Jyoti gosavi

Fantasy

3  

Jyoti gosavi

Fantasy

भारतीय सुपरमॅन शक्तिमान

भारतीय सुपरमॅन शक्तिमान

10 mins
388


वीस वर्षापूर्वी आलेली शक्तिमान ही मालिका आणि त्यातला भारतीय सुपरहिरो मला आवडला .तो नुसते साहस शिकवत नव्हता .तर त्यातून मुलांवर संस्कार देखील घडवत होता. मुलांना स्वारी म्हणण्याचे आत्मभान तो देत होता तर आता पुन्हा एकदा पाहू या शक्तिमान चा नवीन कारनामा. 

**********************


शक्तिमान सध्या परेशान होता त्याला काही सुचत नव्हते. कारण आता ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्यामुळे सर्व मुलांच्या हातात मोबाईल गेले होते. पूर्वी जे पालक मुलांच्या हाती मोबाईल देत नसत त्यांनादेखील नाईलाजाने मुलांच्या हाती मोबाईल द्यावे लागले .त्यातून दुष्परिणाम असा होऊ लागला मुलांच्या हातात सतत मोबाईल दिसु लागले. अभ्यास संपला तरी मित्रांना मैत्रिणींना कॉल करून शंका विचारण्याच्या नावाखाली मोबाईल बघू लागले. मोबाईल वर विविध प्रकारचे गेम खेळू लागले. 

पब्जीसारख्या गेमने तर तारुण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या कोवळ्या मुलांच्या मनावर वाईट परिणाम होऊ लागले. मुले हिंसक बनू लागली. सतत सगळ्या गोष्टी मोबाईलवर रेडिमेट मिळू लागल्यामुळे, मुलांचे अभ्यास कच्चे राहू लागले. त्याचा स्मरणशक्तीवर परिणाम होऊ लागला पूर्वी बेचे पाढे तीनशे पर्यंत पाठ असणारी मुले छोट्या छोट्या गोष्टीला कॅल्क्युलेटर वरती बेरीज-वजाबाकी करू लागली. कोणत्या गोष्टीचे उत्तर मिळवण्यासाठी स्मरणशक्तीला ताण न देता गुगल सर्च करू लागले. मुलांना अभ्यासापेक्षा मोबाईलची गोडी जास्त लागली. हे कुठेतरी थांबले पाहिजे असे शक्तिमान ला वाटू लागले. त्यातच कोरोना आला आणि गेला परंतु आता सुरू झालेली ऑनलाइन अभ्यासक्रम पद्धती बदलत नव्हती. काही संस्थांनी शाळा सुरू केल्या परंतु मुलांच्या हातातील मोबाइल काही सुटत नव्हता. काय करावे ?काय करावे? याचा विचार करीत असताना शक्तिमान मला एक युक्ती सुचली. 

++++++++++++++++


एके दिवशी "प्रगल्भ" विद्यालयाच्या शाळेतील सर्व पालकांना मोबाईलवरती मेसेज आला. 

"तुमच्या मुलाला घातक व्यसन लागलेले आहे" काय ते समजण्यासाठी अमुक अमुक पत्त्यावर ती भेटा. अर्थात आपल्या मुलाच्या बाबतीत मॅसेज असल्यामुळे आणि तो पण त्याच्या व्यसनाबाबत असल्यामुळे सर्व पालक एकमेकांशी न बोलता गुपचुपपणे दिलेल्या ठिकाणी पोहोचू लागले. प्रत्येकाला वेगवेगळा टाइमिंग स्लॉट दिला होता. 


बाहेरून दिसायला ते एखादे इस्टेट एजंट किंवा टूर अँड ट्रॅव्हल्स चे सर्वसाधारण ऑफिस वाटत होते. परंतु एकदा ऑफिसमध्ये शिरल्यानंतर पालकांना एक विशिष्ट नंबर देऊन आतल्या हॉल पाठवत होते .हॉल तसा अंधारी होता त्यामुळे कोणी कोणाला दिसत नव्हते. हॉल कसला, आतमध्ये एखादे मोठे स्टेडियम असावे एवढी मोठी जागा होती आणि त्याच पद्धतीची बसायची सिस्टिमदेखील होती. हळूहळू मेसेज पाठवलेल्यापैकी सगळेच्या सगळे शंभर टक्के पालक जमा झाले. आणि तो हॉल बंद झाला. हॉलचे एसी सुरू झाले आणि अतिशय मंद प्रकाशात हॉलच्या मधोमध असणाऱ्या एका कट्ट्यावर शक्तिमान अवतीर्ण झाला. सर्व पालक आश्चर्याने शक्तिमानकडे पाहू लागले. त्याने आपल्या नेहमीच्या पद्धतीने बोलण्यात सुरुवात केली. 

प्रत्येकाला वाटत असेल, माझा मुलगा असा कसा निघाला? 


आता मी प्रकाशयोजना मोठी करतो. त्यामध्ये तुम्ही कोणकोण आले आहात ते बघा. त्यानंतर त्या स्टेडियम रुपी हॉलची प्रकाश योजना तीव्र करण्यात आली सगळे पालक एकमेकांकडे बघू लागले. त्यात कोणी उद्योगपती होते, कोणी बडे डॉक्टर होते, कोणी सरकारी ऑफिसर होते, कोणी शिक्षक, कारकून आणि अगदी मोलमजुरी करणारा सामान्य पालकदेखील होता. 


पालकांनो! घाबरू नका परंतु मी तुमचे किडनॅपिंग केलेले आहे.

का? कशासाठी? आम्ही काय केले? आणि शक्तिमान तू असा असाशिल असे वाटत नव्हते. आता काय तुला आमच्याकडून पैसे हवे का? किती पैसे हवे बोल,  एक उद्योगपती बोलला. 

अरे! माझ्याकडे काय कमी? आहे मी सरकारी क्लास वन ऑफिसर आहे. फक्त तू नोटांचा आकडा बोल. 

अरे! आम्ही डॉक्टर आहोत, आमचे हॉस्पिटल आहे. तुला दिलेले पैसे आम्ही सहा महिन्यात वसूल करू. तू फक्त आकडा सांग असे सगळीकडून आवाज आले. त्यानंतर मात्र दोन-चार क्षीण आवाज देखील आले. शक्तिमान! आम्ही गरीब मोलमजुरी करणारी माणसे, आमच्याकडे कुठला आला पैसा, आम्हाला चुकीने किडनॅप केले असे वाटते. त्यानंतर शक्तिमान नेहमीप्रमाणे त्याच्या पद्धतीने हसला आणि म्हणाला .

तुम्ही अजून शक्तिमान ला ओळखले नाहीत? शेवटी तुम्ही तुमची लायकी दाखवली .अरे मला काय करायचा पैसा? आता मी काय सांगतो ते कान देऊन ऐका तुम्हा सगळ्यांच्या मुलांना एक घातक व्यसन लागलेले आहे. 

कुठले -कुठले? कसल व्यसन? 

तो गुटखा खातो?

 तंबाखू खातो?

 सिगारेट ओढतो?

  हुक्का ओढतो?

 दारू पितो? 

काही पालक म्हणाले .

काही पालक म्हणाले आमची मुले अजून किती लहान ,दहा-बारा वर्षाची आहेत ती कशी असंल असे व्यसन करतील? शक्तिमान काहीतरी खोटे सांगतो आहे .

नाही मी खरे बोलतो आहे. अगदी पहिलीच्या लहान मुलापासून ते कॉलेजच्या मुला पर्यंत तुम्हा सर्वांचा मुलांच्या हातात सतत मोबाईल असतो ,आणि ते तर व्यसन मोठे घातक आहे. 


हे ऐकल्याबरोबर तेथे एकदम शांतता, पिन ड्रॉप सायलेन्स सर्व पालकांना शक्तिमान चे म्हणणे पटले. शक्तिमान खर आहे ,,आम्ही आमच्या मुलांच्या हातातून मोबाईल सोडवू शकत नाही. मुले आमचे ऐकत नाहीत. शिवाय आम्ही नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर पडलो की ऑनलाइन वर्गाच्या शाळेच्या निमित्ताने ते हातात सतत मोबाईल ठेवतात. शिवाय आजच्या धकाधकीच्या जीवनात कोणाला काही अडचण आली तर घरच्यांचा संपर्क करता आला पाहिजे या हेतूने आम्ही मुलांकडे मोबाइल दिलेले पण होते. परंतु मुले त्याचा गैरवापर करतात. 

पटले ना ?मग आता मी सांगतो तसे करा आणि माझे ऐका. 

तुम्हाला मी काही दिवस माझ्याकडे ओलीस ठेवणार आहे. त्याबदल्यात तुमची मुले सुधारून दाखवतो की नाही पहा. तुम्ही फक्त मला सहकार्य करा सर्वांनी आता डोळे मिटा

*******"*******"******"


सर्व पालकांनी डोळे मिटून घेतले त्यांना स्वतः भोवती गरगर फिरल्या सारखे वाटत होते. तसा शक्तिमान गायब असे होताना स्वतःभोवती गरगर फिरतो तसा संपूर्ण हॉल शक्तिमान च्या एका बोटावर गरगर फिरत होता. आणि शेवटी त्याने तो अंतराळात भिरकावला. पालकांनी डोळे उघडले तर बाहेर सगळा अंधारच अंधार. आत मध्ये मात्र हॉल प्रकाशमान होता मात्र त्यांच्या मोबाइलला आता कुठलीही रेंज नव्हती. त्.यांचे मोबाईल खेळण्यातल्या मोबाईल सारखे निर्जीव झाले होते. आत मध्ये त्यांना राहण्यासाठी सर्व सोयीसुविधा होत्या परंतु घरच्यांशी मात्र संपर्क साधता येणार नव्हता .शेवटी नाईलाजाने एकमेकांशी ओळखी करून घेतल्या. वेगवेगळ्या प्रोफेशन ची, वेगवेगळ्या वातावरणातली, वेगवेगळ्या आर्थिक, सामाजिक, परिस्थितीतली माणसे एकत्र येऊन गुण्यागोविंदाने राहत होते. त्यांना तेथे स्वतःचे अन्न स्वतः बनवून खायचे होते. काही काळ त्यांना आपण एखाद्या बिग बॉस सारख्या शोमध्ये सहभागी झालो नाही ना असे वाटू लागले. 


बिग बॉसमध्ये दोन टीम मध्ये भांडणे मारामाऱ्या असतात. इथे तसे काही होत नव्हते साधारण समवयस्क मंडळी एकत्र येऊन, ग्रुप करून आपल्या लहानपणी च्या आठवणी जागवत होते. गप्पागोष्टी करीत होते. आणि शेवटी अति कंटाळा आल्यावर ते मोठे मोठे काही तीस चाळीस पन्नास या वयोगटातील पालक आपापसात लहानपणीचे खेळ शाळेतले खेळ खो खो, कबड्डी,,लंगडी, खेळू लागले. गाण्याच्या भेंड्या लावू लागले. नाटक, नकला इत्यादी गोष्टी करू लागले. कधीकधी लहान मुलांसारखे भांडू पण लागले. पण त्यात त्यांना मजा येत होती. कोणी सिंगल पेरेंट होते त्यांची तेथे प्रेमप्रकरणे जमली. पुरुष मंडळी बायकांकडून स्वयंपाक शिकून घेत होती. अशी त्यांची मजा चालू होती पण आपण आमच्या गावात अंतराळात आहोत हे त्यांना कळले नव्हते

*********************

त्यादिवशी सर्व बातम्यांच्या चॅनल वरती एकच लाईन झळकत होती .

"प्रगल्भ" शाळेच्या सर्व पालकांना कोणा अज्ञात व्यक्तीने किडनॅप केलेले असून त्याबाबत सर्व यंत्रणा शोध घेत आहे. 

काही घरात आपला नवरा किंवा बायको कोठे गेले आहे ते माहीत होते, पण काही घरात तर ते पण माहीत नव्हते .

जेव्हा संध्याकाळी मालक मंडळी घरी आले नाहीत.,तेव्हा एकच गोंधळ उडाला. मुलांना तर यातले काहीच माहीत नव्हते. पुष्कळ मुले टीव्ही ऐवजी हातात मोबाईल घेऊन बसल्यामुळे बाहेरच्या जगात काय चालू आहे हे त्यांना कळले नव्हते .पण जेव्हा तर उरलेल्या पालकांनी एकमेकाशी फोनाफोनी केली तेव्हा खरी गोष्ट समजली.


जवळ जवळ बाराशे पालक गायब होते. टीव्ही वरती हेडलाईन देखील कोणा अज्ञात व्यक्तीने मॅनेज केली होती .एकमेकांना विचारले असता कोणालाही खरी बातमी माहित नव्हती. टीव्ही चॅनल वर बातमी आली .मी सर्वांच्या पालकांना किडन्याप केले आहे. मी कोण?हे तुम्हाला उद्या दुपारी बारा वाजता समजेल. तोपर्यंत कोणी शोध घेण्याचा प्रयत्न करू नका. मी किंवा किडनॅप केलेले पालक कोणीही सापडणार नाही. खरोखर हा मेसेज कोठून येतो कोण मॅनेज करते आहे याबाबत कोणाला काही समजत नव्हते. पोलिसांच्या सर्व यंत्रणा कुचकामी ठरल्या होत्या .दुसऱ्या दिवशी बारा वाजण्याची वाट पाहण्या पलीकडे कोणाच्या हातात काही नव्हते. 

****"*****"***"****"**


घडलेल्या घटनेकडे सारे जग डोळे लावून बसले होते. दुसऱ्या दिवशी सार्वजनिक सुट्टी घोषित केली. कारण इतर शाळेतील विद्यार्थ्यांना, पालकांना भीती वाटू लागली न जाणो आपण किडन्याप झालो तर? त्यामुळे सुट्टी जाहीर झाली आणि सगळे जग टिव्हीला डोळे लावून बसले .बरोबर 12 वाजता एखादी तबकडी गरगरत यावी त्याप्रमाणे आकाशातून काहीतरी अवतीर्ण झाले .आणि तेच टीव्हीवर मॅनेज करत होते. व्यवस्थित छबी दिसायला लागल्यावर तो शक्तिमान होता हे सर्वांना समजले. कोणी ओरडले ,कोणी हुश्श केले, कोणाला हायसे वाटले, कारण शक्तिमान चांगला आहे हे सर्वांना माहीत होते.

शक्तिमान तू आमच्या आई-वडिलांना किडनॅप केले?

 तू असं कसं करू शकतो?

 प्लीज प्लीज आमचे आई-वडील पुन्हा परत पाठव. त्या बदली आम्ही तुला खूप पैसे देऊ. आमची पिगीबँक देखील देऊ काही मुले म्हणाली.


मुलांनो तुमचे पालक खूप छान आहेत मजेत आहेत. त्यांना काहीही झालेले नाही. माझी एकच अट आहे तुम्ही सर्वांनी आपापले मोबाईल घरात ठेवून, आपल्या आई-वडिलांना शोधण्यासाठी पंधरा-वीस जणांच्या गटाने एकत्र यायचे. त्यांना कोठे ठेवले आहे हे मी दोन तासाने कळवेल तोपर्यंत तुम्ही आपले ग्रुप ठरवा. सगळ्याच मुलांची खाडकन धुंदी उतरली. सर्वांच्या हातातले मोबाईल केव्हाच गळून पडले होते. फक्त ग्रुप ठरवण्यात पुरते फोन वापरले गेले आणि पंधरा वीस जणांचा ग्रुप ठरला देखील. 


ते दोन तास मोठ्या प्रतीक्षेत काढले त्यानंतर पुन्हा एकदा शक्तिमान टीव्हीवर आला. आणि त्याने सांगितले तुमच्या शहरापासून दीडशे किलोमीटर अंतरावर ती एक मोठा पर्वत आहे त्याचे नाव गुलाबी पर्वत, कारण तेथील दगड गुलाबी लालसर आहेत. तेथील एका गुहेमध्ये मी तुमचे सर्व पालक किडन्याप करून ठेवले आहेत. जर तुम्ही प्रतिज्ञा करत असाल इथून पुढे तुम्ही कामाशिवाय मोबाईल वापरणार नाही. आणि स्वतः शोधायला याल तर तुमचे पालक मी परत देईन. तसेच मी शिक्षण मंत्र्यांना देखील ऑर्डर देतो आहे शिक्षणामध्ये 50 टक्के मार्क हे खेळांसाठी ठेवले पाहिजेत .मुलांना मैदानी खेळाची गोडी लावणे, त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणे, त्यांना त्यासाठी साठी मार्क ठेवणे, तसेच त्यांना इतिहासाची गोडी लावा. आपल्या पूर्वजांनी किती पराक्रम करून ठेवले आहेत त्याबाबत माहिती द्या. 


विज्ञान, भूगोल, ग्रहगोल, तारे आकाश दर्शन, या सर्वांचे बाहेरच्या जगात निघून प्रात्यक्षिक दाखवणे. निसर्गाच्या सान्निध्यात शिक्षण देणे .चार भिंतीच्या खुराड्यात शिकवण्यापेक्षा निसर्गाच्या सानिध्यात प्रात्यक्षिकांवर भर देऊन शिक्षण पद्धती ठेवणे हे जर सारे मान्य असेल तरच मी किडनॅप केलेले पालक परत करेन. अन्यथा हळूहळू इतर शाळेचे पालक किंवा मंत्र्यांची मुले किडन्याप होतील हे लक्षात असू द्या. 

*********************


माननीय पंतप्रधानांना शक्तिमान च्या या धाडसाचे कौतुक वाटत होते. कारण यातील कोणतीही गोष्ट त्यांनी स्वतःसाठी केलेली नव्हती किंवा स्वतःसाठी काही मागितले नव्हते. उलट मोबाईलच्या नादात वर्चुअल दुनिया मध्ये वाहून जाणाऱ्या मुलांना, पुढच्या पिढीला एक प्रकारे त्याने सावरण्याचा प्रयत्न केला होता. शक्तिमान च्या मागण्या पंतप्रधानांनी मान्य केल्या आणि लवकरच शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यात येईल असे सांगितले. 


मात्र पुढचे काम कठीण होते. आपल्या पालकांना शोधण्यासाठी मुलांनी स्वतःचे मोबाईल घरी ठेवून जायचे होते. पोलिसांची किंवा कोणाचीही मदत घ्यायची नव्हती. शेवटी आपल्या आईवडिलांसाठी मुले घराच्या बाहेर पडली. त्यांचे एकमेकाचे छान ग्रुप झाले आणि कोणतेही वादविवाद भांडण-तंटा न करता मुले मार्गक्रमणा करू लागले. कारण त्यांच्या डोळ्यापुढे आपल्या पालकांना सोडवण्याचे ध्येय होते. शेवटी कोणते तरी ध्येय असल्याशिवाय मार्गक्रमणा होत नाही. मुलांना जवळ पैसे द्यायचे नाहीत हा देखील नियम होता. पण त्यामुळे पूर्ण रस्त्याने तेथील मंडळी मुलांना मदत करत होती. त्यांना खायला देत होती. विश्रांतीला जागा देत होती. मुलांमध्ये देखील एका युनिटी ची भावना निर्माण झाली.मोबाईल पेक्षा बाहेरचे जग खूप छान आहे हे त्यांना पटत होते. एकमेका बद्दल थोडी देखील माहिती नसलेले विद्यार्थी एकमेकांच्या घरची चौकशी करू लागले. एकमेकांना धीर देऊ लागले. अशा रीतीने त्यांची प्रभात फेरी, मार्गक्रमणा करीत करीत गुलाबी पर्वताच्या दिशेने निघाले. रोजचे 10 किलोमीटर अंतर पकडले तरी दीडशे किलोमीटर साठी मुलांना पंधरा ते वीस दिवस लागणार होते. सोबत मोठी माणसे घ्यायची नव्हती. परंतु मुले ज्या गावात, ज्या शाळेत उतरत असत तेथील मंडळी त्यांची सेवा करत होते. दिवसभर चालून चालून थकलेले त्यांचे पाय या गावातील छोटी मुले मोठी माणसे चेपून देत होते. एखादे संकट आले कि माणसामाणसांमध्ये एकोप्याची भावना निर्माण होते. तशीच काहीशी गोष्ट झाली होती. हळूहळू मार्गक्रमणा करत करत पंचवीस दिवसांनी मुले गुलाबी पर्वताच्या पायथ्याशी पोचली .अर्थात साऱ्या रस्त्याने मीडिया वाल्याने काही त्यांचा पिच्छा सोडला नव्हता. एखाद्या वारीचे चित्रीकरण करावे आणि त्याचे रोजचे अपडेट टीव्हीला द्यावे तसे चालू होते .गुलाबी पर्वताच्या पायथ्याशी आल्यावर शक्तिमानने सर्व टीवी वाल्यांना परत पाठवले. मुलांना शांतपणे खाली बसायला सांगितले आणि विचारले आता तुम्ही एवढे कष्ट करून इथपर्यंत आला आहेत .यातून तुम्हाला काही धडा मिळाला का? जर काही सुधारणा झाली असेल आणि तुम्ही मोबाईल च्या आहारी जाणार नसाल, फक्त अभ्यासात पुरता मोबाईल वापरणार असाल तर मी तुमचे पालक खाली आणून देतो. अन्यथा पर्वत कडा आणि गुहा शोधा कोठे असतील त्यातून तुमचे पालक घेऊन जा. परंतु या गुलाबी पर्वताचे एक वैशिष्ट्य आहे रात्री येथे हीच श्वापदे निघतात.


मुले आता खूप सुधारली होती. पंधरा दिवसात मोबाईल नसला तरी आपण खूप छान राहू शकतो, जग खूप बघण्यासारखे आहे आपण त्यातली मजा घेऊ शकतो हे मुलांना कळले. शक्तिमान ने विचारले इथपर्यंत येईपर्यंत तुम्ही खूप थकून गेला खरे की नाही. ? 


 होय शक्तिमान! 


का बरं? थकून गेलात? तुम्ही तर अजून खूप लहान आहात. 

 तुमच्या मध्ये खूप ऊर्जा पाहिजे पण तुम्ही लवकर थकता का बरे? 

कारण शक्तिमान ! आमच्या शरीराला व्यायामाची सवय नाही. आम्ही खातो पितो टीव्ही पाहतो ,मोबाईल पाहतो आणि अभ्यास करतो .शिवाय रोजच्या स्पर्धेचे आमच्यावर टेन्शन असते. या अभ्यासक्रमाचे आमच्यावर टेन्शन असते. आम्ही खातो ते ठीक नसते . पौष्टिक नसते. आम्हाला पिझ्झा ,बर्गर, चायनीज असले खाण्याची सवय असल्याने आमच्यात शक्ती नाही. 

तुम्हाला माझ्यासारखे शक्तिमान बनायचे आहे ना? मग आज पासून तुम्ही दूध, फळे, पौष्टिक आहार, व्यायाम, जोर-बैठका, धावणे ,पळणे, मैदानी खेळ या सर्वांवर लक्ष केंद्रित कराल .

माझे म्हणणे पटते का? 

हो! हो, शक्तिमान 


मग तुम्ही इथून पुढे स्वतःच्या मनाने या गोष्टी करणार की तुमच्या पालकांना किडनॅप केले म्हणून आता पुरते बोलणार? 

नाही शक्तिमान तू आमचे डोळे उघडले आहेत. आम्हाला आता वर्च्युअल दुनियेपासून खऱ्या दुनियेची जाणीव झालेली आहे. 


सॉरी शक्तिमान! आम्ही आता असे करणार नाही. मग सर्वांनी डोळे मिटा आणि ओमकारचा मोठा नाद करा. तो सगळ्या ब्रह्मांडात भरून जाऊ दे. त्याबरोबर तुमचे पालक तुम्हाला भेटतील. खरोखर सर्व मुलांनी डोळे मिटले आणि ओंकाराचा मोठा नाद केला. तोपर्यंत अंतराळात भिरकावले ल्या त्या स्टेडियम रुपी हॉल ला शक्तीमान ने आपल्या शक्तीने खाली आणले. सर्व मुलांना आत सोडले, सव्वीस दिवसांनी आपल्या पालकांची आणि मुलांची भेट झाली होती. ती मुले आणि पालक कित्येक वर्षांनी गळाभेट घेत होते. कारण त्यांच्या रोजच्या बिझी आयुष्यामध्ये त्यांनी कित्येक वर्षात एकमेकाची

गळाभेट घेतलेली नव्हती. त्यानंतर शक्तिमाने त्यांना काही क्षणात त्यांच्या शहरात पोहोचवण्याची व्यवस्था केली. शक्तिमानला दिलेल्या आश्वासनानुसार पंतप्रधानांनी शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल केला आणि भारत वर्षाची पुढची पिढी सुदृढ आणि बुद्धिमान निर्माण होऊ लागली शक्तिमान चे स्वप्न साकार झाले. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy