Nishigandha Upasani

Tragedy Others

4.4  

Nishigandha Upasani

Tragedy Others

अव्यक्त

अव्यक्त

6 mins
1.4K


अनन्या एक सुंदर तरुणी. 20-21 वर्षांची. नावाप्रमाणेच अनन्यसाधारण सौंदर्य लाभलेली. बघितल्यावर कुणीही प्रेमात पडावं अशी. ती कॉलेजला उच्चशिक्षण घेत होती. अतिशय सुंदर, सालस आणि शालीन होती. नियमित महाविद्यालयात जायची. शिक्षणातही हुशार होती. दरवर्षी उत्कृष्ट गुण मिळवून गुणवत्ता प्राप्त करायची. अतिशय मेहनती आणि आयुष्यात काहीतरी वेगळं निर्माण करून आपलं स्थान मिळवायचं ह्या ध्येयाने प्रेरित ही.


एक दिवस असंच ती कॉलेजमध्ये गेली असता ग्रंथालयाच्या बाहेर एका मुलाची नजर तिच्यावर पडली, तो एकटक तिच्याकडे बघत होता, त्याची नजर काहीही केल्या तिच्यावरून हलत नव्हती. तो तिचे रूप न्याहाळण्यात अतिशय दंग झालेला होता, आपल्या सौंदर्यावर मुलं भाळतात व असं बघतात ह्या गोष्टीची अनन्याला सवय झाली होती, ती हे सगळं दुर्लक्षित करायची, पण आज तसं झालं नाही. तो आपल्याकडे एकटक बघतो आहे हे तिच्याही लक्षात आलं होतं, तिने आपल्या पंजाबी ड्रेसची ओढणी सांभाळत एक कटाक्ष त्याच्याकडे टाकला, दोघांचीही नजरानजर झाली, तरीही तो भान हरवून तिचे रूप बघण्यात मग्न होता, तीही त्याच्याकडे एकटक बघत होती कारण तोही दिसायला तितकाच सुंदर, उमदा होता. गोरा वर्ण, उंचपुरा, निळ्याशार घाऱ्या डोळ्यांचा, शरीरयष्टीही उत्तम, एखाद्या नटासारखी केशरचना असलेला असा होता. तिने आपल्या मनाला आवर घालत तिथून काढता पाय घेतला. ती या विचारात होती की हा इतका सुंदर तरुण कुठल्या वर्षाला असेल, इतके दिवस कसा नाही दिसला, तो माझ्याकडे इतका टक लावून का बघत असेल, का दोघंही तिथेच थांबून राहिलो, मी सुद्धा त्याचे रूप पाहात का उभी राहिले... तपासाअंती कळलं की तो आपल्या महाविद्यालयात नुकताच आला असून त्याचं नाव अनिकेत आहे. अनिकेतचीही अवस्था फार वेगळी नव्हती, तो तर तिचे सुंदर रूप विसरुच शकत नव्हता. गोरा रंग, सुंदर जरीचा पंजाबी, लांबसडक केस, केसांची एक बट थोडीशी चेहऱ्यावर, बोलके डोळे, गुलाबी लालचुटुक ओठ आणि घड्याळात वेळ बघत घाईत चालणारी ती, पायात सोनेरी रंगाचे उंची सॅन्डल, सडपातळ शरीरयष्टी, त्याच्या डोळ्यासमोरून हटत नव्हते ते सौंदर्य, कोणालाही हेवा वाटावा असे. 


मध्ये बराच कालावधी गेला. आता परीक्षेचे दिवस जवळ आले आणि त्याच दरम्यान पुन्हा दोघांची समोरासमोर गाठ पडली, ती गोंधळली... पुढे चालू लागली, एव्हढ्यात Excuse me please... असा आवाज आला. तो अनिकेतच होता. तिच्याशीच बोलण्याचा प्रयत्न करीत होता, सुरुवातीला तिने टाळले पण एक-दोन वाक्यातच तिच्या लक्षात आले की, हा फ्लर्ट नाहीये, जुजबी बोलण्यानंतर एकमेकांचे नाव, गाव... अतिशय सरळ आणि सोपं थोडं बोलणं व थोडी ओळख आणि एक ओळखीचं स्मितहास्य, इतकीच देवाणघेवाण झाली. पुढे ह्या ना त्या निमित्ताने भेटी होऊ लागल्या. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले, दोघांनाही एकमेकांबद्दल प्रेमाची भावना निर्माण झाली होती पण दोघंही बोलण्यास कचरत होते. दोघंही बोलले नाही, व्यक्तही झाले नाहीत… पण दोघांमध्ये निखळ मैत्री खूपच छान जमली होती, प्रत्येक गोष्ट एकमेकांना सांगायचे, सुखदुःख सगळे सगळे व्यक्त करायचे. असेच दिवस सरले. कॉलेज जीवन संपले. दोघेही आपापल्या मार्गाला लागले. बोलणं, भेटी, गप्पा, हसणं सगळं मागे पडलं. 


अनन्याही आपल्या विश्वात रमली होती. मावशीचा साखरपुडा म्हणून अनन्या आईसोबत आजोबांकडे आली होती, घरात काहीतरी वस्तू लागत होती म्हणून मामीने अनन्याला हाक मारली, अनु अगं हिंगं संपलंय... एक काम कर, माझी गाडी घे आणि कोपऱ्यावरच्या सुपर मार्केटमधून आणून दे जरा मला पटकन... अनुला अशी कामं म्हणजे आवडीची, अनु अगं अन्नपूर्णाचंच आण गं, गाडी काढताकाढता मामीचा आवाज, हो हो, मामीचं एक होतं तिला हवी तीच आणि हव्या त्याच ठिकाणाहून वस्तू आणावी लागायची, नाहीतर मग मामीचा पारा चढायचा, सुपर मार्केटच्या बाहेर गाडी लावून धावतच अनुने काचेचा दरवाजा ढकलला, समोर एक ओळखीचा चेहरा दिसला, काही क्षण लक्षातच आलं नाही आणि दोघेही एकदमच जवळजवळ ओरडलेच, “अनन्या तू इथे”, “अनिकेत मीही तेच म्हणतेय तू इथे कसा” पुन्हा एकदा अकस्मात भेटीने आभाळ ठेंगणे वाटावं इतका आनंद दोघांनाही झाला होता, बरंच बोलणं झालं, खूप गप्पाही मारल्या, बरंच काही सांगितलं एकमेकांना… सोबत कॉफीसुद्धा घेतली इतक्यात अनुचा मोबाईल वाजला.


बापरे... वाट लागली, मामीचा फोन,

अनु अगं आणतेस ना हिंगं, इतका वेळ कसा लागला तुला...

हो हो, आलेच मामी... अगं गाडीची हवा कमी झाली होती...

तेच तर, तुझा मामा भारी आळशी बाई... मी आठ दिवसांपासून सांगतेय पण ऐकतील तर, बरं ते जाऊ दे, तू ये बरं पटकन...

आज पहिल्यांदाच अनन्या सहजपणे खोटं बोलून गेली होती,

ए अनिकेत, चल मी निघते, मामी जाम वैतागली आहे, आपले नंबर आहेत बोलू नंतर... असं म्हणून ती निघाली.


त्यानंतर चार-पाच दिवसांत मोबाईलवर मेसेजने संपर्क सुरू होता.


अनन्या ऐक ना आज भेटू या का आपण, असं कर सायंकाळी मी सांगतो त्या ठिकाणी ये कॉफी हाऊसवर...


ठरल्याप्रमाणे अनन्या घरातून मैत्रिणीकडे जाऊन येते म्हणून निघाली, तोही वेळेत हजर होता, का कोण जाणे त्याला काहीतरी बोलायचे आहे असं तिला सहज वाटून गेलं, दोघेही आतमध्ये गेले, कॉफी सांगितली, गप्पा सुरु होत्या तितक्यात कर्णकर्कश आवाज झाला, ते बसलेले होते तिथेच समोर रस्त्यावर एक दुचाकीचा अपघात झाला होता, अनिकेतसह सगळेच तिकडे धावत गेले आणि बघतो तर काय त्याचा घनिष्ट मित्र त्या अपघातात गंभीर जखमी झालेला, अशा प्रसंगात मित्राला एकटे सोडणे शक्य नव्हते. त्याने तिला नजरेनेच इशारा केला की, तू जा... ती घरी परतली, त्यानंतर आठ-दहा दिवस त्याचा फोन, मेसेज काहीच नाही, ती पण साखरपुड्याच्या गडबडीत होती, आता ती आपल्या घरी परतली होती, दोघांचेही बोलणे राहूनच गेले होते.


अजून एक घटना घडली... प्रवासात अनन्याचा मोबाईल गहाळ झाला, अनिकेतचा नंबर त्यातच होता. घरी आल्यावर पप्पांनी तिला मोबाईल आणि सिम दोन्हीही नवीन दिले. इकडे अनिकेतची तिला भेटण्यासाठी आणि मनातलं सगळं तिला सांगण्यासाठी खूप धडपड चालली होती, त्याने तिचा शोध घेतला पण तिच्या वडिलांची बदली झाली असल्या कारणाने त्यांनी शहराचा निरोप घेतलेला होता. 


असाच एक दिवस पुन्हा अचानक भेटीचा योग आला, वडिल रिटायर्ड होऊन पुन्हा त्यांच्या त्या शहरात शिफ्ट झालेले होते, ती मार्केटला गेली होती, अचानक हा समोर आला, खूप बोलले, बोलण्याच्या ओघात तिने आता माझे लग्न झाले आहे, माझा पती मोठ्या कंपनीचा मालक आहे, तो माझी खूप काळजी घेतो, माझ्यावर जीवापाड प्रेम करतो, मला अगदी फुलासारखा जपतो, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो, सुख माझ्या पायाशी लोळण घेत आहे, असं म्हटलं. तरी हरकत नाही. जुने मित्र-मैत्रीण म्हणून गप्पा मारल्या आणि मार्गस्थ झाले.


अनन्याचं बोलणं ऐकून तो मनातून खूप हिरमुसला होता, खरं तर तो तिचीच वाट बघत लग्नासाठी आणि सुखी संसाराची स्वप्न बघत थांबलेला होता, आज ती भेटली. तिच्याजवळ मनातले भाव प्रकट करावे, असं त्याला वाटत होतं पण सुखी संसाराचं जे वर्णन तिने केलं होतं आणि त्यात ती आनंदी आहे हे तिच्या बोलण्यातून जाणवत होतं, त्याने आपल्या मनातल्या भावनांना आवर घातला... असंही आता वेळ निघून गेली होती, तिचं सुख ऐकून तोही आनंदी झाला, त्याचे भाव मनातच ठेवत व मीही सुखात आहे, मीही माझ्या संसारात सुखी आहे, संसारात रममाण आहे असे खोटेच सांगितले. कारण त्याला तिच्या संसारात वेगळी गुंतागुंत निर्माण करणे योग्य नाही वाटले, कदाचित आपल्या सांगण्याने ती दुखावेल, तिच्या वाट्याला दुःख नको यायला. ती सुखी तर मीही सुखी असा भाव मनी ठेवत दोघांनी निरोप घेतला, नवीन नंबरची देवाणघेवाण झाली होती पण त्याचा आता फारसा उपयोग होणार नव्हता. 


ती घराकडे निघाली डोक्यात विचारचक्र सुरू होतं, इतकी सुंदर मैत्री, मनात त्याच्याबद्दल प्रेम पण कधीही व्यक्त नाही केलं आपण, निखळ मैत्रीची मर्यादा पार नाही केली कधीच दोघांनी, पण आज भेट झाली पुन्हा जुन्या आठवणी जाग्या झाल्या. पण एक गोष्ट सतावत होती... आपण नाही व्यक्त झालो पण तोही तर कधीच काही बोलला नाही. घरी आली तरी तिचं चित्त कशात लागत नव्हतं, सारखा अनिकेतचा भाबडा, सुंदर, निखळ मैत्री प्रकट करणारा चेहरा डोळ्यासमोर येत होता, अखेर प्रेम अव्यक्तच राहिले होते. असंही प्रेम असू शकतं यावर आश्चर्य व्यक्त करत ती तिच्या कामांना लागली. 


अनिकेतच्याही डोक्यात त्याच विचारांची सरभेसळ सुरू होती, मी बरोबर वागलो ना, ती सुखी आहे हे पाहून मीही सुखी आहे, माझंही लग्न झालं आहे, असं आपण खोटंच बोललो, हे तिला कळलं तर ती चिडणार तर नाही ना? काहीही असलं तरी आपल्या अद्भुत मैत्रीचे जुने किस्से व आठवणींना उजाळा देत तोही कामाला लागला


Rate this content
Log in