नातं मैत्रीचं
नातं मैत्रीचं


नातं मैत्रीचं
सदानंद आणि मधुर दोघे अगदी जिवलग मित्र होते. कधीही काहीही झालं तरी एकमेकांची साथ सोडणार नाही असं त्यांचं समीकरण होत. पण म्हणतात ना, लोकांना काही चांगलं होत असेल तर ते बिलकुल सहन होत नाही. त्यांचे इतर मित्र-मैत्रिणी सुद्धा त्यांच्यात भांडण लागेल असे सतत प्रयत्न करायचे, पण कितीही काहीही केलं तरी असफलच व्हायचे. त्यांना समजा एकमेकांबद्दल गैरसमज होऊ शकतात अशा गोष्टी कळाल्या तर ते समोरासमोर बसून त्यावर संवाद साधायचे व ती गोष्ट स्पष्ट करून घ्यायचे.
असे असतानाही एकदा त्यांचाच एक मित्र पुष्कर याने त्यांना दोघांनाही एकमेकांबद्दल काही चुकीच्या गोष्टी सांगितल्या. माहीत नाही का पण यावेळी मधुरला असं वाटलं की खरच सदानंदने आपल्याला फसवलं आहे आणि तो इतरांच्या बाबतीत खूप वेगळा व माझ्या बाबतीत अतिशय चुकीचा वागतो. त्याला माझ्यापेक्षा बाकी लोकांबद्दल जास्त प्रेम वाटते व तो त्यांनाच जास्त महत्व देतो. पण अर्थात तसे काहीच नव्हते. माहीत नाही का पण यावेळी आपल्या मित्राशी जाऊन बोलावे व आपल्या मनातील गैरसमज दूर करावा याची गरज मधुरला बिलकुलही वाटली नाही.
सदानंदने खूप प्रयत्न केले. तो स्वतःहून मधुरशी जाऊन बोलण्याचाही मार्ग त्याने शोधला, पण शेवटी तो असफलच झाला. तो बोलायला आला की मधुर तिथून निघून जाई तसेच तो समोरून येताना दिसला की मधूर आपला रस्ता बदलत असे. शेवटी कंटाळून सदानंदनेही प्रयत्न सोडून दिले.
खरं तर सदानंदला "सदा" हे नावही लाडाने मधुरनेच दिल होत. आता मात्र सदा खूप काळजीत होता. काय करावे हा अबोला कसा दूर करावा, मधुरची नाराजी व त्याच्या मनात असलेला गैरसमज कसा दूर करावा याच चिंतेने ग्रासलेला होता. यातून बाहेर पडण्याचा मार्ग काही केल्या सदाला सापडत नव्हता. तर त्याची मनःस्थिती काही ठिकाण्यावर नव्हती. आपला इतका घनिष्ट मित्र आपल्याशी एक अक्षरही बोलत नाही, काय झाले अचानक ?, माझे काय चुकले ? याच विचारात गुरफटलेला होता.
असे बरेच दिवस गेले व सदाच्या मनात आपला मित्र दुरावला याबद्दलचे दुःख होते. अचानक त्यांच्या दोघांचा मित्र पुष्कर ज्याने त्या दोघांमध्ये दुरावा निर्माण केला तोच धावत-पळत आला व तो म्हणाला, "ए सदानंद, चल ना लवकर, त्या मधुरला दवाखान्यात दाखल केल आहे, त्याच्या डोक्यात अचानक जोरदार कळा यायला लागल्या, म्हणून त्याला दवाखान्यात नेलं आहे, मला काहीच कळत नाहीए यार, कोणीच नाहीए तिकडे, प्लीज चल, तुमच्यातला दुरावा, राग थोडा बाजूला ठेव आणि चल ना यार".
मग काय मित्रप्रेमापोटी सहजच सदाने विचारलं कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे? यावर पुष्कर म्हणाला, "वेदांत हॉस्पिटल". हे ऐकताच सदा क्षणाचाही विलंब न करता हॉस्पिटलच्या दिशेने पळत सुटला. तिथे पोहचला आणि मधुरची अवस्था त्याच्याकडून बघवली गेली नाही. सदाने तडक जाऊन डॉक्टरांची भेट घेतली. त्याने मधुरला काय झालं आहे याबद्दल सविस्तर माहिती डॉक्टरांकडून जाणून घेतली. डॉक्टरांसोबतच्या संवादातून त्याला ही गोष्ट कळाली की मधुरला "ब्रेन ट्युमर" झाला आहे, आणि तातडीने त्याची शस्त्रक्रिया करावी लागेल नाहीतर मधुर अगदी काही दिवसांचाच सोबती असेल. त्याने डॉक्टरांना शस्त्रक्रियेसाठी किती साधारण किती खर्च येईल याबद्दल विचारणा केली, त्यावर डॉक्टरांनी 2 लाख रुपये असे उत्तर दिले व येत्या चार ते पाच दिवसात शस्त्रक्रिया करावी लागेल नाहीतर काही खरं नाही असे सांगितले.हे सर्व ऐकल्यानंतर सदाच्या पायाखालची जमीनच सरकली.
आता काय करावे पैश्यांची व्यवस्था कशी करावी ? हा एकच विचार त्याच्या डोक्यात घोंघावत होता.
तो दवाखान्यातून निघाला व तडक जवळच्या मित्रांना जाऊन भेटला व सर्व सद्य परिस्थितीची माहिती त्यांना दिली. त्याने यावेळी एक गुपितही उलगडले जे आजपर्यंत कोणालाही माहीत नव्हते ते म्हणजे " मधुर लहान असतानाच मधुरचे आईबाबा एका अपघातात वारले आणि मधुर अनाथ आहे, सध्या त्याचा सांभाळ त्याचे काका-काकू करताय, पण त्यांचंही हातावरचच पोट आहे, सगळा प्रपंच सांभाळून इतका मोठा खर्च त्यांना परवडणारा नाही, तर मित्रत्वाच्या नात्याने आपणच काहीतरी करायला हवे".
हे सगळं ऐकल्यावर सर्व मित्रांनी मिळून 20-25000 रुपये गोळा केले पण यात काही होणे शक्य नव्हते. आता मात्र काहीतरी करणे भाग होते. सदानंद हा सुंदर गायक होता. त्याने चार दिवसात 12- 15 कार्यक्रम करून पैश्यांची जुळवाजुळव केली व आवश्यक असलेली रक्कम दवाखान्यात भरलीसुद्धा.
यानंतर मधुरची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. आता पुष्कर मधुरला भेटायला गेला व बोलला,"अरे मित्रा, मला माफ कर, मी तुझ्या आणि सदानंदच्या नात्यात वितुष्ट आणले पण आज मला माझी चूक कळाली. तुला बरं नाही समजताच सदानंद येथे आला व त्याने तुझ्या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेली रक्कमही भरली व तुला जीवदान दिले, मला खरच माफ कर, मी तुम्हा दोघांची मनापासून माफी मागतो". इतक्यात सदाही तिथे मधुरला भेटण्यास आला. त्याला पाहून मधुर म्हणाला, "मित्रा, आत्ताच सत्य परिस्थिती मला सांगितली, खरच रे मी खूप कटुता करून घेतली तुझ्याबद्दल. आणि इतकं असूनही तू माझ्यासाठी सगळं केलंस व माझे प्राण वाचवले. तुझ्या कृतीने तू मला कृतकृत्य केलेस. मित्रा, यासाठी मी खरच तुझा आयुष्यभर ऋणी राहीन. आणि हो, माझ्या झालेल्या चुकीबद्दल मला माफ कर, मला आज पटलं की तुझ्याशिवाय माझा कोणी जिवलग मित्र नाही व माझ्याशिवाय तुला कोणीही इतर महत्वाचं नाही".
यावर सदानंद म्हणाला, "चल तू आराम कर, हे सगळं मित्रकर्तव्यासाठी केलं, लक्षात ठेव जे आपण स्वतः निर्माण करतो ते मैत्रीचं नातं असत आणि त्याला कशाचीही तोड नसते, मी तुझा घनिष्ट मित्र होतो, आहे आणि यापुढेही कायम राहील, तू निश्चिन्त हो व शांततेत आराम कर, त्याची तुला जास्त गरज आहे".
अशा रीतीने पुन्हा एकदा मधुर व सदानंद मैत्रीच्या नात्यात बांधले गेले व त्यांचे नाते अजूनच घट्ट झाले. आजही ते दोघे कायम सोबत असतात व एकमेकांच्या सुखदुःखात नेहमीच साथ करतात.
शेवटी काय "ज्या लोकांना देव रक्ताच्या नात्यात बांधू शकत नाही त्यांना मैत्रीच्या नात्यात बांधतो आणि मैत्री निभावणं म्हणजे गरजेला धावून जाणं, एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांच्या सुखदुःखात साथ देणं होय."