Nishigandha Upasani

Tragedy Thriller

4.8  

Nishigandha Upasani

Tragedy Thriller

धडपड जीवनाची (सत्यघटना)

धडपड जीवनाची (सत्यघटना)

3 mins
311


जीवनात कधी कधी असे काही प्रसंग येतात की जे आपल्याला विचार करायला भाग पाडतात आणि अंतर्मुख करून जातात. काही दिवसांपूर्वीच असंच घडलं माझ्या एका स्पर्धा परीक्षेच्या निमित्याने परीक्षास्थळ पुणे असल्याने मला तिकडे जावं लागणार होत. माझ्यासोबत माझे आई, बाबा आणि लहान बहिणही होती.सकाळीच परीक्षा असल्याने मला आदल्या दिवशीच जाण भाग होत. आम्ही सकाळी 5 वाजेच्या रेल्वेच बुकिंग केलं होतं. आम्ही नियोजित वेळेनुसार स्टेशनवर गेलो आणि गाडी आल्यानंतर आम्ही आमच्या सीटवर जाऊन बसलो. थोड्या वेळाने एक दाम्पत्य त्यांच्या एका लहानग्या मुलासह गाडीत चढले. ते आमच्याच डब्यात चढले आणि आमच्या पुढच्याच सीटजवळ उभे राहिले. त्या मुलाच्या तोंडावर मास्क लावलेला होता. काही वेळाने तो मुलगा काही गोष्टींसाठी आग्रह करायला लागला आणि नाही म्हंटल की तो त्याच्या वडिलांना मारायचा. आम्ही बसून हे सगळं दृश्य बघत होतो. आमच्या आजूबाजूला असणारे सर्वच प्रवासी हा प्रकार बघत होते. त्या मुलाचं ते वर्तन बघून सगळे प्रवाशी एकमेकांशी कुजबुजूत होते की हे काय? हा मुलगा असं का वागतोय, मी आईला म्हंटल "काय ग आई, हे काय असं, तो लहान मुलगा का मारतोय त्याच्या वडिलांना? आणि त्याचे वडील तरी का सहन करताय? एका गोष्टीसाठी त्याने हट्ट केला ते त्याला नाही म्हंटल म्हणून असं वागणं तर बरोबर नाही ना." आई म्हणाली, " जाऊदे ना तो त्यांचा प्रश्न आहे, त्यात आपण तरी काय करणार? नको विचार करुस ते चुकीचं आहे पण आपण काय करू शकतो." मीही शांत बसले पण माझ्या डोक्यात विचारांचे काहूर माजलं होत.

    कल्याण स्टेशन आलं असावं आमच्यासमोर बसलेले एक काका त्यांचे स्टेशन आल्याने उतरले, जागा रिकामी झाली हे पाहून तो लहान मुलगा व त्याचे वडील त्या जागी येऊन बसले, तितक्यात जेली विकण्यासाठी एक विक्रेता आला आणि त्या मुलाने मला हवं यासाठी हट्ट सुरु केला पण त्याचे बाबा तू हे खाऊ नकोस असे म्हणाले आणि त्याने पुन्हा त्यांना मारायला सुरुवात केली, त्याच असं वागणं बघून मला राहवलं नाही, मी त्या माणसाला विचारलं " काय ओ काका, तुम्ही कुठलीही गोष्ट नाही म्हटली की हा तुम्हाला मारतोय व तुम्ही पण काहीच बोलत नाहीये असं का?" त्यावर ते काका शांतपणे म्हणाले," हो तुझं बरोबर आहे. पण तो पेशन्ट आहे, मग काय करणार. त्याला उलट मारणं पण तर बरोबर नाही ना." हे ऐकून मी त्यांना विचारलं " काय झालंय त्याला ?". माझा प्रश्न ऐकला आणि त्या गृहस्थाच्या डोळ्यात एकदम पाणी आलं, त्या मुलाला कळणार नाही अशा रीतीने डोळ्यातलं पाणी पुसत ते म्हणाले " त्याला कॅन्सर झालाय, ब्लड कॅन्सर, गेल्या दोन वर्षांपासून तो या आजाराने ग्रस्त आहे. त्याच्याच उपचारासाठी जातोय आम्ही. किमो करावी लागते, दरवेळी तपासणीसाठी रक्त काढाव लागत, हे सगळं अतिशय क्लेशदायक आहे त्याचमुळे तो चिडचिड करतो, बंधन असल्याने त्याला बाहेरचे पदार्थ देता येत नाहीत, आणि त्याला नाही म्हटलं कि संतापतो व असा वागतो "

     हे सारं ऐकून माझ्याही डोळ्यात पाणी आलं, माझ्या पायाखालची जमीनच सरकली, मी त्यांना त्या मुलाचं वय विचारलं तर त्यांनी केवळ साडेचार वर्षे असं उत्तर दिलं. हे ऐकल्यानंतर तर माझं मन भरूनच आलं, मी पुन्हा विचारात गुरफटली, मला खरच खुप वाईट वाटत होत. मी मनापासून देवाकडे प्रार्थना केली की "देवा काहीही कर पण या इवल्याश्या जीवाला बरं कर. त्याच्या खेळण्या-बागडण्याच्या वयात त्याला ह्या जीवघेण्या आजाराला सामोरं जाऊन यातना भोगाव्या लागत आहेत, या आजारातून त्याला लवकर बरं कर व त्याला दीर्घायुष्य दे." मला खूप वाईट वाटलं होतं आजही तो हृदयद्रावक प्रसंग काही केल्या माझ्या मनातून जात नव्हता. तो मुलगा खरच ठणठणीत बरा व्हावा व इतर सर्वसामान्य माणसाप्रमाणे त्यालाही आयुष्य जगायला मिळावं अशी आजसुद्धा माझी मनोमन इच्छा आहे. ईश्वर त्या लेकरास उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy