Nishigandha Upasani

Inspirational Thriller

4.6  

Nishigandha Upasani

Inspirational Thriller

ऐतिहासिक कथा - कारगिल युद्ध

ऐतिहासिक कथा - कारगिल युद्ध

6 mins
367


   तशी गोष्ट जरा जुनीच आहे पण आजही प्रसंग अगदी जसाच्या तसा माझ्या डोळ्यांसमोर उभा राहतो. मी ९/१० वी मध्ये असेन आणि बॉर्डर, क्रांतिवीर वगैरे देशप्रेम जागृत करणारे चित्रपट बघण्याची भलतीच आवड मला. तसेच १५ ऑगस्ट, २६ जानेवारी किंवा १ मे असेल मग तर घरात मोठ्या आवाजात देशभक्तीपर गीते वगैरे लावलेच जातात. नेमके आठवत नाही पण असंच काहीतरी होत दिवसभर तीच देशभक्तीपर गाणी कानात गुंजत होती. रात्री सर्व झाल्यावर मी निजली, जरा गाढ झोप लागली असेल तितक्यात मला आवाज आला, "ए मुली, बाळा निजलीस का?". पहिले ओळखीचा आवाज नाही म्हणून दुर्लक्ष केलं पण पुन्हा तोच आवाज आला.

थोडे किलकिल्या डोळ्यांनी बघितलं आणि घाबरत घाबरत "कोण आपण ?" अशी विचारणा केली. समोरून उत्तर आले,"अगं मीही तुझ्यासारखाच एक देशप्रेमी, या आपल्या भारत देशासाठी बलिदान दिलेला एक सैनिक, याच आपल्या भारतमातेचा एक सुपुत्र". हे ऐकले आणि काहीतरी विलक्षण घडणार अथवा अनुभवणार याची मला कल्पना आली. मग मीही क्षणाचाही विलंब न करता एक एक प्रश्न विचारत माझ्या डोक्यातील विचारांचं काहूर हलके करण्यास सुरुवात केली. पहिलाच प्रश्न होता, "काका सैनिक आहात, बलिदान दिलं हे कळलं पण बलिदान दिलं कुठे ? नेमके कुठल युद्ध होत?". समोरूनही लगेचच उत्तर आल, "कारगिल युद्ध". तोपर्यंत मला कारगिल युद्ध काय होत कसं घडलं, कुठे केव्हा या बाबतीतली जराशीही माहिती नव्हती, फक्त मागे कारगिल नावाचं मोठ युद्ध होऊन गेलं आहे ज्यामुळे इतिहास रचला गेला इतकीच काय ती माहिती होती. मग अर्थातच पुढे "काका, काय होत कारगिल युद्ध, ते कुठे झालं, कस झालं, केव्हा झालं, त्याची कारणे काय होती, मग तुम्ही सर्वांनी त्यावर कशी मात केलीत, नेमक काय काय घडलं ?" अशी अनेक प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. यावर ते काका फक्त एव्हढेच म्हणाले, "थांब बाळा, सांगतो, सगळेच एकदम सविस्तर सांगतो, तुला ऐकायच आहे मग मी पण सांगायला तयार आहे". हे ऐकताच मीही अगदी कान टवकारले आणि ऐकायला सुरुवात केली.आता काका एक एक गोष्ट अगदी सविस्तरपणे अगदी पुस्तक वाचावं अशी सांगू लागले आणि त्यांनी सुरुवात केली.

कारगिल म्हणजे जम्मु काश्मिरची राजधानी श्रीनगरपासून २०५ किमी अंतरावर वसलेले तसेच भारत - पाक आंतरराष्ट्रीय नियंत्रण रेषेपासून जवळ असणारे शहर. हिमालयाच्या इतर भागांप्रमाणे कारगिलमध्ये थंड वातावरण असते. येथे उन्हाळा हा सौम्य तर हिवाळा अगदी कडक व दीर्घ असतो. राष्ट्रीय महामार्ग असलेला लेह ते श्रीनगर हा रस्ता कारगिल युद्धाचे मुख्य कारण ठरला. घुसखोर पाकिस्तानी सैनिकांनी सन १९९९ मध्ये पाकव्याप्त काश्मीर जवळच्या आणि रस्त्याला समांतर १६० किमी पट्टयातील लष्करी चौक्यांवर घुसखोरी केली. त्यातील काही चौक्या ह्या समुद्रसपाटीपासून साधारणतः ५००० मीटरपेक्षा अधिक उंचावर आहेत. इतकेच नव्हे तर कारगिलसह आग्नेयेकडील द्रास व नैऋत्येकडे असलेल्या मश्को खोऱ्यातील, तसेच बटालिक विभागातील चौक्यांवर घुसखोरी केली.

यापुढे एक एक गोष्ट सविस्तरपणे सांगितली जात होती आणि तेथील परिस्थिती जशीच्या तशी माझ्या डोळ्यांपुढे उभी राहत होती. यानंतर ते काका तपशीलवार युद्धाचा घटनाक्रम सांगू लागले. या युद्धाचे पहिले पाऊल म्हणजे पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय चौक्यांवर कब्जा केला. कडक हिवाळ्यातील महिन्यांमध्ये मनुष्यहानी कमी व्हावी या उद्देशाने अतिउंचावरील चौक्या भारत व पाकिस्तान दोन्ही पक्षांकडून रिकाम्या केल्या जात असत. हवामान ठीकठाक झाल्यानंतर दोन्ही सैन्य आपापल्या चौक्यांमध्ये परतून संरक्षणाची जबाबदारी घेत असत. फेब्रुवारी १९९९ मध्ये पाकिस्तानी सैन्याने कडक हिवाळ्यातच चौक्या ताब्यात घेण्यास आरंभ केला. पाकिस्तानने ही मोहीम अगदी सुत्रबद्धरित्या व कोणालाही थांगपत्ता लागू न देता इतकेच नव्हे तर भारतीय गुप्तहेरांना देखील खबर न लागू देता पार पाडली ज्याचा परिणाम म्हणून भारतीय गुप्तहेरांच्या कार्यक्षमतेवर भारतातून आणि जगातूनही खूपच टीका झाली. स्पेशल सर्विसेसच्या सर्वोत्कृष्ट तुकड्या,तसेच नोर्दन लाईट इन्फर्टीच्या काही बटालियन तुकड्या या कामात गुंतल्या होत्या. रिकाम्या चौक्यांव्यतिरिक्त मोक्याच्या भारतीय जागाही ताब्यात घेण्यास सुरुवात पाकिस्तानी सैन्याने केली होती. साधारणपणे अतिउंचावरील एक मुख्य चौकी व त्याला टेका देणाऱ्या दुय्यम उतारावरील एक चौकी व कमी उंचीवरील काही चौक्या पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतल्या. या कार्यात पाकिस्तानी सैनिकांबरोबर अफगाणी व काश्मिरी मुजाहिद्दीन यांनाही समाविष्ट करण्यात आले.

भारतीयांना या घटनेची माहिती मिळण्यास अनेक कारणांमुळे उशीर झाला. पाकिस्तानने अनेक भागात तोफांचा मारा केल्याने शोधपथक पाठवण्यास विलंब झाला. होत असलेला तोफमारा नेहमीचा आहे,हा मारा नियंत्रण रेषापलिकडील सैनिकांना संरक्षण देण्यासाठीचा आहे असा भारतीयांचा ग्रह होता. स्थानिक मेंढपाळाने भारतीय सैन्याला घुसखोरीची बातमी दिली, या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी भारतीय सैनिकांची एक तुकडी टेहळणीसाठी पाठविण्यात आली पण त्यावर हल्ला झाला आणि घुसखोरी झाल्याचे सिद्ध झाले. सुरुवातीला मुजाहिद्दीन घुसखोरी असून लवकरच संपवता येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला परंतु नियंत्रण रेषेच्या बऱ्याच अंतरावर घुसखोरी झालेली आहे हे पाकिस्तानी घुसखोरांचे प्रत्युत्तर काहीतरी वेगळेच आहे असे प्रकर्षाने लक्षात आले व ही घुसखोरी मोठ्या नियोजनातून केलेली आहे याचीही कल्पना आली. अशा रीतीने येथे कारगिल युद्धाला सुरुवात झाली यावर शिक्कामोर्तब झाला. पाकिस्तानने जवळजवळ १३० ते २०० चौरस किमी इतका प्रदेश ताब्यात घेतला होता तर मुशरफ यांच्या मते १३०० किमी इतका प्रदेश काबीज करण्यात आला होता. भारताने "ऑपरेशन विजय" या नावाने युद्धाची कार्यवाही चालू केली. त्यासाठी जवळपास २,००,००० फौजेचा आधार घेण्यात आला. परंतु भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेत फौजेची गणसंख्या २०,००० इतकीच मर्यादित ठेवण्यात आली. अर्धसैनिक व वायुदल मिळून भारताने साधारणपणे ३०,००० सैनिक वापरले तर पाकिस्तानी सूत्रांनुसार घुसखोरांची संख्या जवळपास ५००० इतकी होती. भारतीय वायुसेनेकडून "ऑपरेशन सफेद सागर" राबविण्यात आले आणि या अंतर्गत पायदळ सैन्याची ने - आण करण्याची मोठी भूमिका वायुसेनेने पार पाडली. मोठे बॉम्ब वाहून नेण्यासाठी विमानतळ, भौगोलिक परिस्थितीनुसार नसल्याने वायुसेनेचीही व्याप्ती मर्यादित ठेवावी लागली. भारतीय नौदलाने पाकिस्तानी बंदरांना लक्ष्य ठेवत तिथे येणाऱ्या जहाजांची कोंडी केली. या कृत्यामुळे पाकिस्तानची जीवनावश्यक वस्तूंची रसद थांबली.

यापुढील महत्त्वाचा टप्पा ठरला तो म्हणजे भारताचे प्रत्युत्तर. कारगिल युद्ध सुरू झाल्यानंतर रसद तोडण्यासाठी लेह - श्रीनगर मार्ग तोडण्याचा इरादा नक्की करण्यात आला. पाकिस्तानकडून या मार्गावर मोठ्या प्रमाणात तोफांचा मारा करण्यात आला. प्रत्युत्तरादाखल भारताकडून राष्ट्रीय महामार्गाजवळील भाग ताब्यात घेण्यास प्राधान्य देण्यात आले. बंदुका, स्वयंचलित मशिनगन, छोट्या उखळी तोफा व विमानभेदी क्षेपणास्त्रे यांनी चौक्या सज्ज होत्या तसेच चौक्यांच्या सभोवतालचा परिसर पेरलेल्या सुरुंगांनी संरक्षित केला होता. यासाठी भारतीय सेनेने युध्दाशेवटी ८००० सुरुंग निकामी केले होते. महामार्गालगतच्या चौक्यांवरील हल्ल्यांनी चौक्यांवर ताबा मिळवण्यात भारताला यश आले व महामार्गही सुरक्षित होत गेला. भारतीय आक्रमणात टायगर हिल व तोलेलिंग शिखर या शिखरवजा चौक्यांवर केलेली आक्रमणे नोंद घेण्याजोगी होती. यानंतर बटालिक व तूर्तुक या सियाचीन लगत भागांना लक्ष करण्यात आले. पॉईंट ४५९० आणि पॉईंट ५३५३ याही महत्त्वाच्या जागा होत्या. यापैकी ४५९० वर १४ जून १९९९ रोजी भारतीय सेनेने ताबा मिळवला. तोलेलिंगची लढाई ही महत्त्वाची ठरली तसेच यानंतर सामरिक व राजनैतिक पारडे पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकले. टायगर हीलची लढाई सुद्धा महत्त्वपूर्ण मानली जाते. यात पाकिस्तानने खंदक खोदून भारतीयांना झुंजविले. सरतेशेवटी ४ जुलै १९९९ रोजी भारताने टायगर हिल वर ताबा मिळवला. या लढाईत भारताचे ५ तर पाकिस्तानचे १० सैनिक मृत्युमुखी पडले. या युद्धात भारतीय सैन्याने नवनवीन क्लृप्त्या लढवत, काही लढायांमध्ये रात्रीच्या अंधारात हजारो फूट सरळसोट कड्यांवर गिर्यारोहण करून शत्रूंवर अनपेक्षित ठिकाणाहून हल्ले करून चौक्या ताब्यात मिळवण्यात यश संपादन केले. अशा रीतीने भारताने १९९९ च्या जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अनेक महत्वाच्या लढाया करून अनेक जागा ताब्यात घेतल्या. युद्धात जवळपास ५२७ भारतीय सैनिक शहीद झाले तर २७०० पाकिस्तानी सैनिक मरण पावले.

असे हे भयंकर युद्ध जवळपास ६० दिवस चालले. सरतेशेवटी २६ जुलै १९९९ ला पाकिस्तानने पराभव मान्य केला व भारतीयांचे "ऑपरेशन विजय" यशस्वी झाले. असे हे ऐतिहासिक कारगिल युद्ध झाले.

हे सगळे ऐकताना माझ्या अंगावर रोमांच उठले आणि मी खडबडून जागी झाले, मला प्रचंड घाम फुटला होता. उठल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की हे स्वप्न होते जरी यातील ऐतिहासिक घटना खरी असली तरी ती सांगणारे सैनिक काका हे स्वप्नात संवाद साधत होते पण तपशीलवार सविस्तर माहिती सांगत होते. स्वप्न होते हे जरी लक्षात आले तरी सैनिकांप्रतीचा आदर नक्कीच वाढला आणि मूळच्या माझ्या नसलेल्या पण मला भावणाऱ्या ओळी म्हणजेच "सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजूए कातील में है | कतरा कतरा खून है उबले कतरा कतरा लढेंगे हम, कसम है भारत मां की हर फौजी का सन्मान करेंगे हम" अस म्हणत मी सर्व सैनिकांना मानाने सलाम केला आणि कारगिलमध्ये शहीद झालेल्या सैनिकांप्रती आदरांजली व्यक्त केली.   


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational