करू लागली. इतक्यात ती जिने काठी घेतली होती ती हिंमत एकवटून बोलली, "करून तर दाखव बघतेच मी". आणि तिने हातातली काठी त्या आकृतीच्या दिशेने भिरकावली, आणि वर उचलली गेलेली मुलगी धपकन जमिनीवर येऊन पडली, आकृती गायब झाली. भयावह प्रकार होता. गळ्याला पकडल्यामुळे त्या मुलीचा श्वास कोंडला गेला होता, जशी ती पडली तशी खोकू लागली. तिला पाणी पाजले, पूर्ववत केले, आजी आजोबा पण घाबरले. एकमेकांची काळजी घेत सगळे पूर्ववत झाले पण एक एक प्रकार वाढत चालले म्हणून त्या मुलींनी भीतीपोटी ते घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्या तिथून निघून गेल्या.

        हे सर्व प्रकरण आता इतर गावकऱ्यांनाही कळले, जो तो तीच चर्चा करू लागला. खूप विचारांती एक गोष्ट लक्षात आली की हे सगळे प्रकार फक्त अमावस्या आणि पौर्णिमेलाच घडत होते. का घडत असेल, कशामुळे याचा सर्वच जण विचार करू लागले. तपासाअंती असे लक्षात आले की, तो वाडा हा एका स्मशानभूमी असलेल्या जागेवर बांधण्यात आलेला आहे, तिथे अतृप्त आत्म्यांचा वास आहे. मग सर्व गावकरी आपण शांती करून घेऊया असा तगादा आजी आजोबांकडे लावू लागले. नाही नाही म्हणता म्हणता अखेरीस शांतीसाठी एक मांत्रिक बोलवला, त्याने संपूर्ण जागेची पाहणी केली आणि तो म्हणाला "इथे कुठलेही अपवित्र किंवा अतृप्त अशा गोष्टी नाहीत, हे सर्व तुमच्या मनाचे खेळ आहेत, या सर्व भंपक व अंधश्रद्धेस वाव देणारे विचार आहेत तुमचे,उलट जो कोणी या ठिकाणी इतर कुठलाही विचार न करता राहील त्याचे कल्याण होईल तसेच भरभराटही होईल". यावर कोणाचाही विश्वास बसला नाही, सर्व जण त्या आजी आजोबांना ती जागा सोडून द्या असे सांगू लागले, पण आजी आजोबांनी ते घर सोडण्यास नकार दिला. ते कसलाही विचार न करता, झाले गेले विसरून आनंदाने राहु लागले आणि बघता बघता दिवस पालटले, त्यांना तिथेच सुगीचे दिवस आले आणि भरभराट झाली, त्यांची परिस्थिती सुधारली, आज तेच आजोबा लोकाग्रहास्तव गावाचे सावकार आहेत आणि गुण्यागोविंदाने आपले उर्वरित आयुष्य व्यतीत करत आहेत.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror