स्त्री भ्रूण हत्या
स्त्री भ्रूण हत्या


नर्मदा आणि शांताराम एक सुशिक्षित व सुखी दाम्पत्य होते. आत्ताच नवीन नवीन लग्न झालेले त्यामुळे प्रेमाला अगदी उधाण आलेले होते. एकमेकाला समजून घेणं, एकमेकांची काळजी करणं आणि दोघांसाठी आपणच आपले आहोत असे वागायचे. इतकं छान चालू होत सगळं की जणू त्यांच्या आयुष्यात दुःखाचा लवलेशही नव्हता. नुकतेच लग्न जरी झाले होते तरी त्यांच्या स्वभावामुळे आणि एकमेकांशी असलेल्या वागणुकीमुळे आजूबाजूचे सर्व शेजारी त्यांना Ideal couple म्हणूनच ओळखायचे.
एक दिवस शांताराम नियमितपणे आवरून आपल्या कामासाठी घराबाहेर पडला. नर्मदाने नेहमीप्रमाणे घरातील सर्व कामे आवरली. त्यानंतर ती सहजच दूरदर्शन बघत बसली आणि अचानक तिला गरगरू लागले, उलट्या व्हायला लागल्या आणि अगदी तिच्या अंगात जणू काहीच त्राण नाही असे तिला वाटू लागले. ती थोडी निजली पण तिला आराम मात्र काही केल्या पडला नाही. संध्याकाळचे साधारण ५/५:१५ झाले असतील. शांताराम त्याचे काम उरकून घरी परतला.
त्याने "नर्मदा, ए नर्मदा" असे म्हणून खूप हाका मारल्या.
तो सारखं म्हणत होता,"अगं कुठेस तू?, बाहेर ये बघ मी तुझ्यासाठी काय गंमत आणली आहे ते?"
गंमत म्हणजे त्याच्या हातात मोगऱ्याच्या सुवासिक गजऱ्याची पुडी होती. मोगऱ्याचा गजरा म्हणजे नर्मदाचा जीव की प्राण. त्याने खूप हाका मारल्या पण नर्मदा काही आली नाही. तो तिला शोधण्यासाठी गेला तर बाथरूममध्ये नर्मदा शांत बसलेली दिसली.
त्याने "काय झालं तुला?" ही विचारणा केली.
त्यावर नर्मदा म्हणाली, "काही नाही ओ, जरा मळमळ होतंय आणि गरगरतं पण आहे, काहीच सुचत नाहीए."
हे ऐकल्यावर त्याला तिची खूप काळजी वाटायला लागली व तो तिला म्हणाला, "चल लगेच दवाखान्यात जाऊन डॉक्टरांना दाखवून येऊ, मला काही तुझी अवस्था बघवत नाही."
ती नको नको म्हणत होती तरी तो बळजबरीच तिला डॉक्टरांकडे घेऊन गेला, चेक केल्यानंतर असे समजले की ती गरोदर आहे. हे ऐकताच दोघे अगदी खुश झाले, त्यांच्या आनंदाला काही पारावारच राहिला नाही. आता शांताराम नर्मदेची अधिकच काळजी घ्यायचा, तिला हवं नको या सगळ्याकडे लक्ष ठेवायचा.
सगळं कसं सुरळीत चालू होत पण माहीत नाही का तो अचानक एक दिवस आला आणि नर्मदेला म्हणाला, "चल एका डॉक्टरांकडे जायचंय, तिथे जाऊ आणि गर्भचाचणी करून घेऊ व त्यानंतर जो काही निर्णय असेल तो लगेचच घेऊन टाकू." तो नर्मदेला तिथे घेऊन गेला, त्याने तिची गर्भचाचणी करून घेतली. त्या चाचणीचे रिपोर्ट आले आणि त्यात कळालं की जन्माला येणारे बाळ ही एक "मुलगी" आहे. हे कळताच माहीत नाही शांतारामला काय झाले आणि त्याने आपण गर्भपात करून घेऊ असा तगादा नर्मदेच्या मागे लावला. नर्मदा हे कृत्य करण्यास अजिबात तयार नव्हती. या गोष्टीवरून त्यांचे सारखे भांडण होऊ लागले व त्यांच्या नात्यात बाधा येऊ लागली.
बरेच दिवस असेच चालू राहिले, पण नर्मदाने विचार केला की ही फक्त मुलगी आहे म्हणून हे नाही म्हणताहेत, आणि आता माझी आधीसारखी काळजी पण घेत नाहीत. आपण एकमेकांशी साधे सरळ बोलत पण नाही आणि बोलायला गेलं तर फक्त या विषयावरून वादच होतो. हे सगळं असं होणार असेल व ती मुलगी जन्माला येऊन पण तिला जर सुख मिळणार नसेल तर गर्भपात करून टाकलेलंच चांगलं. तिने मनावर दगड ठेऊन हा निर्णय घेतला आणि मी गर्भपात करण्यासाठी तयार आहे, असे शांतारामला सांगितले. हे ऐकून तो खुश झाला.
ते दोघेही दवाखान्यात गेले व गर्भपात करून घेतला. तिला आतून खूप दुःख होत होते की मी ही स्वार्थी झाले, माझ्या नवऱ्याच्या अट्टाहासापायी मी एका निष्पाप जीवाचा बळी दिला. मी हे सुंदर जग बघण्याचा हक्क तिच्यापासून हिरावून घेतला. काय हक्क होता मला त्या अजाण बालकाची हत्या करण्याचा... याच विचारात ती कायम बसलेली असायची. असंच एकदा याच विचारात ती गुंतलेली होती आणि शेजारच्या रुक्मिणी काकू अगदी सहजच तिच्याशी गप्पा मारायला आल्या. आता त्या तिच्याशी बरंच काही बोलत होत्या आणि ती अगदी निर्विकार बसलेली होती.
त्यांनी विचारलं, "काय गं, काय झालं, काहीच बोलत नाही." हे ऐकलं आणि ती ढसाढसा रडायला लागली व तिने सगळी हकीकत काकूंना विश्वासाने सांगितली.
यावर काकू बोलल्या, "शांताराम आणि तू इतके सुशिक्षित व सुसंस्कारी आहात, तुम्ही असे करणे अजिबात अपेक्षित नाहीए. पण जाऊ दे झालं ते झालं, तुम्ही ते काही बदलू शकत नाही म्हणून जाऊ दे आणि नव्याने सुरुवात करा."
तरीही नर्मदेच्या ती सल मनात कायमच होती. ती त्या रात्री झोपली, अन् काय आश्चर्य, तिच्या स्वप्नात अगदी लहान तान्ही मुलगी आली, आणि म्हणाली, "आई, काय गं, तू मला या जगात आणण्याआधीच संपवलंस ना?,का गं, काय गुन्हा होता माझा?, तू मला जन्म दिला असतास तर मी नक्की असं काहीतरी केलं असतं ज्याने तुला आणि बाबांना कायमच अभिमान वाटला असता, असं वागली असती. मी कोणाची तरी मैत्रीण, कोणाची तरी आई, तुझी मुलगी, कोणाचीतरी पाठराखीण, कोणाचीतरी बहीण अशी बहुरूपी नारी बनली असती. तुझ्या एका निर्णयाने तू माझा बळी दिलास व यासाठी मी तुला कधीच माफ नाही करू शकणार." हे ऐकलं आणि ती तडकन उठून बसली आणि मोठमोठ्याने रडू लागली.
तिच्या रडण्याने शांतारामही जागा झाला आणि तिने सर्व हकीकत त्याला सांगितली. त्यानेही विचार केला व तो सुद्धा अगदी भावूक झाला. आपण यातून काहीतरी मार्ग काढूया असे वचन नर्मदेला दिले. त्याने खूप विचार केला. विचारांती एका मुलीला दत्तक घेऊन चूक सुधारण्याचा निर्णय त्यांनी दोघांनी मिळून घेतला. त्यांनी दोघांनी एक मुलगी दत्तक घेतली, तिचं नाव "स्वप्नाली" असे ठेवले. आज ती अतिशय सुंदर, संस्कारी व हुशार मुलगी आहे. अगदी ती तिच्या आईवडिलांच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांची पूर्तता नेहमीच करते, तिच्या नावाप्रमाणेच.
आता जेव्हा शांताराम विचार करतो तेव्हा त्याला नक्कीच जाणवतं की तेव्हा घेतलेला निर्णय आणि स्त्री भ्रूण हत्येला नकळत दिलेले प्रोत्साहन चुकीचे होते. आता कोणी त्याच्या ओळखीच्या माणसांनी असा विचार जरी बोलून दाखवला तरी शांताराम त्यांना योग्य मार्ग दाखवतो आणि हे आवर्जून सांगतो की, "मुलगा काय आणि मुलगी काय दोघेही सारखेच. एक वेळ मुलगा दुर्लक्ष करेल, स्वप्न पूर्ण करणार नाही व तुमची काळजी घेणार नाही पण एक मुलगी असे कधीच चुकूनही वागणार नाही. ती कायम तुमची साथ देईल व तुम्हाला अभिमान वाटेल असे वागेल. एकूण काय तर 'मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी'." या विचाराने शांताराम आज अनेक स्त्री भ्रूणहत्या वाचवण्यात यशस्वी झाला आहे.